जित्याची खोड…

Submitted by vaiju.jd on 3 November, 2013 - 03:21

||श्री||

बदलापूर स्टेशनवर पोहोचले. गाडी फलाटाला लागलेलीच होती. तिकिट मिळेपर्यंत सुटणार तर नाही? अशी धाकधूक करत एकदाची तिकिट घेऊन गाडीत चढले. दुपारची वेळ असल्याने गाडीला गर्दी कमी होती. कारण गाडी इथूनच निघत होती आणि महिलांचा डबा होता त्यामुळे गर्दी कमीच असणार होती. पण प्रवासाला निघाले की मला प्रत्येक गोष्टीचे दडपण येते. गाडीत चढले आणि समोरच बसलेल्या डोंबिवलीच्या परिचीत बाई दिसल्या. बाई अगदी प्रसन्न चेहेऱ्याच्या, कानातले नेहेमी वेगळे आणि ठसठशीत घातलेले, डोक्यात आंबाड्यावर फूल, गजरा काहीतरी असणारच! हसतमुख, आपण होऊन पुढे होऊन बोलणार्‍या!

“अरे तुम्ही कुठे इकडे बदलापूरला?”

“अहो, माझी पुतणी डॉक्टर आहे इथे. तिचे मोठे हॉस्पिटल आहे. तिच्याकडे आले होते. तुम्ही कशा आत्ता?”

“आम्ही हल्ली सहा महिने झाले बदलपूरलाच राहतो. घर बांधलेले आहेच. ’हे’ रिटायर झाले मग विचार केला आता कुठेतरी दो दोघांनीच राहायचे तर बदलपूरला राहू!”

“हे छान झाले. आता कुठे निघलात दुपारी?”

“ अजुन डोंबिवलीचे सगळे चालू ठेवलेय मी. आज भिशी आहे माझी चार वाजता. ह्या लोकलने गेले की बरोबर पोहोचते म्हणून निघाले. तिथे तुम्हाला माहीतीच आहे, खूप ओळखी चिक्कार मैत्रिणी. इथे अजुन तसे झाले नाही.”

एव्हाना गाडीने दोन स्टेशन पार केली होती. डब्यात प्रवासीही वाढल्या होत्या. इतक्यात तिकीट तपासनीस बाई आल्या. त्यांनी तिकिट मागितले. माझे नुकतेच काढलेले तिकिट मी दाखवले. नंतर माझ्या भेटलेल्या मैत्रिनिनेही तिकिट काढून तपासनीस बाईंना दिले.

तपासनीस बाई म्हणाल्या ,” ओ, हे तिकिट आठवड्यापूर्वीचे आहे. आजचे तिकिट दाखवा.”

“अगो बाई, हो का? दाखवते ह!” असे म्हणून बाई पर्स मध्ये शोधायला लागल्या.

“चला, लवकर दाखवा मला सगळ्यांची तिकिटे तपासायची आहेत. काढलेय ना नक्की? मग दाखवा चटकन!” आणि तपासनीस बाई पुढच्या प्रवाश्याकडे वळल्या.

एकडे बाईंनी पर्स मधून रेल्वेच्या तिकिटांचा हा ढिगारा काढला. आमच्या दोघींच्या मध्ये बाकावर ठेवला. आणि त्या प्रत्येक तिकीटावरची तारीख बघायला लागल्या. वेळेचे महत्व ओळखून निम्मी तिकिटे घेऊन मी तारीख बघायला सुरूवात केली. बाई इतक्या बिचकलेल्या की त्यांना चटचट तपासणे जमेना. हलणारी गाडी, डोळ्यांना चष्मा! त्यांच्या मनावर दडपण यायला लागलेले!

बाईंचे पती शाळेत चित्रकलेचे शिक्षक, आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात हौशी,सचोटीचे कार्यकर्ते, बाई पण अगदी साध्या, पापभिरू, प्रामाणिक! त्यांनी तिकिट न काढता प्रवास करणे तर शक्यच नव्हते. पण कायदा हे काही जाणत नाही.तिकिट मिळायला हवे होते.

मधून मधून बाकडे बदलताना तपासनीस,” काय मिळतेय का?, हे बघा नाहीतर दंड आणि प्रवासभाडे पावती फाडा सरळ!” असे म्हणाल्या. मानहानी कल्पनेने बाईंना घाम फुटलेला!

बाई बाई! अन् शेवटी एकदाचे ते तिकिट मला सापडले! ते दाखवायला मी तपासनीसांना हाक मारली. घाम पुसत बाईंनी तिकिट दाखवले. बाकावरच्या रेल्वेच्या तिकिटांच्या ढिगाकडे बघत तपासनीस बाई म्हणाल्या.,” ही इतकी तिकिटे कशाला ठेवली आहेत? प्रवास झाला की तिकिट टाकून द्यायचे. नाहीतर घरी ठेवायचे, पर्स मध्ये भरू नका परत!” असे म्हणत तपासनीस बाईंनी तिकिटे घेतली आणि काय होते आहे हे कळायच्या आत खिडकीतून टाकून दिली.

बाई धडपडत म्हणाल्या,” अहो, अहो त्यावर माझे सगळे फोन नंबर आणि पत्ते होते.”

“त्यासाठी, एखादी डायरी ठेवा. रेल्वेची तिकिटे फोन नंबर लिहिण्यासाठी नसतात. माझा किती वेळ खाल्लात समजतेय कां?”

डोंबिवली स्टेशन आले होते, तपासनीस उतरून गेल्या. आम्हीही उतरलो. स्टेशनबाहेर आलो.

“ जरा येता का, स्टेशनबाहेरच्या कामत मेडिकलमधून जरा डायबेटिस् च्या गोळ्या घेऊन टाकुया!”

आम्ही मेडिकलच्या दुकानात गेलो. विक्रेता गोळ्या शोधून देईपर्यंत मी बाईंना म्हटले,” या ना घरी.घर तुम्हाला माहितीच आहे पण फोन कराच म्हणजे हेलपाटा नको. असे करा नां पुढच्या भिशीच्या दिवशीच या. जेवा आमच्याकडे मग दुपारी चहा घेऊन भिशीला जा!”

बाई आनंदाने ’हो’ म्हणाल्या.

मी बाईंना म्हटले,” फोन नंबर?”

“घेते ना लिहून!” बाईंनी काउंटरवरचे बॉलपेन पॅड समोर ओढले आणि माझा फोन नंबर लिहून घेतला, पर्समधून काढलेल्या आजच्या रेल्वे तिकिटावरच!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे किस्सा. माझ्या एका बॉसला अशी जित्याची खोड होती. हातात येईल त्या कपाट्यावर नंबर लिहून घ्यायाचा, वर नुसता नंबर लिहायचा.. नाव वगिरे काहीच नाही. मग आयत्यावेळेला नंबर शोधताना नुसती ऑफिसभर शोधाशोध.

मस्त Happy