घरात बाग करायची आहे

Submitted by वेल on 13 November, 2013 - 06:02

मी मुंबईत - बोरिवली पश्चिमेला राहाते. इमारतीत, पाचव्या मजल्यावर. गॅलरी नाही. छोटासे तीन फ्लॉवर बेड आहे ९ फूट बाय दीड फूट. ऊन येईलच याची गॅरण्टी नाही. दोन फ्लॉवर बेडचा अक्सेस घ्ययला तीन फुटाची भिंत आहे. इमारतीला अकराव्या मजल्यावर गच्ची आहे आणि खाली छोटी बाग आहे. सोसायटीने बागेत सध्या तगर लावली आहे. इमारतीच्या मागे मोठी मोठी आठ दहा झाडं आहेत, कडूनिंब, चिंच आणि मला वाटतं रेन ट्री आहे. त्या झाडांवर खारी, पोपट, साळुंक्या आणि कावळे असतात. त्यामागे मुसलमान लोकांची दफन्भूमी आहे. त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.

मला स्वत:ला बागकामाचा काहीही अनुभव नाही. आवड आहे का नाही तेही माहित नाही. पण असं वाटत राहावं स्वत:ची भाज्यांची, फळांची बाग असावी. जेवणात स्वतःच्या बागेतल्या मिरच्या, टॉमेटो, वांगी, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी एवढ्या तरी भाज्या असाव्यात असे वाटते. आई तिच्या घरच्या बागेत झाडं लावली आहेत पण तिच्याच्याने देखभाल फारशी होत नाही (असे मला वाटते, म्हणजे वरचे वर माती खुरपणे, झादे छाटणे इ.)

घरी कुंड्या आणि माती आणली आहे, परंतु काय करावे कसे करावे सुचत नाही. एक छोटे लिंबाचे झाड येते आहे कुण्डीत. माझ्या घरात तुळस अज्जिब्बात टिकत नाही. आसाबांनी लावून पाहिली मी लावून पाहिली, अनेक वेळा लावून पाहिली. आई म्हणते, तिला "त्या" दिवसातला वारा लागतो आणि मागे स्मशानभूमी आहे म्हणून,पण मला ते पटत नाही. आता मी माझी छोटीशी बाग कशी बनवू? कुठल्या झाडापासून सुरुवात करू.

इमारतीच्या कम्पाउण्ड मध्ये मला वासाची मोठी होणारी झाडं लावायची आहेत, उदा. बकुळ किंवा मिडियम साईजची राहतील अशी रातराणी किंवा जुई चालतील. ती कशी लावायची? बियाणे कुठे मिळेल? नारळ आंबा लावता येतील का?

अनुभवी हुषार लोकांनी मला मदत करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग आमच्या आफ्रिकेतल्या सुपीक मातीला श्रेय द्यायला हवे. मी फारसे प्रयत्न न करता, जी जी झाडे इथे लावतो ती मस्त फोफावतात.

घरात कुंडीत लावलेल्या मुगाला सात आठ इंच उंच रोपं आली. आज त्या रोपाच्या कोवळ्या पानांची भाजी केलिये. फोटो टाकायचे होते. पण टाकता येत नाहीयेत.

माझ्या बाईने कम्पोस्ट साठी आणलेले कल्चर रोजच्या कुंड्यात टाकले. त्यामुळे उगवलेल्या रोपांची मुळे मातीत विरघळून सगळ्या रोपांनी माना टाकल्या.

शिवाय कम्पोस्ट करण्यासाठी ज्या भाज्या बादलीत साठवल्या होत्या त्या बादलीत माती आणि कम्पोस्ट चे कल्चर घातलेच नाही. एक दिवस त्यातल्या टरबूजाला केमरं (छोटे किडे) लागले तेव्हा त्या भाज्यांवर माती टाकयची सोडून त्या सगळ्या भाज्या आणि त्याखालची माती कचर्‍यात टा़ऊन दिली.

:: कपाळाला हात मारून घेणारी बाहुली.

ज्यांच्या घरी कढीपत्त्याचे मोठे झाड असेल त्यांच्या घरी त्या झाडाखाली बरीच छोटी झाडे उगवलेली असतात. आणि ते लोक हमखास आनंदाने देतात. उपटताना हळूवार, आजूबाजूच्या मातीसकट उपटावे. नर्सरीतही मिळेल.

ओव्याच्या झाडाच्या फांदीलाही मूळे फुटलेली असतात. अशी एखादी फांदी पावसाळ्यात लावली तर सहज जगते.

ओव्यासाठी ,सावलीचे,थंड आणि ह्यूमिड पण मोकळे वातावरण लागते.तर कडीपत्त्याला निचरा होणारी कुंडी,आणि साधारण तीन-चतुर्थांश थेट सुर्यप्रकाश...घरात्,बाल्कनीत लावयचे असेल तर मातीच्या कुंड्या वापराव्यात.प्लास्टीक कुंड्या वापरणे टाळणे गरजेचे असते.दर सहा महिन्यांनी मातीचा वरचा थर बदला.

माझ्याकडे वेल मोगरा आहे, जिथे माणसाचा हात लागतो तिथे जळतो, पण दुसरीकडे वाढतो, ३ वर्षे भाकड गेल्यावर मी वैतागून त्याला गच्चीतून उचलून बाल्कनीत ठेवला तर फुलू लागलाय थोडी थोडी फुले येत आहेत.

वैतागून त्याला गच्चीतून उचलून बाल्कनीत ठेवला तर फुलू लागलाय .........माझ्या चमेलीची जागा बदलल्यावर झाड आठवड्यात मरून गेले.

मोगर्‍याला(तत्सम फॅमिलीतील झाडे) सतत ठराविक काळाने प्रुनिंगची आवश्यकता असते.माती कंम्पोस्टयुक्त्,व मोकळी ठेवायला हवी.अगदी भूसभूशीत.मोगरा मार्च ते पावसाळा मध्यापर्यंत पिक फ्लॉवरींग स्टेजवर असतो.
कमकुवत फांद्या सतत काढून नव्या फांद्यांचा जोम वाढवावा.फूलांचा बहर ओसरला की पूर्ण प्रुनिंग करावे.
अगदी मुख्य खोडे(फांद्या) ठेवावीत.

सुर्यप्रकाश ५०% लागतो.पूर्ण उन्हात दिवसभर झाड ठेवलत तर फूलं नाहीच येत. गच्चीत ठेवणार असाल तर शेडनेट टाका.(जागा नसेल तर कुंडीच्या मापचं टाकावं)

नुसतं पाणी देऊन नाही चालणार.व्यवस्थित मशागत करा वर्षभर(कदाचीत ती तुम्ही करत असालही)कुंडीतली माती सतत वर्षाने बदलत रहा आणि कुंडीसुध्दा आकाराने मोठी करा.
जागा प्रतिकूल असेल तरच झाड मरते.जागा बदलल्याने झाड मेले हे मी प्रथमच ऐकतोय.

विनिता मॅडम,बाकी तुमचा मोगरा 'सॉलिट्युड' जपणारा दिसतो. Happy

सुर्यप्रकाश ५०% लागतो.पूर्ण उन्हात दिवसभर झाड ठेवलत तर फूलं नाहीच येत. गच्चीत ठेवणार असाल तर शेडनेट टाका.(जागा नसेल तर कुंडीच्या मापचं टाकावं)>>>>हीच चूक झाली असावी, कारण माती बदलणे, कुंडी बदलणे केले आहेच

बाकी तुमचा मोगरा 'सॉलिट्युड' जपणारा दिसतो>>>नाहीतर काय, माणूसघाणा मेला! Proud

मी पण सुरुवात केली आहे. सध्या मेथी, गोकर्ण, सदाफुली आणी तुळस पेरले आहे. पैकी मेथी ४ दिवसात उगवली आहे. तिला किति मोठे होउ द्यावे? बाकी सगळी छोटी रोपे उगवत आहेत. जमेल तसे फोटो टाकेन. Happy

सही...
घरातल्या बागेत वाढणारी मेथी उंचीला कमी असते किंवा ती शक्यतो तशीच वाढते.अपवाद आहेत.
पाने नेहमीच्या (बाजारात मिळते त्या) मेथीएवढी झाली की जमिनीलगत कट करायची.साधारण दहा सेमी ते पंधरा सेमी वाढ होते.काही रोपे तशीच ठेवा म्ह्णजे मेथी किती वाढेल याचा अंदाज येईल.तो पुढे उपयोगी पडेल.
कोवळ्या मेथीची पातळ भाजी छान होते.चवही सुंदर लागते.

गोकर्ण सुंदर वेलवर्गी झाड.पांढरी फूले माझी आवडती आहेत.तुळस पेरून उगवणे जरा कठीण असते,रोप लावले तर पटकन येईल.

शुभेच्छा!

सदाफुलीचे मस्त व्हेरिएशन्स असतात,
तुळस तर आरोग्यदायीच आहे.
भाजी कडे जरा लक्ष द्यावे लागते, पण आली तर ऑरगॅनिक बेस्ट!
वैदेहि१४ : बने रहो!

विज्ञानदास, डीविनिता : प्रोत्साह्नासाठी धन्यवाद! Happy मंजिर्या (manjirya) लावुन पण तुळस आली आहे पूर्वी. यावेळेसचा अनुभव पण शेअर करेन.

Happy उत्सुकता आहेच.मंजिर्‍या पावसाळ्यात येतात असा अनुभव आहे.जर अशा आल्याच तर मलाही पुन्हा प्रयोग करायला उत्साह वाटेल.. ध.

मी बॅकयार्डमधे धने, शेपा, लाल मिरचीच्या बिया टाकुन बघितल्या होत्या पण काहीच आले नाही. आता परत प्रयत्न करुन बघायचाय. काय काळजी घेउ?

नमस्कार निसर्ग मंडळी , एक मदत हवी होती , घराभोवती बागेत लावण्यासाठी सदाहरीत , छोटी ,उगाचच न पसरणारी झाडं /फुलझाडं , वेली सुचवाल का ?
< संपादन प्रतिसाद दिनेश. | 1 July, 2014 - 19:44
बाजिंदा कुठे राहता ?
नुसती फुलझाडे लावण्यापेक्षा मी नेहमी हर्ब्ज वगैरे लावण्याचा सल्ला देत असतो. भाज्याही लावाच.

तशी झेंडू, गुलबक्षी, सदाफुली विनातक्रार वाढणारी झाडे आहेत.
तुळस, बेसिल, पुदीना, गवती चहा, मिरच्या, आले, हळद पण जरूर लावा. कडेने टोमॅटोही लावता येईल.

मुळा, मोहरी, अळशी, कारळे, गाजर यांना शोभिवंत फुलेही येतात. >

< Sayali Paturkar | 2 July, 2014 - 11:22

बाजिंदा... फ्लोरा नावाचा गुलाबाचा एक प्रकार येतो... पांढरा आणि गुलाबी रंग आहे माझ्या कडे...
जास्त पसरत नाही, आणि गुच्छानी फुलं येतात..
तसेच बटण गुलाब पण लावता येईल..

देव घरात छोट्या छोट्या मुर्त्यांना वाहिला की छान वाटते..मोठे फुल वाहिले
की देवाचा चेहराच दिसत नाही..मोठे फुलं फोटो ला आणि छोटी फुलं मुर्तीला.. ( हे माझ मत आहे.)>

धन्यवाद दिनेशदा आणि सायली , अजुन माहीती मिळाली तर बरे होईल ,तसेच ही माहीती 'घरची बाग ' धाग्यावर संकलित करण्यासाठी तुमचे प्रतिसाद इकडे चिकटवलेत, होप यु डोंट माईंड.

कालच्या वास्तुरंगमध्ये बाहेरगावी गेल्यावर झाडांना पाणी मिळत राहण्यासाठी केलेल्या एका उपायावर लेख आला आहे.
http://www.loksatta.com/vasturang-news/simple-way-to-supply-water-to-pla...

नमस्कार.
मी बाल्कनीत कुंड्यामधे हिरवी मिरची, कोरफड, कडीपत्ता लावला आहे.
मिरचीला लाहान कळ्या आणि फुलं येतात. पण फुलं गळुन पडतात. रोप चांगलं हेल्दी दिसतंय. हिरवंगार आहे. लहान नवी पानं कळ्या आहेत. पण मिरची येत नाही. २-३ दिवसाआड पाणी देतेय आणि १०-१२ दिवसांनी मुठभर विकतचं कंपोस्ट.
काल टोमॅटोच्या बिया पेरल्यात. १०-१२ दिवसांनी रोपं येतील. तर ह्या १०-१२ दिवसात कुंडीत रोज पाणी घालायला हवं का?

मिरचीला लाहान कळ्या आणि फुलं येतात. पण फुलं गळुन पडतात. रोप चांगलं हेल्दी दिसतंय. हिरवंगार आहे. लहान नवी पानं कळ्या आहेत. पण मिरची येत नाही. २-३ दिवसाआड पाणी देतेय आणि १०-१२ दिवसांनी मुठभर विकतचं कंपोस्ट...

आता सिझन सुरु होईल मिरचान्चा. वाट बघा जरा. कुंड्यामधे मातीत मुंग्या झाल्याय का ते बघा. तसेच जीवामृत घालून बघा. (सहज आठवला म्हणून एक गंमतीशीर किस्सा सान्गते. Proud )
आमच्या कडच्या मिरचीला सेम problem होता, एक दिवस माझी मुलगी (वय 3 वर्षे) मिरचीच्या झाडाकडे गेली आणि कमरेवर हात ठेऊन ठसक्यात रागावली, "एएए मिर्ची, नुसती फुलं का आणतेस? आम्हाला खूप खूप मिरच्या पण दे. नाहीतर महेशमामाला (आमचा माळी) सांगते की तुला काढून टाक. " अक्षरशः जोरदार धमकी दिली. आणि त्यानन्तर आठवड्याभरात बर्यापैकी मिरच्या धरल्या. Lol Lol
तस्मात हे पण करून बघा.. हा का ना का

सस्मित, कुंडीत रोज पाणी द्यावे लागते. सध्या तुमच्याकडे थंडी असणार, बाषफीभवन जास्त होत नाही त्यामुळे जमीन ओलसर नसेल तरच पाणी शिंपडा, असेल तर शिंपडू नका.

मम्या, मीच दम देउ की मुलाला सांगु? Happy
साधना, माझ्याकडे थंडी नाही. मी दादरला रहाते.
बर. कुंडीत ओल असेल तर पाणी देणार नाही.
मी रोज कुंडीच. रोपांचं निरीक्षण करते. नवा नवा छंद आहे ना:-)
तर आज टोमॅटोच्या कुंडीत मायक्रो कोंब दिसले. Happy

Pages