फिर मिलेंगे भाईजान..

Submitted by तुमचा अभिषेक on 7 September, 2013 - 12:31

गेले वर्षभरात बदललेला हा चौथा डॉक्टर. आजाराने पुन्हा उचल खाल्ली होती. बारावीला चांगले मार्क काढले असतेस तर डॉक्टरच बनवला असता तुला, असे आई कित्येकदा बोलायची, अन माझ्याजागी एखाद्या नर्सशीच लग्न का केले नाहीस असे बायको वरचेवर सुनवायची. म्हणूनच का माहीत नाही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यास माझी पहिली नजर नर्सेसवरच भिरभिरते. अगदी आजही भिरभिरत होतीच, हॉस्पिटलच्या आवारात शिरल्यापासूनच. इतरवेळी रोगट वाटणार्‍या वातावरणात बघण्यासारखे एक तेच तर असते. बस्स भिरभिरतच होती नजर, अन अचानक अडकली. दुरूनच येताना तिला पाहिले ते अगदी दहापावलांवर येऊन समोरच्याच रिसेप्शनिस्टच्या खुर्चीत बसेपर्यंत माझा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कि हि तीच ती होती. किती वर्षे झाली असावीत, चार, सहा, सात.. कि माझा भास होता तो.. पण तिची नजर माझ्यावर जाताच चमकली, क्षणभरासाठी.. अंह अगदी चार सहा क्षणांसाठी अडकली. तेव्हा थोडीफार खात्री पटली. ती तीच होती.

ह्म्म, तीच तर होती ती.. कॉलेजला होतो मी तेव्हा. अपेंडिक्सचे ऑपरेशन निघाले होते. सरकारी हॉस्पिटल अन त्याचे मोठमोठाले जनरल वॉर्ड, चांगली गोष्ट एवढीच की स्वच्छता पुरेशी होती, अन पुरेसे अंतर राखून दूरदूर पसरलेल्या खाटा. त्या खाटांमधून वाटा काढत फिरणारे शिकाऊ डॉक्टर, मागोमाग शिकाऊ नर्सेस.. रंगरुपाने सरकारी इस्पितळाला साजेश्याच.. अर्थात, तोवर तिला नव्हते ना पाहिले मी..!

छोटेसेच तर ऑपरेशन होते, अपेंडीक्सचे.. सुरळीत पार पडले तरी दोनचार दिवस तिथलाच पाहुणचार घ्यायचा होता. मात्र शेजारचे वर्षानुवर्षे तिथेच पडून असल्यासारखे पेशंट पाहता हे दोनचार दिवस कधी एकदा संपतात असे झाले होते.. पण हे वाटणे त्या दिवसापुरतेच होते.

संध्याकाळच्या राऊंडला पहिल्यांदा मी तिला पाहिले. माझी अ‍ॅनेस्थेशियाची गुंगी बर्‍यापैकी उतरली होती, सुस्ती तेवढी होती, अन अशक्तपणा.. तरीही झोपल्या झोपल्या मान वळवून, नजर इथे तिथे भिरभिरत होतीच. काही गोष्टी लांबूनही छान दिसतात अन जवळूनही तितक्याच आकर्षक. ती यापैकीच एक होती. अगदी वॉर्डाच्या त्या टोकापासून या टोकाला माझ्याच दिशेने येत होती, तिथूनच नजर हटायला मागत नव्हती. एका रेषेत अन लयबद्ध चालीत, टिपिकलच असा नर्सचा पेहराव, पांढरट रंगाचा, पण तिला खरेच शोभत होता. तिच्या गोर्‍यापान पायांच्या सौंदर्याला, स्कर्टचा तोकडेपणा, जरा जास्तच खुलवत होता. अन या सर्वांवर हटकून जाणारे, काजळात कोरलेले डोळे, बघताच क्षणी थेट काळजात शिरत होते. पायाला कंप फुटायचा बाकी होता जेव्हा ती अगदी माझ्याच खाटेजवळ येऊ लागली. खाटेजवळ काय, ती माझ्याजवळच आली. अन हातातली काचेची नळी माझ्या आ वासलेल्या तोंडात खुपसली. थर्मामीटर होते ते बहुतेक, आज नक्कीच चुकीची रीडींग देणार होते..

मोजून तीन-साडेतीन मिनिटे ती तिथे होती, मोजून तीन-साडेतीन वेळा माझी पापणी फडकली असावी. पण ती मात्र जशी आली तशी निघून गेली, कदाचित हे असे घडण्याची तिला सवयच असावी.

बस्स तेवढेच तिचे दर्शन. तेव्हढीच तिची ड्यूटी असावी. रात्री कुठे दिसली नाही. रात्र तिच्या आठवणीत तळमळण्यातच जायची होती पण थकलेले शरीर कि औषधांचा असर, मेल्यागत झोप लागली ते सकाळी दहालाच डोळे उघडले. इथपासून पुन्हा संध्याकाळची वाट बघायची होती.

संध्याकाळी मात्र पुन्हा ती आली. त्याच वेळी, त्याच दिशेहून. पेहराव देखील तोच तसाच. जणू कालचाच अ‍ॅक्शन रिप्ले घडल्यासारखे. पण आज काही वेगळे घडवायला हवे होते. काय ते समजत नव्हते. हसलो फक्त.. मी एकटाच.. अन ती रीडींग घेऊन निघून गेली. तिला पाठमोरे जाताना मी नुसते बघत होतो. दूरवर दरवाज्यापर्यंत जाईपर्यंत तिला सोबत करत होतो. अगदी शेवटाला ती पलटली अन थेट माझ्याच दिशेने पाहिले. माझी नजर पकडली गेली होती. ती पुन्हा वळली, अन माझ्याच रोखाने येऊ लागली. जसजशी जवळ येत होती, तसतशी छातीतली धडधड वेगाने वाढत होती. नक्की काय म्हणून परत फिरली आहे याचा विचार करेकरेपर्यंत ती पोहोचली देखील. अन माझ्या खाटेजवळच विसरून गेलेले तिचे रीडींगबूक उचलले. यावेळी मात्र ती हसली. तिच्या हसण्याचे कारण कदाचित वेगळे असावे.. मी मात्र तिचा हसरा चेहरा, तिचे आणखी एक रूप, तिची आणखी एक अदा डोळ्यात साठवून घेतली.

रात्र पुन्हा गाढ झोपेत गेली मात्र सकाळी लवकरच जाग आली. चालाफिरायची ताकद अंगात आली होती. ती जमेल तितकी वापरत होतो. दोन दिवस आंघोळ नव्हती, पण आज हातपाय आणि तोंड स्वच्छ धुवायचे होते. त्याआधी आरसा पाहिला आणि स्वतालाच स्वताची किळस आल्यासारखे झाले. दाढीची वेडीवाकडी वाढलेली खुंटे आणि विस्कटलेले राट केस, भरीस भर म्हणून आत गेलेली गालफडे अन निस्तेज चेहरा, धुतल्यावर मात्र जरा फ्रेश वाटू लागले. दोन दिवसांच्या अशक्तपणाची भरपाई व्हावी इतपत जेवण दुपारी हादडले. आता मी संध्याकाळची वाट बघत होतो. आज तिला माझे गेल्या दोन दिवसांसारखे ओंगळवाणे रूप दिसणार नव्हते, या विचाराने चेहरा जरा जास्तच खुलला होता. पण रात्र येईपर्यंत तो कोमेजला जेव्हा मी तिची वाट बघतच राहिलो आणि आलीच नाही.. नाही म्हणायला संध्याकाळी एक दुसरी नर्स आली होती, जी माझी रिडींग घेऊन निघून गेली, पर उसमे वो बात कहा..

त्या रात्री झोप ठिकठाकच लागली, पण स्वप्नात मात्र ती पुन्हा पुन्हा येत होती अन माझ्या तोंडात थर्मामीटर देऊन जात होती. पहाटेपर्यंत हेच चालू होते, कदाचित म्हणूनच स्वप्न खरे झाले असावे.. कारण आज सकाळीच ती दिसली, अन कालच्या तिच्या न येण्याचा उलगडा झाला. तिच्या ड्यूटीची शिफ्ट बदलली होती. हे देखील चांगलेच झाले म्हणा, आज तिचा सकाळचा टवटवीत चेहरा बघायला मिळाला. तसा माझ्याही चेहर्‍यात आता बराच तजेलदारपणा आला होता. कदाचित याचाच परीणाम असावा, वा तिला माझे तिच्याकडे सतत बघणे समजले असावे, अन ते आवडलेही असावे, कारण तिने इतर पेशंटची चौकशी करत असताना बरेचदा माझ्याकडे वळून वळून पाहिले होते. नजरेचे संकेत आता दोन्हीकडून येऊ लागले होते. तो तिचा चेहरा अन ती तिची नजर, माझ्यासाठी हॉस्पिटलमधील मृगजळच होते ते..

अन ती रात्र आली..! आयुष्यातील अविस्मरणीय अशी एक रात्र..! रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही असे म्हणतात ते कशाला हे त्या रात्री समजले. आज तर पापण्यांनाही फडफडायची बंदी होती. कारण आज तिची नाईट शिफ्ट होती. आज रात्रभर ती माझ्यासमोरच बसणार होती. अगदी हाकेच्या अंतरावर, दोन वार्डांच्या कॉमन पॅसेजमध्ये, जिथून दोन्हीकडच्या पेशंटवर नजर ठेवता यायची.. पण बघत मात्र ती माझ्याकडेच होती. आज रात्रभर जागे राहून तिची हिच ड्यूटी होती. मग मला तरी कशी झोप लागणार होती.

हॉस्पिटलच ते, रात्री दहा-साडेदहालाच सर्वांची निजानीज झाली. अकरा-साडेअकरापर्यंत सारे ठार. फक्त तीन व्यक्ती जाग्या होत्या. अर्थातच एक मी, एक ती आणि एक तिच्या जोडीने सिनिअर नर्स असावी जी माझ्या पाठमोरी बसली होती, वा तिने मुद्दामहून ती तशी बसेल याची काळजी घेतली असावी. माझे तिच्याकडे बघणे वा तिचे माझ्याकडे बघणे हे बघायला म्हणून आता तिथे तिसरा कोणीही नव्हता. हातात घड्याळ नव्हते, ना भिंतीवरचे रात्रीच्या अंधारात दिसत होते, मात्र वेळ सरकताना जाणवत होती, जशी रात्रीची नीरव शांतता आणखी आणखी गडद होत होती. तास, दोन तास किती वेळ उलटत होता याचे भान नव्हते, पण मी तिच्या दिशेने कूस वळवून तिलाच बघत झोपलो होतो अन ती अधूनमधून माझ्याकडेच नजर टाकत बसली होती. मध्येच पाचेक मिनिटांसाठी उठून ती इथेतिथे जायची तो तेवढा वेळ जीवावर यायचा, या वेळेत झोप तर नाही ना लागणार चुकून हि भिती वाटायची. हे नजरेनजरेतील मूक संभाषण आज मला पुर्ण रात्रभर चालवायचे होते.

मध्यरात्री कधीतरी तिच्या बरोबरची नर्स उठून कुठेतरी निघून गेली. किती वेळासाठी माहित नाही पण हिच ती वेळ काहीतरी करण्याची, धाडस करून आणखी एक पाऊल टाकण्याची. काय करावे, उठून जावे का सरळ तिच्याजवळ.. पण ते धोकादायक होते.. ती जिथे बसली होती तिथली लाईट चालू असल्याने त्या भागात तेवढा उजेड होता, मध्येच कोणाही पेशंटला जाग आली असती, तर माझे तिथे असणे लगेच दिसण्यात आले असते. याउलट आत वॉर्डमध्ये तुलनेत अंधारच होता. तिलाच बोलवावे का इथे ??

जास्त विचार करायला वेळ नव्हता, तिच्या बरोबरची नर्स कधीही परतण्याची शक्यता होती. एक पेशंट म्हणून मी काही कामासाठी एका नर्सला नक्कीच बोलावू शकत होतो. तिचीही नजर माझ्यावरच लागलेली, आता आपण दोघेच इथे आहोत या जाणिवेने तिचीही चुळबुळ चालू होती. आणि अश्यातच मी तिला हात दाखवला..

किंचितसे अनपेक्षितच होते ते मला, पण ती तडक उठली आणि माझ्या दिशेने येऊ लागली. हुरहुर, भिती, थरार, छातीतली धडधड, रोखलेला श्वास, गारठलेले हात आणि पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंत जाणारी थंड शिरशिरी.. असह्य होऊन तिला परत जायला सांगावे तर ते देखील जमेनासे झाले होते. इतक्यात मागाहून कसलीशी चाहूल लागली. तिच्याबरोबरची सहकारीण परत जागेवर आली होती. तिच्याही ते लक्षात आले होते. अन मी तिला उगाचच हाक मारलेली, हे देखील समजले होते. माझ्याकडे न बघताच जवळच्या ड्रॉवरमध्येच काहीतरी खुडबुड करायचे नाटक ती वठवू लागली. थोडेसे सुरक्षित वाटू लागताच मगाशी अचानक भरलेली हुडहुडी आता निवळू लागली होती. त्या अंधार्‍या वार्डात, रात्रीच्या समयी, तिचे माझ्या जवळपास असणे मी हळूहळू अनुभवायला लागलो होतो. तिचे माझ्यापासून तीन साडेतीन फूटांवर असणेही नकळत मला उब देऊन जात होते.

दोनचार मिनिटांचा वेळ घालवून ती परतली, बरोबरच्या नर्सला काय कारण सांगितले ठाऊक नाही, पण तिला कसलाही संशय आला नसावा, तिने मागे पलटून तरी पाहिले नाही.. पण हि मात्र माझ्याकडे तशीच बघत होती.. किंबहुना नजरेतली आर्तता यावेळी वाढल्यासारखी वाटली.. अन अश्यातच पहाट झाली.

उजाडताच ती तिच्या इतर कामांना निघून गेली. कदाचित आता घरीच गेली असावी असे समजून मी झोपायचा प्रयत्न केला, मात्र जी रात्रभर आली नव्हती ती आता सकाळच्या कोलाहलात काय येणार होती. झोपलो नाही हे बरेच झाले कारण साधारण नऊ-दहाच्या सुमारास ती परत आली. ड्यूटी संपवून घरी परतायच्या आधी एखादा राऊंड मारायचा म्हणून सहजच... की माझ्यासाठी.. बहुधा माझ्यासाठीच.. माझ्या खाटेजवळ येऊन हलकेच बोलून गेली.. "काल एका मुलाला रात्रभर झोप लागली नाही असे दिसतेय..." असे म्हणत खट्याळपणे हसत निघून गेली.. अन मी मात्र दिवसभर तिच्या या वागण्याबोलण्याचा अर्थ लावत बसलो होतो.

काल रात्री झोप नव्हती, आज दिवसभरात नव्हती, आजही रात्री तिची ड्यूटी असल्यास आज रात्रीचेही काही खरे नव्हते. जागायचे ठरवले तरी तब्येत साथ देईल याची खात्री नव्हती, अन झोपायचे ठरवले तर उद्या सकाळीच मला डिसचार्ज मिळणार असल्याने तिच्या सहवासातली हि शेवटची रात्र ठरणार होती.

तिची रात्रपाळी होती की नाही माहित नाही मात्र ती संध्याकाळी तुलनेने लवकरच आली होती. माझ्या जवळपासच वावरत होती मात्र माझ्याशी नजर चोरत वागतेय की काय असे जाणवत होते. एकदोनदा नजरानजर झाली तशी पटकन इथे तिथे नजर वळवली. मध्ये मी एकदा माझ्या रूटीनप्रमाणे फेर्‍या मारत असताना अचानक आम्ही एकमेकांना सामोरे आलो तशी कावरीबावरी झाली, अन हसत, अंह थोडीफार लाजतच निसटली. काल रात्रीनंतर आजचा दिवस तिनेही माझ्याच विचारांत घालवला असावा हे तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

जेवण झाले तसे मला झोप येऊ लागली, मात्र शक्य तितके वेळ जागायचे होते. म्हणून मी पुन्हा पाय मोकळे करायला इथेतिथे भटकू लागलो. नजर अर्थातच, तिलाच शोधत होती. हॉस्पिटलाला साजेशीच रात्रीची शांतता सर्वत्र पसरली होती. उजवीकडचे वॉर्ड फिरून झाल्यावर मी डावीकडे मोर्चा वळवला. तेथील पहिल्याच वार्डाला लागून असलेल्या राखीव जागेतल्या टेबलाजवळ खुर्ची सारून ती एकटीच बसली होती. तिची सिनिअर हेड, मेट्रन की काय म्हणतात ते, कोणी नव्हते जवळपास. बस्स हिलाच तर संधी म्हणतात, जी साधायची होती. तिच्याशी संवाद साधायची संधी. एका नवीन नात्याची सुरुवात करायची संधी. पण संवादाची सुरुवात नेमक्या कोणत्या शब्दात करायची. अजूनही मन द्विधा अवस्थेतच होते, पण पावले मात्र ठाम होती. ती केव्हाचीच वळली होती.. काय बोलावे, काहीतरी विचारावे, पण नेमके काय.. पाणी मिळेल का, टॉयलेट कुठे आहे, औषधपाणी, डॉक्टरांची चौकशी.. क्रिकेट मॅचचा स्कोअर तर नक्कीच विचारणार नव्हतो, बस एवढेच ठाऊक होते.. जे सुचेल ते विचारू, नाहीच जमले तर हसूनच परत येऊ, ती देखील नक्की हसेल. दोन दिवसांची ओळख आहे, नजरेनजरेतील.. अन कालची रात्र.. काही न बोलता हसलो तरी रागवायची नाही, हसूनच प्रतिसाद मिळेल, खात्री होती. यांच विचारात तिच्या जवळ पोहोचलो अन इतक्यात तिनेच माझे नाव पुकारले, न हसता, सहजच.. कालपासून डोक्यात घोळत होते, जेव्हा तिच्याशी बोलायला जाईन, अगदी पहिल्यांदा, तेव्हा तिला काय हाक मारायची, ती मला काय हाक मारेन, अन अचानक समोरूनच हा धक्का. किती गोड वाटले असे, तिच्या तोंडून स्वताचेच नाव ऐकायला..

समोर रजिस्टर घेऊनच बसली होती, माझे नाव पत्ता अन व्यवसाय.. अंह व्यवसाय कसला त्या वयात, शिक्षणाची नोंद होती त्यात. मी सध्या ईंजिनीअरींग करतोय हे तिनेच मला सांगितले. सांगताना कोण कौतुक होते चेहर्‍यावर, जणू मॅट्रीमोनी साईटवरच कोणालातरी हुडकलेय. नाही म्हणायला एका नर्सच्या मानाने जास्तच असावे माझे शिक्षण. पुढे आणखी काही बोलणार इतक्यात...

.....इतक्यात कोणीतरी तिचे नाव घेऊन तिला पुकारले.
सकीना.. हसीना.. रुबीना की झरीन.... की फातिमा !

काय होते ते नाव.. एकदाच ऐकले.. पुन्हा ऐकायची इच्छाच झाली नव्हती.. ना ती संधी साधायची होती.. पावले तिथेच थबकली होती.. अन कानाचे पडदे बंद झाले होते.. आपसूकच..!
एक मात्र मनात राहीलं.. मराठी छानच बोलायची.. तेव्हाही आणि आजही..!

"शशीकांत सातारकर... ह्म्म, पुढचा नंबर तुमचाय काका..." नर्सचे प्रमोशन होऊन रिसेप्शनिस्ट झाली होती का.. की आजचा दिवस तात्पुरती जागा घेतली होती.. काय फरक पडत होता..

श्या, किती वेळ झाला, बायको ताटकळून वैतागून चिडचिड करायला लागली होती. मला तेवढे वेळेचे भान नव्हते, पण घड्याळाचा काटा तर सरकतच होता. त्याकडे बघून ध्यानात आले, सव्वा तास उलटून गेला होता. मागाहून आलेले दोनचार जण नाहीशे झाले होते, पण आम्ही मात्र तिथेच होतो.. अन ती समोर..!

कदाचित मला जास्त वेळ बघण्यासाठी म्हणून तर नाही ना ती मुद्दामच माझा नंबर लांबवत होती... की.. की.. तेव्हाचा राग काढत होती.

शेवटी पुकारला गेला नंबर.. तिने माझे नाव पुकारायची हि दुसरी वेळ होती. फक्त यावेळी सोबतीला आडनावही होते. अन कदाचित म्हणूनच, त्यावेळसारख्या गुदगुल्या यावेळी झाल्या नाहीत, की हि बदललेली परिस्थिती होती.

ज्या कामासाठी एवढा वेळ बाहेर वाट बघत होतो ते अवघ्या तीन-चार मिनिटांत उरकले. डॉक्टरची फीज देण्यासाठी म्हणून मी पुन्हा काऊंटरवर आलो. सुट्टे पैसे परत घेताना नजरानजर झालीच.

हसूनच म्हणाली.., फिर मिलेंगे भाईजान..!

मी गोंधळून तिच्याकडे बघतच राहिलो, अन ती मात्र हसली. ते हसणे सूचक होते की नाही हे आता येणारा काळच सांगणार होता. आजारानिमित्त वरचेवर या डॉक्टरकडे येणे होणार होते. बायकोला काहीतरी वाटले म्हणून सहजच विचारले, ओळखीची होती का रे.. मी हो म्हणालो, जुनी तोंडओळख होती.. गाढवा, आधीच ओळख दाखवली असतीस तर नंबर लवकर नसता का लागला.. नेहमीसारखे माझ्या मुखदुर्बळ असण्यावर तोंडसुख घेऊन ती शांत झाली. पण माझ्या मनात मात्र वेगळेच चालू होते.. कदाचित............

इतक्यात मोबाईल किणकिणला.. पाहताक्षणीच ट्यूब पेटली, मी माझा नंबर हॉस्पिटलच्या रेकॉर्डला म्हणून देऊन आलो होतो.

चेक केले तर मोबाईलवर मेसेज आला होता... फिर मिलेंगे (भाई) जान..!

.
.

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

झकासरावांसारखे मलाही वाटले होते.. पण वेगळाच ट्विस्ट..
ती सिगारेट पिणारी मुलगी आठवली.. आता यातलेही खरे किती खोटे किती छळणार राव..

काय देवा उगाचच खाजवलंत.....आया माया हि पोष्ट बघू नका Happy

नाना फडणवीस, अहो, इतकं नाराज होऊ नका. आपल्यावर लाईन मारणार्‍या पोरींची/बायकांची (आणि त्यांच्या नवर्‍यांची) यादी बनवून ठेवावी की! गरज पडल्यास आपल्या कामी येण्याची शक्यता अधिक असते. असा उपयुक्ततावादी दृष्टीकोन ठेवा. मग जग कसं सुंदर भासू लागेल. Proud

आ.न.,
-गा.पै.

चेक केले तर मोबाईलवर मेसेज आला होता... फिर मिलेंगे (भाई) जान..!
>>
शेवटच्या मेसेजमध्ये तिने कंसात भाई लिहिले होते?

धन्यवाद सर्वांचे..

निलिमा __ हो ते तसेच आहे.. म्हणजे मी माझ्याकडच्या कॉपीमध्ये भाई शब्दावर स्ट्राईक, आडवी दांडी मारली होती, पण इथे तसा पर्याय न दिसल्याने त्याला कंसात टाकला..

मला वाटलं भाईजान म्हणुन पोपट
झालेला असणार..
इकडे तर वेगळाच ट्विस्ट...>>>+1

तुमच्या या ललितापासून प्रेरणा घेऊन मलासुद्धा पूर्वानुभवांवर आधारित एखादं ललित लिहावं वाटतंय !!!
Proud

सुशांतभाऊ, मग वाट बघू नका... शुभस्य शीघ्रम..
मी सुद्धा माझ्या भूत-वर्तमानातील अनुभवांवरच लेखन करतो.. अन्यथा एकदा मेलो की मग ते तसेच वर घेऊन जाण्यात अर्थ नाही, त्या आधी शेअर केलेले बरे..