समुद्र किनारा - भाग २

Submitted by नंदिनी on 5 October, 2013 - 04:36

कर्कश वाजणार्‍या फोनमुळे साराला जाग आली. बेडवर उठून तिने उशी खालचा मोबाईल शोधला, पण मोबाईल तिथे नव्हता, कसेबसे डोळे चोळत ती बेडवरून उठली, आणि वाजणारा मोबाईल नक्की कुठे वाजतोय ते बघायला लागली. मोबाईल नेहमीप्रमाणे किचनमधे मायक्रोवेव्हवर होता. झोपेतच तिने फोन घेतला “हॅलो” ती म्हणाली.

पलिकडे नक्की कोण होतं हे माहित नाही, पण धनु, बॉलीवूड, न्युजपेपर असले शब्द ऐकून हा रॉंग नंबर नाही, इतकं तिच्या लक्षात आलं. पलिकडचा माणूस जाम वैतागलेला होता, तमिळमधून काय बडबडत होता, ते मात्र तिला अजिबात समजलं नाही.

“सर, डू यु स्पीक इंग्लिश?” तिने एक दोनदा विचारून पाहिलं, त्यावर एक नाही अन दोन नाही, माणसाचं बडबड चालूच राहिली. तिने फोन चालू ठेवून कॉल रेकॉर्डिंगला टाकला. पाचेक मिनिटं बोलून झाल्यावर त्या माणसाने वैतागून फोन ठेवून दिला. साराने काल लिहिलेली कॉपी, ज्यामधे धनुने फ़िल्म सोडायचं मुख्य कारण तिच्या बापावर घातलं होतं, ती न्युज बापाने वाचलेली होती बहुतेक. तिच्यावर तर वैतागलाच होता, पण धनुने फ़िल्म सोडायचं कारण फ़क्त आणि फ़क्त वीर कपूर आहे असं त्याचं म्हणणं होतं. सारा आता झोपेतून चांगली जागी झाली होती, तरी त्याचं बोलणं ऐकून घेत राहिली. फोन बंद झाल्यावर साराने लगेचच पद्मजाला फोन केला. पद्मजा बहुतेक असाईनमेंटवर निघाली होती.

“पद्मा, एक कॉल रेकॉर्डिंग भेज रही हू. तमिळमे है... धनुयारिणीका बाप गाली दे रहा है. मेरेको ना इसके एक एक वर्ड का मीनींग चाहिये, गंदी से गंदी गाली होगी तो वो भी वर्ड टू वर्ड बताना. सब गाली फ़ॉरवर्ड करनी है मुझे...”

“दस मिनीटमे रीटर्न कॉल करके बता देती हू. लेकिन चक्कर क्या है? वीर कपूरके कनेक्शन मे कुछ है क्या?”
“हा रे!!! लेकिन अभी कॉल मत कर. आज ऑफ़िसके बाद मिल मुझसे.अपनेवाले कॅन्टीनमे.... वहा पे बैठके बाते करेंगे. साला... दिवसाची सुरूवात शिव्या खाऊन झाली आज..चल बाय” म्हणत साराने फोन ठेवला. आणि अचानक तिला जाणवलं..... तिचा मोबाईल इथे आणून चार्जिंगला लावला होता? किचनमधे ओट्यावर दूध तापवून ठेवलेलं होतं. काल रात्री टीपॉयवर असलेली दारूची बाटली आता तिथे नव्हती, तिथला ग्लास स्वच्छ धुवून किचनमधल्या सिंकवर ठेवला होता. आणि त्याचसोबत अख्ख्या फ़्लॅटमधे त्याच्या परफ़्युमचा दरवळलेला सुगंध... त्या छोट्याशा वन बी एचकेच्या घरावर सर्वत्र वीर आल्याच्या खुणा दिसत होत्या.

वीर? काल रात्री इथे आला होता? कधी? आणि कशासाठी? आणि मग मला न सांगता कुठे गेला? साराचं लक्ष अचानक घड्याळाकडं गेलं. सकाळचे दहा वाजून गेले होते. म्हणजे वीरसाठी अर्धा दिवस संपला होता. साराने तोंड धुवून चहा करायला ठेवला. परत परत ती स्वत:लाच हा प्रश्न विचारत होती, खरंच वीर आला होता? की तो आपला भास होता? गेल्या दोन महिन्यांमधे तिचा आणि वीरचा काहीच संबंध नव्हता, ज्या ईव्हेंट्सला तो येणार असेल तिथे ती मुद्दाम जायची नाही, गेली तरी राजनला आधी फोनवरून वीर तिथून गेला आहे ना ते विचारून घ्यायची.

आणि वीर तरी कुठे तिला भेटत होता? त्या दिवशी भांडण करून निघून गेला त्यानंतर इथे आलाच नव्हता. मग काल कसा काय आला अचानक.. कधी आला आणी कधी गेला? आणि तो काल आला तरी आपल्याला समजलं नाही, इतकी प्यायलो आपण? काल ऑफ़िसवरून घरी आलो आणि...... नेमकं कालच यायचं होतं वीरला?

साराने कपमधे चहा ओतून घेतला आणि ती हॉलमधल्या खिडकीत येऊन बसली. तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला.
“वीर?” तिने विचारलं.

“गूड मॉर्निंग. उठलीस?” त्याचा आवाज ऐकून सारा उठून उभी राहिली, वीर आत आला, आणि तिच्या समोर उभा राहिला. क्षणभर काय बोलावं हेच तिला सुचेना. त्यालादेखील असंच झालं असावं. मनामधे कितीतरी प्रश्न होते. प्रश्नांची उत्तरे होती, आणि त्याच उत्तरांचे प्रश्न होते. पण आता ते काहीच नको हवं होतं. वीर समोर आल्यावर नकळत तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

“सॉरी, काल रात्री आलो... यायच्याअधी....” त्याला पूर्ण वाक्य बोलू पण न देता सारा धावत त्याच्याजवळ आली आणि रडत त्याच्या मिठीत शिरली. “परत जाऊ नकोस कुठे....” मुसमुसत ती म्हणाली.
“सारा, जिमला गेलो होतो.. तू झोपली होतीस म्हणून...” वीर तिच्या केसांमधून हात फ़िरवत म्हणाला. “रडू नकोस आता” तिचे डोळे पुसत तो म्हणाला.

तरी कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत रडत राहिली.

“सारा... आय ऍम सॉरी” वीर तिला म्हणाला.

“प्लीज... वीर!!! तू सॉरी म्हणू नकोस. माझीच चूक आहे ना ही सगळी?”

“आता या क्षणी त्या कशाबद्दलच नको बोलूया.” वीर तिच्या डोळ्यांमधे बघत म्हणाला, “सारा, तुझ्यावर किती चिडलो, किती रागावलो, तरी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी...”

“आणि मी राहू शकते ना तुझ्याशिवाय? गेले दोन महिने या घरात एकटीने कसे काढलेत ते मला विचार! कितीवेळा विचार केला की हे घर सोडून परत हॉस्टेलमधे जाऊन रहायचा, पण नाही जमलं...”

“सारा, सांगितलं ना... आता खरंच तो विषय नको.... तुझ्यापासून दूर गेल्यावर मला जाणवलं, की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते....” वीर तिच्या केसांतून हात फ़िरवत म्हणाला. “आता परत हा मूर्खपणा नको. आता परत ही भांडणं नकोत...”

तेवढ्यात साराचा मोबाईल वाजला, “ड्युटी कॉल”

“आताच कुणाला फोन करायची दुर्बुद्धी सुचली?” वीर सोफ़्यावर बसत म्हणाला.
“फोन नाही, मेसेज आहे. धवन ढोल्याचा. बारा वाजता रिपोर्टर्सची मीटिंग आहे. मला खास आमंत्रण आहे, म्हणजे एण्टरटेनमेण्टचं लफ़डं नक्की असणार..... लगेच आवरून निघायला हवंय.. तुझं आजचं शेड्युल काय आहे?”

“काही नाही, मी अजून चारपाच दिवस फ़्री आहे...” वीर अगदी कॅज्युअली म्हणाल्यासारखा म्हणाला.

“ओह येस, राजन म्हणाला होता की मला. कालच्या प्रेस कॉननंतर तुम्ही दोघं कुठेतरी फ़िरायला जाणार होतात, बरोबर ना? फ़ॉरेनला कूठेतरी...” साराच्या बोलण्यातला तिरकसपणा वीरला बरोबर लक्षात आला होता. “हो ना?”

“ह्म्म...” वीर काही न बोलता गुपचुप मोबाईलमधे काहीतरी वाचत होता. सारा काय बोलते आहे त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखे दाखवत.

“वीर, तुझ्याशी बोलतेय मी....” सारा कडक शब्दांत म्हणाली.
मान वर करून वीरने विचारलं “आता ऑफ़िसला जायलाच हवं का? आज सुट्टी घे, मग बोलूच दिवसभर”

“धवनने इतक्या अर्जंट मेसेज केलाय म्हणजे मोठी स्टोरी आहे, गेलंच पाहिजे.....”

“काहीतरी कारण दे, दुसरं कुणीतरी कव्हर करेल तुझी स्टोरी.”

“कारण? मी आता फोन करून सांगितलं की मी वीर कपूरबरोबर आहे, त्याचा एक्स्लुझिव्ह इंटरव्ह्यु घेतेय तर धवन खुशीत सुट्टी देईल. सांगू का त्याला तसं?”

“पण तू ते करणार नाहीस..... माझ्यापेक्षा तुझ्यासाठी अनेक इतर गोष्टीच महत्त्वाच्या आहेत...”

“वीर, तुला दरवेळेला हाच वाद घालायचा आहे का? यासाठी तू आलास का इथे?”

“मी वाद घालत नाहीये. मला घालायचा पण नाही. पण......”

“पण काय वीर? तुला वाटेल तसं तू वागशील? तुला वाटलं तेव्हा तू मला प्रपोज केलंस, वाटलं तेव्हा लग्न मोडलंस, वाटलं तेव्हा दुसर्‍या मुलीसोबत अफ़ेअर केलंस, आणि जेव्हा तुला वाटलं तेव्हा परत माझ्याकडे आलास...” सारा चिडून म्हणाली.

“ते लग्न मोडण्यासाठी पण तूच कारण होतीस हे सोयिस्कररीत्या विसरतेस तू.... पण आत्ता प्लीज या विषयावर चर्चा नकोय मला...”

“आत्ताच कशाला? आपण कधीच या विषयावर चर्चा करू या नको. तुझं कधी काही चुकतच नाही, सगळी माझीच चूक!!! ठिक आहे? आता मी आवरून निघते ऑफ़िसला...” सारा तणतणत निघाली.

“प्लीज... सारा..” वीर उठून तिच्याजवळ गेला, “चूक दोघांचीही आहे हे मला माहित आहे, पण परत त्याच चुका करायच्या आहेत का?”

“नाही. मला आता ऑफ़िसला निघायचंय. एक तर डोकं ठणकतंय माझं..... कालपासून जेवले नाही. वर काल रात्री....”

“दारू पिऊन....”

“आता तुला प्लीज माझ्या पिण्यावरून वगैरे वाद घालायचा आहे का? तुला वादच घालायचा आहे का? माझ्याकडे आता खरंच वेळ नाही त्यासाठी... बाय... ”

“तू नीट म्हणणं तरी ऐकून घे माझं आधी.”

“वेळ नाही, ऑफ़िसला निघाले. अजून अंघोळपण झाली नाही माझी...” सारा आवाज हळू करत समजुतीने म्हणाली. “आल्यावर बोलू. दोन तीन तासांत परत येईन, उशीर होणार असला तर फोन करेन. इथे नाहीतर तुझ्या घरी भेटू!!” म्ह्णत सारा बाथरूममधे गेली.

ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा वीर किचनमधे काहीतरी करत होता. “चल, मी निघतेय” डॊळ्यांत लेन्स घालून झाल्यावर साराने त्याला हाक मारली.

“दोन मिनिटे थांब. आणि बस इथे” वीर किचनमधून बाहेर येत म्हणाला.

“वीर, माझ्याकडे आता ब्रेकफ़ास्टला वेळ नाही, स्टेशनवर जाऊन काहीतरी विकत घेइन”
“गप्प बैस आणि हे खाऊन जा” वीर जवळ जवळ तिच्यावर ओरडला आणि सरळ तिच्या हाताला धरून त्याने जबरदस्तीने सोफ़्यावर बसवलं.

“ई... ते ओट्स गोड गोड मला नको. ते गिळगिळीत जात नाही मला” तिने तोंड फ़िरवत म्हटलं.
“कालपासून जेवली नाहीस ना? मग आता खा गुपचुप..” वीरने उजव्या हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा धरला, आणि डाव्या हाताने तिला एक चमचा भरवला.

“भयाण लागतंय ते. मी स्टेशनवर वडापाव खाईन.” कसंबसं गिळून सारा म्हणाली.

“हे एवढं पूर्ण खा. तब्बेतीची जरा तरी काळजी घे ना.” परत एकदा तिला भरवत तो म्हणाला.

“तब्बेतीची काळजी घ्यायला मी काय हिरॉइन नाही. सतत फ़िगरचा विचार करत बसायला. मी निघते आता. एवढंच बास” म्हणत सारा उठली आणि बॅग घेऊन बाहेर निघाली. “लवकर येईनच. तोपर्यंत इथेच असशील का?”

“माहित नाही. कदाचित इथेच असेन. आज तुमच्यासारखे मीडीयावाले बाहेर फ़िरू देणार नाहीत मला. रसिका पण पुण्यात आहे. बाहेर गेलो तर फोन करेन तुला”

“ओके” म्हणून तिने दरवाजा ओढून घेतला.

ती गेल्यानंतर वीरला घर अचानक शांत वाटलं. स्वत:साठी एक ग्लास ज्युस घेऊन त्याने टीव्ही लावला. टीव्हीला डीवीडी प्लेयर जोडला होता आणि त्यावर त्याला अगदी पहिला पिक्चर चालू होता. पाच वर्षापूर्वी आलेला तो पिक्चर फ़ारश्या कुणाच्या लक्षातदेखील नव्हता. पण साराचा मात्र तोच पिक्चर आवडता.

“तुझ्या कितीही सिनेमांनी पन्नास शंभर कोटी कमावले ना, तरी पण हाच पिक्चर अजून शंभर वर्षांनी लोक बघतील” ती कायम म्हणायची.

वीरला आता हा सिनेमा पाहताना “आपण तेव्हा केवढे बावळट दिसायचो. आपली बॉडी लॅन्ग्वेज किती ऑकवर्ड होती” एवढंच दिसायचं. स्क्रीनवर सिनेमामधलं सगळ्यात फ़ेमस असलेलं आयटम सॉग चालू झालं आणि वीर आठवणीच्या गर्तेत बुडून गेला. हे आयटम सॉन्ग सिनेमामधे आलं सर्वात शेवटी. पण एका वेगळ्या अर्थाने ते ट्रेन्ड सेटर बनलं होतं. अर्थात या गाण्याची हिस्ट्री कुणालाच माहित नव्हती, त्याला, राजनला आणि साराला सोडल्यास.

साराला राजनने बोलावलं होतं ते फ़िल्मच्या पब्लिसिटीसाठी एखादा स्पिन लिहिशील का हे विचारायला? राजनची आणि तिची ओळख अशाच कुठल्याशा फ़िल्मी ईव्हेंटमधे झालेली. मोठ्या वर्तमानपत्रांमधून स्पिन करण्याइतके प्रोड्युसरचं बजेट नक्कीच नव्हतं. त्यामुळे एखाद्या छोट्या आणि नवीन रिपोर्टरकडूनच काम करवून घ्यावं लागणार होतं. फ़िल्म पूर्ण झाली तरी हवी तितकी प्रसिद्धी मिळत नव्हती, त्यामुळे फ़िल्मच्या पब्लिसिस्टला- राजनला काहीतरी क्लृप्ती काढणं भाग पडलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून छोट्या वर्तमानपत्रामधून वीर आणि सिनेमाच्या दिगदर्शकाशी भांडणं चालू आहेत, दोघांची मारामारी झाली वगैरे “बातमी” छापून आणायची होती. राजनने आधीच एक दोन पत्रकारांशी बोलून सेटींग करून घेतली होती. आज वीरला फ़क्त एक एक्स्लुझिव्ह मुलाखत द्यायची होती. राजनने बोलण्याचे सर्व पॉइन्ट्स त्याला आधीच लिहून दिले होते. पत्रकारांची वाट बघत वीर ऑफ़िसमधे बसला होता.

सारा ऑफ़िसमधे आल्या आल्या वीरकडे बघून हसली. पण त्याआधी तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य आलं होतं. सेकंदभरासाठी का होइना!!

“आपण एका पार्टीत भेटलो होतो. आठवतंय?” तिने त्याला विचारलं.

“नाही आठवत” त्याने खरं सांगून टाकलं. तरी बरं, अद्याप त्याला साराची स्मरणशक्ती किती उत्तम आहे हे माहित नव्हतं.

“दॅट्स ओके.” ती परत हसत म्हणाली. “तीन चार महिने झाले असतील. शोबालीचा ईव्हेंट होता.” सारा सहज म्हणाली.

“ओह, रसिका ब्रॅन्ड ऍम्बेसेडर म्हणून अनाऊन्स केली तो ईव्हेंट.” पण अजून त्याला या मुलीला भेटला होता की ते आठवत नव्हतं. “एनीवेज, नाईस टू मीट यु अगेन” तो हसत म्हणाला.

“तोच ईव्हेन्ट. आपण जवळ जवळ अर्धा तास गप्पा मारल्या होत्या, म्हणून तर मला माहिती की तू इतकं छान मराठी बोलतोस.” ती डोळ्यावरचा चष्मा काढून पुसत म्हणाली. तेवढ्यात राजन आतमधे आला.

“हाय सरस्वती, थॅन्क्स फ़ॉर कमिंग. वी रीअली ऍप्रीशीएट धिस. मैने ये सारे नोट्स निकालके रखे है तुम्हारे लिये. फ़िल्म पी आरका सब मटेरियल है. आजके इन्टरव्ह्यु के क्वेश्चन्स भी है और आन्सर्स भी” राजन तिच्या हातात प्रिन्ट आऊटचं बाड देत म्हणाला.

साराने त्या कागदांकडे न बघता राजनकडे बघत म्हणाली.

“मी तुला चारदा विचारलं होतं ना? हीरो कोण आहे? तेव्हा का नाही सांगितलंस मला?”

“आधी सांगायचं नव्हतं म्हणून. काही प्रॉब्लेम आहे का?”

“तुला या... या माणसासाठी पब्लिसिटी करावी लागतेय?” सारा वीरकडे हात दाखवत म्हणाली. “हा वीर कपूर आहे. त्याच्या पहिल्या फ़िल्मसाठी तुला हे असले भांडणाचे वगैरे स्टंट करायचे आहेत? जस्ट लूक ऍट हिम!!” सारा अविश्वासने म्हणाली.

“हे.. हे.. मी पण आहे इथे” वीर मधेच म्हणाला. “तुम्हाला म्हणायचं काय आहे ते जरा सरळपणे सांगाल.”
राजनला हे सर्व बोलणं कदाचित पैशांकडे जात आहे असा अंदाज आला. “हे बघ, सरस्वती, आपलं पैशाबद्दल बोलणं आधीच ठरलं होतं. आमचं बजेट खरंच खूप कमी आहे”

“राजन, मला या स्पिनसाठी एक पैसादेखील देऊ नकोस. कारण, हा स्पिन करूच नकोस.”

“म्हणजे?” वीरने विचारलं.

“वीर, मी दोन मिनिटे राजनशी जरा एकटीने बोलू का? तुमच्यासमोर बोलणं थोडंसं विचित्र वाटेल”

“नाही, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते माझ्यासमोर आणि स्पष्टपणे बोला.”

“ओके. सॉरी वीर, मला तुमच्याइतकी इंडस्ट्रीची माहिती नाही. कोकणातल्या गावामधली मुलगी आहे मी. गेले कित्येक दिवस पोलिटिकल बीट मिळवण्यासाठी धडपडतेय, पण तो मिळत नाही म्हणून एन्टरटेनमेण्ट बीट करतेय. पण जितकी मला मासेसची मानसिकता माहित आहे त्यावरून मी हे सांगतेय. त्या दिवशी ईव्हेंटमधे तुमच्याकडे पहिल्यांदा पाहिल्यावर मला जे वाटलं ते स्पष्टपणे सांगू का?”

“प्लीज” वीर म्हणाला.

साराने राजनने दिलेल्या मटेरीयलमधला वीरचा क्लोजप असलेला एक फोटो काढला. “राजन, हा फोटो बघ. नीट बघ,” साराने तिच्या बॅगमधला अजून एक फोटो काढला. “आणि आता हा फोटो बघ”
तो फोटो बघताच वीरच्या मस्तकात तिडीक गेली.

“हे बघा, मिस!!”

“मला माहित होतं तू चिडशील म्हणून. हा रोहित कपूरचा फोटो आहे. माझा आवडता हीरो म्हणून कायम माझ्या बॅगमधे असतो. या फोटोमधे आणि तुझ्यामधे किती साम्य आहे ते नीट बघ. हे असले मारामारीचे स्पिन करण्यापेक्षा या असल्या पोझमधे तुझा एखादा फोटो मार्केटमधे आला ना... तर तुला कींवा तुझ्या या फ़िल्मला पब्लिसिटीची गरजच राहणार नाही. पीपल विल टॉक अबाऊट यु”

“माझा रोहित कपूर या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. मला तो जोडायचा पण नाही.” वीरच्या आवाजामधला तिरस्कार लपत लपत नव्हता.

“हे बघ वीर..” राजन मधेच काहीतरी म्हणाला.

“राजन, एक मिनिट. वीर मी लहानपणापासून हे सर्व रोहितबद्द्लचं गॉसिप वाचत आलेली आहे. आय नो व्हॉट पीपल थिंक अबाऊट ऑल धिस. माझं असं म्हणणं बिल्कुल नाही की तुम्ही रोहित कपूरशी काहीही संबंध जोडावा. संबंध तर लोक जोडतील कारण वीर कपूर इज अ लूक अलाईक ऑफ़ रोहित कपूर. रोहितने कितीही इन्कार केला तरीही... वीर कपूर इज रोहित कपूर्स सन.” सारा ठामपणे म्हणाली.

“तेच तर मला नको आहे. रोहित कपूर इज माय बायोलॉजिकल फ़ादर, त्याहून जास्त त्याचा आणि माझ्या आयुष्याचा काही संबंध नाही. माझ्या करीअरमधे मला कुठल्याही क्षणी त्या माणसाचं नावदेखील नकोय”

“येस, वीर. तुला नाव घ्यायचंच नाही. नाव लोक घेतील. लोक प्रश्न विचारतील. तू नो कमेंट्स म्हणशील आणि लोक स्पेक्युलेशन्स लिहितील. थिंक अबाऊट इट!! तुला फ़ार काही करायचं नाही. ८०च्या लूक्मधे एक फोटोसेशन. आणि ते फोटो पब्लिश करायचे आहेत. इट्स सिम्पल.”

साराची सिम्पल कल्पना राजनला प्रचंड आवडली होती. आणि निर्मात्याला तर इतकी आवडली होती की, त्याने एका जुन्या गाण्याचं रिमिक्स करून ते सिनेमामधे ऍड केलं होतं. अर्थात वीर कपूरला रोहितचा लूक देऊनच. अख्ख्या सिनेमाशी त्या गाण्याचा काडीमात्र संबंध नव्हता. पूर्ण इंडस्ट्रीमधे या गाण्याने खळबळ उडवली. रसिकाने स्पष्टपणे वीर कपूरचे वडील कोण हे कधीच सांगितलं नव्हतं. आणि आता सांगायची गरजच नव्हती.

वीरला नंतर कितीही प्रयत्न केला तरी त्या ईव्हेंटच्या दिवशी ही सारा कधी भेटली ते आठवलं नव्हतं, पण राजनच्या ऑफ़िसमधे भेटलेली ती सारा मात्र कायम लक्षात राहिली. राजन तर तिला जर्नालिझम सोडून पब्लिसीस्ट म्हणून माझ्यासोबत ये म्हणून मागेच लागला तिच्या.

सारा तेव्हा जनशक्त्ती नावाच्या एका छोट्याशा वर्तमानपत्रामधे काम करायची. पण तेव्हा ती सारा नव्हती... सरस्वती विश्वनाथ केळकर होती. या नावासरशी वीरला हसू आलं. त्यांचं दोघांचं अफ़ेअर चालू झाल्यावर त्यानेच तिला नाव बदलायला सुचवलं होतं. तिला ही सूचना अजिबात आवडली नव्हती.

“सरस्वती केळकर नावामधे प्रॉब्लेम काय आहे?” तिने चिडून त्याला विचारलं होतं.

“फ़ार लांबलचक नाव आहे. बायलाईनसाठी फ़ॉन्ट एवढा छोटा होतो, की तुझं नाव दिसतच नाही.” त्याने तिचा हात हातात घेत म्हटलं.

“मग नुसतं सरस्वती चालेल की...”

“ते एस्थेटिकली एवढं खास वाटणार नाही.. के. सारा... हेच नाव छान आहे. घे ना बदलून..”

“काही नको. हे त्या गुज्जु राजनच्या डोक्यातून आलेलं भूत आहे. त्याला लोकांची नावं बदलायची सवयच लागली आहे सध्या. चांगलं सरस्वती हे म्हणयचं सोडून सारा म्हणतो वर ते कायम नाव कर म्हणे. सरस्वती केळकर हेच नाव ठिक आहे. नंतर लग्नानंतर बदलेलच की नाव”

“का? असा काही कायदा नाहीये की लग्नानंतर नाव बदलायला हवं, तुझं नाव आहे, कधीपण बदलू शकशील. तसंपण के. सरस्वती हे नाव तुला शोभून दिसेल...”

“मला आजवर तुम्हा फ़िल्मी लोकांचा नाव शोभून दिसेल हा फ़ंडा काही समजला नाही. तुझं नाव वीर कपूर आहे. पण जरा तरी पंजाबी वाटतोस का? पक्का पुणेरी भट आहेस.” सारा हसत म्हणाला. पण अचानक वीरचा चेहरा उतरला.

“कारण, मी रसिकाचा मुलगा आहे. कपूर तर तिने हट्टाने ठेवलं म्हणून. मला जेव्हा ते समजलं तेव्हाच मला हे नाव बदलायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. आपलं नाव हे आपल्या भूतकाळाशी असलेला एक संबंध असतो. आपण जर या भूतकाळाशी निगडीत आयुष्य जगत असतो तेव्हा त्याचा काहीच त्रास नसतो, पण तुला आणि मला हा भूतकाळ आयुष्यातून वजा करायचा अस्तो, त्याशिवाय जगायचं असतं तेव्हा हा भूतकाळ आपल्याला विसरायचा असतो, तेव्हा या नावाचा काय उपयोग?”

“माझं नाव फ़क्त माझ्या भूतकाळाशी जोडलं नाही. माझ्या अस्तित्वाशी जोडलंय. भाऊंनी नाव सरस्वती ठेवलं कारण मी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती.” सारा डोळ्यांतलं पाणी लपवत म्हणाली. “त्यांनी मला अजून कसली इस्टेट दिली नाही, पण शिक्षण आणि बुद्धीमत्ता मात्र दिली....” वीरच्या आणि तिच्या इतक्या दिवसांच्या ओळ्खीमधे पहिल्यांदा तिने तिच्या वडलांचा उल्लेख केला होता.

“तुझे वडील... आय मीन...”

“मला त्याबद्दल बोलायचं नाही, वीर.” साराने लगेच विषय बदलला होता. पण सहा महिन्यांनी जेव्हा तिला नवीन नोकरी मिळाली तेव्हा तिची पहिली बायलाईन मात्र सारा व्ही. के. या नावाने होती. त्या दिवशी तो शूटींगसाठी सिंगापूरला होता. नेटवर पेपर वाचल्या वाचल्या लगेच त्याने तिला फोन केला.

“के सारापेक्षा सारा व्ही. के. भन्नाट आहे.”

“एवढ्या पहाटे हे सांगायला फोन? पण ही राजनची आयडीया, त्याच्यामते हे फ़ारच रोमॆन्टिक वगैरे....” सारा झोपाळल्या आवाजात म्हणाली.

“त्यात काय रोम्यान्टीक?” त्याने विचारलं.

“येडाच आहेस” सारा हसत म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. कितीतरी वेळ त्याला ती नक्की काय म्हणाली होती ते समजलंच नव्हतं. नंतर सेटवर कुणीतरी त्याला “व्हीके सर” म्हणून हाक मारली तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला.

आजपण त्या आठवणीने त्याच्या चेहर्‍यावर हसू आलं. त्याच रात्री त्याने रसिकाला फोन करून साराबरोबर लग्नाचा निर्णय सांगितला होता. रसिकाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

शूटवरून आल्यावर वीरने तिला लगेच लग्नाबद्दल विचारलं होतं. सारा लगेच लग्नाला हो म्हणाली होती. येत्या वर्षभरामधे लग्न करायचं त्या दोघांनी ठरवलं होतं. तसं झालं असतं तर एव्हाना वीरच्या आणी साराच्या लग्नाला दीड वर्षं झाली असती.

पण तसं झालं नाही. कारण, त्याच्या बरोब्बर दुसर्‍या दिवशी साराला साहिलचा फोन आला आणि सगळं आयुष्याचं चित्रच बदलून गेलं.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललीय कथा. सगळं डोळ्यासमोर घडतय असे वाटते.
पण जरा लवकर लवकर टाक ना भाग.. प्लिज

तुझ्या गोष्टीत गुंतायला होतं अगदी.
लवकर लिहून पूर्ण कर.
ता.क. व्हीके भगवतीला जाणार की नाही नवरात्रात एका तरी माळेला?
Wink

छान

ढॅण टडॅण!!!!

नंदिनी, तू लिहायला लागलीस ना, की माबो उघडून वाचायचा वेगळाच उत्साह येतो गं!

मस्तं मोठ्ठी गोष्ट लिहि, अगदी आपल्या पोरांना वाचून दाखवता येण्याइतकी लांबवलीस तरी चालेल, पण लिही!!!!

(आगाऊपणाबद्दल मंडळ दिलगीर आहे!)

मस्त चाललीये कथा. साहिल याही भागाच्या शेवटी गेस्ट अ‍ॅपिअरन्स देऊन गेलाय! त्याचा लीड रोल कोणत्या भागात आहे याची आता उत्सुकता .............

लौकर लौकर लिहीत जा गं बयो. तुझ्या या 'क्रमशः'ची वाट पाहणं जीवघेणं होतं अगदी.>>> मागचे भाग परत वाचावे लागतात.

साहिल कोण? ( १ ला भाग वाचते) >> पहिल्या भागात नाहीये तो. 'साहिल कोण?' हाच कळीचा प्रश्न आहे या कथेतला असं माझी स्मरणशक्ती सांगतेय Happy

नंदिनी, तुझ्या सगळ्याच कथांमधले नायक गृहकृत्यदक्ष असतात. Happy