चाऊ माऊ आणि इतर गोष्टी- वाघ शाकाहारी झाला आणि.....

Submitted by मधुरा आपटे on 19 September, 2013 - 03:35

एक जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी- पक्षी रहायचे. ससे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे, घुबड, चिमण्या, खारुताई असे सगळे प्राणी- पक्षी मिळून मिसळून रहात असतं. त्या जंगलात पिंट्या नावाचा एक वाघ होता. छान पिवळ्या रंगाचा, त्यावर काळेभोर चट्टे-पट्टे असलेला पिंट्या वाघ जंगलाच्या उत्तरेकडे असलेल्या गुहेत अगदी आरामात रहायचा. सकाळी उशीरा उठायचं. जवळच्याच ओढ्यावर तोंड धुवायचं. मग दुपारी, रात्री आणलेल्या शिकारीतुन काही उरलं असेल तर खायचं. आणि मग एक छान वामकुक्षी घ्यायची. आणि रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचं. असा त्याचा दिनक्रम असायचा.
एके दिवशी काय झालं, पिंट्या वाघाला गुहेत बसल्या बसल्या खूप कंटाळा आला होता. झोपायचं तरी किती वेळ? त्यामुळे आता करायचं काय? म्हणून कंटाळा घालवण्यासाठी तो जरा फिरायला बाहेर पडला. संध्याकाळ झाली होती, सूर्य अस्ताला जायला लागला होता. पिंट्या सगळीकडे फिरत फिरत जंगलाच्या मध्यभागी असलेल्या बागेत पोचला. तिथे बागेत पिंट्याने पाहिलं तर काय रोझी हरिण, खारुताई, बंटी ससा छान गप्पा मारत बसले होते. एकिकडे बंडू हत्ती, चिंटू बगळे, मीना कासवीण, भूभू कुत्रा अशी सगळी लहान मूलं पकडापकडी खेळत होते. तर दुसरीकडे एका झाडाखाली बंडूचे आजोबा, चिंटूची आजी, मीना आणि भूभूचे आजी-आजोबा अशा सगळ्यांचा गप्पांचा फड रंगला होता. सगळ्या प्राण्यांची ही मैत्री बघून पिंट्याला खूप आश्चर्य वाटलं. हे सगळे प्राणी माझ्याशी मैत्री का करत नाही? त्यांना जराही वाटलं नाही की पिंट्या वाघालाही आपण बोलवावं, त्याच्याशीही मैत्री करावी.' पिंट्या मनाशीच म्हणाला. त्याला त्या सगळ्याच प्राण्यांचा खूप राग आला. आणि त्याने त्या रागातच मोठी डरकाळी फोडली. बागेतले सगळेजण ती डरकाळी ऐकुन खूप घाबरले. बापरे साक्षात पिंट्या वाघ. आता आपलं काही खरं नाही. पिंट्या कोणाला तरी नक्कीच खाणार. बागेतले सगळेच प्राणी बिचारे खूप घाबरले होते. लहान मूलं आपल्या आजी-आजोबांना बिलगली. मोठे प्राणी पटकन उठुन उभे राहिले. पिंट्याने सगळ्यांना दरडावून विचारलं, 'तुम्ही कोणीच माझ्याशी मैत्री का करत नाही?'. पण कोणीच उत्तर देईना. सगळेच खूप घाबरले होते ना. पिंट्या म्हणाला,' घाबरु नका. मी कोणालाच खाणार नाही. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझ्याशी मैत्री का करत नाही? मला गप्पा मारायला का बोलवत नाही?' कोणाला कळेचना आता काय उत्तर द्यायचं ह्यावर. कारण पिंट्या वाघ तर मांसाहारी. ह्याच्याशी मैत्री कोण करणार?सगळेच विचार करत होते, आता ह्याला काय बरं उत्तर द्यायचं? शेवटी बंटी सशाने मनाचा हिय्या करुन पिंट्याला उत्तर दिलं. 'अरे वाघोबा असं काही नाही रे. तुला बोलवणारच होतो आम्ही. पण तु खूप लांब रहातोस ना, त्यात तु मांसाहारी आहेस. आम्ही तुझ्याशी मैत्री करायचो आणि तु आम्हालाच खाऊन टाकायचास.'
'अच्छा, म्हणजे मी मांसाहारी आहे. म्हणून तुम्ही माझ्याशी मैत्री करत नाही तर?' पिंट्या म्हणाला. 'ठिक आहे तर मग. आजपासून मी मांसाहार सोडला. मी पण तुमच्यासारखच गवत खाणार. आजपासून मांसाहाराला सुट्टी.'
'खरच?' सगळ्या प्राण्यांनी एकसुरात विचारलं.
'हो. खरच. मी आजपासून काय आत्तापासून मांसाहार सोडला. आता मी कोणालाही खाणार नाही.' पिंट्याने सांगितलं. सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला. 'तु खरच शाकाहारी झाला असशील तर तुझं आमच्यात स्वागत आहे.' बंटी सशाने पिंट्याशी हात मिळवत त्याला सांगितलं.
झालं. बघता बघता ही बातमी वा-यासारखी संपूर्ण जंगलभर पसरली. 'पिंट्या वाघ शाकाहारी झाल्याचीच चर्चा प्रत्येकजण करत होता. पिंट्या वाघ शाकाहारी झाला म्हटल्यावर सगळ्याच प्राण्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. 'जंगलातला एक मांसाहारी प्राणी कमी झाला' असं सगळ्याच प्राण्यांचं म्हणणं पडलं. तर इकडे मांसाहारी प्राणी मात्र पिंट्यावर चांगलेच रागवले होते.
'पिंट्याची वागण्याची ही कुठली पद्धत? आणि शाकाहारी होण्याआधी त्याने आम्हाला का नाही विचारलं?' कुकु कोल्हा सिंहराजाला सांगत होता.
मिकू बिबळ्याने सिंहराजाकडे मागणी केली की 'काहीही करुन तुम्ही पिंट्याला परत मांसाहारी व्हायला भाग पाडा. नाहीतर निसर्गाचा समतोलच बिघडेल'
शेवटी सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे सिंहराजा पिंट्याकडे गेले. त्यांनी त्याला खूप समजावलं पण त्याच्यात काहीही फरक पडला नाही. आता काय करायचं?
शाकाहारी झाल्यापासुन तर पिंट्या वाघ फारच वेगळा वागायला होता. आधी खूप रागीट असणारा पिंट्या आता खूप शांत झाला होता. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. तो तर चक्क गुहेत रहाण्याऐवजी झाडाखाली राहू लागला होता. तो शाकाहारी प्राण्यांसारखच गवत,कंदमूळं, झाडांची पानं खायचा. सगळेजण त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघायचे. नाही म्हटलं तरी पहिले पहिले पिंट्याला गवत खाणं जडच गेलं होतं. पण करणार काय? सगळ्यांच्या समोर तो मोठ्या थाटात म्हणाला होता ना की मी मांसाहार सोडला म्हणून. त्यामुळे त्याला गवत खाणं तर भागच होतं. पण ह्यामुळे शाकाहारी प्राणी खूप आनंदात होते. त्यांना वाटलं पिंट्या आता आपल्यात आलाय म्हटल्यावर कोणाचीच हिंमत होणार नाही, त्यांना खायची. आता आपण आनंदात जगायचं. पण लवकरच त्यांच्या सगळ्या आनंदावर विरजण पडायला सुरुवात झाली होती. त्याचं झालं असं....
जंगलाच्या बाहेर गवताचं कुरण होतं. सगळे शाकाहारी प्राणी तिकडूनच खाण्यासाठी गवत आणायचे. पण पिंट्याची भूक चांगलीच होती. त्यामुळे एकावेळेला तो दहा-दहा प्राण्यांचं गवत खायचा. त्यामुळे बिचा-या शाकाहारी प्राण्यांची पूरती पंचाईत झाली होती. जरका हा पिंट्या रोज असच दहा-दहा प्राण्यांचं गवत खाऊ लागला तर बाकीच्या प्राण्यांनी खायचं काय? आता मात्र सगळेच काळजीत पडले. ते गवताचं कुरण संबंध जंगलातल्या शाकाहारी प्राण्यांना पूरत असे. पण पिंट्या शाकाहारी झाल्यापासून मात्र गवताची टंचाई चांगलीच भासू लागली होती. ह्या पिंट्याचं शाकाहारी होणं त्रासदायक ठरु लागलं होतं. मग सगळ्या प्राण्यांनी एक खाजगी सभा बोलवली. आणि सर्व प्राण्यांनी मिळून त्याला परत मांसाहारी होण्यासाठी एक योजना बनवली.

दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे पिंट्या उठला. त्याने आळस दिला. ओढ्यावर तोंड धुतलं. अंघोळ केली. आणि मग काय कुरणाकडे जायला निघाला. त्याला सपाटून भूक लागली होती. त्यामुळे तो धावतच कुरणावर पोचला. पण बघतो तर काय सगळं कुरण साफ. 'गवताचं एक पातं नाही? नुसती कोरडी जमिन?' आता काय खायचं? पिंट्या विचार करु लागला. मग तो बंटीच्या शेतात गेला. पण बंटीनेही त्याला सगळी कंदमूळं संपली असच सांगितलं. मग पिंट्या झाडाची पान खायला गेला. आणि पान खाऊन बघतो तर काय...शी शी कडू कडू...म्हणून पिंट्या दुस-या झाडाची पानं खायला गेला. त्यांचीही चव कडूच? आता मात्र पिंट्याला काही सुचत नव्हतं. त्याने खारुताईला हाक मारली, रोझी हरिणीला सांगून पाहिलं, पण कोणीही पिंट्याला जेवण द्यायला तयार होईना. पिंट्याच्या मनात आलं 'अरे आपले एवढे चांगले शाकाहारी मित्र असूनही कोणी आपल्याला जेवण तयार होत नाही. ह्यापेक्षा तो मांसाहार बरा.' त्याला भूक तर सपाटून लागली होती. शेवटी तो आपल्या मांसाहारी मित्रांकडे आला. आणि त्यांना जेवण द्यायची विनंती केली. पिंट्याला सिंहराजे म्हणाले,'काय पिंट्या, शाकाहारी होण्याचं खूळ गेलं का?'
पिंट्या म्हणाला,'हो गेलं गेलं गेलं. आता ह्यापूढे मी कधीच शाकाहारी होणार नाही. माझ्या शाकाहारी मित्रांनी माझा घात केला. त्यांना मी नकोसा झालोय म्हणून त्यांनी माझं जेवणच बंद केलं'
मग सिंहराजांनी पिंट्याला समजावलं,' अरे पिंट्या, तु दहा-दहा प्राण्यांचं एकावेळेस गवत खायला लागल्यामुळे जंगलात गवताची टंचाई निर्माण झाली होती. तुला अद्दल घडावी म्हणून आम्ही ही सगळी योजना बनवली होती. अरे सगळ्या शाकाहारी प्राण्यांनी रात्रीच कुरणातलं सगळं गवत काढून ठेवलं होतं. कंदमूळ उपटून ठेवली होती आणि झाडांच्या पानांना कारल्याचा रस लावून ठेवला होता. जेणेकरुन तुला तुझी चूक कळावी.निसर्गाने आपल्याला जे खाणं नेमुन दिलय ना, तेच खावं. आणि जरका तसं नाही केलं तर निसर्गाचा समतोल बिघडलाच म्हणून समज.' पिंट्याला ते सगळं मनोमन पटलं.कुकु कोल्हा, मिकू बिबट्याने त्याला पोटभर जेवायला दिलं. हो, पण भले आज पिंट्या मांसाहारी झालेला असला. तरी तो पूर्वीच्याचप्रमाणे सगळ्यांशी मिळून मिसळून रहातो.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users