दार कलते झुलते

Submitted by भारती.. on 2 August, 2012 - 03:56

दार कलते झुलते

दार कलते झुलते झाड सळसळे बाहेर
येती कुठूनसे सूर आणि आठवे माहेर..

असे कोवळाले सूर यावी मैत्रिणींची सय
बाळदेशीची झुळूक यावी विसरावे वय

पानजाळीमध्ये ऊन जावी मध्यान्ह कलून
नक्षीदार कवडसे सारे अंगण भरून

उडे वार्‍यात पाचोळा आणि गलबले मन
जोखमीने राखलेले कुणी नेले माझे धन

आर्त संध्यारंगी शोक झगमगले क्षितीज
दु:ख रूपवंत मागे वैभवाचा स्वरसाज

सूर पाण्यातून यावे निळा शृंगार करून
निळ्या चालीने चालावे माझ्या तहानेवरून..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येती कुठूनसे सूर आणि आठवे माहेर....... क्या ब्बात !

माहेरच्या आठवणींवरून पुढे कोणत्या तहाणेत बुडाल्या ... समजले नाही

माहेरच्या आठवणींवरून पुढे कोणत्या तहानेत बुडाल्या ... समजले नाही

शाम,अश्विनीमामी आभार आणि क्षमस्व सुद्धा, कविता थोडी दुर्बोध वाटते.. ही लताचे वार्‍यावर वहात येत असलेले सूर ऐकताना तिला काँप्लिमेंट म्हणून लिहिली होती. ही तहान तिच्या सुरांनी जागवलेली अन त्या सुरांचंच निळं स्वर्गीय पाणी पिऊन भागवलेली सुद्धा.

कविचं भावविश्व कसं शब्दांतून वेगळं करावं ? अपघाती मृत्यूने अकाली ओढून नेलेल्या माझ्या तरुण उमद्या भावाची, सुहासची आठवणही या कवितेतल्या दु:खात लपलेली आहे..' जोखमीने राखलेले कुणी नेले माझे धन' हा रक्षा बंधनाच्या दिवशी मी केलेला त्याचा आठव आहे...तो आर्त संध्यारंगी शोक..

भारतीताई तुमच्या भावनांचा खूप खूप आदर आहे,
पण पहिल्या द्वीपदीने उंचावलेल्या अपेक्षा... खालील शब्दांच्या गूढ गर्दीत हरवत गेल्या..

भारतीताई मला ती साधारण कल्पना आली. आजचा दिवस तुम्हास अवघड जाणार. पण आम्ही आहोत की. शोक अनुभवल्यशिवाय आपल्या कलाकृतीत तो तितकासा नीट उतरत नाही हे परत
एकदा समजले. ह्या शब्दांवर सुरेख ग्राफिक बनेल.

भारतीताई खविता खूप छान आहे
काळजात उतरली

कवितेत माझी आठवण काढलीत त्याबद्दल धन्यवाद

<<<<दु:ख रूपवंत मागे वैभवाचा स्वरसाज Wink

खूप आवड्ली कविता

शाम.अश्विनीमामी, आभार. कविता कवीप्रमाणेच प्रतिसादकाच्याही मनात घडत असते. तुमच्या भावनांचा आदर.ती गूढतेत हरवणे माझ्या बाबतीत कित्येकदा संभवते..मी ते ठरवून करत नाही.

वैभव,तुमचं नावही ठरवून आलेलं नाही :)) नक्कीच, पण तुम्ही मला पहिल्यापासूनच ताई म्हणता ते खूप आवडतं.

फारच सुंदर .विषय जरासा वेगळा, किरण. मैत्रिणींचं भेटणं हा एक वेगळाच उत्सव. उद्या या विषयावरची माझीही एक कविता देते..

आज लतादीदींना ८४ वर्षे पूर्ण झाली. आज योगायोगाने प्रभुकुंजसमोरून दोन वेळा आले, गेले. गिरगावातील गावदेवीच्या देवळात त्यांचे वास्तव्य काही काळ होते असे ऐकले आहे, त्या देवळाजवळही आज जाणे झाले.रेडिओवर त्यांची गीते सतत लहरत होती.त्यांच्या स्वरांना समर्पित ही कविता पुन; वर काढत आहे, दुसरे काहीही जमत नाही, सुचत नाही.कसे आठवू गा शब्द अब्द अब्द मनी येते !

भारतीताई छानच कविता आहे ही .

आर्त संध्यारंगी शोक झगमगले क्षितीज
दु:ख रूपवंत मागे वैभवाचा स्वरसाज

या ओळी म्हणजे तर अफाटच आहेत .

भारती....

कविता आणि त्या निमित्ताने लतादिदींच्या वाढदिवसाची तुम्ही आठवण काढली त्याचे खूप वैशिष्ट्य वाटले.
"...असे कोवळाले सूर यावी मैत्रिणींची सय
बाळदेशीची झुळूक यावी विसरावे वय ..."

~ यातील 'कोवळाले सूर' योजनेने अगोदरच लता नजरेसमोर आल्याच होत्या, पण 'प्रभुकुंज' च्या आठवणीने त्या अधिकच.

काल रेडिओवर साहजिकच 'लता खास' कार्यक्रम होता.....आणि त्यातील :

घन तमी शुक्र बघ राज्य करी....रे खिन्न मना, बघ जरा तरी !

त्याशिवाय....."...का मरणि अमरता ही न खरी ?...." या प्रश्नातील आवाहन तर उच्चच.

~ भा.रा.तांब्यांची रचना दिदींच्या स्वरातून ऐकताना सारे नभमंडल समोर ठाकले.

आभार सुशांत ,कवीच्या तरलतेने कवितेचा परमोच्च बिंदू मांडलात. आर्त संध्यारंगी शोक .. या शोकाचे तपशील व्यक्तीगणिक , खरे तर जीवमात्रागणिक बदलणारे , म्हणून संध्यारंगांइतक्या छटा त्याच्या.संध्यारंगांइतक्याच वैभवशालीही ..
अशोकजी ,>> ~ भा.रा.तांब्यांची रचना दिदींच्या स्वरातून ऐकताना सारे नभमंडल समोर ठाकले.>> यथार्थ शब्द !
संध्यारंग, नभमंडल अशी व्याप्ती गाठणारे हे स्वर आपण आयुष्यभर ऐकले हेच आपलं अहोभाग्य !

आभार अंजली, जय .
या कवितेत दोन अंत:प्रवाह एकत्र आले आहेत शोक अन त्याचे विरेचन करणारा स्वरसाज..

लताबाईंचे सूर खरंच मैलोनमैल वार्‍यावर उडत जातील असेच! आणि ते कानी पडले कि घर माहेर आठवतं हेही तितकंच खरं. तुमची ही कविता वाचून ग्रेसची लता-बद्दलची कविता आठवली..

माहेराहुनि गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे;
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे!

यातच पुढे ग्रेसने लताला 'चैतन्याची खुळी परी' म्हटलंय, तेही खूप समर्पक वाटतं मला. Happy

सई , तुझ्या या सुंदर प्रतिसादामुळे ग्रेसांनी लतावरील कवितेत माहेर हीच प्रतिमा वापरल्याचे कळले. कविता मिळवून वाचली पाहिजे. कोणत्या संग्रहात आहे आठवतेय का ?
माहेराहुनि गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे;
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे!
या ओळी अर्थातच जीवघेण्या लोभस. शुभ्रसुगंधी निशिगंधाची प्रतिमा लताच्या व्यक्तिमत्वाला साजणारी.
'चैतन्याची खुळी परी' हे तर वेडं करून टाकणारं विशेषण !

आभार समीर !

हो ना! Happy वेडी झालेली मी ते वाचून. 'सांध्यपर्वातील वैष्णवी' मधे 'लता मंगेशकर' नावानेच आहे ही कविता. आणि २-३ वर्षांपुर्वी ग्रेसने लताच्या वाढदिवशी 'माहेराहुनि गलबत आले' या शीर्षकाखाली एक लेखही लिहीला होता सकाळमधे. मला तो अजून मिळाला नाही. esakal ची लिंक आता चालत नाहीये. Sad सुरवातीच्या ८-१० ओळीच वाचायला भेटल्या.. त्यातुनच अंदाज येतो कि तुफान लेख असणार आहे म्हणून! त्याच देतेय इथे..

निर्मिती तात्कालिक असो की चिरकालिक असो; चिमूटभर असो, पसाभर असो, ओंजळभर असो की अंगणभर असो; तिच्या ओटीपोटात सनातन वेदनेची, पाशवी-शारीर चमक निनादून आल्याशिवाय, तिच्या रहस्याचा पुरावा सुरूच होत नाही. …याचे पुरावेही देता येतील पण आजचा लेखनप्रपंच पुराव्यांचा आणि स्पष्टीकरणाचा नाहीच आणि अशा लेखनाचे मला आतून तसे अगत्यही नाही. बडेगुलाम अली खाँ, मिर्झा ग़ालिब आणि ए. ई. हाउज्‌मन या कलावंतांच्या निर्मितीत असे कंपभिंगर, शारीरिक नोंदणीचे संकेत सापडतात. माझ्यासंबंधी म्हणावयाचे झाले तर, प्रत्यक्ष भेटीपूर्वीच मी साऊलकडे, पंथविराम-अंगणाची भातुकली धाडली होती; ती (ही) परवाच माझ्याच, दूरच्या घरातून, चक्क माझ्याच अनुपस्थितीत...

पानजाळीमध्ये ऊन जावी मध्यान्ह कलून
नक्षीदार कवडसे सारे अंगण भरून

उडे वार्‍यात पाचोळा आणि गलबले मन
जोखमीने राखलेले कुणी नेले माझे धन

छान कविता .... वरील द्वीपदी सर्वात विशेष वाटल्या.

आभार नव्याने प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे !

''दु:ख असावे मोहमय तुझ्या स्मरणाइतके सुंदर ''..!

सई इतकं जबरदस्त अवतरण देऊन कुठे गायबली आहेस ?