दुरून जाता कधीतरी - ( तरही गझल)

Submitted by वैभव फाटक on 11 October, 2013 - 08:02

या वेळच्या 'तरही' उपक्रमात माझा विनम्र सहभाग.

दुरून जाता कधीतरी कुटीत माझ्या वळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

सदैव आहेत सोबती उरातले घाव आजही
नकोच घालूस फुंकरी जमेल तर हळहळून जा

तुझ्यामुळे स्वप्न राहिले तिथेच वाळूत कोरडे
पुसून टाकायला तरी अखेरचा कोसळून जा

परिस्थितीने गळ्यामधे कधीच हा फास टाकला
यमा, मला सोडवायला हळूच तो आवळून जा

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा

हरेक पानास शेवटी गळून आहे पडायचे
तुझ्यापरीने कधीतरी जरूर तू सळसळून जा

वैभव फाटक ( ११ ऑक्टोबर २०१३ )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा<<< वा वा

हरेक पानास शेवटी गळून आहे पडायचे
तुझ्यापरीने कधीतरी जरूर तू सळसळून जा <<< सु रे ख शेर आहे.

मस्तच.

तुझ्यामुळे स्वप्न राहिले तिथेच वाळूत कोरडे
पुसून टाकायला तरी अखेरचा कोसळून जा

वाह.

वैभव वसंतराव कु... | 11 October, 2013 - 22:46
वाह फाटक साहेब अनेक दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळाली खूप मस्त वाटले

>>
अनेक दिवसांत तुमची मिळाली नाहीये वैवकु...... खूप चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय.. (की मी मिसल्या मध्येच काही गझला ?)

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा

बहोत खूब. हा ओथंब शब्दप्रयोग किती वेगळा आहे। गझल आवडलीच

अचानक माझ्या काही जुन्या ओळी आठवल्या..

चाललास दूर तू, प्रवास एकटाच हा
उभी अशी मी पाहण्या एकदा वळून जा

थेंब थेंब सय तूझी वाहते, तनीमनी
थांबून एकदा जरा, उरात साकळून जा...

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा
.....मस्त !
तसेच अनेक शेर आवडले .