जलतरंगी रंगले मन ...!

Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 07:50

अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमीअधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते ! याचा अनुभव आम्ही परवा घेतला. निमित्त होतं गरवारे प्रशालेच्या ढोलवादकांच्या पथकासमोर श्री. मिलिंद तुळाणकर यांनी सादर केलेल्या जलतरंगवादनाच्या कार्यक्रमाचं. जलतरंगाबरोबरच त्यांनी काष्ठतरंग, नलिकातरंग, मोर्चंग (मुहुचम्) आणि मेडिटेशन बाउल यांचीही झलक दाखवली. कार्यक्रमानंतर मिलिंदजींशी गप्पा मारायचाही योग आला. त्या गप्पांमधून मिळालेली जलतरंग आणि त्याचे वादक श्री. मिलिंद तुळाणकर यांच्याबद्दलची माहिती सगळ्या मायबोलीकरांसाठी इथे देतो आहे.Jaltarang_1.jpg
जलतरंग हे अस्सल भारतीय वाद्य. आधीच्या काळात धातूच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाजवलं जाणारं हे वाद्य आता चिनी मातीचे बाउल वापरून वाजवलं जातं. दिसायला जरी सहज-सोपं दिसणारं असलं तरीही वाजवायला तितकंच अवघड !
जलतरंग वाजवायला अवघड आहे कारण मुख्य मुद्दा आहे ट्यूनिंगचा. जलतरंग ट्यून कसं करतात? हा बर्‍याच जणांसाठी कुतूहलाचा विषय असूशकतो. बाऊलचा आकार आणि त्यात असलेलं पाण्याचं प्रमाण यावर त्यातून येणारा स्वर अवलंबून असतो. मुळात बाऊलला स्वतःचा एक स्वरअसतो. पाणी नसताना बाऊलमधून जो स्वर येतो त्यापेक्षा त्या बाऊलमध्ये पाणी घालून ३ ते ४ स्वर अधिक मिळवता येतात. बाऊलचा आकारजितका मोठा तितका त्यातून येणारा स्वर खालच्या सप्तकातला. बाऊलमध्ये जितकं पाणी कमी तितका त्याचा स्वर वरचा लागतो. त्यामुळे इतरवाद्यांसारखं ट्यूनिंग करताना स्वर चढवणं हे जलतरंगाच्या बाबतीत शक्य नसतं. जलतरंग हे स्वर उतरवून ट्यून केलं जातं.
उदाहरणार्थः बाऊलचा पाण्याशिवायचा स्वर 'मध्यम' असेल तर पाणी घालून तो स्वर गंधार, कोमल गंधार, रिषभ, कोमल रिषभ या स्वरांपर्यंत उतरवता येतो. त्यामुळेच जलतरंगाबरोबर जुगलबंदी करताना जलतरंगवादकांना याचा थोडासा त्रास होऊ शकतो. एका रागानंतर दुसरा राग वाजवताना, आधीच्या रागापेक्षा एखादा स्वर वरचा घ्यायचा असल्यास,बाऊल बदलावा लागतो.
ट्यूनिंगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तापमानाचा. जलतरंगासाठी वापरलं जाणारं पाणी एकदम थंड असेल तर जलतरंग वाजत नाही. गरम पाणीवापरलं तर एरवीपेक्षा कमी पाण्यात जलतरंग ट्यून करता येतं पण वाजवता वाजवता पाणी पुन्हा नेहमीच्या तापमानावर येतं तेव्हा ट्यूनिंग बिघडतं.पाण्यापेक्षा घनतेने हलक्या द्रवपदार्थानेही ते ट्यून करता येऊ शकते (उदा. केरोसीन) पण अशा द्रव पदार्थांचं बाष्पीभवन लगेच होत असल्याने ते वापरणे व्यावहारिक नाही.
जलतरंग हे वाद्य शास्त्रीय राग वाजवण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नाही असा एक विचारप्रवाह आहे. जलतरंगात 'मींड' वाजवता येणं शक्य नाही हे त्यामागचं मुख्य (किंबहुना एकमेव) कारण. (मींड म्हणजे एका स्वरावरून दुसर्या स्वरावर तुटकपणा न वाटता येणं) ह्याबद्दल विचारलं असता मिलिंदजी म्हणाले, मींड वाजवता न येणं ही मर्यादा मान्य आहेच, पण आपल्याकडे चांगल्या गोष्टी कमी पाहिल्या जातात. मुलाला परीक्षेत चित्रकलेत ९० आणि गणितात ४० मार्क मिळाले तर लगेच दुसर्‍या दिवशी गणिताची शिकवणी लावली जाते आणि चित्रकला मागेच राहते. हेही तसंच काहीसं आहे. जलतरंगावर मींडशिवायही रागविस्तार सुंदररीत्या करता येतो आणि त्यामुळेच जलतरंगाचा अडीच-तीन तासांचा कार्यक्रमही श्रोते एकचित्ताने ऐकतात. ही एक मोठी पावतीच नाही का? मींड वाजवायचीच झाली तर स्टिकने बाऊलवर आघात करता करता दुसरा एक छोटा बाऊल त्यात बुडवून मींड वाजवता येऊ शकते. पण मींडचा अट्टाहास मात्र मिलिंदजींना पटत नाही.
जलतरंगावर वाजवायला अवघड राग कोणता? असा प्रश्न विचारला असता, "ज्या रागाचा रियाज कमी झाला आहे, तो राग जलतरंगावरच काय, कोणत्याही वाद्यावर वाजवायला अवघड" असं सगळ्याच संगीत अभ्यासकांना मोलाचं ठरेल असं उत्तर देऊन ते पुढे म्हणाले की कोणत्याही रागात आरोहात अथवा अवरोहात एखादा स्वर सोडून वाजवायचं असेल, तर असा राग जलतरंगावर वाजवणे कठि़ण आहे. याचं कारण, एखादा स्वर सोडायचा म्हणजे एक अख्खा बाऊल सोडून त्यापुढच्या बाऊलवर आघात करावा लागतो. स्टिक्सने वाजवताना, लगतच्या बाऊलवर अनवधानाने आघात होणं सहज शक्य आहे.
उदा. यमन हा राग इतर वाद्यांवर त्या मानाने बराच सहजतेने वाजवता येत असला तरी जलतरंगावर वाजवताना, आरोहात नी रे ग हे स्वर येत असल्याने, 'सा'चा बाऊल सोडावा लागतो. आकारानेही 'सा'चा बाऊल बर्‍यापैकी मोठा असल्याने हा राग वाजवणं कठिण जातं. पण रियाज हेच यावरचं योग्य उत्तर आहे. जलतरंगावर आतापर्यंत वाजवले जाणारे रागही बर्याचदा ठराविक आणि आरोह अवरोह सरळ असणारे (वक्री स्वर नसलेले) असेच होते. परंतु रियाजाने एकाच स्वराच्या दोन विकृती असलेले जोग किंवा ललतसारखे रागही वाजवणं शक्य होतं हा मिलिंदजींचा अनुभव आहे.
नादातली नजाकत आणि प्रसन्नता हे जलतरंग या वाद्याचं वैशिष्ट्य! असं म्हणतात की तुम्ही जो आहार घेता तसेच तुमचे विचारही होत जातात. हेच वाद्याच्या बाबतीतही खरं म्हणावं लागेल. कारण मिलिंद तुळाणकर त्यांच्या जलतरंगासारखेच साधे, पण प्रसन्न आहेत, निगर्वी आहेत.
श्री. मिलिंद तुळाणकर यांचा जन्म भंडार्‍याचा. त्यांचे आजोबा (आईचे वडील) कै. पंडित शंकर कान्हेरे हे त्यांचे जलतरंगातले गुरू. मिलिंदजी आजोबांच्या कडक शिस्तीची आठवण सांगतात- `माझं दहावीपर्यंतचं शिक्षण सातार्‍यात झालं. सहावी- सातवीत असल्यापासून मी हार्मोनियम वाजवायचो. पण ते वय म्हणजे खेळाची जास्त आवड असणारं. तरीही आम्ही 'क्रिकेट' खेळताना आजोबांच्या दृष्टीस पडलो की काही खैर नसायची. आजोबांचा खेळाला विरोध नव्हता. पण त्यांच्या मते क्रिकेटमध्ये सगळ्यांनाच खेळायला मिळत नाही. आणि चेंडू हाताला/ बोटांना लागून दुखापत झाली तर वाद्यवादनाच्या दृष्टीने हातांची जी नैसर्गिक हालचाल व्हायला हवी ती होणार नाही.'
कडक शिस्तीच्या आजोबांनी मिलिंदजींना जलतरंग शिकवायला सुरुवात केली तीही योगायोगानेच. आजोबा घरात नसताना छोटा मिलिंद आजोबांचं जलतरंग वाजवायचा. राग कोणता? वगैरे त्यावेळी समजत नसलं तरीही आजोबा जसे वाजवत तसेच वाजवायचा. एक दिवस त्यांच्या आजीनेच आजोबांना सांगितले की 'मिलिंद अगदी हुबेहूब तुमच्यासारखा वाजवतो', तेव्हा आजोबांसमोर मिलिंदजींनी पहिल्यांदा जलतरंग वाजवले आणि आजोबांनी जलतरंगासारख्या दुर्मिळ वाद्याचा वसा मिलिंदजींना दिला. मिलिंदजींच्या घरी आणि आजोळीही सांगीतिक वातावरण होतं. त्यांची आजी सौ. स्नेहलता कान्हेरे सातार्याच्या कन्या शाळेत संगीत शिक्षिका होती. आई कै.सौ. सरिता तुळाणकर गायिका तर वडील श्री. श्रीराम तुळाणकर सतारवादक. त्यामुळे ओघानंच त्यांची सांगीतिक प्रगती झपाट्याने होत होती. अर्थात, घरात सांगीतिक वातावरण असलं की लोकांच्या अपेक्षाही खूप असतात आणि त्याचा कधी कधी तोटाही होतो. पण सुदैवाने मिलिंदजींच्याबाबतीत असं घडलं नाही. उलट बी.ए च्या शेवटच्या पेपरच्याच दिवशी आकाशवाणीवर ऑडिशन असूनही आजोबांनी 'पेपर नंतर देऊ शकशील, आत्ता ऑडिशन दे' असा पाठिंबा दिल्याचे मिलिंदजी अभिमानाने सांगतात.

आज मिलिंदजींचे भारतात आणि भारताबाहेरही जलतरंगवादनाचे अनेक कार्यक्रम होत असतात. मिलिंदजी मलेशिया इथल्या एका विद्यापीठात काही काळ संगीतशिक्षकही होते.
त्यांनी भारतातल्या अनेक गायक-वादकांबरोबर जलतरंग जुगलबंदी सादर केली आहे.
त्यात नुकतीच बी.बी.सी चॅनलतर्फे छायाचित्रित करण्यात आलेली उस्ताद तौफिक कुरेशी यांच्याबरोबरची जलतरंग आणि झेंबे या तालवाद्याची जुगलबंदी उल्लेखनीय आहे.
त्या जुगलबंदीची झलक इथे पहायला मिळेल.
काही अभारतीय वाद्यवादकांबरोबरही त्यांनी जुगलबंदी केली आहे.
त्यात जलतरंग आणि सेहतार या पर्शियन वाद्याबरोबरची जुगलबंदी ही विशेषत्वाने उल्लेखण्याजोगी आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या गुड डे बिस्किटांच्या जाहिरातीच्या संगीतात मिलिंदजींनी वाजवलेल्या जलतरंगाचा प्रामुख्याने वापर झाला आहे. ती जाहिरात इथे बघा.
श्री. मिलिंद तुळाणकर यांनी वाजवलेला राग चंद्रकंस इथे ऐका. तबलासाथ- पं. रामदास पळसुले यांची आहे.
Jaltarang_2.jpg

मिलिंदजींना अनेकानेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
सुरसिंगार संसदेचा सुरमणी पुरस्कार, पुण्याचा कलागौरव पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार हे त्यातले काही मुख्य!
जलतरंगाखेरीज मिलिंदजी इतरही अनेक वाद्ये वाजवतात. हार्मोनियम, सतार, संतूर, तबलातरंग, पियानो ही त्यातली काही वाद्ये! काष्ठतरंग आणि नलिकातरंग ही त्यांनी स्वतः तयार केलेली छोटेखानी वाद्ये. काष्ठतरंग म्हणजे लाकडी पट्ट्या विशिष्ट आकारात कापून त्यातून आघाताने स्वरनिर्मिती करतात तर नलिकातरंग हे वाद्य धातूच्या नलिका वेगवेगळ्या आकारात कापून तयार केलेलं वाद्य. नलिकातरंगही आघाताने वाजवतात. मिलिंदजींनी दगड विशिष्ट आकारात तासून त्यातूनही स्वरनिर्मिती होऊ शकते याचे प्रयोग केले आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक तानपुराही तयार केला आहे. त्या तानपुर्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे यातून हार्मोनियमचा सूरही ऐकू येतो. जो इतर इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍यात नाही. मिलिंदजींचे वडील सतारवादक असल्याने ते सतारही उत्तम वाजवतात. पण त्यांना स्वतःला मात्र जलतरंगानंतर आपण हार्मोनियम सगळ्यात चांगली वाजवू शकतो असे वाटते. आपली सगळी कौशल्ये सारखी वापरात नसतील तर ती हळूहळू नष्ट होतात असे म्हणतात. त्यामुळे मिलिंदजी अधूनमधून जलतरंगाशिवाय ही इतरही वाद्ये वाजवण्याचा सराव करतात.
वाद्यवादनाशिवायही त्यांच्या अंगी अनेक कलागुण आहेत. ते उत्तम गायन करतात. काही मराठी कवितांना, त्यांनी स्वतः लिहिलेल्या हिंदी कवितांना आणि संतकाव्याला त्यांनी चालीही लावल्या आहेत. मिलिंदजींचं लिखाण मुख्यत्वे हिंदीत आहे. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना त्यांनी लिहिलेली एक गजल -वजा रचना त्यांनी आम्हाला ऐकवली.
कोई हमे बता दे दुनिया मे इक जगह |
उन के करीब फिर भी बहोत दूर हो जगह |
पाया है सुकून हम ने उन्हे देखने के बाद
ढूंढा था जिन को पेहले इस जगह से उस जगह |
वो मुझ से मिले थे कुछ देर के लिये
यादों को उन के मिलने जाती हूं उस जगह |

ते उत्तम पेंटिंग करतात. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं एक पोर्ट्रेट काढून मिलिंदजींनी त्यांना भेट केलं आहे. मिलिंदजी उत्तम कुकही आहेत. ते आवडीने अनेक पदार्थ तयार करतात. खरे तर ते काय काय करतात हे सांगण्यापेक्षा ते काय करत नाहीत हे खूप लवकर सांगून होईल.

Jaltarang_3.jpgआपल्या जलतरंगवादनाने सर्वांना आनंद देणार्‍या श्री. मिलिंद तुळाणकर यांच्याबरोबर मला गप्पा मारता आल्या हे मी माझं मोठं भाग्य समजतो. जलतरंगासारख्या दुर्मिळ वाद्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं त्यांचं कार्य आणि इतके सारे कलागुण अंगी असूनही अत्यंत निगर्वी वागणं सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. मिलिंदजींशी माझी ओळख करून देणार्‍या माझ्या मित्राचे केदार देशमुखचेही मी यानिमित्ताने औपाचारिक आभार मानतो.

जलतरंग आणि मिलिंदजी यांच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्यांच्या जलतरंगवादनाचे काही ऑडिओ/व्हीडिओ तुम्हाला www.jaltarang.com इथे पाहता येतील.

-चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलतरंगाविषयी खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद या लेखाबद्दल Happy

चंद्रकंस ऐकला आत्ताच! सुंदर!!!

संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले हे देखिल अगदी त्यांच्या सांगितिक कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जलतरंग,काचतरंग इत्यादि वाजवायचे...आकाशवाणीवरून त्यांचं हे वादन कैक वेळेला ऐकलंय...
आता इतक्या वर्षांनी मिलिंद तुळणकरांबद्दल कळलं आणि त्याचं वादनही ऐकलं... मस्त वाटलं ऐकायला.

सुंदर ओळख! जलतरंग या वादनाच्या कलेविषयी फार कमी माहिती होती. लेख वाचून त्यात मोलाची भर पडली. आता लिंक्स बघते.

सकल कलांच्या अभिनायकाच्या उत्सवात एका आगळ्या-वेगळ्या कलेची आणि कलाकाराची ओळख करुन दिल्याबद्दल संयोजकांचे आभार!

>संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले हे देखिल अगदी त्यांच्या सांगितिक कारकिर्दीच्या सुरुवातीच्या >काळात जलतरंग,काचतरंग इत्यादि वाजवायचे...आकाशवाणीवरून त्यांचं हे वादन कैक वेळेला ऐकलंय...

देव काका, ही माहिती नवीन आहे. धन्यवाद.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

सुंदर... जलतरंग बद्दल फार कमी वाचायला मिळते. ईथे दिल्याबद्दल धन्यवाद!

अजून जरा ते भांडी वा बाऊल बनवणे, साहित्य, ई. बद्दल व त्यातील प्रयोगशीलता, भारतात ऊपलब्ध असलेले शिक्षण, प्रयोग, याबद्दलही ऐकायला आवडलं असतं.

जलतरंग कुठल्या (एका) वाद्य कॅटेगरीत बसेल- string, wind, percussion, or solid instru...? Happy

खुप आवडला हा लेख. या वाद्याबद्दल फारच कमी वाचायला मिळते आणि ऐकायला तर क्वचितच.
आता घरी जाऊन निवांत ऐकेन.

योग,
भारतात जलतरंगवादनाचे पूर्णवेळ कार्यक्रम करणारे खूपच मोजके लोक आहेत.
मिलिंदजी त्यातले एक आणि आत्ताच्या काळात अग्रगण्य मानावे लागतील.
लेखात लिहायचा राहून गेलेला मुद्दा हा
की मिलिंदजी जलतरंग मोफत शिकवतात.
जलतरंगातले प्रयोग म्हणाल तर-
व्हायोलीनचा बो वापरूनही जलतरंग वाजू शकते.परंतु त्याचा आवाज 'बासरी'च्या आवाजाशी खूपच साम्य दाखवणारा आहे. त्यामुळे जलतरंगाची ओळख असलेला नाद त्यातून मिळत नाही.
गरम पाण्याने जलतरंग ट्यून करून पाहणे, पाण्यापेक्षा हलक्या घनतेच्या पदार्थांनी ते ट्यून करून पाहणे हेही त्यातले काही प्रयोगच आहेत.

जलतरंग हे- स्ट्रोक इन्स्ट्रुमेंट म्हणता येईल.अजून जड शब्द हवा असेल तर 'अवनद्ध वाद्य' (पण अवनद्ध वाद्य हा जास्तकरून तालवाद्यांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. जलतरंग हे तालाशी बरीच जवळीक साधत असलं तरीही ते 'स्वर-वाद्य'च आहे, तालवाद्य नव्हे)

>>>जलतरंग कुठल्या (एका) वाद्य कॅटेगरीत बसेल- string, wind, percussion, or solid instru...?
योग, हे वाद्य तरंगवाद्य प्रकार म्हणून ओळखले जाते.

अहाहा, किती सुंदर वाजवलंय.... चैतन्या, भरुन पावलो अगदी .... (हे सगळे इथे शेअर केल्याबद्दल तुझे खास आभार....)

बाकीची माहितीही खूप सुंदर, नाविन्यपूर्ण ......

वॉव! छान ओळख करून दिलीये!
एखादा माणूस किती मल्टी टॅलन्टेड असू शकतो..............!
आत्ताच पूरिया धनाश्री ऐकला! सुंदर!

>एखादा माणूस किती मल्टी टॅलन्टेड असू शकतो
मानुषी, अगदी अगदी.
आणि इतकं असूनही खूप साधे आहेत मिलिंदजी.
त्यांची रचना ऐकवा म्हटलं तर अगदी अजिबात आढेवेढे न घेता ऐकवली त्यांनी.
त्यांच्या आवाजातली रचनाही द्यायची होती इथे, पण लेखात समाविष्ट नाही करता आली...
बघू जमल्यास देईन नंतर...