फार बोललीस तू...

Submitted by अ. अ. जोशी on 14 November, 2013 - 11:56

प्रश्न हा नसे इथे कि लाज सोडलीस तू
खेद एवढा प्रिये कि फार बोललीस तू

राहिला तिथे, तसा तुझा प्रपंच एकटा
प्रेरणा जिथे, जशी तुझीच त्यागलीस तू

मढविलेस तू शरीर मोह त्यात ना मला
ओतलेस जे हृदय म्हणून भावलीस तू

साथ जीवनी तुझी भरून अर्थ वाहिली
एवढी कि आजही दुरून चाललीस तू

दुःख यात कोणते कि पत्र फाडलेस तू..?
सूख यात मानले कि ओळ वाचलीस तू

थयथयाट हा तुझा नवा नसे मलातरी
एवढी सशक्तता कुठून आणलीस तू..?

साथ देत तू नि मी प्रसन्न वाट चाललो
चल, पुन्हा तिथे जिथून वाट लावलीस तू

अश्रु वाहतो अजून आठवून त्या क्षणां
नयन कोरडे, मनात धाय मोकलीस तू

भेटणे नि भांडणे असेच होत राहते
बोललो जरा! निघून काय चाललीस तू..?

शब्दभार आणि मार सोसला तुझ्यामुळे
मात्र डागणी बरोबरीत सोसलीस तू

चामडीच सोलटून मी तुला दिली प्रिये
वाटले उभ्या जगास कात टाकलीस तू

धैर्य एवढे तुझे कि काय मी म्हणू तुला
शब्द राहिले थिटे जिथून भंगलीस तू

तेल संपले, दिवा पडून भंगला पुरा
जेवढे जमेल पण हटून तेवलीस तू

गुप्तता किती जरी जपून राखलीस तू
पाहिले तुला जिथे लपून लाजलीस तू

वाटते मजाच फार जाणताच सत्य हे
चालला प्रथम 'अजय', जिथून धावलीस तू

व्यर्थ राहिलास विश्वभर फिरूनही 'अजय'
बायको घरी असून गझल शोधलीस तू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साथ जीवनी तुझी भरून अर्थ वाहिली
एवढी कि आजही दुरून चाललीस तू

दुःख यात कोणते कि पत्र फाडलेस तू..?
सूख यात मानले कि ओळ वाचलीस तू - (कि आणि की - सुख आणि सूख)

थयथयाट हा तुझा नवा नसे मलातरी
एवढी सशक्तता कुठून आणलीस तू..?

साथ देत तू नि मी प्रसन्न वाट चाललो
चल, पुन्हा तिथे जिथून वाट लावलीस तू

चामडीच सोलटून मी तुला दिली प्रिये
वाटले उभ्या जगास कात टाकलीस तू

तेल संपले, दिवा पडून भंगला पुरा
जेवढे जमेल पण हटून तेवलीस तू

गुप्तता किती जरी जपून राखलीस तू
पाहिले तुला जिथे लपून लाजलीस तू

वाटते मजाच फार जाणताच सत्य हे
चालला प्रथम 'अजय', जिथून धावलीस तू

व्यर्थ राहिलास विश्वभर फिरूनही 'अजय'
बायको घरी असून गझल शोधलीस तू?<<<

बरेच चांगले शेर!

फॉर वन्स (सो फार), अजय जोशी हॅज कंपोझ्ड अ गझल दॅट इज ऑब्व्हियसलीअ‍ॅप्रिशिएबल!

बाकी, सत्यवादी असल्यामुळे इतकेच लिहितो की 'ही' गझल मस्त झाली आहे.

-'बेफिकीर'!

(र्‍हस्व दीर्घ खटकले, ते तुमच्यापाशी)

बेफिकीर,

धन्यवाद..

कि हा प्रयोग चालू शकतो माझ्या अभ्यासानुसार.

सूख मुद्दामहून लिहीला होता. बदल करता येईल अजूनही.

राहिलो सुखासनी... असा बदल आहे.

थयथयाट हा तुझा नवा नसे मलातरी
एवढी सशक्तता कुठून आणलीस तू..?

विशेष आवडला हा शेर !

साथ देत तू नि मी प्रसन्न वाट चाललो
चल, पुन्हा तिथे जिथून वाट लावलीस तू

तेल संपले, दिवा पडून भंगला पुरा
जेवढे जमेल पण हटून तेवलीस तू

हे शेरही छान .मक्ताही 'गझल'वाला भावला .
(र्हस्व दीर्घ खटकले, >>+1

अजय,

कम्मालीची सुंदर गज़ल! तब्बल १७ द्वीपदी ... आणि त्याही एकापेक्षा एक सुंदर! ग्रेट. मानले. आणि मक्ता... व्व्वा वा! दुधात काश्मिरी केशर!!

गंमत म्हणजे आता 'सूख' तितकेसे खटकत नाही. कदाचित सवय झाली असावी. 'कि' पहिल्यांदा खटकले. पण परत वाचल्यावर नाही. Happy

मढविलेस तू शरीर मोह त्यात ना मला
ओतलेस जे हृदय म्हणून भावलीस तू
>>> वा!

थयथयाट हा तुझा नवा नसे मलातरी
एवढी सशक्तता कुठून आणलीस तू..?
>>> ये ब्बात! पहिली ओळ फार सहज आलीये... सशक्तता जsssरा ऑड वाटला... किंवा कदाचित तेच म्हणायचं असेल तुम्हाला...

अनेक ओळी खूप छान आहेत पण त्याहीपेक्षा जास्त ओळी अश्या निघाल्या की जिथे सुलभता नाही इतकी की खटकतेच खटकते
सगळेच खयाल आवडले सखोलता जास्तच भावली व विशेष म्हणजे खरोखरच खूप आतून आलेल्या भावभावना आपण मोकळेपणाने ('बेफिकीर'पणे असे म्हणणार होतो पण नको !:))व्यक्त केल्यात हे जास्त आवडले
मी आपल्या अनेक गझल वाचल्या आहेतच माबो वर पण ही जितकी आवडली तितकी इतर कुठली आवडल्याचे स्मरत नाही आहे (अनेक दिवस तुम्ही माबोवर नव्हतात त्यामुळेही आठवत नसेल बहुधा )

धन्यवाद

वैवकु,

*** त्याहीपेक्षा जास्त ओळी अश्या निघाल्या की जिथे सुलभता नाही इतकी की खटकतेच खटकते ***

उगीचच लिहीले आहेत.

काही शेर मस्त आहेत. पण जर ही एकाच विषयावरची गजल असेल तर थोडं confusion आहे. "ती" साथ देते आहे की वाट लावते आहे? I mean काही शेर positive आणि काही negative आहेत म्हणून.
>> साथ जीवनी तुझी भरून अर्थ वाहिली
एवढी कि आजही दुरून चाललीस तू
या शेरात तर दोन्ही ओळीतला संबंध समजलाच नाही.
शिकण्यासाठी विचारत आहे. क्रु. गै. न.

पारिजाता,

तुम्ही उल्लेख केलेला शेर सत्य आणि उपहास यांचा मेळ आहे, तसेच दोनही ओळीत सत्यच आहे.

धन्यवाद.

वैवकु, समीर

**** त्याहीपेक्षा जास्त ओळी अश्या निघाल्या की जिथे सुलभता नाही इतकी की खटकतेच खटकते

सहमत. ****

तुमचे म्हणणे स्पष्ट करा. केवळ निगेटीव्ह लिहायचे म्हणून लिहू नका. अन्यथा आपले म्हणणे मागे घ्या किंवा तीव्रता बदला.

पण उपहास आहे हे स्पष्ट होत नाही. confusion होते आहे. असो.
>> तेल संपले, दिवा पडून भंगला पुरा
जेवढे जमेल पण हटून तेवलीस तू
हा स्वतंत्र आवडला.

अजयजी:

मला वाटतं वाचकांच्या मतावर आपण अधिक विचार करायला हवाय.
प्रश्न बरोबर वा चूक चा नाही आहे.
वैभवने दिलेले मत एक कवी म्हणून घ्यायला हवे. त्यावर उगीचच लिहीले आहेत.
असे म्हटल्यानंतर तुम्हाला असे का वाटते हे स्पष्ट करण्याची गरज नाही का ?
केवळ निगेटीव्ह लिहायचे म्हणून लिहू नका. असे कोणीतरी तुम्हालाही म्हणू शकतेच की.
आपला टोन फार खटकला. कोणी काय मत द्यायचे हे कवी ठरवू शकत नाही हे लक्षात घ्यावे.
मी केलेले विधान मला अद्याप योग्य वाटते.
आपण आजवर केलेल्या गझलांमधे ही गझल उजवी आहे इतकेच म्हणेन.

शुभेच्छा.

समीर चव्हाण

कैलास,

धन्यवाद.

समीर,
आपणही गजलेचे जाणकार आहात आणि माझ्या आधीपासून इथे लिहीत आहात. त्यामुळे केवळ -सहमत- असे मत देणे मला योग्य वाटत नाही. माझा टोन तुम्हाला फार खटकला असे म्हणालात ते ठीक आहे. मग, कोणतेही स्पष्टीकरण न देता केवळ टीका करणाऱ्यांचा टोन बरोबर आहे काय़...
जसा प्रतिसादकांना मत देण्याचा अधिकार आहे तसा कवीला नाही काय....
कवीने जे लिहिले त्यावर कोणीही काहीही मत प्रदर्शित करावे आणि कवीने त्यावर लिहू नये काय...

अर्थात तुमच्या मतावर माझे लिहिणे कधीही अवलंबून नसेल हे नक्की.

लोकांची वाहवा मिळविण्यासाठी मी गझल लिहीत नाही. गझल लिहिणे हा माझ्या जगण्याचा एक भाग आहे.

धन्यवाद.

पारिजाता,

पहिल्या ओळीत उल्लेख केलेली साथ नेमका कोणता अर्थ भरून वाहिली हे दुसऱ्या ओळीतून स्पष्ट होत आहे. असो.

धन्यवाद.