'' पत्र सांगते गूज मनीचे '': मामी

Submitted by मामी on 11 September, 2013 - 10:04

पत्र क्रमांक १:

आदरणीय सौ. सुरंगाबाई यांस सादर आणि सविनय प्रणाम.

पत्रास कारण की आपण रोज आमच्याकडे कामाला येण्याचे ठरले आहे त्यात नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खंड पडला आहे.

आपण जेव्हा आमच्याकडे कामास सुरूवात केली तेव्हा महिन्याच्या दोन रजा ठरल्या होत्या. तुम्हीही तुमच्या चेहर्‍यावर त्यावेळी चक्क हसरे भाव आणून भरघोस होकार भरला होता. आता मला कळतंय त्या हास्यामागचं रहस्य. पण तरीही महिन्याच्या दोन सुट्ट्याचं आश्वासन लवकरच लवचिकपणे वाकवून तुम्ही आठवड्याला दोन सुट्ट्या घेऊ लागलात. मी काही बोलले नाही.

माझ्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन तुम्ही काही दिवसांतच सकाळी पाऊण तास उशीरा येऊ लागलात. मी गप्प बसले. नंतर तुम्ही संध्याकाळीही अर्धा तास लवकर जाऊ लागलात, माझ्या परवानगीची गरजच नाही वाटली तुम्हाला.

वेळेवर येण्याची विनंती केली असता, 'चालत यावं लागतं ताई! घरची सगळी कामं आटोपून नंतर भरभर चालत यायला होतंय होय?' असा हृदयद्रावक प्रश्न टाकून तुम्ही माझ्या कोमल हृदयालाच आवाहन केलंत. त्यावर मी तुम्हाला जाण्यायेण्याकरता बसभाडं म्हणून अधिक पैसे देऊ लागले. पुढे काही दिवसांनी मला कळलं की माझं काम धरल्यावर तुम्ही आमच्या बिल्डिंग शेजारच्याच चाळीत घर घेतलं आहे. तुम्ही तुमच्या घरी धुण्याभांड्याला एक बाई ठेवली आहे हे ही माझ्या कानावर आलं. पण मी मूग गिळून गप्प बसले.

गावाकडे तुमचे नातेवाईक, पूर्वी प्लेगच्या साथीत लोकं एकामागोमाग एक मरायची, तसे मरू लागले. प्रत्येक नातेवाईकांच्या तुम्ही लाडक्या असल्यानं तुम्हाला नाईलाजास्तव गावाला जाऊन दिवस करूनच यावं लागायचं. मी हे ही खपवून घेतलं.

आमच्या घरच्या भाज्या, कपडे, साबण, कडधान्य कधी सांगून आणि मग घरच्याच झाल्यानं न सांगता तुम्ही आपल्याकडे नेऊ लागलात. पण 'नाहीतरी आपण कुठे मुद्दाम जाऊन दानधर्म करतो' असा विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

असं सगळं असताना, सुरंगाबाई, सांगा तुम्ही येणं तरीही का बंद केलंत? तुम्ही खरंच का त्या समोरच्या टॉवरमधल्या घरात नविन काम धरलंय? मला येऊन सांगावसंही नाही का वाटलं तुम्हाला? का अशी माया पातळ केली आमच्यावरची? विचार करून माझं बीपी वाढलंय. काही करा पण परत या, सुरंगाबाई. तुम्हाला कोणीही एकही प्रश्न विचारणार नाही. मी महिन्याला तुम्हाला एक साडीही घेऊन देत जाईन आणि एक सिनेमाही दाखवेन.

तुमच्या उत्तराची आणि कृपेची अभिलाषी,

दया लाचारे.

****************************************************

पत्र क्रमांक २ :

नमस्कार दयाताई,

अवो, ह्ये काय पत्राचं खूळ काडलंय? आताच्या काळात कोनी पत्रं लिवतात का? तुम्ही whatsapp वर नाही का? हां हां आलं लक्षात, तुमचा फोन तो लई जुना हाये ना? कसला ब्येक्कार फोन वापरता तुम्ही! नुसता कॉल घ्यायला उपयोगी! नंबर टाईपही केलेला दिसत नाही त्या तुमच्या फोनच्या पडद्यावर. आणि तुमच्या फोनवर एसटीडीही चालत नाही. मी ट्राय केलंय ना!

काय ताई, अवो जमाना कुटं चालला अन तुम्ही अजून तितंच.

व्हय. म्या आता या टॉवरमदी काम धरलंय. हीतं ताई तर बर्‍या हायतंच कारण त्या सतत फिरतीवरच असतात. पण सायेबही दिसायला लई चिकनं हायत. एकदम जान अब्राहम वानी! ताईंना फुलांचे गुच्छ देतात मधून मधून आणि त्यावेळी मलाही एखादं गुलाबाचं फूल देतात. तुमच्या सायबांनी तुमालाच कदी फूल नाय आणलं तं मला काय देतील!

मी काय आता तुमच्याकडं येत नाय. दुसरी बगा. तुमचं फेसबुक स्टेटस अपडेट करा - येतील बायांचे फोन! (फेसबुक अकाउंट हाये का? की तोपण नाय?)

आता थांबते हितंच. टिव्हीवर दुपारच्या माझ्या शीरीएलची वेळ झाली. कधी आयता च्या प्यावासा वाटला तर येऊन जाईन.

तुमची ex-कामवाली,

रंगू ऊर्फ रँगेलीना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, संयोजक. प्रशस्तीपत्रक मस्त आहे. Happy

मतदानाकरता कनवाळू मायबोलीकरांनाही धन्यवाद. Happy

मामी, मनःपूर्वक अभिनंदन....
लेखनशैली आणि विषय - दोन्हीही जबरीच ...

एक चहा ,(जास्त साखरेचा )द्या हो सध्याच्या कामवालीला, तुझ्या क्रुपेने आज बक्षिस गावलय अशिच क्रूपाद्रुष्टी असू दे म्हणावं Lol
अभिनंदन

Pages