"संहिता" माझ्या नजरेतून...

Submitted by हर्षल_चव्हाण on 19 October, 2013 - 04:29

...................मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता-द स्क्रीप्ट" या चित्रपटाच्या प्रिमियरला चिन्मय दामले (चिनुक्स)मुळे जाण्याची संधी मिळाली. प्रत्यक्षात सारे कलाकार पाहण्यास मिळाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आल्यामुळे खूप मजा आली.

चित्रपटाविषयी :
...................'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं जेव्हा आपण सगळे म्हणतो, त्यामध्ये बर्‍याचदा पूर्वी घडून गेलेल्या घटनांशी बरचसं साम्य असलेल्या घटनांना आपण अनुभवत असतो. मग त्या घटना आपल्याच आयुष्याशी निगडीत असो किंवा दुसर्‍या कुणाच्याही... घटना घडत असतात, त्यांची आठवण ठेवली जाते, त्यांच्या कथा-दंतकथा होतात... आणि कालांतराने त्यावर, कुणाला अगदी काही खास वाटलंच, तर चित्रपटही निघतात...
...................आता चित्रपट म्हटला की पटकथा पहिले हवी. त्या पटकथेचा उगम (शिरीन आणि तिचा पॅरॅलाईझ्ड नवरा), त्या मागचा प्रेरणास्त्रोत (तारा देऊस्कर), त्या पटकथेचा प्रवाह (हेमांगिनी) आणि त्या पटकथेचा आत्मा (रेवती) आणि या सर्वांमार्फत ती पटकथा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे "संहिता- द स्क्रीप्ट". अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाने दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावली आहेत. त्यामुळे मुळात या चित्रपटाची संकल्पना आणि त्याचं मूर्त रूप हे पडद्यावर दिसणार्‍या गोष्टींपेक्षा, ऐकू येणार्‍या संवादांपेक्षा आपल्या अंतर्मनात होणार्‍या उलथापालथीचं, आणि त्यातून आपल्याला होणार्‍या स्वतःबद्दलच्या साक्षात्काराशी खूप जास्त निगडीत आहे.
...................एक उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण स्त्री असणार्‍या; माहितीपट दिग्दर्शिका रेवती (देविका दफ्तरदार)ला, पक्षाघात होण्यापूर्वी नावाजलेला निर्माता असलेल्या माणसाची; त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याची शेवटपर्यंत सेवा करणारी पत्नी शिरीन (ज्योती सुभाष) भेटायला बोलावते. आपल्या पतीची शेवटची इच्छा असलेल्या, १९६० च्या दशकात प्रकाशित झालेल्या एका लेखिकेच्या "दर्पण" या कथेवर चित्रपट बनवायलाच हवा म्हणून शिरीन, रेवतीला सांगते. त्यानुसार रेवती, त्या कथेची लेखिका तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांना भेटते. त्या तिला कथा ऐकवतात. आणि त्यानुसार चित्रपटाची संहिता लिहितांना रेवती, हेमांगिनी (राजेश्वरी सचदेव) हिलाही भेटते, कथा ऐकवते. ह्या प्रवासात "दर्पण" कथा प्रत्यक्षात पडद्यावर कशी दिसेल ह्याचा रेवतीचा कल्पनाविलास आपल्यासमोर घेऊन येतो, 'संहिताचा' एक समांतर प्रवास... भव्य राजवाडा, शाही थाट, मैफिल, पोशाख, खानसामा, अदब, जरब, जुना पण हवासा वाटणारा काळ... इतकी सहज गुंफण ह्या चित्रपटात दाखवलीये की, मुळात संहिता कुठली, आणि वास्तव कुठलं याचा फरक सापडेनासा होतो... आणि हेच या चित्रपटाच खरं यश आहे!!! Happy
...................'दर्पण' कथा हेरवाडच्या संस्थानाचे राजे असलेल्या सत्यशील जहागिरदारांची (मिलिंद सोमण). त्यांच्या उच्चशिक्षित, स्वतंत्र विचारांची पत्नी असलेल्या मालविकाबाईंची (देविका दफ्तरदार). वडीलांनी बळजबरी, लहानपणीच लावून दिलेल्या लग्नामुळे असलेल्या असंतोषाची. आपल्या स्वतंत्र वृत्तीला मोडता न घालण्याची, आणि समर्पित न होण्याची. मग अशा वेळी राजवाड्यात येणार्‍या, दैवी गळा लाभलेल्या गायिका भैरवीच्या (राजेश्वरी सचदेव) प्रेमात पडून, राजधर्म विसरणार्‍या राजाच्या हातून चूक घडणे ओघाने आलंच. अशा वेळी आडवे येणारे समाजाचे किंवा आपल्याच नातलगांचे आचार-विचार. किंवा स्वतःच्याच मनाची घालमेल. ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आणि सर्वांनाच आनंदी कसं ठेवायचं ह्याचा झालेला गुंता म्हणजे समांतर "संहिता".
...................बदललेल्या काळासोबत मात्र, प्रश्न काही बदलत नाही. रेवतीचं आयुष्य अगदी मालविकासारखंच... स्वतंत्र, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण त्यामुळे मुंबईत एकटं राहणं. तिचा नवरा रणवीर फ्लॉरीकल्चरीस्ट आहे. वडिलोपार्जित जमिनीवर फुलं उगवून ती एक्स्पोर्ट करण्याचा त्याचा व्यवसाय. त्यामुळे गावाकडे राहणं, वडीलांसोबत. दोघांचं लव्ह मॅरेज. मुलगी हॉस्टेलवर. नात्यांतली गुंतागुंत, आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली गोष्ट. शिरीनचं एक उपकथानक आहे. तीचं एक वेगळंच दु:खंय... हेमांगिनीचं उपकथानक आहे. समांतर संहिता आणि त्याचं आजच्या काळाशी असलेलं साम्य यामुळेच मी सुरुवातीला 'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं म्हटलंय. मात्र, इतिहासातून शिकण्यासारखी एकच गोष्ट असते ती म्हणजे, बदलती मानसिकता. बदलता काळ आपल्याला प्रगल्भ बनवत असतो. आणि जेव्हा हिस्टरी रिपीट होत असते, तेव्हा आपण पूर्वीपेक्षा खूप प्रगल्भ झालेलो असतो. ज्यामुळे ज्या गोष्टीचा शेवट पूर्वी दु:खद झालेला असतो, त्या गोष्टीचा शेवट सुखद कसा करायचा हे आपल्याला कळलेलं असतं. जर तसं नसेल, तर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं म्हणण्यावाचून पर्याय नसतो. तोपर्यंत त्याची संहिता आपली आपल्यालाच लिहावी लागते.
...................ह्या चित्रपटाचे खूप पैलू आहेत. संवाद ही सर्वांत महत्त्वाची बाजू. बर्‍याच दृश्यांमधली ओळन् ओळ विचार करायला लावणारी. त्यानंतर गाणी, आरती अंकलीकर-टीकेकरांचा आवाज, संगीत सगळं उत्तमच! चित्रीकरण, सेट, पोशाख... बोलावं तितकं कमीच... अभिनय सर्वांचा अगदी सहज-सुंदर. देविका दफ्तरदार दोन्ही भुमिकेंमध्ये खासच... मालविका म्हणून तर मला खूपच भावलीये ती... मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सुद्धा उत्तम! उत्तरा आणि ज्योतीजी तर लीलया वावरल्यात... ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार्‍या सुमित्रा भावे आणि गीतकार सुनिल सुकथनकर यांना सलाम! ही कलाकृती नक्कीच अविस्मरणीय झालीय...
...................एकंदर हा चित्रपट 'क्लास' साठी आहे. 'गॉड इज अ बॅड स्क्रीप्टराईटर' हे जरी खरं असलं, तरी त्याच्या लिखाणाचा ड्राफ्ट आपल्याहाती देऊन तो आपल्या आयुष्याची एक उत्तम संहिता लिहिण्याची संधी आपल्याला देतो, याचा अर्थ तो एक उत्तम डिरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही! आणि 'आपण आपल्या आयुष्याची संहिता स्वतःच का लिहू शकत नाही?' याचं उत्तरही वरच्या ओळीतच दडलंय... कारण आपल्या संहितेतली बरीचशी पात्र त्याने निवडलेली असतात, रेखाटली असतात. ती समजून घ्यायला वेळ लागतोच... आणि लिहायला आयुष्यं!

---------------------हर्षल (१९/१०/२०१३ - दु. १.४५)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला दर्पणात डोकावल्यावर जे दिसले ते प्रामाणिकपणे आणि सुंदर लिहिले आहेस,

शेवटचा परिच्छेद तर चांगला आहेच पण
"ज्यामुळे ज्या गोष्टीचा शेवट पूर्वी दु:खद झालेला असतो, त्या गोष्टीचा शेवट सुखद कसा करायचा हे आपल्याला कळलेलं असतं. जर तसं नसेल, तर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं म्हणण्यावाचून पर्याय नसतो. तोपर्यंत त्याची संहिता आपली आपल्यालाच लिहावी लागते." ही वाक्ये पण मस्तच आहेत.

आज सकाळी जाग येतानाच परत संहिता आठवत गेला म्हणून परत इथे येऊन लिहितेय Happy

एस्पेशिअली मालविका ! वर जे तिचे स्वभावविषेश दिले गेले आहेत त्याच पुढे जाऊन ती थोड्या अलिप्तपणे ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल करताना दाखवली आहे ते अत्यंत कंट्रोल्ड आहे. ह्या छोट्याश्या गोष्टीतही हा सिनेमा वेगळा जाणवला.

राजा आणि गायिका भैरवी ह्यांच्यातील प्रेम हे टेक्निकली विवाहबाह्य संबंध असले तरी त्या प्रेमाची तरल पातळी, समर्पण, काही मिळवण्यापेक्षा फक्त देण्याची वृत्ती आणि मालविकेने त्या दोघांचे प्रेम वेगळ्याच पातळीवरुन समजून घेणे ह्या सगळ्यामुळे त्या संबंधांना 'बाहेरख्यालीपणा' हे लेबल लावायला आपण धजावत नाही.

गाण्यांचे बोल, संगीत, गायकी सगळंच बेस्ट, त्यावर राजेश्वरीचा अभिनयही नैसर्गिक आहे. राजेश्वरीचा संवादांच्या वेळचा आवाज नाजुक वाटतो, तिचा वावरही मितभाषी/लाजरा आहे पण गातानाचा प्लेबॅक भारदस्त कसलेला असल्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की राजेश्वरी गायला बसली की अचानक तिचं व्यक्तिमत्व बदलतंय काही वेळापुरतं. बेस्ट अभिनय आणि बेस्ट गायकी एकत्र येऊनही काहीतरी मिसमॅच वाटतं. पण तेवढं दुर्लक्ष करण्याजोगं आहे.

https://www.youtube.com/watch?v=AUugxovFpu4 (क्या यही था जुर्म के हम उन्हे दिलो जाँ से ना भुला सके) अ‍ॅवॉर्ड विनिंग "पलके ना मूंदो" असलं तरी हे गाणं मला जास्त अपील झालं कारण त्यातला दर्द कथेतल्या टर्नला अत्यंत साजेसा वाटला.

हर्षल, मला जे सिनेमा बघताना किंवा गेल्या ४ दिवसांत ह्या सिनेमातलं जाणवत गेलं ते जवळ जवळ सगळंच तू इथे लिहिलं आहेस त्यामुळे तेच परत लिहित नाही. थोडं अजून जे जाणवलं तेवढंच लिहिलंय. धन्यवाद Happy

गातानाचा प्लेबॅक भारदस्त कसलेला असल्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की राजेश्वरी गायला बसली की अचानक तिचं व्यक्तिमत्व बदलतंय काही वेळापुरतं. बेस्ट अभिनय आणि बेस्ट गायकी एकत्र येऊनही काहीतरी मिसमॅच वाटतं. पण तेवढं दुर्लक्ष करण्याजोगं आहे. >>> + १००

केश्विनी, मी कालच हा चित्रपट बघून आले. अतिशय सुरेख ! त्या अनुभवाबद्दल लिहिनच. तेव्हा ही बाबही लिहिणार होते. त्यांचा आवाज राजेश्वरीच्या मुखातून आलेला वाटत नाही. मुळात आरतीताईंचा आवाज आपल्यासाठी नवा नाही. पण त्याच वेळी राजेश्वरीने गाताना कमालीचा सुंदर मुद्राभिनय केला आहे. तसं होऊनही मिसमॅच होतो ह्याचं वाईट वाटतं.

चित्रपट मस्ट वॉच आहे मात्र !

आज सकाळी जाग येतानाच परत संहिता आठवत गेला म्हणून परत इथे येऊन लिहितेय>>> हा चित्रपट अलगद हळू हळू मुरत जाणारा आहे.

राजेश्वरीचा संवादांच्या वेळचा आवाज नाजुक वाटतो, तिचा वावरही मितभाषी/लाजरा आहे पण गातानाचा प्लेबॅक भारदस्त कसलेला असल्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की राजेश्वरी गायला बसली की अचानक तिचं व्यक्तिमत्व बदलतंय काही वेळापुरतं.>>> हा मुद्दा मला पण जाणवला, पण खटकला नाही कारण माझ्या मते राजा भैरवीच्या सुंदर चेहर्‍याच्या प्रेमात पडलेला नाहीये तर एका गयिकेच्या आवाजाच्या प्रेमात पडलेला दाखवलेला आहे त्यामुळे खटकत नाहीये....

छान चर्चा .. मालविका आणि रेवतीमधला फरक हा की रेवतीचा नवरा रणवीर कुणाच्या प्रेमात पडलेला नाही. दोघांमध्ये लाइफ़स्टाईलमुळे निर्माण झालेला ताण आहे. रेवती स्वत:ला स्टिरिओटाईप करायला तयारही नाही..
कथा लिहिली जाताना वास्तव अन कल्पिताची सरमिसळ कशी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाकडून होत जाते ..

हर्पेन, आपण त्रयस्थपणे बघतोय म्हणून जाणवलं...खटकलं नाही. प्रेमात पडलेल्यांना काहीच खटकत नाही कारण जसे असेल तसे स्वीकारलेले असते, गुणदोषांसकट. आणि इथे तर तिचा आवाज बोलताना नाजूक आणि गाताना भारदस्त असणं हा दोष नाहीच आहे, फक्त तफावत आहे आणि आपल्याला माहित आहे की तो गाता आवाज आरतीताईंचा आहे व तो तसाच असणार आहे Happy

राजेश्वरी आणि आरतीताई यांच्या आवाजाबद्दल सुमित्रामावशींचं मत -
'जुन्या काळातल्या अनेक मुस्लिम गायिकांचे बोलतानाचे आवाज आणि गातानाचे आवाज वेगळे असत, हे मी पाहिलं आहे. अनेक नाजूक, सुरेख दिसणार्‍या गायिका होत्या, पण त्यांचा गाता गळा अतिशय भारदस्त होता. मला अशा मुस्लिम गायिकेचाच आवाज चित्रपटासाठी हवा होता.'

हो दीपांजली, ऐकलं आहे तिचं गाणं Happy

चिन्मय, ख्याल्/ठुमरी ही त्या गायिकांची खासियत. आणि हे गायनप्रकार भारदस्तच व त्यासाठी लागणारा आवाज हा अतिशय कमावलेलाच हवा. सुमित्राताईंनी पुर्ण अभ्यासानेच हा सिनेमा बनवला आहे आणि हा मुद्दाही त्यांनी विचारानेच घेतला असणार ह्यात शंकाच नाही. हा सिनेमा खणखणीत नाणं आहे म्हणून तर अजून मनात रुंजी घालतोय :-). फक्त एक सामान्य प्रेक्षक म्हणून ते जाणवलं इतकंच, खटकलं अजिबातच नाही. आणि अय्यो! तू त्यांना काय जाऊन सांगितलंस इथे काहितरी न कळून बरळलेलं? Wink

< आणि अय्यो! तू त्यांना काय जाऊन सांगितलंस इथे काहितरी न कळून बरळलेलं?>
Happy हे त्यांना इतर काहींनीही सांगितलं आहे. आणि त्या 'न कळलेलं' काय आहे? एखाद्या आवडलेल्या चित्रपटातही काही गोष्टी खटकू शकतातच.

बरं बरं ! Happy पण बाकी तो सिनेमा पाहून विसरुन जाणं होत नाहिये हे सांगितलंस का त्यांना? ही मनापासूनची दाद पण त्यांच्यापर्यंत पोहोचव Happy

.

मलाही एकीने सिनेमातल्या गाण्यांबद्दल ही बाब खटकल्याचं सांगितलं होतं. पूर्वीच्या कसलेल्या गायिकांचे नेहमीच्या आयुष्यातले बोलायचे आवाज कसे होते यांबद्दल माहीत नाही, परंतु अगदी नाजूक, सुरेख दिसणार्‍या गायिका एकदा गायला बसल्या की त्यांच्या गळ्यातून निघणारे स्वर खणखणीत, घोटीव आणि आवाज भारदस्त असायचा हे कानसेनगिरी केल्यामुळे माहीत आहे. सुमित्रा भावेंनी विचार करूनच आरतीताईंचा आवाज या भूमिकेसाठी आणि तोही संपूर्ण चित्रपटात गायिकेच्या जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर वापरलाय ह्याची खात्री होती. इथे लिहिल्याबद्दल थँक्स चिनूक्स! Happy

छान चर्चा चालु आहे Happy

बाकी तो सिनेमा पाहून विसरुन जाणं होत नाहिये हे सांगितलंस का त्यांना? ही मनापासूनची दाद पण त्यांच्यापर्यंत पोहोचव>>>>>>+१ Happy