आजीची कलात्मक गोधडी

Submitted by मंजूताई on 19 September, 2013 - 05:30

'गोधडी' शब्द उच्चारला की तो 'आजी' ह्या विशेषणाविना अधुरा वाटतो नाही का? प्रेमळ मायेची ऊबदार गोधडी ही आजीचीच! कोणे एकेकाळी(?) नऊवारीतली अन पांढऱ्या केसांची बाई म्हणजे आजी हे समीकरण होतं आता हे इतिहासजमा झालंय. आजच्या पिढीला आज्या ह्या सलवार कमीजमधल्या किंवा फार झालं तर साडीतल्या! त्यामुळे आजीच्या गोधडी प्रश्नच नाही. गोधडी हा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या कपड्यांना टाकून न देता त्याला कलात्मक नवीन रूप देऊन त्याचे 'रिसायकलिंग' (पुर्नरवापर) करणे. त्यापाठीमागे आर्थिक कारण जास्त असावीत किंवा वाया जाऊ न देणे हे तत्त्व असावे पर्यावरण पूरकतेपेक्षा. सकाळची कामे आटोपल्यावर बायकांचा फावल्या वेळेतला उद्योग म्हणजे निवडण - शिवण - टिपण. हे करता करता आपलं मनमोकळं करायला मिळालेला एक हक्काचा कमरा व वेळ. त्याचबरोबर एक सांस्कृतिक मेळावाही. सोलापूर भागात त्याला धार्मिकतेची जोडही आहे. गोधडी ,शिवण्यासाठी चांगला दिवस वैगेरे पाहिला जातो. जात्यावर बसल्यावर जश्या ओव्या सुचतात तश्याच गोधडी शिवतानाही. ही एक लोककला आहे ती पिढी दर पिढी आजही आपल्या देशात बऱ्याचशा भागात जपल्या जातेय, कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय. ही झाली आपली भारतीय गोधडी. पण परदेशात (अमेरिका) कलात्मक गोधडी बनवण्याची कला अवगत करून आलेल्या एका आजीच मनोगत!

ह्या आजी आहेत नेटाने नीटसपणे काम करणाऱ्या नेटके आजी, डॉ सौ कमल नेटके! वय वर्षे फक्त त्र्याऐंशी! गोधडी शिवण वर्गाला प्रवेश घेतला तेव्हा वय वर्षे साठ! म्हणतात लाईफ बिगिन्स अट फोर्टी नो... नो ... अट सिक्स्टी.... कधीही .. काहीही शिकता येतं, शिकायला वयाचं बंधन नसतं ह्याचं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे नेटकेमावशी! जबलपूरला विद्यापीठात जवळपास तीस वर्षे मराठी शिकवल्यानंतर १९९० मध्ये सेवानिवृत्त झाल्या. आतापर्यंत शिकवण्यात रमलेल्या मावशींना एकाएकी शिकावंस कसं काय वाटू लागलं विचारलं असता त्या म्हणाल्या, "मला मनापासून दोन्ही शिकवायला व शिकायला आवडतं आणि मुळात मला रिकामं बसायला आवडत नाही. ह्यापूर्वीही मी ६६-७० साली आम्ही अमेरिकेला माझ्या मिस्टरांच्या शिक्षणा (पी एचडी) च्या निमित्ताने गेलो होतो तेव्हाही शिकवलं अन शिकलेही. त्या काळी विद्यार्थ्याच्या कुटुंबाकरिता चर्चमध्ये देवाण - घेवाणीचा कार्यक्रम होत असे तिथे मी आपले भारतीय पदार्थ शिकवले अन बेकिंग शिकले. एका अमेरिकन माणसाला टिळकांच्या अग्रलेखांचा अभ्यास करायचा होता त्यासाठी त्याला मी मराठी शिकवलं, शिकवलं म्हणण्यापेक्षा कसं शिकवायचं हे त्याच्याकडून शिकले. मला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवायची सवय होती. मी त्याला मुळाक्षरापासून शिकवायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले असं शिकवत बसले असते तर .... एक दिवस तो आमच्या घरी आला अन माझ्या मुलांना म्हणे तुम्ही माझ्याशी मराठीत बोला. माझी मुलं व आम्ही त्याच्याशी गप्पा मारू लागलो...... अन तो मराठी शिकला.

दुसऱ्यांदा आम्ही दोघंही अमेरिकेला मुलाकडे गेले होतो. मिस्टरांना (डॉ श्रीरंग नेटके) 'रिसर्च सायंटिस्ट म्हणून एका इंस्टिट्यूटमध्ये जाऊ लागले. इतकी वर्षे सतत काम करण्याची सवय होती थोड्या दिवसात कंटाळा येऊ लागला. नाही म्हणायला नातीच्या बाललीलांत वेळ जात असे पण त्याचबरोबर काहीतरी उद्योग हवा असे वाटू लागले. एक दिवस टीव्ही बघत बसले असताना त्यावर ह्या क्विल्टवरचा कार्यक्रम बघितला आणि ते बघत असताना ही आपल्याला करतायेण्याजोगी कला आहे,असे लक्षात आले. शिवणाचे थोडेफार ज्ञान होते. शिकवणी वर्गाची माहिती काढली तर तो अगदी घराच्या जवळच अन तोही जगप्रसिद्ध क्विल्टिंग टीचर 'मेरी व्हाईटहेड' ह्यांचाच! थोड्याश्या साशंक मनानेच वर्गाला प्रवेश घेतला. तिथल्या विविधरंगी क्विल्ट बघून मन इतके मोहित झाले की साशंकता कधी गळून पडली कळलेच नाही. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे तुकडे कापताना, ते आकर्षक रंगसंगती साधून जोडताना वेगळ्या सृजनतेची जाणीव होऊ लागली. साधारण तीन तपे मराठी काव्यातील शब्दांचे सौष्ठव, त्यातील शब्द रचनेचे लालित्य, विचारांचे सौंदर्य समजावून देताना व घेताना होणाऱ्या संवेदनांची अनुभूती क्विल्ट निर्मितीत मिळू लागली. वेगवेगळ्या आकाराच्या कपड्यांची मनमोहकता, त्यांच्या विविध रंगातील रमणीयता आणि त्यांची योग्य ती जुळवाजुळव करून होणारी सौंदर्यनिर्मिती मनाला भारून टाकायला लागली आणि 'आपल्याला जमेल का' ह्या प्रश्नापासून सुरू झालेला प्रवास केव्हा आवडता छंद झाला कळलेच नाही. ह्या कापडाचे तुकडे तुकडे जोडता जोडता अनेकांशी मैत्रीचे बंध जुळले. चिनी, जपानी अश्या अनेक विविध देशातल्या मैत्रिणी मिळाल्या. अश्या ह्या क्षेत्राशी ओळख झाल्यावर आणखी शोध घेण्याची ओढ वाटू लागली. मी कलार्थी होऊन खोलात शिरले तेव्हा लक्षात आले हे एक थक्क करणारे मोहक कलाविश्व आहे. गोधडी ही लोककला व गृहकला होती. तिला अमेरिकन स्त्रियांनी हे मोठे व्यापक कलाक्षेत्र दिले ते गरजेतून दिले नसून त्याबद्दलच्या उत्कट अभिलाषेतून, आत्माविष्कारासाठी दिलं असं वाटतं.

एकूण हा कला प्रकार मला भावला आणि मी मला स्वतःला झोकून दिले. नातवंडांसाठी, मुलामुलींसाठी, मैत्रिणींसाठी कितीतरी प्रकारच्या क्विल्टस केल्या. त्या अंथरुणावर टाकल्यानंतर त्यांचे रंगीबेरंगी विलोभनीय दृश्य पाहून मला बालकवींच्या 'फुलराणीच्या' मखमली गालिच्यांची आठवण येते तर कपड्यांचे रंगीबेरंगी तुकडे उचलताना केशवसुतांच्या 'टिप फुले टिप, फुलांची पखरण झिप' ची ! जेव्हा काही स्वकीयांनी माझ्यासाठी क्विल्ट कर असे आग्रहपूर्वक सांगितले तेव्हा त्या क्विल्टची मनमोहकता माझ्यापुरतीच मर्यादित नाही तर ती दुसऱ्यांना दिल्याने त्यांना पण आपण आनंद देऊ शकतो. ही नवी जाणीव झाली. निवृत्तीनंतर आवश्यक असणारा, आपल्यालाच नव्हे तर दुसऱ्यांनाही आनंद देणारा एक अर्थपूर्ण व्यासंग मला सापडला. ह्या क्विल्ट बरोबरच लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्यासाठीच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज) व डायपर बॅग्ज ज्या मी स्वतः डिझाईन केल्या त्याही बनवते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! आजींना आजी कसे म्हणणार? आणी कौतुक तरी कोणत्या शब्दात करणार? शब्दच बापुडे झालेत इतके कलात्मक नमुने बघुन्.:स्मित: मानले पाहीजे या उत्साहाला आणी जिगरीपणाला. धन्यवाद मंजू इतक्या छान व्यक्तीमत्वाचा परिचय करुन दिल्याबद्दल. त्यांचा पत्ता किंवा फोन नं. मिळाला तर?

खूप सुंदर आहेत सर्वच गोधड्या... गोधडी हा प्रकार अतिशय जिव्हाळ्याचा आहे. पांघरायला घेतली की उबदार सुखाची झोप आलीच पाहीजे. पूर्वीच्या काही गोधड्या अजून अजून आईने ठेवलेल्या पण त्या साध्याशा गरजेपुरत्या केलेल्या त्यामुळे पांढर्‍या आणि काहीशा ओबडधोबड!
पण हे भलतेच अप्रतिम आकर्षक प्रकरण आहे... इतक्या नेटक्या, रंगीत, आकर्षक गोधड्या, दुपट्या, बाळांच्या सामानासाठीच्या बॅग्ज असतील असतील असं खरंच वाटलं नव्हतं... खूप सुरेख आणि अप्रतिम!

माबो च्या खरेदी विभागात उपलब्ध आहेत का या?

व्वा! सुंदर, कलात्मक गोधड्या... आणि किती तो अपरिमित उत्साह! नेटके आजींच्या या कलेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद मंजू! Happy

वा! एकसे एक सुरेख आहेत. पिन व्हील अन स्टार क्विल्ट मधे कोपरे अगदी पर्फेक्ट जुळले आहेत. क्विल्टिंग स्टिचेस पण अगदी एकसारखे अन सुबक आहेत.
खरंच कुठे मिळतील ?
कॅरी बॅग्ज चे फोटो टाकता येतील का ?

सुरेख आणि सुबक! नावाला जागल्या आहेत नेटके आज्जी. Happy
खरंच मायबोली खरेदीत ठेवायचं सुचवा. कॅरी बॅग्ज आणि डायपर बॅग्जही बघायला आवडतील.

आजींच्या गोधड्या आणि बॅग्ज इथे खरेदी करता आल्या तर खरच छान सोय होइल.
सर्वच गोधड्या सुरेख आहेत. घरगुती छंद म्हणून केलेल्या नसून अगदी प्रोफेशनलच दिसत आहेत.

Pages