राक्षसी महत्वाकांक्षा पुर्ण होण्यासाठी केलेली गुंतवणूक अर्थात....'इन्व्हेस्टमेंट'

Submitted by अश्विनी के on 22 September, 2013 - 02:00

काल मायबोली माध्यम प्रायोजक असलेला ’इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला.

investment.jpg

जिथे तिथे रोखठोक व्यवहार, पुढील व्यावहारिक आणि दृष्य फ़ायद्यांसाठी केली जाणारी मुल्यांच्या दृष्टीने चूक असलेली गुंतवणूक. नातेसंबंधांना बट्टा लागेल असा चालणारा सट्टा. साधारण दहा वर्षांपुर्वी दबा धरुन वाटचाल सुरु करणारी ही परिस्थिती अक्राळविक्राळ रुप धारण करु लागली आहे. आणि हिचा चेहरा असणार आहे अत्यंत सोफ़िस्टिकेटेड, अत्यंत फ़सवा...हिचं काम असणार आहे स्वार्थासाठी माणुसकीच्या, आपल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणे, आपल्याच माणसांना स्वत:च्या पराकोटीच्या ईर्षेपोटी, वाट्टेल ते करुन मी मला हवं ते मिळविनच ह्या हव्यासापोटी एक साधन म्हणून वापरणे. ह्याचंच एक छोटंसं उदाहरण हा चित्रपट आपल्यापुढे घेऊन येतो.

ह्या चित्रपटात कथानक कुठेही रेंगाळत नाही, प्रत्येक फ्रेम पुढेच नेत राहते. प्रत्येक फ्रेम मध्ये आजूबाजूला ढासळणारी मुल्ये आणि त्या ढासळण्याला आपापल्या कुवतीनुसार विरोध करणारी परंतु अंती हताश होणारी माणसे वैचारिकदृष्ट्या जागा व्यापतातच. एकही फ्रेम फुकट गेलेली नाही. दिग्दर्शन क्लासिक.

स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, फायद्यासाठी सहजासहजी खोटं बोलणारी, शब्द फिरवणारी माणसं, विश्वासाला तडा देणारी आणि तरीही उजळ माथ्याने वावरणारी माणसं ज्या प्रवाहातून जात असतात त्याच्या उलट दिशेने पोहू पाहणारी, दाहक असले तरी 'सत्य' शूरपणे मान्य करणारी आशिषची आई सुलभा देशपांडेंनी साकारली आहे. ह्या बाईंच्या चेहर्‍याची रेष अन् रेष बोलते. जे कुणी सिनेमा बघतील त्यांनी त्या आजारी असतानाचे दोन क्लोज-अप्स आवर्जून पहा. तुषार दळवींनी मुल्यं आणि निर्दय ठरणारा प्रॅक्टिकलपणा ह्यांच्या कात्रीत सापडलेला आशिष उत्तम वठवला आहे. सुप्रिया विनोदने कुठेही लाऊड न होता राखेखाली धुमसणारा महत्वाकांक्षेचा निखारा नुसत्या मुद्राभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. संदिप पाठक आणि त्याची पत्नी झालेली अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या कमी प्रसंग असलेल्या पण प्रभावी ठरलेल्या व्यक्तिरेखा ताकदिने साकारल्या आहेत. संजय मोने तर प्रत्यक्ष गुन्हा करणार्‍या गुन्हेगारापेक्षाही भयानक वाटेल अश्या वृत्तीचा कोल्ड ब्लडेड वकिल अक्षरश: जगतो. आणि येस! सोहेलचं काम करणार्‍या मुलाला आपण कसं विसरु शकतो? अजून जग न पाहिल्यामुळे चेहर्‍यावर न दिसणारा बेरकीपणा पण पौगंडावस्थेची सुरुवात होत असताना धोक्याच्या वळणार उभी असलेली ही अर्ली टीन एज मधली पिढी त्याने साकार केली आहे...अप्रतिम.

मुलांना संस्कारांची गरज नाही सांगाणारी एक बाजू आणि संस्कारांच्या संस्कारांनीच माणूस अंतर्बाह्य घडतो ह्यावर विश्वास ठेवणारी एक बाजू. नव्या जुन्याचा चपखल संकर न करता नुसतं मुल्यांना जुनाट ठरवून आंधळेपणाने नव्याच्या चकाकीला भुलणारी माणसं आज समाजाला कुठून कुठे नेत आहेत! स्वार्थापोटी इन्व्हेस्टमेंट म्हणून देऊ केलेल्या सुखसोयी, सत्यावर केलेली कुरघोडी मोठी ठरणार की त्या कुरघोडीच्या मधूनही जिथे गॅप मिळेल तिथे संस्कारांची म्हटली तर मोलाची आणि म्हटली तर कुचकामी ठरणारी पुंजी मोठी ठरणार? कधीकधी कुटुंबाच विघटन परिस्थितीमुळे अपरिहार्य असतंच, पण निव्वळ आपल्या अक्राळ विक्राळ महत्वाकांक्षांना अडसर ठरेल असे मुल्याधारीत संस्कार करणारी म्हणून आधिची पिढी जाणून बुजून दूर केली जात असेल तर ह्या महत्वाकांक्षेच्या भस्मासुराला थोपवणार कोण?

सुप्रिया विनोदचं कॅरेक्टर प्रवाहात पुढे जाण्यासाठी स्वतःची संवेदनशीलताही जाणूनबुजून मारणार्‍या समाजाच्या एका भागाचं प्रतिनिधित्व करतं. दुर्दैवाने हा भाग अजून अजून विस्तारत जाताना आपण पाहतोच आहोत. गांगण परिवार, स्वतःच्या सासूबाई ह्यांना निम्नस्तरीय ठरवून त्यांच्या भावनांना सरळसरळ ठेचून, त्यांचे अपमान सहजरित्या करत ही बाई पुढे जात राहते. आणि जेव्हा गांगण ती छोटीशी चिठ्ठी तिच्या घरी येऊन देऊन जातो तेव्हा त्या गोष्टीचा तिला अपमान वाटतो. ह्यातून मला एक प्रकर्षाने जाणवलं की समाजाचे नुसते आर्थिक किंवा शैक्षणिक गोष्टींवर आधारित स्तर नसतात. ते माणुसकी, भावना व मुल्याधारितही असतात. एखादा स्तर दुसर्‍या स्तराला स्वाभिमानाचा अधिकार नसल्यासारखा दबवतच राहतो. ह्यात एका बाजूला गांगण आणि सुलभा देशपांडे, सोहेलच्या शाळेतला साक्ष देणारा मुलगा आणि त्याचे वडिल, तर दुसर्‍या बाजूला सुप्रिया विनोद आणि संजय मोने. अधल्या मधल्या स्तरांवर तुषार दळवी, शाळेचे पदाधिकारी वगैरे, ज्यांची मुल्ये एक तर अजिबात ठाम नसतात किंवा फायद्याप्रमाणे बदलत राहतात. जेव्हा पहिला स्तर परिस्थितीमुळे मुका होताना दिसतो, आतल्या आत तडफडताना दिसतो तेव्हा आपण प्रेक्षक म्हणूनही हताश होतो. कुठे तरी ह्याला अंत असलाच पाहिजे.

शेवटी शाळेतला साक्ष देणारा मुलगा तुषार दळवींना जी प्रतिक्रिया देतो तिथेही दिग्दर्शकाने कमाल केली आहे. तिथेच आपल्याला जाणवते की आज जरी हा माजोरडेपणा जिंकून देत असला तरी पुढे कुठेतरी तो माज खाली उतरवला जायची सुरुवात होते आहे. तुषार दळवीसारख्या अजून मुल्यांची टोचणी थोडीफारतरी बाळगणार्‍या क्लासला ते फटके जाणवतील. जे सुप्रिया विनोदच्या कॅरेक्टरसरखे इन्सेन्सिटीव्ह झाले असतील त्यांना ते फटके खूप प्रखर झाल्यावरच जाणवतील. आपण समाजाचा भयाण चेहरा जरी पहात असलो तरी आतल्या आत स्वतःला विचारतो की निदान मी तरी ह्या प्रवाहात वाहत जायला माझ्यापुरतातरी विरोध करेन ना? "नक्कीच करेन" हे उत्तर आतून आलं की एक दिलासा मिळतो की जसं माझ्यातली मी हे उत्तर प्रामाणिकपणे देऊ शकते तर उर्वरित समाजाकडूनही होप्स आहेतच.... अजून सगळं संपलं नाही... गाडी उतारावरुन वेगाने घरंगळण्याला आपण आपापल्यापरिने अडसर नक्कीच बनायचा प्रयास करु.

चित्रपट पाहताना जाणवले की रत्नाकर मतकरींच्या विचारांमधला खरेपणा ह्या कलाकृतीत उतरला आहे.

खरंच सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी- छान लिहिलं आहेस! Happy

कॉपी पेस्टेड कमेन्ट... माझीच आहे. दुसर्या धाग्यावरही आहे-

आज आपण थोड्याफार फरकाने का होईना हे सगळंच आजूबाजूला पाहातोच. येनकेनेप्रकारेण आपल्याला जे हवं ते मिळवण्याकरता वाट्टेल ते करणारी माणसं आज आपल्याच आजूबाजूला आहेत. नेमकं चित्रपट हेच दाखवतो. चित्रपट पूर्ण वेळ खिळवून ठेवतो.
काहीकाही ठिकाणी जरासा लाऊड वाटू शकेल काही जणांना, पण तसले संवाद अग्दीच घडत नाहीत असं नक्कीच नाही म्हणता येणार.

सुलभाताईंच आजीचं रूप फारच छान जमलंय. तुषार-सुप्रिया-सोहेल उत्तम अभिनय.
सोहेल तर अगदीच घराघरांत दिसतो. आजकालची लहान मुलं टीनेज येऊ घातलेली म्हणा हवंतर असले हट्ट करतात, असंच वागतातही. सोहेलचा पडद्यावरचा वावरही छान आहे. लहान आहे म्हणून काही ठिकाणी अग्दीच बालिश संवाद कधी पहायला मिळतात, लहान कलाकार कधीतरी गडबडलेले दिसतात. तसं अजिबात नाहीये सोहेलच्या अभिनयात.
संदीप-भाग्यश्री यांचा अभिनय सुद्धा हुबेहूब वठलाय. त्यांची अगतीकता, मानसिक अवस्था यांचं चित्रण भाव खाऊन जातं.
संजय मोनेंचा रोखठोक वकील, अन त्यांचे सेटिंग लावण्याचे कसब, त्यातले हावभाव, संवाद-फेक, नंतरचे कोर्टातले युक्तिवाद... सगळंच अप्रतिम.

संपूर्ण चित्रपट हॅन्डहेल्ड कॅमवर झालेला आहे, हे जाणवतही नाही. अमोल गोळेचं हे कसब वाखाणण्याजोगं आहे. गरज नसतांना प्रसंगाचा फील यावा म्हणून दिलेलं पार्श्व्संगीत सुद्धा कुठेही जास्त वाटत नाही. खरोखरच खूप छान दिग्दर्शन. जरूर सगळ्यांनी पहावा.

कॉपी पेस्टेड कमेन्ट... माझीच आहे. दुसर्या धाग्यावरही आहे-

सोहेलच्या शिक्षिकेनी त्याच्या आज्जीला " आम्ही असले आर्टीफिशिअल संस्कार करत नाहीत मुलांना" हे सांगणं आणि त्याचे पुढे चित्रपटात जाणवणारे परिणाम 'असे संस्कार आवर्जुन करायलाच हवेत जरी ते आर्टीफिशिअल वाटले तरीही ' हेच अधोरेखीत करतात.
देणगीसाठी खोटे बोलणारे म्हणजेच नकळत चुकीचे संस्कार करणारे शिक्षक\ शाळा मन उद्वीग्न करतात.
सगळ्यांचीच कामे उत्तम
चित्रपटभर ए बाबा म्हणणार मुलगा मधेच एकदा बाबांना अहोजाहो करताना दिसलाय, पण एकदाच. ते चुकुन झालय की मुद्दाम माहीत नाही.
आणखी एक. :- तु. दळवीची आई जाते त्या वेळी त्यांच्या घरात कोणीच कसं नाही? तो स्मशानातून ते मडकं घेऊन येतो तेव्हाही एकटाच घरी येतो आणि घरात फक्त बायको आणि मुलगा हे जरा खटकलंच. कोणीतरी नातेवाईक किंवा शेजारी तरी असायला हवे होते. निदान अधुन मधुन भेटणारे अजित केळकर तरी. अशा प्रसंगात माणसे येतातच घरी.
अश्वे जिथे बोल्ड झालीयेस ते जास्तच भावलं मनाला.

"नक्कीच करेन" हे उत्तर आतून आलं की एक दिलासा मिळतो की जसं माझ्यातली मी हे उत्तर प्रामाणिकपणे देऊ शकते तर उर्वरित समाजाकडूनही होप्स आहेतच >>>> अस्वस्थ करणारा सिनेमा असुनही तुम्हि त्यातून सकारात्मक विचार करताय हे विशेश आहे

शाळेतला साक्ष देणारा मुलगा तुषार दळवींना जी प्रतिक्रिया देतो तिथेही दिग्दर्शकाने कमाल केली आहे >>> असहमत आहे. तद्दन घिसिपिटी प्रतिक्रिया आहे ती. आतापर्यन्त कित्येक सिनेमा मधून आलेली आहे, त्यात वेग्ळे काहीच वाट्ले.

मस्त लिहिलंस अश्विनी. Happy
मी लिहायला घेतलेले अनेक मुद्दे तुझ्या लिखाणात आल्याने ते रिपीट करत नाही. तुझं लिखाण पुरेसं सर्वांगांनी विचार करून लिहिलेलं दिसल्याने वेगळा धागा न काढता इथेच पोस्ट टाकणं योग्य वाटलं.

एका बदलत्या जीवनशैलीला सादर करून दाखवणारा 'इन्व्हेस्टमेण्ट'. मुलासाठी 'काहीही' करायला तयार असणारे आई वडील प्रत्यक्ष कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याचं एक उदाहरण हा सिनेमा आपल्यापुढे ठेवतो.

सिनेमा संपताना मला माकडीण आणि तिच्या पिल्लाची गोष्ट आठवली. पूर्वी ही गोष्ट 'सबको अपनी जान प्यारी' हे ‘तात्पर्य काढायला’ सांगितली जायची. मात्र आता महत्त्वाकांक्षा इतक्या तीव्र आणि टोकदार झाल्या आहेत की त्यासाठी वाट्टेल ते करायची आपली तयारी आहे हे सांगायलाही ही गोष्ट वापरता येईल. मुंबईची जलदगती आणि साचेबद्ध जीवन प्रत्येक प्रसंगात ठळकपणे दिसतं. सर्वच कलाकारांचे अभिनय पूरक असेच झाले आहेत. संवाद मात्र अपुरे, कच्चे वाटतात. उदा. फोनवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पहिल्यांदाच बोलताना कुणीही पटकन 'कळवलंत तर उपकार होतील' अशी भाषा वापरणार नाही. कथानक ताकदीचे असूनही काही ठिकाणी त्रुटी जाणवत राहतात. पण वस्तुस्थिती समोर ठेवणारा आणि शेवट गोड करण्यासाठी कोणता तरी 'चमत्कार' न करणारा म्हणून चांगला चित्रपट. Happy

मायबोलीमुळे, तसेच माध्यम प्रायोजकांनी हा सिनेमा पाहण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचे व मायबोलीचे मन:पूर्वक आभार!

वस्तुस्थिती समोर ठेवणारा आणि शेवट गोड करण्यासाठी कोणता तरी 'चमत्कार' न करणारा म्हणून चांगला चित्रपट. >>>

अगदी बरोबर!
गंभीर विषयाची गंभीर हाताळणी - या एका गोष्टीसाठी मला सिनेमा आवडला.

विषयाचं वेगळेपण सतत केंद्रस्थानी आहे. त्यामुळे सादरीकरणात कुठलाही प्रयोग न करण्याची, ते एकरेषीय ठेवण्याची खबरदारी घेतली गेली आहे.
आईचं मुलाला पाठीशी घालणं कसं चुकीचं आहे हे प्रेक्षकांच्या मनावर पुरेपूर ठसावं याकरिता आईचं व्यक्तिचित्रण करण्याचा जो मार्ग निवडला गेला आहे, तो जरा गॉडी वाटू शकतो. पण तोच सर्वात सोपा मार्ग होता हे उघड आहे.

पण,
तुषार दळवीची घुसमट अधिक चांगल्या रीतीनं दाखवायला हवी होती असं वाटलं.
तसंच, घरात नुकताच मृत्यू झालेला असतानाही त्या कुटुंबाचं पार्टी करणं वगैरेही फारसं पटत नाही.

संजय मोनेचा अभिनय उत्तम, पण त्याच्या कार्यालयात फायलींचा अस्ताव्यस्त गराडा, त्याच्या टेबलवर एक साधा संगणकही दाखवला नाही (लॅपटॉप तर दूरचीच गोष्ट), यांमुळे तो दाबून फी आकारणारा वकील वाटलाच नाही अजिबात.
शाळेतली शिक्षिका मुलाच्या मारामारीची तक्रार सांगायला घरी येते ते ही जरा विचित्र वाटलं.

@ लली,
घरात नुकताच मृत्यू झालेला असतानाही त्या कुटुंबाचं पार्टी करणं वगैरेही फारसं पटत नाही. >>> अगदीच गं. पण त्या प्रसंगामुळेच नातेसंबंधांवरही महत्वाकांक्षा कशी हार्श कुरघोडी करते ते जास्त टोकदारपणे जाणवलं. तुषार दळवीला आईच्या वियोगामुळे किंवा कात्रीत सापडल्यामुळे होणारी घुसमट जास्तवेळ अनुभवूच देत नाही सुप्रिया. ती त्या घुसमटीलाही फरफटत आपल्याबरोबर रेसमध्ये खेचून नेते.

कित्येक बड्या धेंडांच दाखवायचं रुप वेगळं असतं तसाच दाखवला आहे संजय मोने. दाबून घेतलेली फी अशी उघड करायचीच नसते ह्या लोकांना. अगदी हिर्‍यांचे रोजचे व्यवहार करणारे हिरे व्यापारी देखील साधेच दिसतात. ऑपेरा हाऊसच्या पंचरत्न बाहेर बघितलंस तर हातात तरटाची पिशवी घेऊन चाललेला एखादा माणूस अनेक कोटींचा मालक असू शकतो. फायली आणि रेफरन्स बूक्सचा गराडा असतोच ह्या वकिलाचा प्रोफेशनमध्ये.

उगाचच्या उगाच गाणी घुसडली नसल्यानेही गंभीर विषयाची विण विसविशीत झाली नाही.

@ झंप्या दामले,
तशी प्रतिक्रिया कॉस्मेटिक व्हिलन्स असलेल्या किंवा मसाला चित्रपटांतून एक दोन वेळा पाहिली आहे. इथे त्याच प्रतिक्रियेला वेगळं परिमाण मिळालंय असं वाटलं Happy

@ आशूडी,
संवाद तसे कमीच आहेत. न्यायालयात देखील आतषबाजी वगैरे कुठेच नाही. तू पॉइंट आऊट केलेला संवाद माझ्याकडून निसटला Happy

हो, हो, गाण्यांचं लिहायचं राहिलंच.
सिनेमात एकही गाणं नव्हतं हे मला घरी परतल्यानंतर जाणवलं.
पार्श्वसंगीतही खूप लाऊड नव्हतं.

तुषार दळवीची घुसमट अधिक चांगल्या रीतीनं दाखवायला हवी होती असं वाटलं<<<<<
लले तशी त्याची फार घुसमट वगैरे होत नसावी असं वाट्तय कारण सुरुवातीलाच मला हवं ते मी मिळवतोच हे वाक्य आहे त्याच्या तोंडी त्यामुळे तोही त्याच कॅटेगरीतलाच असणार
फत मधे मधे आईचे संस्कार डोकं वर काढतात इतकंच