झेप

Submitted by -शाम on 6 November, 2013 - 23:02

का झेप पाखराची सांडी मुजोर वारा
आभाळल्या जिवाचा पंखात कोंडमारा

शतवार हारलेल्या इच्छा वळून येती
मातीत माखलेली येते फुलून छाती
गात्रातुनी तरारे बळ कोणते उदारा

लय साधता भिडावा वाटेवरील वैरी
घनघोर अंतराळी आकांत रानभैरी
येतो तुटून जैसा कोणी अनाम तारा

माझ्या मना तुझ्याही भाग्यात ना निराळे
स्वप्नेच पावसाळी मार्गावरी उन्हाळे
आहे प्रवास कैसा काळीज पोळणारा
....................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम आशय आणि सुरेख शब्दकळा. शेवटचे कडवे अगदी अहाहा करून गेले.
खूप आवडली कविता.

सुंदर गीत
ओळन्ओळ बेहतरीन झाली आहे
खूप आवडली
धन्स
जेंव्हा तुझ्या बटांना उधळी...ची चाल आप्सूक आठवली त्याच चालीत गुणगुणली कविता

माझ्या मना तुझ्याही भाग्यात ना निराळे
स्वप्नेच पावसाळी मार्गावरी उन्हाळे
आहे प्रवास कैसा काळीज पोळणारा>> खासच Happy

>>शतवार हारलेल्या इच्छा वळून येती
मातीत माखलेली येते फुलून छाती
गात्रातुनी तरारे बळ कोणते उदारा >>

खूप ऊर्जा देणारे शब्द.