ब्लॅक आईस

Submitted by निनाद on 6 October, 2013 - 07:04

सारा ही चाळीशीची गायनॅक डॉक्टर आहे. तिचा नवरा लिओ हा आर्किटेक्चर विषयातला प्राध्यापक आहे. दोघेही हेलसिंकीमध्ये राहत असतात. साराच्या चाळीसावा वाढदिवस लिओने आणि तिने दुपारी रमणीय शृंगारीकपणे साजरा केलाय.
आता सायंकाळी पार्टी आहे. पार्टीच्या आधी योगायोगाने साराला समजते की लिओच्या आयुष्यात अजून एक प्रकरण आहे.
सारा भडकते. विमनस्क झालेली सारा पार्टी उधळून टाकते. सगळ्यांच्या समोर कंडोम्सचे फुगे करत लिओला जाब विचारते पण लिओ असे काही प्रकरण आहे हेच नाकारतो.

थोड्याफार खटपटीतच तिच्या लक्षात येते की मुलीचे नाव तूली आहे आणी ती त्याची विद्यार्थिनीच आहे. तूली मार्शल आर्ट्सची प्रशिक्षिकाही असते. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यासाठी मत्सरग्रस्त सारा तूलीच्याच क्लासला नाव घालते.

एकदिवस शांतपणे सारा घर सोडते. तूली बरोबर जवळीक वाढवण्यासाठी नव्या नावाने मानसोपचार तज्ञ असल्याचे भासवून तिच्या आजूबाजूला वावरू लागते. त्यासाठी नव्या नव्या हिकमती लढवते. या सगळ्याचा परिणाम होतो आणि तूली तिला स्वतःची चांगली जवळची मैत्रिण समजू लागते. तूली लिओ विषययी असलेली सर्व माहिती साराला सांगू लागते. त्यातून तिला लिओची अजून अनेक प्रकरणे होती हे लक्षात येते. तरी मनोमन सारा लिओला सोडू शकत नाही.

सारा सोडून गेल्याने लिओ अस्वस्थ होतो. त्याचा मित्र इक्का त्याची चांगली कानउघडणी करतो. अस्वस्थ लिओ तूलीला टाळून साराला भेटण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यासाठी तो तूलीकडे दुर्लक्ष्य करू लागतो. तूली अस्वस्थ होऊ लागते.
शेवटी सारा भेटायला तयार होते. या भेटीत लिओ तिला सांगतो की माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. मला तुझ्या मुलाचा बाप व्हायचंय. सारा सुखावते पण अजून त्याला निर्णय सांगत नाही.

तूली आणि सारा कॉलेजच्या एका कार्यक्रमात जातात. तेथे लिओ अजून तिसर्‍याच मुलीबरोबर या दोघी पाहतात. तूली भडकते.
त्याच मानसिक अवस्थेत तूली तिला सांगते की लिओमुळे तीची पाळी चुकली आहे. सारा विचारते की तिने प्रेग्नंसी टेस्ट केली आहे का? तूली नाही सांगते.
हादरलेली सारा तिला हेलसिंकीच्या बर्फाळलेल्या रस्त्यांवरून लिओच्याच घरी घेऊन येते. तेव्हा तूली प्यायलेली असते. साराला ती खरच प्रेग्नंट आहे की नाही हे तपासायचे असते. सारा तिला अजून दारु पाजण्याचे ठरवते. गुंगी येण्यासाठी एका पेल्यात औषध घातलेले मद्य तयार करून ठेवते. गायनॅक असलेली सारा प्रेग्नंसी टेस्ट करण्याचा प्रयत्न करते. पण प्रयत्न फसतो तूली जागी होते.
तूलीला संशय आलेला असतो पण लिओचे घर पाहिल्यावर तिलाही साराचे स्वरूप लक्षात येते.
नेमका तेव्हाच लिओही घरी येतो. वादात सारा त्याला सांगते की तूली प्रेग्नंट आहे. या सुखद धक्क्याने लिओ तेथे असलेला मद्याचा पेला पिऊन टाकतो. साराच्या फसवणूकीने अस्वस्थ असलेली तूली त्यांच्या नकळत घरातून बाहेर पडते आणि त्याची गाडी घेऊन जाऊ लागते. आता लिओचे विचारच पालटतात. तो सारा ला तेथेच सोडून तूलीच्या मागे दुसरी गाडी घेऊन जातो. तूलीच्या हे लक्षात येते पण ती थांबत नाही. मद्यातले औषध परिणाम करू लागते आणि लिओ एका झाडाला धडकतो.

संतापलेली तूली गाडी थांबवते आणि मागे आणते. धडधाकट असलेला लिओ पाहिल्यावर ती त्याला सांगते की तू या बर्फाळ रात्री आता चालतच घरी जा आणि ती निघून जाते. लिओ घरी पोहोचतच नाही.

पुढे काय होते... ते चित्रपटातच पाहा.

प्रेमाचा तिकोण असलेली कथा सुंदर हाताळली आहे. सर्वांचाच अभिनय सुरेख आहे. साराची भूमिका औती मेन्पा ने अप्रतिम साकारली आहे. चाळीशीची अस्वस्थ, उध्वस्त पण चलाख सारा अप्रतिमपणे उभी केली आहे. तूली प्रथम भेटण्याचा प्रसंग जबरी आहे. पहिल्यांदा तूलीला जवळून पाहताना साराच्या डोळ्यात मत्सर पेटतो तो प्रसंग सुंदर आहे. तूली प्रेग्नंट आहे हे कळल्यावरचा अभिनयही मस्त. आधी बधीर वाटलेली तूली (रिया कात्जा) पुढे सुंदर अभिनय करते. साराचा संशय आल्याचा प्रसंग. किंवा लिओने तिला सोडल्यावर, साराला तिच्या क्लास मध्ये भेटण्याचा प्रसंग अप्रतिम आहेत. फक्त डोळ्यातून तिने दाखवलेला विखार जबरदस्त!

रंगेल, रसिक लिओची भूमिका मार्ती सुओसालोने ठिक उभी केली आहे.

पण खर्‍या अर्थाने चित्रपट या दोघींचाच आहे. प्रेमाच्या त्रिकोनातले दोन कोन आणि त्यातलेच रंग गहिरे होत जातात.
ब्लॅक आईस म्हणजे बर्फाचा न दिसून येणारा एक पातळ थर. हा भयंकर निसरडा असतो. पण तो तेथे आहे हे लक्षात येत नाही.
मानवी संबंधातले निसरडे थर जाणवून देणारा चित्रपट असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल.

दिग्दर्शन ठिकठाक. अजून चांगले होऊ शकले असते वाटत राहिले. त्यातही सारा लिओकडे परत आल्यावरचा प्रणयप्रसंग, किंवा पार्टीत कंडोमचे फुगे फुगवत तिरकसपणे जाब विचारणे असे काही प्रसंग दिग्दर्शक दाखवून जातात. निरनिराळे पण मोजकेच चित्रपट या दिग्दर्शकाने दिले आहेत. प्रकाश चित्रण ठिकठाक. अजून चांगले करता आले असते. संगीत मात्र सुरेख आहे. काही गाणी खुपच छान आहेत.

Black Ice (Musta jää)
भाषा - फिनिश
वर्ष - २००७
कथा आणि दिग्दर्शन - पेट्री कोत्विका
संगीत - इक्का तोपिनेन
प्र. भू.
सारा - औती मेन्पा
तूली - रिया कात्जा
लिओ - मार्ती सुओसालो

ट्रेलर - http://www.youtube.com/watch?v=VOTNuC2F_DA
पुरस्कार
बर्लिन आंतराष्ट्रिय चित्रपट मोहोत्सव - बर्लिन गोल्डन बेयर साठी नामांकन
फेस्त्रोय त्रुआ - उत्कृष्ठ अभिनेत्री - रिया कात्जा

(फिनिश नावांचे उच्चार गंडले असतील तर जाणकारांकडून दुरुस्तीचे स्वागत आहे!)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users