पुण्याचे वैभव : शनिवारवाडा

Submitted by ferfatka on 26 September, 2013 - 07:53

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा

DSCN4558.jpg

गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का? मी नाही म्हणताच मग कोण? बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला. त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहानपणी शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी व माझे मावसभाऊ व त्यांचे मित्र असे शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.

मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो. वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा केवळ पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. शनिवारवाड्यात पेशवे राहत असत. थोरले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला. भगवी झेंडा ते युनियन जॅक फडकताना या वाड्याने अनुभवला आहे. आपल्या अनेक कटू व काही सुखद आठवणी घेऊन हा वाडा आजही उभा आहे. अनेक घटना, दुर्घटना पाहिल्या. पानिपतचे महायुद्ध असो, त्यानंतरचा तोतया भाऊसाहेब, राघोबादादांची अटेकपार स्वारी, नारायणरावाचा खून असो , राजकारणं, लग्नसमारंभ व मंगल प्रसंग पाहिले. आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पेशव्याने येथे बांधकाम करून वाड्याच्या सौंदर्यात भर टाकली. तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. मात्र, दुर्देवाने १८२७ मध्ये लागलेल्या आगीत वाडा आतून जळून नष्ट झाला. यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी जेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये आदी सुरू केले होते. यानंतर १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. पुण्याचे सध्याचे विस्तारीकरण या शनिवारवाड्याच्या आजुबाजूला झालेले आहेत.

DSCN4294.jpgबांधकामाची माहिती :
संभाजीमहाराजांचे पूत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी सातारा येथून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. पुण्याचे सरसुभेदार बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना १७१३ मध्ये शाहूंनी ‘पेशवे’ हे पद दिले. बाळाजी विश्वनाथांनी आपला कारभार सासवड व सुप्यावरून सुरू केला. १७२० ला बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले. त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा बाजीरावला १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली. सुरूवातीची काही वर्षे त्यांनी सासवड व सुप्यावरून पेशवाईचा कारभार सुरू केला. पाण्याची कमतरतता व राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून पुणे येथे कारभार करण्याचे ठरले. कारण जवळच असलेले राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड सारखे बळकट किल्ले होते. पुण्यात पेशव्यांचे स्वत:चे घर नव्हते. पुणे पूर्वी फार लहान गाव होते. छोट्या छोट्या वस्त्या होत्या. यातच कसबा पेठ होती. पेठेजवळ शनिवार पेठ होती. लाल महालाच्या शेजारीच बाजीरावांनी स्वत:चा वाडा बांधण्याचे ठरविले. वाड्याची पायाभरणी शनिवार, १० जानेवारी १७३० ला केली गेली. बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. १६,०१० रुपये खर्चून हा वाडा उभारला गेला. वाडा शनिवारपेठेत होता. म्हणूनच की काय या वाड्याचे शनिवारवाडा असे नाव ठेवले असावे. वाड्याच्या कोटाचे काम सुरू झाले. पेशव्यांनी वाड्याला कोट घालावा व सगळ्या पुण्याभोवती वस्तीला कोट करावा हे छत्रपती शाहूमहाराजांनी हे पसंत पडले नाही. त्यांचे म्हणणे होते की, ‘अशा प्रकारच्या वाडा बांधल्यास तो जर चुकून मोगलांच्या ताब्यात गेला तर परत जिंकणे अवघड होऊन बसेल. व त्याच्या आसºयाने आणखीही काही ठिकाणे मोगल जिंकू शकतील. परिणामी शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार कोटाचे काम थांबविण्यात आले.
बाजीरावांच्या काळात वाड्याचे बांधकाम लहान स्वरूपाचे होते. १७४९ ला छत्रपती शाहूमहाराजांचे निधन झाले. मराठ्यांच्या राजकारणाची सूत्रे नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव यांनी पुण्यास आणली. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुणे बनले. त्यानंतर शनिवारवाड्याच्या इतर बांधकामास सुरूवात झाली. अर्धवट काम पूर्ण करून त्या जागी दिल्ली दरवाजा, बुरुजयक्त तटबंदी बांधण्यात आली. वाड्याच्या सर्व तटांवर २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
सध्या शनिवारवाड्यात पाहण्यासारखी काहीच अवशेष उरलेले आहेत. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे खºया स्वरूपातील वाडा आपण आज शकत नाही. पुरातत्व विभागाने बसवलेल्या फलकावरून आपणाला त्याची माहिती व अंदाज करता येतो. दिवाणखाना, गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, हजारी कारंजे यांचे केवळ अवशेष पाहण्यास मिळतात. एक तर येथील तटबंदी आणि बुरुज, दिल्ली दरवाजा व अन्य दरवाजे, नगारखाना.

तटबंदी आणि बुरुज
शनिवारवाड्याचा आकार चौकोनी असून जवळपास ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे. तटबंदीची उंची अंदाजे ३३ ते ३४ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा दगडी चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम विटांचे आहे. संपूर्ण वाड्याभोवती असलेल्या तटबंदीमध्ये बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या अर्थात भोके ठेवण्यात आली आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था असे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास तोफेचा बुरुज तर पश्चिम बुरुजास पागेचा बुरुज म्हणत. तट रुंद असल्याकारणाने आत शिपार्इंच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ आहेत. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी १७५० ला वाड्यात बरेच बदल केले. अनेक नवीन इमारती बांधल्या. १७८० च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, कारंजी बांधली. पेशवे कुटुंबातील परिवाराला रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. जवाहिरखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, जिन्नसखाना, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी स्वतंत्र दालने होती. महालांच्या बाहेर असलेल्या चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. हजारी कारंजे या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. ८० फुटाचा परिघ असलेले एक १६ पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडण्यासाठी १६ नळ होते.

DSCN4358.jpgDSCN4429.jpg

वाड्यास एकूण ५ दरवाजे सध्या या दरवाज्याच्या शेजारून रस्ता गेला आहे. सतत गाड्यांची वाहतूक होत असते.
१. दिल्ली दरवाजा :

शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेला प्रत्येक पर्यटक याच दरवाज्यातून प्रवेश करून वाड्यात प्रवेश करतो. आपल्या वैशिष्टपूर्ण दिल्ली दरवाजाने शनिवारवाडा ओळखला जातो. हत्तींच्या धडकांपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या येथे बसविलेल्या आहेत. दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे. दिल्ली ही उत्तरेला असल्यााने या उत्तरकडे असणाºया दरवाज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. वाड्यातील इतर दरवाज्यांच्या तुलनेने हा दरवाजा सर्वात मोठा आहे. आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. पुरातत्व विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी तिकीट घर उघडले असून, तिकीट घेऊन आपण आत प्रवेश करतो.
२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा : मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू (आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे ईशान्य कोपºयात राहत असत. ते वाड्याच्या ईशान्य बाजूच्या दरवाज्यातून ये-जा करत असत म्हणून त्या दरवाज्यास अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. दरवाजा सर्वात लहान आहे.
३. खिडकी दरवाजा : पूर्व बाजूस असणाºया या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत.
४.गणेश दरवाजा : पूर्व दिशेला असलेला हा दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याने यास गणेश दरवाजा असे नाव पडले.
५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा : वाड्यात सगळ्यात जास्त नावे असलेला हा दरवाजा आपल्या वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या नावाने ओखळला जात असे. दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास दक्षिण दरवाजा असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास नारायण दरवाजा नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास जांभळीचा दरवाजा असेही म्हणत.

नगारखाना
दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दोन मजली इमारत दिसते. तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकºयांच्या कोठड्या व वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात. वरती नगारखान्यात गेल्यावर पुणे परिसरचा काही भाग पाहता येतो. झपाट्याने विस्तारलेले पुणे व आजुबाजूचा भाग दिसतो. जवळच असलेली पर्वती ही दिसते.

DSCN4440.jpgDSCN4404.jpgखंत :
शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळविण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून सुद्धा या वास्तूकडे केवळ ऐतिहासिक दृष्ट्या महत्व देऊन सरकारने आपले हात झटकणे चांगले नाही. केवळ पर्यटनस्थळ घोषित करून किरकोळ डगडुजी करून शनिवारवाडा आपल्या शेवटच्या घटका मोजत असेल की काय असे वाटते. एवढे नक्की की पुरातन वस्तू असल्याने नवीन डागडुजी करता येत नाही परंतु त्या ठिकाणी त्या जागे विषयी आवश्यक ती माहिती चांगल्या स्वरूपात ठेवण्याची तसदी तरी सरकारने घ्यावी. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेला शनिवारवाड्याची सध्याची अवस्था बिकट आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी नेमून परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. वाड्यात गेल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांनी फेकून दिलेल्या पिशव्या, बाटल्या दिसल्या विशेष म्हणजे हा सर्व कचरा एका बाजूला नेऊन पेटवून देत असल्याच्या खूणाही दिसल्या. खरे तर अशी पर्यटनस्थळे केवळ पर्यटनस्थळेच नसून, तो आपला एैतिहासिक वारसा आहे. पर्यटकांनीसुद्धा अशा ठिकाणी ठेवलेल्या कचरापेटीतच कचरा टाकणाचे कष्ट करायला हवे. मी एकाट्याने घाण केल्याने काय होणार? असा विचार बदलला पाहिजे. वाड्याची पार्श्वभूमी मागे ठेऊन स्वत: ‘बाजीराव’ असल्याचा आव आणून काही महाभाग स्टाईलमध्ये फोटो सेशन करताना दिसतात. तटबंदीवरील एखाद्या बुरुजाचा आसरा घेऊन बसलेले जोडपे, शाळा, कॉलेजला दांडी मारून वेळ घालवण्यासाठी फक्त ५ रुपयांत येथे विश्रांतीसाठी आलेल्या बहाद्दरांना अटकाव करणे गरजेचे आहे. दिल्ली दरवाज्याच्या बाहेरील बाजूस पेपर वाचत बसलेले. हातपाय पसरून निवांत झोपलेले महाभागांना अटकाव केला पाहिजे. बाजीराव पुतळ्याच्या चौकटीच्या खालील बाजूस तर प्रचंड घाण साचलेली दिसते. तेथे स्वच्छता करणे गरजेचे आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर कधी काळी अर्पण केलेला हार वाळून खाली पडण्याची वाट पाहणे कितपत योग्य आहे. हे सर्व पाहिल्यावर वाईट वाटते. ब्लॉगवर लिहण्याशिवाय काहीच करू शकत नसल्याची खंत ही वाटते.

शनिवारवाडा पाहण्याची वेळ :

  • सकाळी ८.३० ते सायं. ६.००
  • तिकीट विक्री :
  • ५.४५ ला बंद करण्यात येते. त्यानंतर अर्धा तास पाहण्यासाठी मिळतो.
  • १५ वर्षांखालील मुलास मोफत प्रवेश व त्यावरी प्रत्येक व्यक्तीस ५ रुपये प्रवेश फी आकारली जाते.
  • वर्षभर शनिवारवाडा पाहण्यासाठी उपलब्ध असतो.

कसे जावे :

  • स्वारगेट वरून शनिवारवाड्याकडे अथवा शिवाजीनगरकडे जाणाºया बसने अथवा पायी चालत १५ ते २० मिनिटांत शनिवारवाडा येथे येता येते. वाटेत येताना पुण्यातील मंडई जवळील प्रसिद्ध तुळशीबाग तेथून शनिवारवाड्याकडे येता येईल.
  • रिक्षा सुद्धा शिवाजीनगर, पुणेस्टेशन व स्वारगेट वरून आहेत.

अधिक फोटोसाठी कृपया या ठिकाणी क्लिक करा.

http://ferfatka.blogspot.com/2013/09/blog-post.html

लेख आपणास कसा वाटला यासाठी ब्लॉगवर जरूर प्रतिक्रिया लिहा. मेल करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिति शनिवारवाड्याची.मला बर्‍याच गोष्टी नव्याने कळाल्या.
बाजीराव पुतळ्याच्या चौकटीच्या खालील बाजूस तर प्रचंड घाण साचलेली दिसते. तेथे स्वच्छता करणे गरजेचे आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर कधी काळी अर्पण केलेला हार वाळून खाली पडण्याची वाट पाहणे कितपत योग्य आहे. हे सर्व पाहिल्यावर वाईट वाटते. ब्लॉगवर लिहण्याशिवाय काहीच करू शकत नसल्याची खंत ही वाटते. >>> का नाहि काहि करु शकत बरे?? एका सुट्टिच्या दिवशि जा आजुबाजुच्यांना घेवुन आणि करा सफाई.

छान माहिती.
या जागेवर एक मांजर एका कुत्र्याचा पाठलाग करताना दिसली म्हणून इथे वाडा बांधायचे ठरले. असे वाचल्याचे आठवतेय.
फिरोझ रानडे यांनीच लिहिले होते बहुतेक. त्यांनी या दरवाज्याबद्दलही काहीतरी लिहिले होते.

शनिवारवाड्याची अवस्था सुधारली पाहिजे याबद्दल ..+१

>> वाड्याची पार्श्वभूमी मागे ठेऊन स्वत: ‘बाजीराव’ असल्याचा आव आणून काही महाभाग स्टाईलमध्ये फोटो सेशन करताना दिसतात

यात काय वाईट आहे ? उद्या व्हाईट हाउस समोर उभा राहून फोटो काढला तर त्याला अमेरिकन प्रेसिडेंटचा आव आणला असा कसा म्हणायचा ??

प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी सर्व जण चौथरा , पुतळा , वाडा , किल्ला यांच्या समोर उभा राहून फोटो काढतात..जोवर मूळ वस्तू आणि उद्देशाला धक्का लागत नाही तोवर फोटो काढण्यास हरकत नसावी

इतर सुधारणांसाठी अनुमोदन ..

शनिवारवाड्याची अवस्था सुधारली पाहिजे याबद्दल ..+१ +११

एक प्रश्न - जवळच लाल महाल आहे. तो जसा पुनरुज्जीवित केला आहे तसा शनिवारवाडा पण करावा का?

काही राजकीय विरोध किंवा अडचणी येण्याची शक्यता दाट वाटते. भांडारकर इन्स्टिट्यूट जाळणारे नि दादोजी चा पुतळा हलवणारे लोक आहेत पुण्यात! शनिवारवाडा ज्या जातीच्या लोकांनी बांधला त्या जातीबद्दल आजकाल फारसे कौतुक नाही.

ही केवळ वस्तुस्थिती आहे म्हणून नोंदवली. बाकी इथे लिहून काही फरक पडणारच नाहिये.

मी जेव्हा शनिवारवाड्याला गेलो होतो, तेव्हा त्याच्या अंगणात एका कोपर्‍यात १-२ थडगी आणि मोरपिसे घेऊन एक फकीर बघितले होते. या थडग्यांना काही इतिहास आहे की अतिक्रमण?

शनिवारवाड्याच्या दारातच जे रिकामटेकडे लोक झोपा काढत, पेपर वाचत बसलेले असतात ना ते बघुन या वाड्याची शानच जाते. लेखात दिलेला पहिला प्रचि बघा.

सुरेख माहिती, सुंदर प्रचि ...

<<<<त्या हजारी कारंजावर उडी घेऊन नानासाहेब पेशव्यांनी जीव दिला होता ना?>>>> नानासाहेब हे पानिपतच्या धक्क्याने गेले. सवाई माधवरावांना वात झाला होता - त्या झटक्यात त्यांनी उडी मारली होती खाली कारंज्यावर - एवढे आठवतंय ... बाकी जाणकार सांगतीलच ...

छान माहीती आणि फोटो.

तिथे जो Audio Visual कार्यक्रम असतो त्याची माहीती कोणाला आहे का? म्हणजे रोज असतो का? किती वाजता असतो वगेरे. ह्या दिवाळीच्या सुट्टीमधे लेकीला न्यायचा विचार आहे.

>>>>>तिथे जो Audio Visual कार्यक्रम असतो त्याची माहीती कोणाला आहे का? म्हणजे रोज असतो का? किती वाजता असतो वगेरे. ह्या दिवाळीच्या सुट्टीमधे लेकीला न्यायचा विचार आहे.>>>>>

शनिवारवाड्याचा आॅडिओ व्हिजुअल कार्यक्रम संध्याकाळी ५.३० नंतर असतो. त्यासाठी २५ रुपये प्रति माणसी तिकीट असते. मात्र, प्रेक्षक जमा न झाल्यास कार्यक्रम रद्द केला जातो.

परवा (शनिवार, १६ मे) शनिवार वाड्यातला Audio Visual कार्यक्रम बघितला. ७:३० ते ८:३० मराठी आणि ८:३० ते ९:३० इंग्रजी कार्यक्रम असतो.

आम्ही मराठी बघितला. चांगला आहे. एकदा बघायला नक्कीच छान आहे. अंधारात बाकी काही दिसत नव्हते तर मुलींनी परत दिवसा उजेडी येऊया म्हणले हे खरे या कार्यक्रमाचे यश Happy

ह्या उन्हाळ्याच्या दिवसातही शनिवार वाडा बघण्याची वेळ ९.३० ते सायं. ६.०० आहे. नंतर दरवाजा बंद करतात Sad आणि ७:३० ला परत उघडतात. खरतर संध्याकाळीही चालू ठेवायला पाहीजे. निदान उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी.

तो Audio जास्त आहे Visual पेक्षा. डोळ्यात पाणी येतं बघताना.

शनिवारवाडा हे पर्यटनस्थळ कमी आणि तीर्थस्थान अधिक आहे. मराठेशाहीची ध्वजा १०० हून अधिक काळ फडकवत ठेवणार्‍या पेशव्यांच्या असंख्य आठवणी साठेवलेलं ते एक पवित्र ठिकाण आहे. Happy

या हजारी कारंजावर उडी घेऊन नानासाहेब पेशव्यांनी जीव दिला होता ना?>>> नाही.सवाई माधवरावांनी जीव दिला होता.

सगळ सरकार ने करायच हे का ?
घाण आपण करणार. साफ कोणी दुसर्याने करायची?
कचरा आपण करणार. उचलायचा दुसऱ्याने?

शनिवार वाड्यात डाव्याबाजुने प्रवेश करतानाच, शांतीच्या दुतांचे एक देव्स्थान आहे. त्याला पताका वगैरे लाऊन सजवले आहे.
ते तसे एतिहासिक काळापासुन होते का?
नसेल तर अशा पुरातन वास्तुत असे काही देवस्थान बांधले कसे जाऊ शकते? आणि शांतीच्या देवाचे शनिवारवाड्यात काय काम आहे?

स्पॉक, त्या विषयी मी अतिक्रमणविरोधी विभागात ऑनलाईन तक्रार केली होती. काहीही कारवाई नाही. Happy

नसेल तर अशा पुरातन वास्तुत असे काही देवस्थान बांधले कसे जाऊ शकते? आणि शांततेच्या देवाचे शनिवारवाड्यात काय काम आहे?>>>>>>>>>>> मलाही खटकलेली बाब आहे.शनिवारवाड्यात हे बांधकाम पाठून झाले असणार.आज छोटे आहे,नंतर वाढत जाईल.जसे प्रतापगडावर झाले.

शनिवारवाडा, रायगड सारख्या ठिकाणी काही मजले बांधकाम होते असे म्हणले जाते. आजकाल बांधकाम चालुही न करता २०-२० मजले बिल्डींग त्यातील सुविधा सॉफ्टवेअरच्या माध्यमाने बनवुन दाखवतात तसे जर अशा ऐतिहासीक वास्तुचे सादरीकरण केले तर अधिक प्रभावशाली होईल.