लेडी शेलॉट : एक आख्यायिका

Submitted by भारती बिर्जे.. on 29 September, 2013 - 11:25

लेडी शेलॉट : एक आख्यायिका

सरदारांनी आपल्या कन्येसाठी हा किल्ला बांधून घेतला होता.
त्याचे बांधकाम, विस्तार, त्याचे बुरुज एका आख्यायिकेचा भाग होते.

आख्यायिका सर्वस्वी खर्‍या थोड्याच असतात ?

डोंगरपठार आणि त्याला वळसा घालून वहाणारी नदीची चमचमती रेषा यामुळे बेटासारख्या वाटणार्‍या त्या भूभागावर किल्ला उभा होता.निळ्याशार आकाशावर एक काळीशार चित्राकृती.त्याच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश दृष्टीपथात येत असे. काड्यापेट्यांतील घरे मांडल्यासारखे सुबक गाव,तिठा, वाटा अन बाजारपेठा.पायवाटांवरून रमत गमत चाललेल्या ग्रामकन्या , ग्रामस्थ.किल्ल्याजवळून जातानाची त्यांची कुजबूज, त्यांचे वळून पहात कसलातरी वेध घेत तेथून जाणे.

त्या आख्यायिकेचा केंद्रबिंदू शोधत.लेडी शेलॉट.

सरदारांनी आपल्या कन्येसाठी, लेडी शेलॉटसाठी, हा किल्ला बांधून घेतला होता.किल्ल्यात येणारीजाणारी त्यांच्या विश्वासातली काही माणसे अन रक्षक सोडल्यास तिथे राहाणारी दोनच माणसे होती.लेडी शेलॉट आणि तिची दाई, जी आवश्यक कामांसाठी क्वचित गावात जात-येत असे.तिथूनच तर सगळी आख्यायिका गावात पसरली होती.

लेडी शेलॉटचं आरस्पानी सौंदर्य, तिच्या कोमल बोटांतून झरणारं कुशल विणकाम, तिचा स्वर्गीय स्वरसंभार.

तिच्यावरचा शाप.

लेडी शेलॉटने म्हणे गावाकडे एक नजर जरी टाकली तरी तिचा सर्वनाश ठरलेला होता.म्हणूनच तर किल्ल्याच्या एका बुरुजात तो प्रख्यात कोनाकोनांचा आरसा सरदारांनी बसवला होता.दिवसभर गावातल्या वाटांची, पेठांची, घराअंगणांची प्रतिबिंबे त्या विशाल आरशात कोनाकोनातून उमटत. दिवसभर तिथे बसून एकीकडे झरझर विणकाम करत लेडी शेलॉट उत्सुक निरागस डोळ्यांनी ती चित्रमाला न्याहाळत राही.
आरशातली ती चित्रे एकमेकांत गुरफटून तिच्या विणकामातील अर्ध-आकलनीय आकृती बनत. तिने बनवलेले सुंदर ताणेबाणे निगुतीने जपणे दाईचे काम, कधी ते काढून न्याहळत बसणे हा लेडी शेलॉटचा विश्राम.

कधी या असल्या जन्मठेपेला कंटाळून एक आर्तमधुर स्वरलकेर तिच्या गळ्यातून उमटे तेव्हा वाटेवरचा वाटसरू शहारून जात असे.लेडी शेलॉट खरेच अस्तित्वात असल्याची तेवढीच खूण होती.

संध्याकाळ झाली की किल्ल्याचे उंच उंच बुरुज काळोख पिऊन उग्र भासू लागत. किल्ल्यातला एकांत शांततेच्या किंकाळ्या मारणार्‍या पिशाच्चासारखा अंगावर येई.आरशासमोरून नाइलाजाने हटून मग लेडी शेलॉट किल्ल्याच्या अंतर्भागात जात असे. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात दाई तिला गावातल्या गोष्टी सांगून रिझवी.

वरचे आकाश नक्षत्रांनी झगमगू लागे.चंद्राचं झुंबर लखलखू लागे.अशातच तिचे गीत जागून उठे.
लेडी शेलॉटचे सूर माळावरच्या थंडगार वार्‍याबरोबर स्तब्ध आसमंतात दूरवर पोचत. गावातल्या आया त्या तालावर छोट्या बाळांना निजवताना स्वत;शीच चुकचुकत.त्यांचे जीवन सुंदर करणार्‍या त्या स्वरांची मालकीण एकाकी होती. तिचे जीवन शून्याकार होते.

स्वतःच्या शापाशीही स्वतःचा एक करार असतो. लेडी शेलॉट तो कसोशीने पाळत होती.
दु:खात सुखी होती.
दु:खात सुखी होती ?
दिवसरात्री अशाच जात होत्या.

त्या रात्री दाई येणार नव्हती. गावात कुणाचेसे लग्न निघाल्याने ती तिथे जाणार होती. ज्यांचे लग्न होणार होते ते जोडपे वाटेने येताजाताना लेडी शेलॉटने कितीदा आरशात पाहिले होते. एकमेकांना बिलगलेले. एकमेकांत हरवलेले.त्यांना निरखणारी तिची नजरही हरवत गेली होती कितीदा. विणकामाचे टाके बोटात घुसून बोटे रक्तबंबाळ होऊ लागली होती अलिकडे.

त्या रात्री मग किल्ल्यातल्या बुरुजातल्या सावल्या सावकाश आकाशभर झाल्या. मागल्या अंगणात एकटीनेच फेर्‍या मारणार्‍या लेडी शेलॉटची शुभ्र वस्त्रे झुळुकांमध्ये सळसळू लागली. दूर गावात वाजणार्‍या तालवाद्यांचा ताल पकडून तिचा स्वर उंच उंच टिपेला पोचू लागला.
आजचा काळोख मख्मली होता. नक्षत्रांचे जडावकाम आज खूपच झगमगत होतं . चंद्राचं झुंबर आज तेजाळलंच नव्हतं ना !

झुळुका अधिकाधिक धीट होऊ लागल्या.लेडी शेलॉटचं शुभ्र उत्तरीय उडून मागल्या दरवाजाच्या गंजक्या कडीला अडकलं.वेलीवरची शुभ्र कळ्याफुलं दचकून सुगंधाची बरसात करत उंबरठ्यावर विखुरली.
अडकलेलं उत्तरीय सोडवून घेणारी लेडी शेलॉटची बोटं तिची राहिली नाहीत. तशीही ती तिची कुठे होती ? विणकाम करताना ती बोटं तिलाच चकित करायची नवेनितळ चित्राकार धाग्याधाग्यात उलगडून.
आज ती बोटं जुनाट गाफिल कडीशी झुंजत होती.करकरत ती कडी उघडली.

लेडी शेलॉट कुठे गेली ?
माळावर रात्रभर स्वर्गीय संगीताचे सूर विहरत राहिले.
दाईने परतल्यावर काय पाहिले ? काय सांगितले?
बुरुजातला आरसा तडकला की सरदारांचे माथे ?

कुणी म्हणाले, एका नावेत बसून लेडी शेलॉट नदीच्या प्रवाहाबरोबर वाह्त गेली.कुणी म्हणाले एका देखण्या सरदाराला घोड्यावरून दौडत येताना तिने नुकतेच आरशात पाहिले होते.कुणी म्हणाले की शाप खरा झाला. पलिकडच्या गावात म्हणे धारेला लागलेला तिचा निष्प्राण देह मिळाला.पण मग माळावरच्या रानवार्‍यात अजूनही गुंजतात ती मधुर गाणी कुणाची ?

आख्यायिका सर्वस्वी खर्‍या थोड्याच असतात ?

-जिगिषा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिगिषा....

काय म्हणावे तुमच्या या कल्पनाशक्तीला आणि लेखनशैलीला.....जी.ए.कुलकर्णी यांनी सरड्याच्या पायासारखी दिसणार्‍या काशीसंबंधी लिहिताना 'शॅलॉट' ला आणले होते ते १९५५-५६ मध्ये.... काशी थिएटरमध्ये गेलीआहे...तिथे नदीच्या पात्राचा प्रचंड पडदा होता...जणू काशी अगदी नदीकाठीच आल्याप्रमाणे नदीचे पात्र रुंदावले जाते....काठावरील फुलांच्या पाकळ्या तल्हाताएवढ्या होत्या....शलॉटच्या सार्‍या बोटांवर निरनिराळ्या रंगांच्या रत्नांच्या अंगठ्या होत्या...दूर एका वाड्याच्या गच्चीवर कुणीतरी हातात वाकडी तलवार घेऊन उभे होते.

शॅलॉटला तुम्ही इतक्या क्षमतेने शब्दबद्ध केले आहे की खुद्द टेनिसनच तिच्यावर व्याख्यान देत आहे असा मला भास होत गेला.

अतिशय सुंदर अनुभव....वाचेन तितके कमीच आहे.

अशोक पाटील

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
अशोक, जी.ए.कुलकर्णी यांचे ते लेखन मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन.

उच्च लिहिलंयस जिगिषा! इतकं तरल, धूसर वातावरण निर्माण केलंय - केवळ शब्दांतून. Happy

अजून अशा शैलीतील सुंदर सुंदर लेखांच्या प्रतिक्षेत .......

अत्यंत प्रभावी... सुरेख लिहिलय. नुस्त्या शब्दांतून ही आख्यायिका न रहाता समोर उभी रहातेय.
सुर्रखच जिगिषा.

जिगिषा....

जी.ए.कुलकर्णी यांच्या "पारवा" या कथासंग्रहात ती कथा आहे.....१९६० साली प्रथमावृत्ती निघाली होती. माझ्याकडे आहेत हे त्यांचे सारे संग्रह. तुम्हाला २००९ ची आवृत्ती मिळू शकेल....नाही मिळाली तर मला कळवा, मी देईन पाठवून.....

....तुम्ही ही 'शॅलॉट' वाचलीच पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटत आहे.

अशोक पाटील

आगाऊ, नंदिनी, दाद , आभार .
मामी, तुमच्यासारखं सहज सुंदर विनोदी लिहायला खूप आवडेल !
आभार अशोक या माहितीसाठी, न मिळाल्यास तुम्हाला कळवेनच.

वाह!

म्हणजे हा केवळ तुमचा कल्पनाविलास आहे? मला सिरियसली वाटलं की ही कथा कशावरतरी आधारित वगैरे आहे Happy भारीच लिहिलं आहेत.

वा, सुरेखच लिहिलंय Happy

पौर्णिमा, द लेडी ऑफ शॅलोट ही व्हिक्टोरिअन काळातील प्रख्यात कवी लॉर्ड टेनिसन ह्यांनी लिहिलेली कविता आहे.
लिंकमध्ये लेडी ऑफ शॅलोटचे जे चित्र दिले आहे ते बघत हे वरचे वर्णन वाचायला अजूनच मजा आली Happy

सर्वांचे मनापासून आभार ! लेडी शेलॉट ही टेनीसनची नायिका न राहता एक जितेजागते प्रतीक आहे.जगण्यातले बंधन आणि ते ओलांडण्याचे भय या प्रतीकात सामावले आहे असे मला वाटते.

अगो लिंकसाठी आभार. चित्रे सुरेख आहेत.

१८३३ सालची ही मूळ कविता. आज त्याच्यावर कुणाला लिहावेसे वाटणे हेच अप्रूप. इतके सुंदर लिहिलेय तुम्ही जिगिषा, वा! कवितेतील लेडी शॅलॉट ही कशाचे प्रतीक आहे यावर अनेक स्कॉलर्सची अनेक मते आहेत. तुम्ही उभे केलेले चित्रही मनोहर आहे.

Pages