श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 14 November, 2013 - 23:45

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य लोक "माऊली" या नावानेच हाक मारतात. तेराव्या शतकाच्या अगदी शेवटी ज्यांनी या महाराष्ट्रात जे अलौकिक असे जीवन जगून दाखवले त्यांच्या विषयी अजूनही सर्व भाविकांच्या मनात एक विलक्षण श्रद्धा आहे, आदर आहे.
याचे मुख्य कारण हे त्यांनी केलेले चमत्कार नसून संस्कृतातील भगवद्गीता मराठीत आणण्याचे जे थोर कार्य केले तेच होय. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो.

ज्ञानेश्वरीविषयी सर्वच भाविक, पंडित, तत्वज्ञानी मान डोलावतात, हात जोडतात. पण ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात कोण कोण डोकावतात हे पहाणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे.
सुमारे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी वापरलेली मराठी भाषा ही आताच्या काळात समजायला खूपच अवघड आहे, तसेच त्यात अनेक उपमा, दृष्टांत असे वापरले आहेत की ते समजावून घेतानाच इतके कठीण जाते तर ते स्वतः समजावून घेऊन इतरांना सांगणे हे आणखी अवघड झाले आहे.
सहाजिकच ज्ञानेश्वरीला केवळ नमस्कार करणारेच जास्त आहेत. फार झाले तर पारायणे करण्याचा एक पवित्र ग्रंथ एवढेच महत्व तिला दिले जाते.

स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिली हे ही आपणच मोठ्या अभिमानाने सांगतो आणि ती वाचायची केव्हा तर म्हातारपणी, पेन्शनीत निघाल्यावरच असा मोठा विरोधाभासही आपणच निर्माण करतो.

ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा तर भाषा समजत नाही, अर्थ समजत नाही - हे मुख्य कारण सर्व सामान्यांकडून दिले जाते. हे समजून घेता येण्यासारखे आहे. याला एक उपाय म्हणजे या भाषेचा डौल, नजाकत जर आधी समजून घेतली तर जरा गोडी लागून काहीबाही तरी ज्ञानेश्वरी आपण वाचण्याचा प्रयत्न करु.

याकरता आपण सरळ ओव्याच वाचायला सुरुवात करु या तर....

ज्या ओव्या एकदम अपिल होतात त्या तरी आधी पाहू यात जरा ......(अध्याय पहिला)

जैसें शारदीचिये चंद्रकळे| माजि अमृतकण कोंवळे| ते वेंचिती मनें मवाळें| चकोरतलगें ||५६||
तियापरी श्रोतां| अनुभवावी हे कथा| अतिहळुवारपण चित्ता| आणूनियां ||५७||
हें शब्देंवीण संवादिजे| इंद्रियां नेणतां भोगिजे| बोलाआधि झोंबिजे| प्रमेयासी ||५८||
जैसे भ्रमर परागु नेती| परी कमळदळें नेणती| तैसी परी आहे सेविती| ग्रंथीं इये ||५९||
कां आपुला ठावो न सांडितां| आलिंगिजे चंद्रु प्रकटतां| हा अनुरागु भोगितां| कुमुदिनी जाणे ||६०||
ऐसेनि गंभीरपणें| स्थिरावलोनि अंतःकरणें| आथिला तोचि जाणें| मानूं इये ||६१||

चांदणे हेच ज्याचे अन्न आहे असा चकोर पक्षी ही एक कविकल्पना. शरदऋतूतील स्वच्छ चांदणे पडले असताना ज्याप्रमाणे चकोराची पिले हे अमृतकण अतिशय हळुवारपणे हे कोवळे अमृतकण टिपतील त्याप्रमाणे अतिशय हळुवार अंतःकरणाने ही ज्ञानेश्वरी तुम्ही श्रोतेजन अनुभवा.
शब्दांशिवाय संवादण्याची, इंद्रियांना जाणू न देता भोगण्याची ही गोष्ट आहे. थेट सिद्धांतांनाच भिडण्याची अपेक्षा माऊली करताहेत.
जसे भुंगे हे इतक्या हळुवारपणे कमळातील परागकण नेतात की त्या कमळाला पत्ताही लागत नाही त्याप्रमाणे श्रोत्यांनी अतितरलपणे या ग्रंथाचा अनुभव घ्यावा.
चंद्रविकासी कमळाची अजून एक उपमा माऊली देतात - चंद्र उगवला की हे कमळ फुलते जणू काही आपली जागा न सोडता ते जणू चंद्राला आलिंगन देते अशा अतिशय भावविभोर पद्धतीने, स्थिर अंतःकरणाने जो हे वाचेल (अनुभवेल) त्याच्याच हे सारं लक्षात येईल.

अशा भावपूर्ण अंतःकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली तर काही बाही हातात पडावे अशी आशा आहे.
मी कोणी ज्ञानेश्वरीचा जाणकार वा अंतरंग अधिकारी नाहीये. एकंदर लोकांना ज्ञानेश्वरीविषयी आवड तर वाटतेच पण त्याचजोडीला भाषेचा अडसरही जाणवतो हा एक विचित्र तिढा कसा सोडवता येईल याकरता हा खटाटोप. आपल्या पैकी कोणी अजून सोप्या पद्धतीने या ओव्या समजावून सांगितल्या तर त्यांचे स्वागतच आहे.

मुख्य भाग असा आहे की ज्ञानेश्वरीची गोडी लागून ती जास्तीत जास्त लोकांनी वाचावी, त्याचा अभ्यास करावा.
--------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ५

http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ६

http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ७

http://www.maayboli.com/node/46959 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ८

http://www.maayboli.com/node/48725 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ९
--------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/svarup/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मस्त झालीये.

मला तलगे याचा अर्थ बरेच दिवस माहीत नव्हता. तेंव्हा चकोर चंद्रकिरण पितात असा आसपासचा अर्थ लाऊन समाधान मानून घेत होतो. पण तरी अपूर्णता जाणवत होतीच. जेंव्हा तो अर्थ कळला तेंव्हा झालेला आनंद अजूनही आठवतोय. ज्ञानेश्वरी अगदी वरवर वाचली तरी बरेच काही हाती लागते. पण जेंव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ लागतो तेंव्हा माउलींची प्रतिभा खर्‍या अर्थाने उमजते आणि ओवीचा अर्थ चपखलपणे डोक्यात बसतो.

शब्दांचे अर्थ समजण्यास थोडी अडचण असली तरीही, वर म्हटल्या प्रमाणे ज्ञानेश्वरी हि स्वानुभूति घेण्याची गोष्ट आहे. मला खालील २ पुस्तकांचा खूप उपयोग झाला. आपणाला हि उपयोग होईल हि आशा.

१. घरोघरी ज्ञानेश्वरी

http://www.gharogharidnyaneshwari.com/

२. सम ओवी ज्ञानेश्वरी - अंजली ठकार

धन्यवाद

व्वा... छान सांगत आहात शशांकजी! Happy
अजुन येउ द्यात.
तुम्ही निरुपण छान करु शकाल. Happy

खूपच छान !
चकोराची पिले हे अमृतकण अतिशय हळुवारपणे.. चकोरपक्षी चांदणे पिऊन जगतो.तेच मुळी कोमल भाव दाखवतात.त्यात त्याच्या पिलांनी चांदणे टिपले म्हणजे अधिक कोमलता ...कवयित्री प्रभा गणोरकरांनी आम्हाला ज्ञानेश्वरीचा हा अध्याय शिकवित असताना सांगितलेला अर्थ.अतिशय सुरेख शिकवायच्या.

सुंदर सुरवात झाली.
कमळातील पुंकेसरापासून निघालेला वारा, डोळ्यातील बुब्बुळांना जितक्या हळूवार पणे स्पर्श करेल ( तसे वक्त्याचे बोलणे असावे ) अश्या अर्थाची पण एक ओवी आहे ना. शाळेत शिकल्याचे आठवतेय.

खूप छान सुरुवात.पुढचे भाग लवकर येउदे.आस्वादात्मक टिका शिकवताना निकुंब सर आम्हालाही ओवि इतकी छन समजाउन सांगायचे.४० वर्षे उलटुन गेली तरी अजुन डोळ्यासमोर वर्ग उभा राहतो.

वा! खूप आवडेल अशाप्रकारे ज्ञानेश्वरी समजून घ्यायला! मला हरिपाठाचा देखील अर्थ हवा आहे. बऱ्याच ओव्या सोप्या आहेत पण अधिक चांगल्या प्रकारे शब्दार्थ आणि भावार्थ यांची सांगड घालून कोणी अर्थ उलगडून दाखवला तर हवा आहे!
अवांतर, ज्ञानेश्वर कवी म्हणून देखील किती थोर होते!

हे चांगल केलत. तुम्ही सांगितल्यानुसार मी ज्ञानेश्वरी आणून वाचायला सुरुवात केली पण काही दिवस वाचून वेळ मिळत नाही हे निमित्त काढून मग कंटाळा केला. इथे रोज वाचता येईल.

सर्व माऊलीभक्तांना सादर प्रणाम .....

मूळ ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या दररोज वाचत गेल्यास ज्ञानेश्वरी कळेल हळुहळु व मग गोडीही लागेल त्या भाषेची ....

वा, आवडलंच.

भगवद्गीता सामान्य जनांना समजावी म्हणून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहीली पण आता अशी वेळ आली आहे की ते मराठीसुद्धा कळत नाही.मीही प्रयत्न केला होता अनेकदा वाचायचा. पण गर्भितार्थ नीटसा न समजल्यामुळे ते वाचन केव़ळ यांत्रिकपणे होते आणि मग कंटाळून सोडून दिले जाते.

तुम्ही खूपच सोप्या शब्दांत लिहीलंयत. त्यामुळे हे सारे भाग तरी नक्की वाचेन.

धन्यवाद !