घरात बाग करायची आहे

Submitted by वेल on 13 November, 2013 - 06:02

मी मुंबईत - बोरिवली पश्चिमेला राहाते. इमारतीत, पाचव्या मजल्यावर. गॅलरी नाही. छोटासे तीन फ्लॉवर बेड आहे ९ फूट बाय दीड फूट. ऊन येईलच याची गॅरण्टी नाही. दोन फ्लॉवर बेडचा अक्सेस घ्ययला तीन फुटाची भिंत आहे. इमारतीला अकराव्या मजल्यावर गच्ची आहे आणि खाली छोटी बाग आहे. सोसायटीने बागेत सध्या तगर लावली आहे. इमारतीच्या मागे मोठी मोठी आठ दहा झाडं आहेत, कडूनिंब, चिंच आणि मला वाटतं रेन ट्री आहे. त्या झाडांवर खारी, पोपट, साळुंक्या आणि कावळे असतात. त्यामागे मुसलमान लोकांची दफन्भूमी आहे. त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.

मला स्वत:ला बागकामाचा काहीही अनुभव नाही. आवड आहे का नाही तेही माहित नाही. पण असं वाटत राहावं स्वत:ची भाज्यांची, फळांची बाग असावी. जेवणात स्वतःच्या बागेतल्या मिरच्या, टॉमेटो, वांगी, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी एवढ्या तरी भाज्या असाव्यात असे वाटते. आई तिच्या घरच्या बागेत झाडं लावली आहेत पण तिच्याच्याने देखभाल फारशी होत नाही (असे मला वाटते, म्हणजे वरचे वर माती खुरपणे, झादे छाटणे इ.)

घरी कुंड्या आणि माती आणली आहे, परंतु काय करावे कसे करावे सुचत नाही. एक छोटे लिंबाचे झाड येते आहे कुण्डीत. माझ्या घरात तुळस अज्जिब्बात टिकत नाही. आसाबांनी लावून पाहिली मी लावून पाहिली, अनेक वेळा लावून पाहिली. आई म्हणते, तिला "त्या" दिवसातला वारा लागतो आणि मागे स्मशानभूमी आहे म्हणून,पण मला ते पटत नाही. आता मी माझी छोटीशी बाग कशी बनवू? कुठल्या झाडापासून सुरुवात करू.

इमारतीच्या कम्पाउण्ड मध्ये मला वासाची मोठी होणारी झाडं लावायची आहेत, उदा. बकुळ किंवा मिडियम साईजची राहतील अशी रातराणी किंवा जुई चालतील. ती कशी लावायची? बियाणे कुठे मिळेल? नारळ आंबा लावता येतील का?

अनुभवी हुषार लोकांनी मला मदत करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी आणि गमभन - आमच्याकडे देवपूजाच होत नाही. तुळशीला ऊन लागतं का? ते मात्र मिळत नाही.

गमभन - कोरफड सावलीतच लावली होती. हे मला माहितच नव्हतं एवढी मस्त वाढलेली कोरफड, मी पार्ल्याहून आणली होती खास. आणि तिच्या नादात माझा मुलगा - सहा महिन्याचा होता तो, बेडवरून खाली पडला होता.

खरं तर माझ्या डोक्यात खूप भीती आहे, मला जमेल का झाडांची काळजी घ्यायला, आईची घरातली बाग मोठी आहे, तिला कधी पाणी पण घातले नाही मी. पण आता काहीतरी करावेसे वाटते.

पडवळ, घोसाळ्याचे वेल कुंडीत वाढतात ना? त्याला किती ऊन लागत? ग्रिलवर सोडले तर वाढतील का?

आता शनिवारी कोरा केंद्रात जाऊनच पाहाते.

सुशांत - http://www.eltindia.com/ ही वेबसाईट मस्तच आहे. असं काही आपल्याला घरात लावता येतं? आणि त्याची फारशी काळजी पण घ्यायला लागत नाही का? अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये लागणार्‍या भाज्या पण लागू शकतील का? किती खर्च येईल? माझा नवरा म्हणेल - तू खर्च जास्त करशील आणि काळजी घेता नाही आली तर सगळा फुकट जाईल, झाडांची वाट लागेल ते वेगळेच. खरंतर कुंडीत लावण्याच्या झाडाबद्दल पण हेच म्हणेल तो.. पण त्यात खर्च थोडासा आहे म्हणून फारसं काही वाटत नाही.

वल्लरी,
एकदम सगळी झाडे लावायच्या ऐवजी आधी थोडी झाडे लावा. ती जगली की मग नंतर हवे असल्यास थोडी थोडी करुन मग इतर झाडे लावा.

दिनेशदा,
तुम्ही बिमली म्हणून उल्लेख केलाय ते झाड कोणते? विलायती चिंच (Pithecellobium dulce) का?

देवीदास लेनवरही एक नर्सरी आहे. सेंट लॉरेन्स शाळेकडून स.व.पटेल मार्ग/सुधीर फडके फ्लायओव्हरकडे जाताना डाव्या हाताला.
इथे डी एन म्हात्रे रोड आणि देवीदास लेनला मिळतोय त्या कोपर्‍याला रस्ता ओलांडून.

गमभन,
बिमली साधारण तोंडल्यासारखी दिसते. रंगाने चमकदार पोपटी असते. पाने आणि झाड आवळ्यासारखेच असते. आणि बिमल्या खोडालाच लागतात. माझ्या रंगीबेरंगी पानावर फोटो असेल.

गोकर्ण चा निळया फुलाचा वेल लावून सुरुवात करा .वर्षभर फुले येतात आणि फुलचुकी सनबर्ड रोज फुलांवर दोनवेळा येतील .

मी मारे मोठे मोठे प्रश्न विचारले, मला आतत्ता सगळं वाचताना - खर तर सनबर्डस बद्दल वाचताना लक्शात आलं माझ्या फ्लॉवर बेड्सला आम्ही अगदी बारिक जाळी लावली आहे. डास येऊ नयेत म्हणून. (आणि आत्ताच नव्याने ती लावली आहे, जुनी काढून) त्यातून फुलपाखरं, मदत करणारे किटक, पक्षी आत नाही येऊ शकणार, मग मिरच्या, टॉमेटो साठी परागीभवन कसं होणार? वार्‍याने जेवढं होतं तेवढं पुरेल का?

आणि मला अजून कळत नाहीये माझ्याकडच्या खिडक्यात ऊन फारसं येत नाही, कधीकधी तर नाहीच नाही. काय होईल. मिरची, टॉमेटो, वांगी, दुधी वगैरे होतील का? का मी उत्साहाने नुसत्या उड्या मारतेय? सर्वात आधी ह्यातलं काय होईल म्हणजे वेल/ झाड छान वाढेल आणि माझ्या उत्साहावर पाणी फिरणार नाही.

असो. आजपासून ओला कचरा बालदीत जमवायला सुरुवात केली. आज त्याच्यावर माती टाकेन, बॅक्टेरिया कल्चरवाली. बोरिवलीत, बाभई सिग्नलच्याजवळ छोटासा भाजीबाजार आहे तिथे बागकामाचं सामन मिळतं तिथून घेउन येईन. बाकीच्या कुंड्यात पालक, मेथी आजच लावणार आहे, त्याला कडक ऊन नसेल तर चालेल ना?

बाकी गोकर्ण पारिजातक, बेल, सिताफळ, पेरू, डाळिंबे, बकुळ, चाफा, बूच, बिमली, करांद्याचा वेल, पडवळ, दूधी, कारली हे सारे नुसते बियाणे मातीत टाकले आणि त्याची काळजी नाही घेतली तर येईल का? कारण मी ते सोसायटीच्या कुंपणात झाडांच्या मध्ये टाकणार, तिथे वेल किंवा झाड आले तर आपोआप काळजी घेतली जाईल पण जर मी त्याच्याकदे मुद्दाम लक्श देत राहिले तर .. आमच्या सोसायटीत थोडे विचित्र लोक सुद्धा राहतात, त्यांचा भरवसा नाही, आरडाओरड सुद्धा करतील. म्हणून विचारलं. (आमच्या माळ्याल विश्वासात घेऊन काही खास लक्ष देता येतं का पाहते)

आणि मला अजून कळत नाहीये माझ्याकडच्या खिडक्यात ऊन फारसं येत नाही, कधीकधी तर नाहीच नाही.

वल्लरीच सांगायला वाईट वाटते पण उन नसेल तर मिरची, टोमॅटो, वांगी, तुळस इत्यदी मंडळी रुसणार.. उगीच आपल्या हौसेसाठी त्यांचे हाल करु नका.

अजिबात उन लागत नाही अशी शोभेची झाडे नर्सरीत भरपुर मिळतील, ती लाऊन हौस पुरवुन घ्या. दुसरा उपाय नाही.

खालीही जी झाडे, रोपे, वेली लावणार त्या नुसत्या बिया टाकुन येणार नाही. व्यवस्थित माती तयार करुन, आळी करुन लावली तर त्यांची वाढ व्यवस्थित होईल. मोठी झाडे होणा-या रोपांनाही पहिले वर्ष खुप जपावे लागते, नियमीत देखभाल करावी लागते.

माळी असेल तर त्याला सांगुन करता येईल. पण तो नसेल आणि वर सोसायटीत विक्षिप्त लोक असतील तर उगीच निराशा पदरी पडेल वर पैसेही वाया जातील.

मी असल्या उद्योगात भरपुर पैसे वाया घालवलेत म्हणुन ही निराशावादी पोस्ट. पण उड्या मारण्यापुर्वी आपला आवाका बघुन उड्या मारा. जर सगळे नीट झाले तर आनंदीआनंद होईलच. Happy

साधना, तुमच्या मेथी टोमॅटो कोथिंबीरच्या पोस्टमध्ये वाचलं, अळू सावलीत छान होतो, मी तोच लावला तर, अजून काय लावता येईल?

मला फक्त हौसेसाठी झाडं नाही लावायची .. त्यांचा काही तरी तर उपयोग झाला पाहिजे घरात नाहीतर त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष होणार.

सोसायटीच्या सामायिक जागेत काहीही करू नका .भांडणाशिवाय काही हाती लागत नाही .वेलाला जाळीतून एका ठिकाणी बाहेर काढून द्या की झाले काम .

साधना, srd

मला पण तीच भीती आहे. पण तरी मी एकदा विचारून बघेन म्हणते सेक्रेटरीला, किंवा सांगते तुम्ही परवानगी द्या मी सोसायटीसाठी हे सगळं करायला सुरुवात अक्रते, फार काय मला म्हणतील कशाला कष्ट वाया घालवतेस. पण ती हिरवी भिंत, त्यावर फुललेली छान फुलं, त्यांच्यावर आलेले पक्षी, त्या फुलांचा पसरलेला सुगंध... मला कल्पनेनेच इतकं छान वाटतय.

अळूला पाणी खूप लागतं ना? आमच्याकडे लावला होता तेव्हा गड्याने सांगितलं होतं. चिखल होइल इथपत पानी राह्यलं पाहिजे म्हणून.

पालक मेथी घर्च्याघरी उगवता येतील, फारसे ऊन नसले तरी चालेल.

नंदिनी, कुंडीत चिखल करणं खूप सोपं पडेल ना, नाही का. करून तर पाहू.

मला ते दिनेशदांचं निसर्गाच्या कोनफळ पण आवडलं आहे. जमतं का पाहाते. मला कोनफळाचे काप खूप आवडतात आणि बाजारात कोनफळ खूप महाग आहे, आमचं कुटुंब मोठं आहे - ७ जण, सगळ्यांना पुरेल असं कोनफळ आणयचं म्हणजे ...

अळूला पाणी जास्त लागते हे खरंय पण अगदी चिखल व्हायला पाहिजे असे नाही. जमिनीत ओल कायम राहिल एवढे पाणी पुरे असते.

अगं मी लिहिलंय ते अळूवडीचं अळू. अळूला सावलीच लाभते, कडक उन्हात जळते बिचारे.

भाजीचे अळू मात्र कुंडीत लावण्यात काहीच राम नाही. भाजी करायची तर एका वेळी कमीतकमी २५-३० पाने तरी हवीत आणि खिडकीतल्या कुंडीत नाही होणार एवढी पाने. अळूला भरपुर चिखल आणि पसरायला भरपुर जागा हवी. हे दोन्ही घटक असले की ते भराभरा वाढते आणि भाजी करता येईल इतकी पाने येतात. म्हणुन गावी भाजीचे अळू नेहमी घराबाहेर जिथे सांडपाणी वाहुन जाते तिथे लावतात.

अळूवडीचे अळू कुंडीत होते नीट. फक्त कुंडी मोठी पाहिजे. अळूची मुळे आत पसरतात आणि त्यापासुन परत रोपे फुटतात. दिड फुटी कुंडी असली तर एका वेळी ६-७ पाने मिळतात.

तु प्रयोग म्हणुन एक कुंडी ठेव आणि त्यात तुला जे लावावेसे वाट्ते ते लाव - एकावेळी एकच प्रकार Happy त्याची प्रगती पाहुन तुला ठरवता येईल की नीट होईल की नाही ते.

सध्या जर तुझ्याकडे कुंडी असेल तर घरात साध्या लाल संकेश्वरी मिरच्या अस्तात त्याच्यातल्याच बीया लाव. म्हणजे काहीच खर्च न करता बागकाम सुरू केल्याचा आनंद मिळेल. मिरचीच्या रोपाला पण उन पाहिजेच पण तुला निदान डोळ्यासमोर रोप वाढत असलेले पाहिल्याचा आनंद तरी मिळेल. मिरच्या लगेच लागतात महिना-दिड महिन्यात सगळे नीट असेल तर.

कोनफळ?? तुला नीरफणस म्हणायचे का? कोनफळ हा कंद आहे. तुझ्या ७ जणांच्या फॅमिलीला पुरेल इतका मोठा होईतो त्याचा वेल टिकला म्हणजे झाले. Happy

for konfal,

http://www.maayboli.com/node/2590?page=8

मी वडीचे अळू लावेन आणि मग त्याची भाजी करून खाईन. मज्जा..

नीरफनस लावण्याचा प्रयत्न करणारे, पण आधी म्हटलं त्याप्रमाणे सोसायटीला जरा मस्का...

आपल्याकडे कोनफळ फार मोठे होत नाही. मुंबईतलेच मध्यम बटाट्याच्या आकाराचे कोनफळ मी नायजेरियात लावले होते. सहा महिन्यात ४ किलो वजनाचा कंद झाला होता. ( मायबोलीवर फोटो टाकला होता मी. ) जिथे पाणी वहात असते तिथे अळू छान वाढते. पुर्वी न्हाणीघराजवळ लावत.
नीरफणसाचे झाड खुपच मोठे होते. त्याच्याखाली दुसरे झाड जगत नाही.

झाडांना उन मात्र मिळालेच पाहिजे. हवी तर कुंड्यांची जागा त्यानुसार बदलायची. आता मार्च पर्यंत आपल्याकडे दक्षिण दिशेकडून उन येईल ( दक्षिणायन आहे म्हणून ) मार्चनंतर उत्तरेकडून. कमी उन्हात होणारी इनडोअर प्लान्ट्स असतात. मनिप्लांट तसेच आहे.

दिनेशदा, तुमच्याच कोनफळाची लिंक दिली आहे. ६ महिन्यात ४ किलो, मला ३-४ महिन्यात १-१.५ किलो झालं तरी पुरे. प्रयत्न करून पाहेन.

आज लाल मिरचीच्या बिया, धणे, आलं, मूग, मेथी, पुदिना इतकं लावलं कुंडित. मी नव्हे, माझ्या घरात आसाबांना सांभाळायला एक जण राहतात ना, त्यांनी. त्या पूर्वी गावी राहायच्या तेव्हा थोडी फार बाग केली होती त्यांनी.

त्यांनी मला सांगितलं लिंबाच्या कुंडीत तुळशीच्या बिया टाकल्या होत्या त्यातून छोटी छोटी झाडं आली आहेत. आणि रात्री फुलणार्‍या फुलांच्या बियाही टाकल्या होत्या त्याची रोपटी आली आहेत. आता त्याला फुलं आली की फोटो टाकेन.

आता अजून दोन कुंड्या रिकाम्या आहेत, एकात उद्या टॉमेटो लावेन एकात पालक लावेन आणि आईसक्रीमचा अर्ध्या किलोचा छोट्टासा डबा आहे त्यात काहीतरी थोडंसं लावायचं आहे.

पण का माहीत नाही, मला स्वतःला मातीत हात घालावासा वाटला नाही. का असेल असं. मुलाने मात्र मातीत बिया मिक्स करणं खूप एन्जॉय केलं.

अळूला पाणी खूप लागतं ना? आमच्याकडे लावला होता तेव्हा गड्याने सांगितलं होतं. चिखल होइल इथपत पानी राह्यलं पाहिजे म्हणून. << मला एकदम भिंतीमधे पाणी झीरपुन खराब झालेल्या भींती डोळ्यासमोर आल्यात Happy

अदिती, प्लॅस्टिकची मोठी कुंडी वापरली तर पाणी बिंतीत नाही झिरपणार. काल मी एक मोठी कुंडी पाहिली, आयताकृती, एक फूट बाय दोन फूट उंचीला दीड फूट. ती वापरली तर पाणीसुद्धा साचून राहिल आणि झिरपणारसुद्धा नाही आणि घरात भाजीचा अळू मस्त होईल. (माझ्या कुकला सांगेन, भाज्या धुतलेलं पाणी एका भांड्यात काढून ठेव, तेच पाणी घातलं तर जास्त बरं होईल ना अळूला.)

दिनेशदा, माझ्याकडे सध्या दक्षिणायनामुळे भरपूर ऊन येतं एका खिडकीत. पण उत्तरायन सूरू झालं की कोणत्याच खिडकीत ऊन येत नाही. उत्तरेच्या खिडकीत उन्हाचं रिफ्लेक्शन होऊन खूप उजेड आणि उष्णता मात्र येते.

वल्लरीच, तु पाणी साचुन राहिल हे म्हणतेयस पण मला हा प्रकार जरा डाऊट फुल वाटतो. सांडपाण्याच्या जागी साचलेलं पाणी वेगळं आणि कुंडीची भोके बुजवुन साचवलेलं पाणी वेगळं. जमिनीत मुळे पसरायला वाव असतो, त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळॅ मुळांना त्रास होत नाही. पण कुंडीत मुळॅ एका जागीच राहतात आणि मग अशा भोके बुजवुन साचवलेल्या पाण्यात मुळे कुजुन जायचा धोका निर्माण होतो. शिवाय त्या साचलेल्या पाण्याचा वास येतो आणि डासही व्हायचा धोका आहे.

मी एका मोठ्या कुंडीत त्याची भोके बुजवुन पाणी साठवुन वॉटरलिली लावलीय. त्यात मी गप्पी मासे सोडलेत. नविन पाणी रोज अ‍ॅड करत राहते तरीपण पाण्याला थोडा वास येतोच. गप्पी मासे सोडायच्या आधी त्यात डास अंडी घालायचे आणि त्यांछी पिल्ले दिसायची त्या पण्यात.

माझेच ४ वर्षापूर्वीचे स्वप्न वल्लरी .
इतके वर्ष बराच पाठपुरावा केला याचा. माझे अनुभव.
हे सर्व ढोबळ & अनुभवांचे आहे. मी (८ -१० तास कामानिमित्त बाहेर )& आठवड्यातून एकदा येणारा माळी या भांडवलावर केलेल हे उद्योग आहेत . घरातल्यांना फक्त डायरेक्ट भाजी आली की ती किती मस्त आहे यात रस.
झाडांना उन आवश्यकच असते. कोणतेही भारतीय फळ & फुल येण्यासाठी तर भरपूर उन लागते हा ढोबळ नियम लक्षात ठेवावा.
विदेशी & रानफुले ४-५ महिने थंडीची चांगले येतात.
घरची भाजी - माझ्या चारी बाजूला स्वताचे अंगण आहे पण शेजारी बाकीचे बंगले असल्यामुळे उन कमी मिळते. जमिनीत खते टाकली तर फक्त त्याच झाडाला न मिळता इकडे तिकडे वाहून जातात. भाजी म्हणजे फळ असल्याने खते आवश्यकच असतात. तिथे काही भाजी मिळेना शेवटी मी माझी शेती गच्ची वर नेली. एक वेगळा बेड करून घेतला. पण तिथेही ६ जणांच्या कुटुंबाला पुरेल एव्हढी भाजी एका वेळी कधी आली नाही.
१०-१२ भेंड्या( भेंडी & तिची फुले खूप सुंदर दिसतात ) , २-३ वांगी ( खाणेबल स्टेज मधील) एवढीच कमाई. पालेभाजीचा तर तूच विचार कर की किती मिळत असेल.शिवाय पालेभाज्या तर पक्षी पण खातात.
गवार लावून बघ. ठीक येते .( २-४ दिवस ओळीनी काढली होती १ वेळेची भाजी मला मिळाली होती. २-३ रोपे होती)
मिरच्या, कडीपत्ता टोमाटो कमी लागते घरात तेंव्हा त्याचा उपयोग मस्त होतो. मिरच्या मस्त येतात.
वेली भाज्या लाव. दोडकी, घोसावळे सारखी वजनाला हलकी भाजी लाव. भोपळे लावले तर मांडव घाल. लाल भोपळा लावू नकोस हा माझा सल्ला. ( माझ्या घराच्या तिनी बाजूला लाल भोपळा & फक्त आणि फक्त त्याची फुले असा १ वर्ष नजारा होता. ) काकडी काही माझी लागली नव्हती
अळू माझ्या मते जमिनीतच चांगला येतो. अळू फोफावला ( मुळ वाढायला भरपूर जागा) तर त्याची वाढ छान होते.
माझ्या या हौसेपायीबरेच पैसे ( ३र्य मजल्यावरच्या गच्चीत माझी शेती होती.तिथे मी वाटरप्रुफ करून माती वर चढवली होती.) घालवले आहेत म्हणून सांगितले म्हणून सांगितले. (पार ड्रीप इरिगेशनचे समान पण आणून ठेवलेलं आहे. )
या फेज नंतर माझा जीव पार विटून गेला होता. म्हणून गेले वर्षभर नो बागकाम.
सध्या कुंड्यांमध्ये झाडे लावण्याचा प्रकल्प चालू आहे.

वल्लरीच,

काही बेसिक गोष्टी आधी लक्षात घ्या, कुंडी कशीही आणी कितीही मोठी असली तरी त्याला खाली अथवा आजूबाजूला छिद्रे असतात. त्यामुळे जास्त पाणी घातले की ते झिरपणारच. पाणी झिरपले की त्यातून माती वगैरे बाहेर येऊन घरामधे, बाल्कनीमधे वगैरे घाण होणार. बाल्कनीमधून दुसर्‍यांच्या बाल्कनीत हे पाणी गेलं ते शिव्या घालणारच.

साधना म्हणते तसं, डासांचा उपद्रव ही फार मोठी त्रासाची गोष्ट असते. झाडं लावली की, घरभर डास येतात. जमिनीत जेव्हा अळू फोफावतो तेव्हा त्याला भरपूर जागा उपलब्ध असते, तशी जागा कुंडीमधे त्याला नक्कीच मिळणार नाही. त्यामुळे तो किती मोठा होइल याबद्दल मला शंकाच आहे.

घरी रत्नागिरीलादेखील आम्ही घरच्या घरी भाजी दरवर्षी काढतो. अळू, हळद, तुळस, दूर्वांचे लॉन वगैरे पण केलेले आहेच.

मृणाल, माझ्या घरामागे २० बाय १० चा भाग झाडे लावण्यासाठी मोकळा सोडलेला आहे. तिथेच दोन माड पण आहेत त्यामुळे ऊन आणि सावली व्यवस्थित मिळू शकते. त्यामधे मी एका वेळच्या भाजीला पुरेल इतका मेथी, पालक, राजगिरा काढलेला आहे. कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता तरी घरचाच होतो मला. वांगी, भेंडी यायची वाट बघत आहे. इकडल्या पावसाचा अंदाज येत नसल्याने गडबड होते खरी.

बागेत काम करायची हौस असल्यास मातीत, पाण्यात, खतात, शेणात हात घालायची, कोयेते कुदळ चालवायची सवय हवी खरं तर.

६/७ जणांना पुरवणे हा निकष असेल तर मिरची, पुदीना, पालेभाज्या आणि आवडत असतील त्या हर्ब्ज हा चांगला ऑप्शन आहे. माझ्याघरी एका कुंडीत एका माणसाला पुरेल एवढा लाल माठ होतो. खुडताना मी मूळापासून उपटत नाही, त्यामूळे त्याच झाडाला नवे फुटवे येतात.
आमच्याकडे पक्ष्यांचा मात्र त्रास नाही. त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न भरपूर उपलब्ध आहे इथे.
एका कुंडीत एक कोबी / एक कॉलीफ्लॉवर / दोन तीन अलकोल / ४ मूळे होऊ शकतात.

नंदिनी ,
माझ्याकडे पण घरामागे २ नारळ आहेत & तिथेच भाज्यांचा बेड होता पण मागे जो बंगला आहे त्यांनी २ मजले वर वाढवले, त्यामुळे उनाचा प्रश्न, मग आमची शेती टेरेस वर गेली होती. मिरच्या कडीपत्ता पण आता मी कुंडीमध्ये लावणार आहे. म्हणजे उन्हाप्रमाणे कुंड्या हलवता येतील
वल्लरीच,
नंदिनीच्या पोस्ट मुळे आठवले की कुंडी मधून जे पाणी झिरपते ते पाणी जमिनीचा रंग लाल करते & तो रंग लवकर निघत नाही. त्यामुळे पाणी नीट घाल & जमीन जर मार्बलचीअसेल तर खुपच काळजी घे. मार्बल रंग अब्सोर्ब करते . मी त्यामुळेच ड्रीप इरिगेशन चा विचार करत होते

घरात कुंडीत बाग करायची म्हणजे त्याचा व्याप जास्त आणि प्रॉडक्शन अतिशय कमी असे होते. जमिनीत लावलेल्या रोपाचे प्रॉडक्शन आणि कुंडीतल्या रोपाचे प्रॉडक्शन यात खुप तफावत आहे.

अमृतमिट्टी, भाज्यांच्या कच-याचे खत इत्यादी गोष्टींनी ही तफावत कमी करता येते, पण परत हे सगळे करायला डेडिकेटेड एफर्ट्स लागतातच.

अमृतमिट्टी ही कंसेप्ट अतिशय चांगली आहे पण अमृतमिट्टी बनायला ६ महिने लागतात. त्यानंतर ती वापरता येते. तोवर उत्साह टिकत नाही अस माझा अनुभव आहे. Sad समोर काहीही रिझल्ट दिसत नसताना काम करायचा उत्साह टिकवणे हे माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी खुप कठिण काम आहे. तुझे माहित नाही ... Happy सो, ऑल द बेस्ट.

मृणालचा स्वतःचा बंगला आहे म्हणुन बरे. माझ्यासारखे पहिल्या मजल्यावर बाग करणारे लोक तळमजल्यावरच्याच्या शिव्या खातात. सिडकोची घरे तशीही गळतातच. पण लोकांना बोलायला मिळते, ह्यांच्या बागेमुळे गळते म्हणुन Happy

मीही ब-याच वर्षांनी परत भाजीकडे वळतेय आता. अजुन सुरू केले नाहीय पण या महिन्यापासुन सुरू करणार आहे. गेले काही वर्षे बागेत फक्त कुंड्या आहेत, त्यात झाडे आहेत आणि ती बिचारी नॅचरली जशी वाढतील तशी वाढताहेत. तरी एका झाडाने दया दाखवुन मला एक अननस खाऊ घातलेच. एकाने एक गोड मस्कमेलन खाऊ घातले. ही सगळी झाडांची दया. मी काही केले नव्हते. Happy

तर आता परत सुरू करतेय. वल्लरीच, तुही सुरू कर. मग आपण इथे आपापली प्रगती शेअर करुया.

Pages