कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा - तरही

Submitted by बेफ़िकीर on 11 October, 2013 - 00:10

नवीन तरही गझलेत माझा नम्र सहभाग! कवी रसप यांची आकर्षक ओळ त्यांनी तरहीसाठी योजायला दिल्याबद्दल त्यांचे व धाग्यासाठी डॉ. कैलासराव यांचे आभार!

-'बेफिकीर'!
===================================================

पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा

नकोत कुठले उपाय अन् नकोत कुठलीच औषधे
जशी उमलते जुनी जखम तशीच तू भळभळून जा

पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा

तुझी अवस्था जशी तिथे तशीच मी सोसतो इथे
कधीतरी हळहळून ये कधीतरी हळहळून जा

जगात व्यवहार चालतो... कसे तुला सांगणार मी
प्रफुल्लतेने सजून ये... विषण्णतेने मळून जा

सचेतनेचा प्रवाह हो नसानसांना तुडुंब कर
मनातुनी पाझरून ये तनावरी ओघळून जा

उषा गुलाबी बनून ये... करून माध्यान्ह केशरी
जशी तिन्हीसांज रंगते तशीच तू जांभळून जा

तुझ्या नशीबी असोतही अजून कित्येक वादळे
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह.... अप्रतिम गझल.

उषा गुलाबी बनून ये... करून माध्यान्ह केशरी
जशी तिन्हीसांज रंगते तशीच तू जांभळून जा

या शेरातील जांभळून या शब्दास एक विशेष संदर्भ असल्याने फार आवडला हा शेर.

पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा

नकोत कुठले उपाय अन् नकोत कुठलीच औषधे
जशी उमलते जुनी जखम तशीच तू भळभळून जा

पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा

तुझी अवस्था जशी तिथे तशीच मी सोसतो इथे
कधीतरी हळहळून ये कधीतरी हळहळून जा

तुझ्या नशीबी असोतही अजून कित्येक वादळे
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा

>>>>
दुनियाभारी शेर !! व्वाह्ह !

मतला तर आरपार..................!! मी नुसता गुणगुणतोय तो मतला!

मजा आ गया सरजी!

>>या शेरातील जांभळून या शब्दास एक विशेष संदर्भ असल्याने फार आवडला हा शेर.<<

डॉक.,
म्हणजे ??

पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा >>>> भन्नाट शेर

बाकीचे शेरही छान !!!

वाह वाह!! बेफिकीर टच...फारच सुन्दर!
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा..
पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा..
हे आवडले..:)

जगात व्यवहार चालतो... कसे तुला सांगणार मी
प्रफुल्लतेने सजून ये... विषण्णतेने मळून जा

अप्रतिम शेर. मक्ताही आवडला.

व्वा.

सर्व शेर आवडले.

मळून, हळहळून आणि मक्ता जबरदस्त.

तरही इतकी भारी होण्याचे एक विरळ उदाहरण!

अर्रे वा! मस्त गझल! Happy
('सचेतनेचा' आणि 'जांभळून' इथे अडखळले वाचताना, पण शेर सगळेच मस्त!) Happy

Happy

पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा....

,,,,,,अप्रतिम, वगरे,वगरे शब्द हि थिटे!

"बेफिकीर" अलगत भेटे तिथे !!