लेडी शेलॉट : एक आख्यायिका

Submitted by भारती बिर्जे.. on 29 September, 2013 - 11:25

लेडी शेलॉट : एक आख्यायिका

सरदारांनी आपल्या कन्येसाठी हा किल्ला बांधून घेतला होता.
त्याचे बांधकाम, विस्तार, त्याचे बुरुज एका आख्यायिकेचा भाग होते.

आख्यायिका सर्वस्वी खर्‍या थोड्याच असतात ?

डोंगरपठार आणि त्याला वळसा घालून वहाणारी नदीची चमचमती रेषा यामुळे बेटासारख्या वाटणार्‍या त्या भूभागावर किल्ला उभा होता.निळ्याशार आकाशावर एक काळीशार चित्राकृती.त्याच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश दृष्टीपथात येत असे. काड्यापेट्यांतील घरे मांडल्यासारखे सुबक गाव,तिठा, वाटा अन बाजारपेठा.पायवाटांवरून रमत गमत चाललेल्या ग्रामकन्या , ग्रामस्थ.किल्ल्याजवळून जातानाची त्यांची कुजबूज, त्यांचे वळून पहात कसलातरी वेध घेत तेथून जाणे.

त्या आख्यायिकेचा केंद्रबिंदू शोधत.लेडी शेलॉट.

सरदारांनी आपल्या कन्येसाठी, लेडी शेलॉटसाठी, हा किल्ला बांधून घेतला होता.किल्ल्यात येणारीजाणारी त्यांच्या विश्वासातली काही माणसे अन रक्षक सोडल्यास तिथे राहाणारी दोनच माणसे होती.लेडी शेलॉट आणि तिची दाई, जी आवश्यक कामांसाठी क्वचित गावात जात-येत असे.तिथूनच तर सगळी आख्यायिका गावात पसरली होती.

लेडी शेलॉटचं आरस्पानी सौंदर्य, तिच्या कोमल बोटांतून झरणारं कुशल विणकाम, तिचा स्वर्गीय स्वरसंभार.

तिच्यावरचा शाप.

लेडी शेलॉटने म्हणे गावाकडे एक नजर जरी टाकली तरी तिचा सर्वनाश ठरलेला होता.म्हणूनच तर किल्ल्याच्या एका बुरुजात तो प्रख्यात कोनाकोनांचा आरसा सरदारांनी बसवला होता.दिवसभर गावातल्या वाटांची, पेठांची, घराअंगणांची प्रतिबिंबे त्या विशाल आरशात कोनाकोनातून उमटत. दिवसभर तिथे बसून एकीकडे झरझर विणकाम करत लेडी शेलॉट उत्सुक निरागस डोळ्यांनी ती चित्रमाला न्याहाळत राही.
आरशातली ती चित्रे एकमेकांत गुरफटून तिच्या विणकामातील अर्ध-आकलनीय आकृती बनत. तिने बनवलेले सुंदर ताणेबाणे निगुतीने जपणे दाईचे काम, कधी ते काढून न्याहळत बसणे हा लेडी शेलॉटचा विश्राम.

कधी या असल्या जन्मठेपेला कंटाळून एक आर्तमधुर स्वरलकेर तिच्या गळ्यातून उमटे तेव्हा वाटेवरचा वाटसरू शहारून जात असे.लेडी शेलॉट खरेच अस्तित्वात असल्याची तेवढीच खूण होती.

संध्याकाळ झाली की किल्ल्याचे उंच उंच बुरुज काळोख पिऊन उग्र भासू लागत. किल्ल्यातला एकांत शांततेच्या किंकाळ्या मारणार्‍या पिशाच्चासारखा अंगावर येई.आरशासमोरून नाइलाजाने हटून मग लेडी शेलॉट किल्ल्याच्या अंतर्भागात जात असे. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात दाई तिला गावातल्या गोष्टी सांगून रिझवी.

वरचे आकाश नक्षत्रांनी झगमगू लागे.चंद्राचं झुंबर लखलखू लागे.अशातच तिचे गीत जागून उठे.
लेडी शेलॉटचे सूर माळावरच्या थंडगार वार्‍याबरोबर स्तब्ध आसमंतात दूरवर पोचत. गावातल्या आया त्या तालावर छोट्या बाळांना निजवताना स्वत;शीच चुकचुकत.त्यांचे जीवन सुंदर करणार्‍या त्या स्वरांची मालकीण एकाकी होती. तिचे जीवन शून्याकार होते.

स्वतःच्या शापाशीही स्वतःचा एक करार असतो. लेडी शेलॉट तो कसोशीने पाळत होती.
दु:खात सुखी होती.
दु:खात सुखी होती ?
दिवसरात्री अशाच जात होत्या.

त्या रात्री दाई येणार नव्हती. गावात कुणाचेसे लग्न निघाल्याने ती तिथे जाणार होती. ज्यांचे लग्न होणार होते ते जोडपे वाटेने येताजाताना लेडी शेलॉटने कितीदा आरशात पाहिले होते. एकमेकांना बिलगलेले. एकमेकांत हरवलेले.त्यांना निरखणारी तिची नजरही हरवत गेली होती कितीदा. विणकामाचे टाके बोटात घुसून बोटे रक्तबंबाळ होऊ लागली होती अलिकडे.

त्या रात्री मग किल्ल्यातल्या बुरुजातल्या सावल्या सावकाश आकाशभर झाल्या. मागल्या अंगणात एकटीनेच फेर्‍या मारणार्‍या लेडी शेलॉटची शुभ्र वस्त्रे झुळुकांमध्ये सळसळू लागली. दूर गावात वाजणार्‍या तालवाद्यांचा ताल पकडून तिचा स्वर उंच उंच टिपेला पोचू लागला.
आजचा काळोख मख्मली होता. नक्षत्रांचे जडावकाम आज खूपच झगमगत होतं . चंद्राचं झुंबर आज तेजाळलंच नव्हतं ना !

झुळुका अधिकाधिक धीट होऊ लागल्या.लेडी शेलॉटचं शुभ्र उत्तरीय उडून मागल्या दरवाजाच्या गंजक्या कडीला अडकलं.वेलीवरची शुभ्र कळ्याफुलं दचकून सुगंधाची बरसात करत उंबरठ्यावर विखुरली.
अडकलेलं उत्तरीय सोडवून घेणारी लेडी शेलॉटची बोटं तिची राहिली नाहीत. तशीही ती तिची कुठे होती ? विणकाम करताना ती बोटं तिलाच चकित करायची नवेनितळ चित्राकार धाग्याधाग्यात उलगडून.
आज ती बोटं जुनाट गाफिल कडीशी झुंजत होती.करकरत ती कडी उघडली.

लेडी शेलॉट कुठे गेली ?
माळावर रात्रभर स्वर्गीय संगीताचे सूर विहरत राहिले.
दाईने परतल्यावर काय पाहिले ? काय सांगितले?
बुरुजातला आरसा तडकला की सरदारांचे माथे ?

कुणी म्हणाले, एका नावेत बसून लेडी शेलॉट नदीच्या प्रवाहाबरोबर वाह्त गेली.कुणी म्हणाले एका देखण्या सरदाराला घोड्यावरून दौडत येताना तिने नुकतेच आरशात पाहिले होते.कुणी म्हणाले की शाप खरा झाला. पलिकडच्या गावात म्हणे धारेला लागलेला तिचा निष्प्राण देह मिळाला.पण मग माळावरच्या रानवार्‍यात अजूनही गुंजतात ती मधुर गाणी कुणाची ?

आख्यायिका सर्वस्वी खर्‍या थोड्याच असतात ?

-जिगिषा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी हा अनुवाद नाही, एका प्रतीकाला पुन: फील केले आहे, मांडले आहे.
अमेय म्हणतात तसे या प्रतीकावर अनेक मते आहेत, कलावंत, निर्मितीचे आतले जग, बाहेरचे वास्तव वगैरे वगैरे.
मी मला भावले तसे लिहिले. स्वत:च लेडी शेलॉट होऊन पाहिले खरे तर .

वरील एका प्रतिसादात जिगिषा लिहितात ~ "...एका प्रतीकाला पुन: फील केले आहे, मांडले आहे....". त्या दृष्टीने शॅलॉटचे वाचन पुन्हा केल्यास वाचकाला जर मूळ कलाकृती माहीत असल्यास या लेखाचा आनंद द्विगुणित करता येतो. मूळ लेखककवीने सादर केलेले तत्वज्ञान आणि त्यातील सार 'आपल्या' नजरेतून पाहणे हा कित्येक प्रतिभावंतांचा छंद असतो....जिगिषा अशाच एक प्रतिभावंत आहेत हे मला पटत चालले आहे...विशेषतः त्यांचा हा लेख तसेच वूस्टर जीव्हज पत्रव्यवहार वाचल्यानंतर.... आणि आपापल्या क्षमतेनुसार मूळ कलाकृतीला नवी झिलई देऊन ती समाजात नव्याने आणली जाते...तीवर चर्चा अपेक्षित असते.

कलाकृतीचे नवीन संस्करण म्हणजेच उत्तरकांड....उदा. मूळ कथा कविता जिथे संपते तिथून पुढे त्यातील नायकनायिकेचे काय झाले असेल ? या प्रश्नाचा घेतलेला काल्पनिक शोध, ज्याला इंग्रजीत 'अ‍ॅपोक्रिफल' असा शब्द आहे. त्याचा अर्थच 'कल्पित' असा असून उत्तरकांडात पात्रांना कशाप्रकारे रंगविले पाहिजे त्याचे स्वामित्व अर्थातच या दुसर्‍या लेखकाकडे असते.

टेनिसनच्या 'शॅलॉट' ची अपोक्रिफा म्हणून जर जिगिषा यांच्या 'शॅलॉट' कडे पाहिल्यास त्यातील सुंदरतेची जाणीव अधिकच लोभस होत जाईल.

अशोक पाटील

अशोक,''अ‍ॅपोक्रिफल '' हे सुंदरसे सैद्धांतिक नाव माझ्या साध्याशा लेखनाला आहे हे कळल्यावर आनंद झाला Happy अशीच आमच्या आकलनात भर घालत रहा ही विनंती.

"....सैद्धांतिक नाव माझ्या साध्याशा लेखनाला आहे हे कळल्यावर आनंद झाला...."

~ जिगिषा, प्लीज....सर्वप्रथम वरील वाक्यातील 'साध्याशा' हा लेखनामागील जोड दूर करा. मुळात तुमचे लेखन किती अव्वल दर्जाचे तसेच वैचारिक आहे हे मी साधार ओळखत असल्याने त्या लिखाणाचा दर्जा कोणत्या स्थराचा आहे हे मी जरूर जाणतो. हा तुमचा विनय असेल तुमच्या लेखनाला तुम्ही साधे समजता....पण तसे समजायचे की अन्य दर्जा त्याला द्यायचा हा सर्वस्वी वाचकाचा प्रश्न असू शकतो.

योगायोगाने 'अ‍ॅपोक्रिफल' चा वापर केल्याचे मला आढळले होते ते तुमच्याच पी.जी.वुडहाऊसच्या वूस्टर आणि जीव्हज जोडीसंदर्भातील लेखांमुळेच. या क्षणी तो लेख लिहिणार्‍या ब्रिटिश समीक्षकाचे नाव मला आठवत नाही, पण टी.एल.एस. च्या पुरवणीत तसा उल्लेख निश्चित होता. सर्वांटेजच्या 'डॉन क्विक्झोट' या जगप्रसिद्ध कादंबरीतील नायक डॉन आणि त्याचा प्रामाणिक नोकर सँको पान्झा या दोन वीरांची गाथा रंगविली गेली ती सन १६०५ मध्ये. प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून हे स्पेनची पात्रे सार्‍या जगभरातील वाचकांच्या गळ्यातील ताईत बनून गेले आणि शतकानुशतके त्यांची गोडी अद्यापही कमी झालेली नाही. जगातील एकही विद्यापीठ असे नसेल की जिथे इंग्रजी स्पेशलसाठी ही कादंबरी अभ्यासक्रमात लावलेली नाही.

तर याच डॉन आणि सँकोचा 'अ‍ॅपोक्रिफल' सारखा वापर करून वुडहाऊसने वूस्टर आणि जीव्हज ही जोडी निर्माण केली आणि तितकीच लोकप्रियही केली....अशी इंग्रजी साहित्यातील अनेक उदाहरणे देता येतील. हेन्री फिल्डिंग, डोस्टोव्हस्की, गुस्तॉव्ह फ्लॉबर्ट, फ्रांझ काफ्का आदी अनेक जागतिक किर्तीच्या लेखकांनी आपल्या कादंबर्‍यातून अ‍ॅपोक्रिफल सिद्धांताचा वापर करून डॉन आणि सँको सदृष्य पात्रांची निर्मिती केली आहे.

किती सुरेख भाषा! फार फार सुंदर लिहीलंय तुम्ही जिगिषा. जिगिषा नाव अस्लेल्या लेखिकेनं लेडी शॅलॉटबद्द्ल लिहावं हे पण तितकंच मनोहर. Happy

सुंदर तरल कथा आहे.
.
>>>>>>.चंद्राचं झुंबर लखलखू लागे.अशातच तिचे गीत जागून उठे.>>>> ओंजळीत भरुन पिउन घ्याव्यात अशा ओळी.
>>>>>स्वतःच्या शापाशीही स्वतःचा एक करार असतो. लेडी शेलॉट तो कसोशीने पाळत होती.>>> Happy

सुंदर लिहिलं आहे
लेडी शॅलॉट ची उपमा वापरून ऍगाथा ख्रिस्ती ची 'मिरर क्रॅकड फ्रॉम साईड टू साईड' नावाची कथा आहे.ती पण वाचण्या सारखी आहे.

अतिशय सुंदर लेखन... चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. पुढील भागाची हुरहूर लागून राहिली. अर्थात काही गोष्टी अर्ध्यावर सोडण्यातच त्यांचे सौंदर्य लपलेले असते...

कित्ती सुरेख.
B.A.अभ्यासाला होती ही कविता. तेव्हा कोणी ईतक्या सुरेखपणे समजावून दिली असती तर आणखीच आवडली असती.

योगायोगाने कालच अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे एक पुस्तक वाचून झाले. पुस्तकाचे नाव होते, "And the Mirror Cracked from Side to Side" या पुस्तकात दोन-तीन ठिकाणे लॉर्ड टेनिसन यांच्या कवितेच्या दोन तीन ओळी लिहिल्या आहेत. त्यात लेडी शेलॉट चा उल्लेख होता. तेव्हापासून उत्सुकता लागून राहिली होती, 'कोण असेल ही लेडी शेलॉट?' आता उलगडा झाला.

खूपच छान लिहिले आहे.

Pages