दुरून जाता कधीतरी

दुरून जाता कधीतरी - ( तरही गझल)

Submitted by वैभव फाटक on 11 October, 2013 - 08:02

या वेळच्या 'तरही' उपक्रमात माझा विनम्र सहभाग.

दुरून जाता कधीतरी कुटीत माझ्या वळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

सदैव आहेत सोबती उरातले घाव आजही
नकोच घालूस फुंकरी जमेल तर हळहळून जा

तुझ्यामुळे स्वप्न राहिले तिथेच वाळूत कोरडे
पुसून टाकायला तरी अखेरचा कोसळून जा

परिस्थितीने गळ्यामधे कधीच हा फास टाकला
यमा, मला सोडवायला हळूच तो आवळून जा

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा

हरेक पानास शेवटी गळून आहे पडायचे
तुझ्यापरीने कधीतरी जरूर तू सळसळून जा

Subscribe to RSS - दुरून जाता कधीतरी