दुनियादारी आणि शाळा : एक समांतर प्रवास

Submitted by झंप्या दामले on 16 September, 2013 - 14:09

लहानपणी नवख्या लोणच्याची चव पाहणं हा एक सोहळा असायचा. दुपारी आईची नजर चुकवून बरणीचे झाकण हळूच उघडायचे... लोणच्याची फोड जिभेवर टेकवायची... पाठोपाठ लोणच्यातल्या साखरेला बाजूला सारत करकरीत फोडींची आंबट जर्द चव करवती सारखी सरसरत शेवटच्या दाढेपर्यंत जायची आणि न आलेल्या अक्कल दाढेच्या मोकळ्या परिसरात विरघळून जायची. आहा ! 'अनुभूती' शिवाय त्याला दुसरा शब्द नाही ! पण मोठा झालो तसतशी एक जाणीव व्हायला लागली - ताज्या लोणच्याची चव हवीहवीशी असते हे खरे, पण खाल्ल्यानंतरही त्यातल्या साखरेची गोडी जेवणानंतर खूपवेळ रेंगाळत ठेवणारे मुरलेले लोणचेच जास्त समाधान देते. त्यामुळेच लोणचे ताजे ताजे खाण्यापेक्षा मुरल्यावर काही काळाने जास्त भावते हे जाणवले. 'शाळा' आणि 'दुनियादारी' चे पण असेच आहे. अनुक्रमे शाळेत आणि कॉलेज मध्ये असतानाच ही पुस्तके वाचली तर आवडणार नाहीत असे नाही, पण त्यांची खरी मजा ही ते-ते कालखंड अनुभवून पुढे गेल्यानंतर वाचण्यात जास्त आहे. त्यातला गोडवा अधिक आहे, कारण अनुभव जास्त मुरलेले आहेत.

मिलिंद बोकिलांची 'शाळा' मी दहावी नंतर ३-४ वर्षांनी कॉलेजात असताना पहिल्यांदा वाचली आणि सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' सुद्धा कॉलेज संपल्यानंतर वर्षभराने पहिल्यांदा वाचली. वाचता वाचता माझ्यात आणि माझ्या आठवणीमध्ये पूल कधी बांधले गेले कळले सुद्धा नाही. दोन्ही अनुभव अगदी 'क्लोज टू माय हार्ट' म्हणावेत असे आहेत. वाचताना आलेला nostalgia केवळ अशक्य !
आपण शाळेत असताना - एका अर्थाने हुकुमशाहीच म्हणावे अशा व्यवस्थेत वावरताना - आपण सतत शिस्तीच्या त्या पोलादी भिंतींमधून एखादी फट दिसते का हे शोधत असतो. आठवी-नववीत येताना सतत कसली तरी बंडखोरी करायला हात-पाय शिवशिवत असतात. प्रत्येकाच्या मनात आपल्या आजूबाजूच्यांना इम्प्रेस करण्याची सुप्त इच्छा असतेच असते. फरक इतकाच की नाकासमोर चालणारी पोरं फक्त इमले रचत बसतात आणि वांड कार्टी बरं - वाईट काही ना काही करून दाखवतात. थोडक्यात काय बंडखोरी, लाईन मारणे धुडगूस घालणे, खच्चून शिव्या घालणे या गोष्टी आपण स्वतः केलेल्या तरी असतात किंवा आजूबाजूच्यांना करताना पाहताना कळत न कळत त्याला संमती तरी दिलेली असते. म्हणजे काय, तर पोरगा सुऱ्या तरी असतो नाहीतर जोशी तरी.... शाळेत शिकत असताना 'शाळा'वाचलं तरी पौगंडावस्थेच्या एवढ्या सगळ्या छटा जाणवत राहण्याइतका समजूतदारपणा आपल्याकडे असतो कुठे ? म्हणूनच जोशीचं स्वतःशी संवाद साधणं, सगळ्यामध्ये असूनही कशातच नसणं, सुऱ्याची मानसिकता या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो, ते खऱ्या अर्थाने अधिक कळत्या-जाणत्या वयातच. शाळा सोडल्यानंतर 'शाळा' जास्त उमगत जातं ते याच कारणांमुळे.

पुढे कॉलेजमध्ये शिकताना बंधनं अर्थातच कमी होत जातात आणि त्या मोकळ्या वातावरणात श्वास घेणं अगदी विलक्षण वाटायला लागतं. भावनांना आवर घालणं शाळेत असताना जितकं सक्तीचं असतं तितकं ते आता वाटत नाही. शाळेतलं 'लाईन मारणं' इथे अधिक धीट होऊन प्रेमाकडे झुकू पाहतं. शाळेतल्या लुटूपुटू मारामारीचं आणि खुन्नसचं 'grandeur' इथे वाढलेलं जाणवतं. साहजिकच अशा वातावरणात घडणारी 'दुनियादारी' कॉलेजमध्ये असतानाच वाचली तर आवडेलच पण कॉलेज सोडल्यानंतर काही काळाने मागे वळून बघताना, कॉलेजमध्ये असतानाचे आपले विचार - आपल्या भावना हे सर्व किती बालिश होते आणि आपली स्वप्नं किती ठिसूळ होती हे लक्षात येते तेव्हा 'दुनियादारी' वाचली तर ती आपल्याला जास्त भावते.

दुनियादारी पहिल्यांदा वाचली तेव्हा अक्षरशः अधाशासारखी संपवली होती.
'शाळा' वाचताना आलेला nostalgia पुन्हा एकदा मळभ यावे तसा साचून आला होता. श्रेयसचा एकटेपणा, चिमटीत येतायेता सुटून जाणारे प्रेम, दिग्याचं सावरणं - विखुरणं, अश्वत्थाम्यासारखा भळभळणारा एम.के., तो पूर्णपणे आपला होऊ कधीही शकत नाही हे माहित असूनही त्याला अंतर न देणारी स्वराली यांचा असा काही गोफ सु.शिं.नी विणलाय की त्यात गुरफटायला होतं. कॉलेज मधल्या दंगामस्तीच्या आणि nostalgia च्या खूप पुढे जात, नियती, आयुष्य, तिढे, अडकणं-निसटणं हे सारं सु.शि. आपल्याला कधी आडून तर कधी थेट सांगून जातात...

सामाजिक भान असणारे लिखाण करणारे मिलिंद बोकील आणि तथाकथित 'लोकप्रियते'चा शिक्का असणारे सुहास शिरवळकर यांच्या कलाकृती मी एकाच तागडीत तोलतोय हे काहींना आवडणार नाही, कारण 'शाळा'ला आणीबाणीची पार्श्वभूमी असल्यामुळे अर्थातच सामाजिक अंगाने 'शाळा' ची खोली अधिक आहे आणि त्यादृष्टीने 'दुनियादारी'ला असली कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी नाही. परंतु 'दुनियादारी' वाचल्यानंतर आलेल्या भारलेपणातून थोडे भानावर आलो तेव्हा मला 'शाळा' आणि 'दुनियादारी' विलक्षण समांतर भासल्या. मनाला भिडणं, हळवं करणं, 'पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत ही' बोच लावणं हे अनुभव या दोन्ही कलाकृती देतात आणि संपताना विलक्षण हुरहूर लावून जातात.

'शाळा' मधला जोशी आजूबाजूला यार-दोस्ताचं कोंडाळं असूनही 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' असा काहीसा आहे. तो स्वतःशी संवाद करणारा आहे, विलक्षण संवेदनशील आहे. शिरोडकरचं आकर्षण हेच त्याला प्रेम वाटतंय. मात्र त्याचं नक्की निदान करण्याइतकं त्याचं वय झालेलं नाहीये. पण गोष्ट संपताना त्याच्या मनातला अंकुर चिरडला गेलाय. जोशीचं एकटेपण सतत अधोरेखित होतंय. आणि तिकडे 'दुनियादारी' मधला श्रेयस हा जणू जोशीचाच आत्मा घेऊन आलाय. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जोशीपेक्षा पूर्णपणे वेगळी (आणि मोडकळलेली) आहे, पण तोही विलक्षण संवेदनशील आहे. आजूबाजूला दिग्या, श्री, उन्मेष सग्गळे सग्गळे आहेत, पण सगळ्यांमध्ये असूनही तो कोणाचाच नाहीये. त्याच्या प्रवासात त्याच्यासह असणारी माणसं कितीही जवळची वाटली तरी ते फक्त सहप्रवासी आहेत - आपले स्टेशन आले की उतरून जाणारे. प्रवास सुरु करताना आणि संपतान श्रेयससुद्धा जोशी सारखाच संपूर्ण एकाकी झालाय. श्रेयसलाही आकर्षण वाटतंय - मिनू आणि शिरीन दोघींबद्दल. पण नक्की कुणावर प्रेम आहे आणि नुसते आकर्षण कोणाचे वाटते आहे याबद्दल (जोशीपेक्षा वयाने मोठा असल्यामुळे कदाचित खूप जास्त विचार करत असल्यामुळे) गोंधळलेला आहे. आणि सरतेशेवटी त्याच्याही नशिबी त्याचं उमेदीतलं प्रेम नाहीये.

'शाळा' मध्ये सुऱ्या आहे तर 'दुनियादारी' मध्ये दिग्या. लौकिकार्थाने मवाली उपद्रवी वगैरे वगैरे. पण तरीही सरळमार्गी असणाऱ्या जोशी-श्रेयसने त्यांना आपलं मानलंय. सुऱ्या-दिग्यालाही हळवं होता येतं, व्हायला आवडतं. प्रेम व्यक्त करायची त्यांची पद्धत रांगडी आहे पण सच्ची आहे. त्यात आड-पडदा नाही. गोष्ट संपतानाचं दोघांचही अपयशी ठरणं, असहाय होणं, मोडून पडणं मला हलवून गेलं.

शाळा आणि दुनियादारी या दोन्ही कलाकृतींमध्ये दिसत राहणारी स्वप्नं आपापल्या ठिकाणी कितीही प्रामाणिक आणि सच्ची असली तरी ती त्या-त्या पात्रांच्या आयुष्यातल्या अश्या नवथर आणि भावनाप्रधान टप्प्यांवर निर्माण झालेली आहेत की ती आपोआपच कचकड्याची ठरणारी आहेत, मोडून पडणारी आहेत आणि म्हणूनच माझ्यासाठी दोन्ही पुस्तके वाचून संपतानाचे रितेपण सारख्याच खोलीचे आहे आणि डोळ्यात जमा होणारे थेंब सारख्याच उष्णतेचे आहेत ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दामलेजी, छान लिहीता तुम्ही. एका विशिष्ट वयात सुशि आवडतातच. त्यांची शैली भन्नाट आहे. दुनियादारी त्याच वयात वाचायला हवी. शाळा मात्र कुठल्याही वयात नॉस्टॅल्जिक बनवते. सिनेमा पण (माध्यमांतर समजून घेउन) तसाच वाटला. ज्येष्ठांचं काय म्हणणं आहे ते माहीत नाही Happy

प्राजक्ता_शिरीन : दुनियादारी आणि सु शि ऑल टाईम फेवरेट >>>> ते नावात दिसतेच आहे Happy

विस्मया : धन्यवाद.... शाळा सिनेमा आवडला. दुनियादारी सिनेमा मधे मात्र कथानकाची वाट लावलिये पार ... काही अर्थच नाही ...

विजय देशमुख : न चुक्ता प्रतिक्रिया देता त्या बद्दल आभारी आहे ...