अनुदिनी परिचय-७: आरती

Submitted by नरेंद्र गोळे on 13 November, 2013 - 23:47

अनुदिनीकार लेखिकेची ओळख: सौ. आरती खोपकर उपाख्य "अवल" ह्या असंख्य विद्यार्थ्यांना इतिहास, संगीत, कला शिकवत; अकरा अनुदिनींची अनोखी मयसभा, काही वर्षांच्या अल्पावधीत उभी करणार्‍या लेखिका आहेत एवढीच ओळख पुरेशी नाही. सौ.आरती चारुहास खोपकर ह्या उपजत कलाकार आहेत. जमेल ती कला शिकत-शिकवत त्यांनी जो आयुष्याचा आस्वाद घेतला, त्याचेच प्रच्छन्न प्रतिबिंब त्यांच्या अनुदिनींतून अभिव्यक्त होत असते. मग तो अभ्यासाचा विषय इतिहास असो. प्रेरणेचा विषय माता-पित्यांचा, आज्जीचा असो. नित्यकर्म पाकशास्त्राचा असो की छंदस्वरूप विणकामाचा असो. आवडत्या स्वरसाधनेचा असो की प्रकाशचित्रणाचा. प्रत्येक गोष्टीत अव्वल स्थान मिळवण्याचा त्यांना उपजत ध्यास आहे. म्हणूनच की काय मायबोली डॉट कॉम वरील त्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव त्यांनी “अवल” असेच घेतलेले आहे.

व्यवसायाने इतिहास अध्यापन करत असलेल्या अवल, उपजत कलाकार असून त्यांना अनेक कलांत रुची आणि गती आहे. मायबोलीवरील त्यांचे इतर लेखन आणि त्यांच्या वरील अनुदिनीही ह्याची साक्ष पटवतील. खालील दुव्या वरील शाडूचा मानवी चेहरा त्यांच्या मूर्तीकलेचा उत्तम नमुना आहे. http://cdn1.maayboli.com/files/u10778/My_creation_.jpg

बांधवगडच्या प्रवासवर्णनातील लेख वर्णनात्मक आहेत खरे. पण त्यात आरती ह्यांचे प्रकाशचित्रण कौशल्यच वाखाणण्यासारखे असल्याचे दिसून येते. ह्या प्रवासा दरम्यान त्यांनी टिपलेला हा नाचरा मोर पहा!


त्या म्हणतात, “अन मग वैचारिक लेखनाने माझ्यावर आपली भूल घातली. माझ्या व्यवसायाने माझी ही इच्छा पूर्ण केली. विद्यापीठातल्या अनेक विषयांच्या क्रमिक पुस्तकांच्या लिखाणातून माझा हाही छंद फोफावत गेला. त्यातून आमच्या विद्यापीठाने अनेक वेगळे विषय सादर केले होते, त्यातून या छंदाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी निघणारी मासिकं, इतिहास संशोधक मंडळाची मासिकं, जीवनशिक्षणची मासिकं यांतून अनेक विषयांवर लिखाण करायला संधी मिळतच गेली. "यांनी घडवले सहस्त्रक" या रोहन प्रकाशनाच्या अतिशय सुंदर पुस्तकातही काही लेख लिहिण्याची संधी मिळाली. १५ वर्षांच्या प्राध्यापकीत शिकवण्याचा छंद आपोआपच पूर्ण होत गेला. त्यातून आमचे मुक्त विद्यापीठ असल्याने वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांना शिकवायला मिळाले. मी २४ वर्षाची तर समोरचा विद्यार्थी ७२ चा असं ही झालं. अगदी येरवडा जेल मधल्या जन्मठेप झालेल्या विद्यार्थ्यांनाही. त्यातून एक खुप वेगळा विषय बर्‍याचदा शिकवायला मिळाला. "संज्ञापन कौशल्य" ज्यात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली मते निबंधातून मांडावयाची असत. स्वाभाविकच हा विषय शिकवताना खूप कस लागायचा. आपली माहिती, त्याची मांडणी, त्याची चर्चा, या सर्वांवर विद्यार्थ्यांशी संवाद, चर्चा अन त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे. यातून अनेक छंद जोपासले गेले. वाचन, बोलण्याची हौस, चर्चा, वादविवादाची हौस. जवळजवळ १५ वर्षे अनेक छंद असे पूर्ण होत राहिले.”

ह्या छंदांतून उभी राहिली माणसाची गोष्ट ही अनुदिनी. ह्या अनुदिनीत “कवडसे“ हे पंधरा लेख आणि १२० पृष्ठांचे वि-पुस्तक. तसेच, “लक्षात कसे ठेवाल?“ हा माध्यम-मार्च-२०१३ मधील तीन पानी लेख, “वैभव नाट्य-संगीताचे-एक सुरेल अनुभव“ हा मंगळवार २००४ च्या लोकमतच्या अंकातील लेख आणि “अन्‌ मी मोठा झालो-अश्मयुगीन रामची गोष्ट“ हे इतर लेखही आहेत. “कवडसे” मधले “संज्ञापन कौशल्य” हे प्रकरण तर वाचायलाच हवे असे आहे. स्वतःचे विचार स्वतःला समजणे, दुसर्‍याला ते समजावून देता येणे आणि दुसर्‍याचे विचार समजावून घेऊन ते तिसर्‍याला समजावून सांगता येणे, ही कौशल्ये संज्ञापन कौशल्यांत गणली जातात हेही मला हे प्रकरण वाचूनच समजले.

लेखिका पुढे म्हणतात, “नोकरी सोडली ती माझ्या एका फार महत्वाच्या छंदासाठीच. माझा लेक. हा तर माझा सगळ्यात मोठा आनंदाचा छंद.” मात्र ह्या छंदातून “किडुक-मिडुक” अनुदिनी निर्माण झाली असावी असे वाटत नाही. प्रशिक्षण देण्याच्या छंदाचा ती परिपाक असावी. तिचा उदय आयुष्यात नंतरच झाला असावा हे खरे.

अनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदी: "छंदांविषयी लिहायचे म्हटले अन मनात सगळ्यांनी धक्काबुक्की सुरू केली. "ए मी आधी, नाहीरे तू नाही आधी मी..." अरे बापरे, या सर्वांना एका माळेत ओवू तरी कशी? शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर." असे म्हणून लेखिकेने त्यांच्या छंदवर्णनाचा जो पट उलगडला आहे, http://www.maayboli.com/node/5871 ह्या दुव्यावरील तो लेख - "हे छंद जिवाला लावी पिसे"; अर्थात छांदिष्ट मी! – त्यांच्या अनुदिनींचाही लेखाजोखा साद्यंत उभा करतो. त्यांच्या अनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदींपैकीच ही एक नोंद आहे.

http://arati21.blogspot.in/2013/09/blog-post_9.html ह्या दुव्यावरील "सकल कलांचा तू अधिनायक" हा दुसरा एक लेख त्यांच्या विणकामाचे प्रात्यक्षिक पेश करतो. लोकरीचा गणपती लोकरीचाच तबला-डग्गा वाजवतो. खरे तर चित्रारती ही अनुदिनी त्यांची सर्वोत्तम अनुदिनी मानायला हवी. कारण प्रकाशचित्रांच्या चौकटींची निवड, चित्रविषयाचे संपूर्ण दर्शन करवण्याची हातोटी, चित्राची अप्रतिम गुणवत्ता आणि सादरीकरण ह्यांमुळे सजलेली ही अनुदिनी वाचकांनी स्वतःच पाहून आस्वादावी अशा मोलाची आहे.


चित्रकला, वाचन, विणकाम, शिवणकाम, भरतकाम इत्यादींचे छंद त्यांनी जोपासले. त्याचे पुरावे अनुदिनीवरही विखुरलेले आढळतात. खालील भरतकामाचा नमुना प्रातिनिधिक आहे.

स्वयंपाकाच्या आणि कविता करण्याच्या छंदानेही त्यांच्यावर बरेच गारूड केले दिसते. त्याचेच पर्यवसान रसना-आरती आणि मयूरपंखी ह्या अनुदिनींच्या निर्मितीत झालेले दिसून येते. रसना-आरती अनुदिनीचा रावण-पिठल्यापासून सुरू झालेला प्रवास, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांतून वाट काढत पंधरा नोंदींतून बाकरवडीपर्यंत पोहोचलेला दिसतो. प्रत्यक्षात आस्वादाचा योग आल्यास गुणवत्तेचा गौरव अवश्य करता येईल. सध्या मात्र त्यातील पाकक्रिया घरीच करून पाहिल्यास त्यातील तथ्य लक्षात येऊ शकेल असे वाटते.

मयुरपंखी अनुदिनीत लेखिकेच्या काव्याविष्कारांचे दर्शन घडते. बहुतेक कविता मुक्तछंद असल्या, तरी किमान शब्दांत मनातील भावना कागदावर / शब्दांत उतरवणे हे कवितेचे वैशिष्ट्य मात्र त्यांत साध्य झालेले दिसते. त्यामुळेच असेल, त्यांच्या कवितांचे चाहतेही अनेक आहेत.

लेखिकेच्या आई, सौ. रेखा चित्रे ह्यांची अनुदिनी “पद्मरेखा” तयार करून, त्यांनी आईच्या अलौकिक कलेला चिरायू केलेले आहे. त्याच कलेचा वारसा त्या पुढे नेत आहेत, ह्यामुळे तर त्यांच्या आईही समाधानी असतील. लेखिका लिहीतात, “ कुटुंबातील जवळजवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले. भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या. पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाचे दोर्‍याने बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल. १९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात. हे सर्व चालू असताना टी.व्ही. वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात. ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.”

वडील सुरेश ह्यांचे ओरिगामी, चित्ररेखने, संगीत-रसास्वाद इत्यादी छंद, सुमारे दहा मिनिटांच्या ध्वनिचित्रफितीत अंकित करून, त्याचे आधारे वडिलांकरता तयार केलेली अनुदिनीही, व्यक्तिचित्रण कसे सजीव करता येईल, ह्याचा नमुनाच ठरावी अशीच आहे. वडिलांनी काढलेले लतादिदींचे रेखाचित्र सुरेख आहे.

"१९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी आज्जीची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती." अशी आठवणही लेखिका, "वत्सलसुधा" ह्या त्यांच्या आज्जीच्या अनुदिनीवर नोंदवतांना दिसून येतात.

मग त्या म्हणतात, "स्वरगंगा मंचात संगीत, नाट्य, चित्रपट, वैद्यक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना, विचारवंतांना बोलवले जात असे. यात मी ओढली गेले. मग त्या कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन, निवेदन इत्यादी पार पाडणे असा नवीन छंद लागला. यातून अनेक मुलाखती घेता आल्या. ज्योती सुभाष, डॉ. अनिल अवचट, डॉ. विश्वास मेहेंदळे. नंतर मायबोलीसाठी सौ. लतिका पडळकर आणि ऐश्वर्या नारकर तसेच आनंदीबाई जोशींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अंजली किर्तने इत्यादींच्या मुलाखती घेता आल्या. या "स्वरगंगा" मध्ये एक अभिनव कल्पना पुढे आली. अन त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. सोसायटीमधील गायकांचा एक कार्यक्रम बसवणे. अन मग लहान मुलांचा "स्वरांजली" अन मोठ्यांचा "सप्तसूर" असे दोन कार्यक्रम तयार झाले. आमच्या सोसायटीतील गौरी शिकारपूर हिने संगीताची जबाबदारी उचलली अन बाकीची सर्व मी. अन दोन अतिशय सुरेख, सुरेल कार्यक्रम तयार झाले. सर्वांनी अतिशय नावाजले. यातून संयोजनाचा छंदही पार पडला."

पुढे त्यांनी, सवाई गंधर्व महाविद्यालयात एका वर्षाच्या प्रशस्तीपत्रकाच्या क्लासला जावून, गायन शिकण्याचा छंद, पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. त्यानंतर पुष्पौषधींच्या अभ्यासाचा, विणकाम शिकवण्याचा, ऍनिमेशनचा, अनुदिनी-निर्मितीचा, बागकामाचा असे अनेक छंद जोपासले. नावा-रूपास नेले. त्यांची नोंद त्यांच्या अनुदिनींत सविस्तर केलेली आढळून येते.

जसे त्यांचे छंद सदैव नव्याची आस धरत पुढे पुढेच जात राहतात, तशाच प्रकारे त्यांच्या अनुदिनीही प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू राहाव्यात हीच शुभेच्छा! त्यांच्या छंदांचा आणि अनुदिनीलेखनाचा हा प्रवास जसा मला आवडला, तसाच माझ्या वाचकांनाही आवडेल ह्यात मुळीच शंका नाही.

अनुदिनीची नोंदणी: मराठी ब्लॉगर्स, मायबोली संयुक्ता, मराठी ब्लॉग विश्व, मराठी-ब्लॉगर्स-नेटवर्क.

मी करवून दिलेले अनुदिनी परिचय

१. http://www.maayboli.com/node/24339 आहार आणि आरोग्य
२. http://www.maayboli.com/node/24622 आनंदघन
३. http://www.maayboli.com/node/24752 प्रशासनाकडे वळून बघतांना
४. http://www.maayboli.com/node/24806 अक्षरधूळ
५. http://www.maayboli.com/node/25034 सेव्ह अँटिबायोटिक्स
६. http://www.maayboli.com/node/26509 वातकुक्कुट
७. http://www.maayboli.com/node/46317 आरती

माझी अनुदिनी http://nvgole.blogspot.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोळेकाका, आरतीचा अनुदिनीकार म्हणुन इतका तपशीलवार परिचय करून दिल्याबद्दल खुप सारे धन्यवाद. तिच्याबद्दल एवढं सगळं वाचून मी थक्क झालेय. आता जमेल तसं तिच्या या सा-या ब्लॉग्जना भेट देईन.
तुमचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे.

वस्तुत: आरती ह्यांनी स्वतःच्या छंदांचे सविस्तर वर्णन मायबोलीवरच लिहिलेले असल्याने, अशा परिचयाची आवश्यकता इथे तशी नव्हतीच. मात्र इतरांच्या नजरेत भरतील अशा काही गोष्टी त्यात अलिखितच राहिल्या असे वाटल्याने, तसेच आरतीस अपरिचित असलेल्यांना परिचय म्हणून हा लेख लिहावा असे वाटले.

म्हणूनच,
सई आणि आतिवास,
आपल्याला परिचय आवडला ह्याचा आनंद आहे.

आतिवास,
आपल्या सूचनेनुरूप आता,
आधीच्या सहा परिचयांचा उल्लेखही वर समाविष्ट केलेला आहे.

गोळेकाका, अनुदिनी परिचय आवडला. (ही कल्पनाही आवडली.) तुम्ही करून दिलेले याआधीचे परिचयही यथावकाश वाचणार आहे. या निमित्ताने माहीत नसलेल्या अनेक ब्लॉगांबद्दल माहिती होईल. धन्यवाद.

चांगली कल्पना आहे.

फार माहितीत किंवा लोकप्रीय नसलेल्या तरी हटके ब्लॉग्सबद्दल वाचायला आवडेल.

आरतीची भेट झाली तेव्हा ती एवढी मोठी कलाकार असेल असे वाटलेही नाही. अगदी साधी ( भोळी ) वाटली.
मोठे कलाकार कलेने तर मोठे होतातच पण त्यापेक्षा त्यांच्या नम्र स्वभावाने मोठे होतात. आरती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो.