कैफ-ए-टोमॅटो

Submitted by विजय देशमुख on 10 November, 2013 - 03:37

यापुर्वी म्हटल्याप्रमाणे काही खास पुरुषांनी पुरुषांकरीता लिहिलेल्या पाककृतीत ही आणखी एक भर.
यापुर्वीची पाककृती http://www.maayboli.com/node/43825 बघता येईल. {बघता येईल, ही म्हणायची पद्धत. त्याचा अर्थ, जर लेखकाच्या शैलीशी परिचित नसाल, तर हे आधी वाचाच, नाहीतर इतर लोकं "हे वाचल नाही का आधी" असं सुनावनार हे नक्की}

तर आजची पाककृती आहे, कैफ-ए-टोमॅटो. दिवाळीचा ज्वर {म्हणजे दिवाळीत बसल्या जागी बायकोने मेहनतीने केलेल्या फराळावर नको इतका ताव मारल्याने पोटाला आलेला ज्वर} उतरला नसेल तर अजुनही खिचडीचा {साबुदाण्याच्या नव्हे} हंडा लावणे चालू असेल. त्यासोबत चवीष्ट आणि खमंग सांडगे नसतील, तर हा कैफ-ए-टोमॅटो तुम्ही (म्हणजे पुरुष) बनवू शकता आणि तितकाच सौ.ना आराम देउन दुसर्‍या दिवशी खिचडी ऐवजी दुसरं काही स्वयंपाक घरात शिजेल, असं वातावरण बनवू शकता.
इथे प्रस्तावना संपली.

साहित्य :-
हा पदार्थ शक्य तितक्या जास्त फ्लेमवर करायचा असल्याने, लांब दांडिचं पॅन (लहान-मोठे कोणतेहि चालेल, मात्र उथळ हवे) किंवा नॉन-स्टिक तवा, आणि लांब दांडीचा चमचा/सराटा (शक्यतो लाकडी).
माणसी २ टमाटे
व्हेरायटी हवी असल्यास कांदे
तेल, जीरे, तिखट, हळद, वगैरे.

कृती :-

कांदे वापरणार असाल, तर माणसी एक (मध्यम आकाराचा) कांदा बारिक कापुन घ्या.
टोमॅटो कापणे एक कला आहे. आधी टोमॅटो पाण्याने धुवुन घ्या, आणि टोकदार सुरी एका बाजुने टोमॅटोत घुसवा. {संदर्भ :- ७०-८०च्या दशकातला कुठलाही हिंदी सिनेमा}. मग त्याचे बारिक तुकडे करा. आकाराची फिकीर करु नका. ऑफिसचा एखादा दुश्मन आठवा, योग्य तो आकार मिळेल. {सांभाळुन ! बोट कापु नका.}
हे बारिक कापलेले टोमॅटो एका वाटित काढुन घ्या.
दुसर्‍या एका छोट्या वाटित चवीनुसार तिखट, हळद आणि मीठ एकत्र काढुन घ्या.

आता पॅनमध्ये २ टिस्पुन तेल घ्या. या कैफ-ए-टोमॅटोला जितकं तेल कमी तितकं चांगलं. त्यामुळे तुम्ही खुप तेलखाऊ असाल, तर फारफार तर सव्वादोन चमचे तेल घ्या.
गॅस फुल करा. तेल गरम होताच जीरे टाका. {वापरणार असाल तर कांदे सोनेरी होईपर्यंत भाजा}. लगेच एका हाताने हळद, तिखट, मिठ (एकत्र केलेले) टाका. ३-५ सेकंदात टोंमॅटो टाका. हे मिश्रण चमच्याने सतत ढवळत रहा. टोमॅटो खरपुस भाजा. त्याचा एक छान सुगंध येईल. त्याचा कैफ हॉलमध्यल्या सौं.ना चढायला हवा.
जेंव्हा हा कैफ-ए-टोमॅटो तयार होईल, तेंव्हा टोमॅटोचे सालंसुद्धा फारशी दिसणार नाही, इतकं एकजीव मिश्रण होईल.
हे गरमागरम खिचडीसोबत खा आणि खिलवा. किंवा भाजी नसेल तर पोळीसोबतही मजा घ्या.

विषेश टिपा :- या पाककृतीस आणि स्वतः बनवलेल्या कोणत्याही पाककृतीस सर्वांसमोर तर सौ.ने बनवलेल्यांना तिच्या पाठीमागे नावे ठेवणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यावर कोणिही आक्षेप घेउ नये. तुम्हाला तुम्ही बनवलेल्या कैफ-ए-टोमॅटोचा कैफ चढला नाही, तर तो तुमच्या पाककौशल्याची कमतरता आहे, लेखकाच्या लिखाणाची नव्हे.

फोटो इथे बघा.

tomato.jpg

स्त्रोत :- स्वस्तुती आवडत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललितलेखनामधे का बरं हे? आहारशास्त्र ग्रूपमधे टाका. पाककृती मस्त आहे. आधी नाव वाचल्यावर मला वाटलं की स्पेनच्या त्या प्रसिद्ध टोंमॅटो फेस्टिवल वर लिहिलाय की काय?

प्ण हे भारी आहे.

भारी लिहीलय. स्रोत Biggrin
मला आधी कतरिना कैफ आणि तिचे टोमाटिना फेस्टिव्हलचे गाणे याबद्दल लेख वाटला ललितलेखन ग्रूप बघून

धन्यवाद जाई, रुनी, नंदीनी.
नंदिनी, हि रूढ अर्थाने पाककृती नाही, पण विनोदी आहे की नाही हेही ठरवता आलं नाही, कथा/ कादंबरी, कविता प्रकारात बसत नाही, म्हणुन ललित. Happy
खरं तर अजुन ललित म्हणजे नेमकं काय हे कळलं नाही, सो it is safe to be here Biggrin

मला टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतींवर लेख असावा असे वाटले होते. ग्रुप बदला.

पण पाकृ आणि लिहायची पद्धत आवडली. फोटो भारी आलाय. हे प्रकरण चटणी प्रकारासारखे तिखट असते की भाजीसारखे सौम्य?

माधव, चटणीसारखे तिखट. खरं तर तिखटाशिवाय मजा नाही याची. एकदा हिरव्या मिरच्या घालुन बघितल्या, पण ती मजा नाही आली.
आता ग्रूप बदलला. (लोकाआग्रहास्तव Happy )

छानै की पाकृ! मग 'आहारशास्त्र आणि पाककृती' या गृपमध्ये टाकायला लाजायचं कशाला?

पोळ्या कुठुन मिळवल्या? की कैफ चढायच्या आधीच करून घेतल्या होत्या? उथळ पॅन मि़ळालं नाही तर खोल पॅनमध्ये पण उथळ व्यक्तीनं केलं तर चालेल का?

यात ठेचलेली लसणाची एखादी पाकळी आणि तिखटासोबतच एखाद-दुसरी अख्खी हिरवी मिरची घालायची. टॉमॅटोबरोबर शिजून गाळ झालेली ती हिरवी मिरची चोखून खायला मस्त लागते.

आमच्याकडे याला कांदा-टॉमॅटो चटणीच म्हणतात. प्रवासात धपाट्यांसोबत न्यायला मस्त लागतो हां तुमचा कैफ-ए-टॉमॅटो. Happy

मस्त लागतो हा कैफ .. दाण्याचं कुट घालुन पण मस्त लागते ..
इतकंही करायच नसेल तर सरळ थोड्या तेलावर टोमॅटो नि कांदा परतुन त्यावर शेंगदाण्याची चटणी ओतायची .. Happy

यातच थोडी बडिशोप आणि एखादी लसूण पाकळी घालून, शिजवून मग मिक्सरमधून काढली तरी एक वेगळीच आणि मस्त चव येते. इडली, डोश्यांबरोबर छान लागते.

जोष-ए-धपाट्यांबरोबर कैफ-ए-टोमॅटो चांगला लागतो असं सांगते आहे अल्पना. Proud

मामी, त्यादिवशी पोळ्या मलाच कराव्या लागल्या, त्यामुळे केल्या. Sad सहन करुन घ्या. Biggrin
मिलिंदा, Lol
दाण्याचे कुट करणे ही देखील कला आहे. त्यासाठी दाणे (म्हणजे शेंगदाणे - जे जमिनिखाली उगवतात ते) भाजावे लागतात आणि नंतर कुटयंत्रातुन (manual/ electronic) बारिक करावे लागतात. Happy

ह्या व यापुढीलही सगळ्या पाककृती ज्यांनी कधीच स्वयंपाकघराचं तोंडही पाहिलेलं नाही, पण काही अपरिहार्य कारणाने बघावं लागतय अश्या माझ्यासारख्या गरिब बिच्चार्‍यांसाठी लिहितोय. Happy

मामी, उथळ पाहिजे, पॅन असो किंवा माणुस, पण माणसापेक्षा पॅन परवडेल.

बाकी सगळ्या सुगरणी कॉमेंटस देत आहेत, हे बघुन बरं वाटलं. (मिलिंदा, हे वाक्य तुझ्यासाठी नाही. Light 1 )

भारीच.