Visiting Ladakh - 4

Submitted by साधना on 15 September, 2013 - 13:12

गब्बर एक्प्रेस लेहमध्ये शिरली खरी पण आमचे हॉटेल कुठे आहे ते गब्बर एक्प्रेसच्या चालकाला माहित नव्हते. विचारत विचारत पुढे जाताना दोन तरुण वाट दाखवण्याच्या मिषाने सरळ गाडीतच चढले. त्यांचे स्टेशन आल्यावर 'आता असेच पुढे विचारत जा, हॉटेल सापडेल' हा सल्ला देऊन त्यांनी आम्हाला बाय बाय केले. Happy थोडे पुढे गेल्यावर एका म्हातारबाबांनी " हॉटेल तर लेहच्या दुस-या टोकाला आहे" म्हणुन आम्हाला परत यु टर्न मारुन परत पाठी धाडुन दिले. गाडीतील प्रवाशांनी आधीच्या दोन तरुणांबद्दल शक्य तेवढे गौरवोद्गार काढले आणि आम्ही परत मागे फिरलो. जिथुन सुरवात केली तिथे आल्यावर "आता जिथुन आलात तिथेच परत जा" हा सल्ला मिळाला. शेवटी त्या तरुणांचेच खरे निघाले. त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरच आम्हाला आमचे हॉटेल एकदाचे गवसले.

लेह पाहताक्षणी मला आवडले. शहराच्या चारी बाजुला बाहेरुन जरी रखरखाट असला तरी खुद्द लेह शहरात मात्र ब-यापैकी हिरवळ आहे. उंच इमारती बिमारती असली भानगड नाहीच. बहुतेकांचे एकमजली किंवा दुमजली बंगले. प्रत्येकाच्या बंगल्याच्या मागे आणि पुढे शेती. बटाटे, टोमॅटो, पालक, मका, वांगी, फ्लॉवर, कोबी, गाजरे आणि इतर काहीबाही लावलेले. मध्येमध्ये मोकळ्या जागांवर बार्ली लावलेली. स्वच्छ रस्ते आणि रस्त्यांच्या बाजुने खळाळत जाणारे स्वच्छ पाणी.

इथे मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजुंना घाणीने भरलेली गटारे असतात पण अख्ख्या लडाखात रस्त्यांच्या बाजू शक्य तिथे छोट्या कालव्यांसारख्या बांधुन डोंगरांवरुन वाहात येणारे स्वच्छ काचेसारखे पाणी त्यातुन शहरांमध्ये आणि गावांमध्ये फिरवले आहे. सगळी शेती त्या पाण्यावरती चालते. एवढे स्वच्छ पाणी रस्त्याशेजारुन वाहताना मी पहिल्यांदाच पाहिले. Happy क्वचित कुठेतरी त्या पाण्यात बाटल्या बिटल्या टाकलेल्या दिसल्या. काही गावांमध्ये बायका रस्त्याच्या कडेच्या पाणोठ्यांवर कपडे, भांडी धुताना दिसल्या.

आमच्या हॉटेलचे अंगणही असेच बटाटा आणि टोमॅटोने भरलेले. बॉर्डरला मस्त फुलझाडे लावलेली. पाहताच मला हॉटेल खुपच आवडले. पण इथेही तेच. खिडक्यांना गजच नाहीत Happy आमच्या शेजारची खोली जिप्स्याची होती. दुस-या दिवशी मी माझ्या बाल्कनीतुन वाकुन बघितले तर जिप्स्या त्या भलामोठ्या खिडक्या उघड्या टाकुन आत घोरत होता. Happy खिडक्यांना गज नाहीत आणि रात्री खिडकीतुन कोणीही आत येऊ शकतो ही गोष्ट पुरुषमंडळींच्या ध्यानातही आली नसणार. पण माझ्या डोक्यातुन ही गोष्ट अजिबात गेली नाही. शेवटपर्यंत मला गाढ म्हणतात तशी झोप काही आली नाही. Happy

लेहमध्ये पोचल्यावर थोडा वेळ आराम केला आणि मग मार्केट बघण्यासाठी बाहेर पडलो. लेहमध्ये शॉपिंग कुठे करायचे याची सगळी माहिती जिप्स्याने आधीच मिळवुन ठेवलेली. आम्ही त्या सगळ्या जागांना भेटी दिल्या. पण मुळातच किंमती इतक्या वाढवुन सांगितल्या जात होत्या की आता यात बार्गेनिंग काय करायचे हा प्रश्न पडला. शेवटी काही खास शॉपिंग न करता केवळ बाजारात भटकंती करायचा मार्ग पत्करला.

बाजारात म्हटले तर शॉपिंगसाठी भरपुर ऑप्शन्स होते पण त्यांच्या किमती डॉलर ते रुपया कन्वर्ट करणा-या मंडळींना परवडणा-या होत्या. एवढे महाग का आहे याचे उत्तर 'इथे काहीच बनत नाही. सगळे खालुन आणावे लागते' हे मिळाले आणि ते पटलेही. लेहमध्ये टुरिस्ट हाच मुख्य धंदा आहे. तिथल्या मंडळींचे कमवायचे महिने फक्त सहा असतात. त्या महिन्यांत शक्य तितके कमवुन त्यावर उरलेले सहा महिने काढावे लागतात. त्यामुळेही वस्तुंच्या किंमती जरा चढ्याच असतात. मी आपले फक्त विंडोशॉपिंगचे सुख उपभोगले.

दुस-या दिवशी लेहच्या आसपासचे स्थलदर्शन करायचे हा प्लॅन होता. त्यातले काही आधल्या दिवशी धावत्या बसमधुन पाहुन झालेले होतेच. Happy आता उरलेले पाहायला निघालो. आज नविन बस होती आणि त्यात नविन ड्रायवर आणि क्लिनर होते. ड्रायवर तिथलाच होता आणि भारीच हौशी होता. सोबत छोटा कॅमेरा घेऊनच तो निघालेला. गाडीतली मंडळी फोटो काढायला उतरली की तोही उतरुन फोटो काढत होता. जाता जाता त्याने आपली नेव्हीमध्ये निवड झालीय आणि सप्टेंबरात आपण बँगलोरला जाणार आहोत ही खुषखबरही दिली.

आज शे पॅलेस, थिकसे, हेमिस गोंपा, सिंधु घाट, हॉल ऑफ फेम इत्यादी गोष्ट पाहायच्या असे ठरले होते.

सगळ्यात लांब टोकाला हेमिस गोंपा होतं. तिथुन सुरवात करुन मागे यायचे असे ठरले. बराच वेडावाकडा प्रवास करुन एकदाचे हेमिसला पोचलो. लेहमध्ये परदेशी मंडळींचा जास्त सुळसुळाट आहे. ही मंडळी सोबत गाईड घेऊन मठाचा एकेक भाग नीट आरखुन पारखुन बघत होती. आमच्या सोबत फोटोग्राफर मंडळी असल्याने सगळे जण कॅमे-यातुन बघत होते. मठात बुद्धासारख्या दिसणा-या अनेक मुर्ती होत्या. त्यातल्या काही बुद्धाच्या आणि बाकी इतरांच्या होत्या.

लेहमधल्या सगळ्या मॉनेस्ट-या टेकड्यांवर आहेत. बरे, इथे साधे सरळ रस्त्यावरुन जरा जोरात चालले तरी दम लागतो, मग टेकडी चढायची म्हणजे किती दम लागत असेल याचा विचार करा. त्यामुळे मी एकदोन मठ पाहिल्यावर सगळे मठ सारखेच असतात हा निष्कर्ष काढला. Once you have seen one, you have seen them all. तसेही हेमीसच्या मठातला तो डोळे वटारलेला पद्मसंभव मला फारसा आवडला नव्हताच. पण हेमिसला अतिशय सुंदर असे म्युझियम आहे, आत खुप जुन्या मुर्ती, भुर्जपत्रे आणि इतर बरेच साहित्य ठेवलेय. सगळी मॉनेस्टरी अगदी नीट पाहायची असेल तर एक अख्खा दिवस लागेल.

हेमिसनंतर आमचा मोर्चा ठिकसेकडे वळला. गाडी बरीच वर गेल्यावरही अजुन बराच पायी जायचा चढ बाकी होता आणि तो चढ संपल्यानंतर पाय-या Sad Sad थोडीशी चढण चढल्यावर ऐशुने वाटेतच बसकण मारली. आता पुढे काय मी येत नाही हे निर्वाणीचे बोलुन ती जवळच्या कठड्यावर जाऊन डोळे मिटुन बसली. सोबत प्रज्ञाही बसली. दोघीही दमल्या होत्या. त्यांना तिथेच बसवुन मी 'आता आलोच आहोत तर वर जाऊन बघुया काय आहे ते' असा विचार करुन माझ्या ग्रुपमागुन धावले, आय मिन चालले. लेहमध्ये धावणे म्हणजे हॉस्पिटलात भरती होण्याची पुर्वतयारी करणे.

अतिशय कडक उन्हात कमीत कमी ४५ अंश चढ असलेल्या टेकडीवर पाय-या चढेतो माझ्या डोक्यात एव्हाना हातोड्याचे घण बसत असल्याचा भास होऊ लागलेला. तरीही निकराने एकेक पायरी चढुन मी मठाच्या दारात पोचले तर माझ्यासारखे अनेक जण तिथे बसलेले दिसले. मठ दुपारच्या भोजनासाठी बंद झालेला आणि दिड वाजल्याशिवाय उघडणार नव्हता. मी स्वतःला व्यवस्थित दमवुन घेतल्यामुळे तिथेच सावलीत बसले आणि आधी पाण्याची बाटली जवळ केली. पाणी प्यायल्यावर जीवात जीव आला. अजुन तासभर तरी वाट पाहावी लागेल हे लक्षात आल्यावर मात्र मला राहवेना. खाली ऐशुला एकटीच सोडुन आले होते याची बोचणी लागायला लागली. शेवटी परत गेले खाली.

प्रज्ञा हळुहळू चालत वर आलेली पण आमच्या मॅडम तिथेच डोळे मिटुन बसलेल्या. मॉनेस्टरीचे एकमेव हॉटेल बाजुलाच होते. तिथे जाऊन तिची पोटपुजा केली आणि मग बाबापुता करुन एकेक पायरी चढवत कसेबसे वर घेऊन आले. तोपर्यंत मोनेस्टरी उघडलेली आणि प्रांगणात पुजेची तयारी सुरू होती. आधी मोनेस्टरी पाहिली, पुजा सुरू झाल्यावर थोडा वेळ ती पाहात थांबलो आणि मग तिथुन खाली आलो. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. मोनेस्टरीतल्या एकमेव हॉटेलामध्ये परत एकदा गेलो आणि पोटोबा केला. हॉटेल तिथल्या भिख्खुनीच चालवलेले होते पण पदार्थांच्या किंमती मात्र सर्वसंगपरित्यागी भिख्खुना अजिबात शोभणा-या नव्हत्या. लेहला काहीच बनत नाही, म्हणुन सगळे महाग हे परत एकदा स्वत:ला सांगत ते किंमती पदार्थ पोटात घातले आणि तिथुन निघालो.

प्रचि १

Visiting Ladakh - 3 थिकसे रे...

वाटेत काही कारणाने गाडी दोन मिनिटे थांबली तेव्हा ऐशुला बाजुच्या तलावात पोहणारे मासे दिसले आणि मग आम्ही सगळेच मासे बघायला धावलो, आय मिन चालत गेलो Happy चक्क दिडदिड फुट लांबीचे गोड्या पाण्यातले जाडजुड मासे त्या छोट्याश्या तलावात पोहत होते. आमचा ड्रायवर आमच्यापेक्षाही जास्त हौशी असल्याने कुठल्याही प्रेक्षणिय स्थळी तो आमच्याआधीच पोचायचा. हा तलाव मॉनेस्टरीचा म्हणजेच देवाचा असल्याने तलावात मासेमारीला बंदी आहे आणि म्हणुन हे मासे असे गुटगुटीत होऊन फिरताहेत ही माहिती त्याने दिली. आपल्याकडे देवराया तशी इथे देवतळी आहेत असा निष्कर्ष काढुन तिथुन निघालो.

पुढे रँचोची शाळा होती. दोन वर्षांपुर्वी झालेल्या ढगफुटीत शाळा वाहुन गेल्याने ती परत बांधण्याचे काम सुरू आहे असा फलक तिथल्या एका इमारतीत लावला होता. तिथेच शाळा बघायची परवानगीही घ्यायची होती. शाळा बघायला फी काहीच नव्हती पण येणा-या प्रत्येक पर्यटकाने काहीतरी देणगी द्यावी अशी अपेक्षा होती. तिथल्या बाईला आमचा कंपु फारसा आवडला नसावा आणि त्यावरुन तिचे आणि गिरीचे काहीतरी प्रेमळ संभाषणही सुरू झाले. बाहेर उन मी म्हणत होते, माझे डोके गरगरत होते त्यात ह्या प्रेमळ संभाषणाची भर पडल्याने शाळा बघण्याचा माझा उत्साह बराच कमी झाला आणि मी सरळ बसमध्ये जाऊन बसले. काही मंडळीं तर माझ्यापेक्षा शहाणी निघाली, त्यांनी बसमधले सुरक्षित स्थान सोडलेच नव्हते. लेहमधल्या उन्हाने खरेच जीव उबवला आमचा.

वाटेत येताना शे पॅलेस आणि शांतीस्तुप बसमधुनच पाहिला. शांतीस्तुप इतक्या उंचीवर आहे की तिथे माझ्या स्पिडने चढुन जाईतो एक अख्खा दिवस खर्ची पडेल याची मला खात्री पटली. दुस-या बाजुने वरपर्यंत गाडी जाते हे तेव्हा दिसलेच नाही Happy

त्यानंतर हॉल ऑफ फेममध्ये मात्र भरपुर वेळ घालवला. मिलिटरीने बांधलेले हे म्युझियम लेहची सांस्कृतिक आणि प्राकृतिक माहिती तर देतंच सोबत तिथे राहणारे सैनिक कसे राहतात, त्यांचे कपडे, खाणे, हत्यारे इत्यादी सगळी माहिती तिथे मिळते. कारगिल युद्धावर बनवलेला एक माहितीपटही तेथे दाखवतात, कारगिल युद्धातल्या सगळ्या हिरोंचे फोटो आणि माहिती तिथे आहे.

परत आल्यावर परत एकदा मार्केटात गेलो. मार्केटात जायची वाट खुप छान होती. आमच्या हॉटेलपासुन एक गल्लीसारखी दिसणारी, पेवर्स ब्लॉकने बांधुन काढलेली पायवाट होती. तिच्यावरुन सरळ चालत राहिले की साधारण अर्ध्या तासाने मार्केट येई. आमचे हॉटेल थोड्या वरच्या अंगाला होते. शेवटच्या दिवशी मार्केटात गेल्यावर क्रेडिट कार्डे हॉटेलातच विसरल्याचे ,माझ्या लक्षात आले. मी हॉटेलात चालत परत आले आणि कार्डे घेऊन परत मार्केटात गेले. हॉटेलात यायला पाऊण तास लागला, त्याच वाटेने परत मार्केटात जायला मात्र २० मिनिटे लागली Happy सगळीच गंमत.

मार्केटात परत विंडो शॉपिंग केली. दुस-या दिवशी नुब्राला जायचे होते. तिथे रात्री थंडी असणार या अपेक्षेने काही मंडळींनी जॅकेट्स वगैरे विकत घेऊन दुस-या दिवशीच्या अपेक्षाभंगाची तयारी स्वतःचेच पैसे खर्च करुन करुन घेतली. मी आपली फक्त ताजी गाजरे आणि ओले जर्दाळू घेतले आणि डोळे भरुन ताजी भाजी पाहुन घेतली.

नुब्राला जाताना फेमस खार्दुंगला पास लागतो. वाहनाने जाण्यालायक असा जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला रस्ता असे याचे वर्णन आम्ही आधीपासुनच वाचुन ठेवलेले. पण अशा रस्त्यावर जाणे कितीही आकर्षक वाटले तरी इतक्या उंचीवर गेल्यावर काय होते ते आता अनुभवाने कळले होते. Happy

तर दुस-या दिवशी उत्साहाने सकाळी लवकर निघालो. खांदुर्गला विषयी मनात फार उत्सुकता होती. तेथील विरळ हवा, उणे तापमान, अकस्मात कोसळणार्‍या दरडी, हिमनग आणि सगळ्यात भयानक म्हणजे तो खांदुर्गलाचा अरुंद रस्ता... खार्दुंगला जाणारा रस्ता तसा खुप सुंदर आहे, त्याच्यावर वळणे किती आणि काय प्रकारची त्याची गिणती करणे अशक्य.

ह्या रस्त्यावरुन आपण प्रवास करु लागलो की निसर्ग किती प्रचंड मोठा आहे आणि त्याच्या ह्या पसा-यात आपण केवळ एक धुळीचा ब-यापैकी मोठा कण आहोत ह्याची जाणिव होते. या जाणिवेनेच की काय माहित नाही पण इथुन परत सुखरुप परतु की नाही हा विचार मनात प्रकर्षाने यायला लागला. प्रत्येक वळणावर पुढे रस्ता नाही की काय अशी शंका येईतो ड्रायवर झटकन नव्वद किंवा कधीकधी त्याहीपेक्षा जास्त अंशात गाडी वळवायचा आणि आम्ही परत रस्त्यावर यायचो. वाटायचे, गाडी वळवायला काही क्षणांचा जरी जास्त अवधी गेला तरी झाले.. आटोपला आमचा ग्रंथ इथेच. निसर्गाला मात्र त्याचे काहीच वाटले नसते. त्याच्या लेखी वा-याने उडुन एक पान इकडचे तिकडे पडले, बस्स इतकेच.

तिथला निसर्ग खरेच इतका प्रचंड आहे. तिथली माणसेही बहुतेक या निसर्गाच्या या रौद्ररुपाला घाबरुन की काय, खुप देवभोळी आहेत. शहरात जागोजागी प्रेयर व्हिल्स, माणसे बाजारात जाता जाता या व्हिल्सच्या दोन चार फे-या करत जातात. ठिकठिकाणी मंदिरांसारखे काहीतरी.

प्रचि २

प्रचि ३

लेहच्या उत्तरेला सियाचीनला जोडणार्‍या रस्त्यावरिल खांदुर्गला ही जगातील सर्वात उंची वरील खिंड... शहरातून बाहेर पडले की लगेच चढ सुरु होतो. साधारण एक दिड तासात खांदुर्गलाचा साऊथ पुल्लू (आर्मीचा पहिला चेक पोस्ट) लागतो. भारताच्या या भागात जाण्यासाठी लेह मधुन रितसर परवानगी (Inner Line Permit) घ्यावी लागते. हे Permitचे काम आमच्या टुर ऑपरेटरने करुन ठेवले होते. साउथ पुल्लू वरुन दिसणारा नजारा.

प्रचि ४

साउथ पुल्लू नंतरचा भयाण रस्ता पोटात गोळा आणत होता.

प्रचि ५

प्रचि ६

जसजसे वर जात होतो तसतसे ट्रॅफिकची घनता वाढत होती. इतर वेळी वाटेल तसे Over Taking करणारे बहाद्दर इथे मात्र Horn OK Please ची री ओढताना दिसत होते. :p

प्रचि ७

जे डोंगर आधी आम्ही खालुन वर पाहात होतो, ते हळुहळू आम्हाला समांतर झाले. काराकोरम पर्वतराजीवरचे बर्फ खालुन अजिबात दिसत नव्हते. आता वर आल्यावर त्याच्यावरचे बर्फ दिसायला लागले. हवा अधिकाधिक थंड व्हायला लागली होती. खारदुंग खिंडीत जेव्हा उतरलो तेव्हा चक्क थंडी वाजायला लागली. 'इथे १५ मिनिटांशिवाय जास्त वेळ थांबु नका" ह्या पाटीकडे दुर्लक्ष करुन गाडीतील प्रत्येकाने उगीच फोटो काढत इकडे तिकडे धावाधाव केली. ह्या भानगडीत तासभर कधी गेला कळलेच नाही. ऐशुला तर तिथे प्रचंड त्रास व्हायला लागला. पण गुपचुप गाडीत बसाय्चे सोडुन ती अधुनमधुन गाडीत जाऊन सिटवर आडवी होऊन विश्रांती घेत होती आणि परत खाली उतरुन इतक्या उंचावर आल्याचा आनंद साजरा करत होती.

प्रचि ८ खां दु र्ग ला

प्रचि ९ खांदुर्गला वरुन दिसणारी उत्तरे कडील काराकोरम पर्वत रांग

प्रचि १०

प्रचि ११

खांदुर्गला पार करुन खाल्सरच्या दिशेने निघालो. वाटल होत की खांदुर्गंचा नॉर्थ पुल्लू पार केल्यावर रस्ता चांगला असेल. पण कसल काय... वितळाणार्‍या हिमनगांनी पुढच्या रस्त्यात २-३ फुटांची पाण्याची डबकी निर्माण केरुन ठेवली होती.

खारदुंगच्या खाली खल्सर गावात जेवलो. जेवण नेहमीसारखेच बेक्कार होते. पण आता वाईटातही चांगले शोधायची सवय झाली होती. इतक्या उंचीवर पोटभर जेवण मिळत होते हेच नशिब समजायचे. बरे वाईट काय बघायचा प्रश्न येतच नाही इथे.

प्रचि १२

प्रचि १३

उत्तर ध्रुवा नंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाच थंड हवेचा प्रदेश म्हणजे कारोकोरम पर्वत रांग. या काराकोरम पर्वतसरीच्या मुखातून शायोक नदी उगम पावते. उत्तर पश्चिम असा प्रवास करणार्‍या श्योक नदीच्या उत्तर तीरावर पसरलेली आहे नुब्रा व्हॅली! नुब्रा खो-यात पोचल्यावर निसर्ग अचानक बदलल्यासारखा वाटला.

प्रचि १४

वरच्या फोटोत जी दिसतेय ती आहे नदी. इथे फोटोत शांत वाटतेय पण प्रत्यक्षात ती तशी अजिबात नाहीय. वितळणा-या बर्फाचे पाणी ज्या नदीला सतत येऊन मिळत असेल ती नदी अशी शांत राहुच शकणार नाही.

या व्हॅलीतून उत्तरेला गेलेला रस्ता पार सियाचीन बेसकँप पर्यंत जातो... तर पश्चिमेला जाणारा रस्ता तुरतुक पर्यत जातो. आम्ही तुरतुकच्या मार्गाने डिस्कीटला पोहचलो.

झोझिला पार करताना जी सिमेंटसारखी माती दिसत होती, तशाच प्रकारची माती नुब्रालाही आहे. तिथुन वाहणा-या श्योक नदीत चक्क सिमेंट वाहुन नेल्यासारखे पाणी दिसत होते. नदिकाठाने थोडीफार हिरवळ, बाकी सगळे वाळवंट असा एकुण थाट आहे ह्या परिसराचा.

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

आमचा मुक्काम डिस्किटला होता तिथे पोचेपर्यंत डोक्यात घणाचे घाव पडून पडून ते आता जवळजवळ फुटण्याच्या बेतात आले होते. कधी एकदा हॉटेल गाठतोय असे झालेले. वाटेय मैत्रेय बुद्दाचे दर्शन झाले पण तिथे उद्या जाऊया असे ठरवले. समोर डिस्किट गाव होते, यात आपले हॉटेल कुठे असेल, परत शोधाशोध करावी लागेल की काय असे वाटत असतानाच अचानक होटेल ओल्थांग समोर दिसले. सगळ्यांनी अगदी उस्फुतपणे टाळ्यांचा कडकडाट केला.

इथे मुंबईत असताना तिकडची हॉटेले बेकार असणार, अगदी लहान खोल्या वगैरे वगैरे वर्णने करुन लोकांनी मला अगदी घाबरवुन सोडलेले. पण आम्हाला एकही बेक्कार हॉटेल मिळाले नाही. टुर ऑपेरटरने खुप चांगली हॉटेले दिली होती. डिस्किटसारख्या भारताच्या अगदी बॉर्डरवर असलेल्या छोट्याश्या खेड्यातले हे हॉटेलही खुपच छान होते. माझे बुकिंग तिघांचे होते, एका रुममध्ये एक्ट्रा बेडसहित. श्रीनगरला हाऊसबोटीतल्या रुममध्ये पर्मनंट एस्क्ट्रा बेड होता, कारगिलला तर डबलबेडच इतका मोठा होता की आम्ही जादाचा बेड मागवलाच नाही. इथे ओलथांगमधली रुम खुप मोठी होती आणि त्यात जादाचा बेडही आधीच आणुन ठेवला होता.

डोक्याचा त्रासाने आम्ही तिघीही इतक्या त्रासलेलो की हॉटेलवर गेल्यागेल्या आडवे झालो. बाकीच्या मंडळींचे सँड ड्युन्स बघायचा जायचे ठरले, मला जायचे होते पण डोक्यामुळे अशक्य झाले. ऐशुने तर "तुच जा, तुझ्याबरोबर आता मी जन्मात कुठे येणार नाही" ही प्रतिज्ञाच करुन टाकली. . मग नाईलाजाने मला सँड ड्युन्सचा कार्यक्रम रद्द करावा लागला. जौद्या झाले, तसेही उंटावर बसल्यावर पाठिचे मणके खिळखिळे करुन घेण्यापेक्षा हॉटेलात आडवे झालेले बरे असा विचार करुन मी थोडी विश्रांती घेतली.

तासाभराने जरा बरे वाटल्यावर खाली हॉटेलात फेरफटका मारला. हॉटेल छान होते, एका बाजुला मालकांचे घर, त्याच्या समोर हॉटेलचे रिसेप्शन आणि बाजुला हॉटेल. मध्ये जिथे जागा मिळेल तिथे फुलझाडे लावली होती. हॉटेलच्या खोलीत टिवी नव्हता पण मालकांच्या घरात मात्र टिवी दिसत होता.

घरमालकाच्या गच्चीवर मध्यभागी एक काचेची पेटी होती आणि त्यात दोनतिन कलश ठेवलेले दिसत होते. दिवेलागणीच्या वेळेस एक मुलगी तिथे आली आणि इथे तुळशीसमोर निरांजन ठेवतात तसे तिने त्या कलशांसमोर निरांजन ठेवले.

थोड्या वेळाने चहाच्या निमित्ताने हॉटेलच्या मॅनेजरशी भेट झाली. त्याच्याशी गप्पा मारताना कळाले की हॉटेलमालक आर्मीत का नेवीत कुठेतरी मोठ्या पोस्टवर आहेत आणि हॉटेल त्यांच्या मुलीचे आहे. सध्या मॅनेजरच बघतोय सगळे. मॅनेजर शर्मा पंजाबचा होता. त्याने लडाखबद्दल खुप गमतीदार गोष्टी सांगितल्या. लडाखमध्ये सगळी इस्टेट मुलीच्या नावाने असते, ती लग्न करते आणि नवरा घरी आणते. तिला मुलगी झाली की सगळी इस्टेट त्या मुलीची होते. त्या रितीप्रमाणे आमचे हॉटेलही मालकाच्या मुलीचेच होते. वर निरांजनवाली मालकिण होती इथली. इथल्या मालकांची बायको आणि सासूबाई एकदा खार्दुंगलाहुन गाडीने येत असताना गाडी खाली कोसळली. त्यानंतर मुलगी मैत्रिणीसह घरात राहतेय. मालक नोकरीच्या ठिकाणी.

मुलीशी लग्न करुन इथेच स्थाईक व्हायची ऑफर मालकांनी मला दिलेली, पण घरजावई होऊन कोण राहिल म्हणुन मी ती नाकारली हे त्याने अभिमानाने सांगितले. त्याला नुब्रातल्या सँड ड्युन्स आणि तंबुबद्दल विचारले तर त्याने लोक उगीच तंबुत राहतात, कधी कधी वादळ येते आणि तंबु उडुन जातात. मग लोक येतात माझ्या हॉटेलात अशी फुशारकी मारली. आम्ही म्हटले असो.

उंटावर बसायला गेलेले स्वार तोवर परतले होते. त्यांचे फोटो आणि हंडर मधल्या कॅमल राईडचे वर्णन -

प्रचि १७

वाटेत श्योक नदीच्या दोन्ही तीरावरील अद्भुत डोंगर रांगाची मालिका लक्ष वेधुन घेत होती. तिरप्या कोनात नदीत उतरणारे डोंगर जणू काही घसरगुंडीला आव्हान देत होते. डोंगरावरुन घरंगळत उतरणार्‍या वाळूने आणि सतत वाहत्या वार्‍यामुळे येथे नदी किनार्‍यावर वाळुच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत.

प्रचि १८
>

या वाळुच्या टेकडयांवर Double Humpd Camel ची एक दुर्मिळ प्रजाती पहावयास मिळाली. येथील Camel Safariतून फेरफटका मारताना खूप धम्माल आली. पाच सहा उंटाच्या समूहला सगळ्यात पहिल्या उंटाच्या मागे असे एका रांगेत बांधतात आणि देतात सोडून... मग काय या रेल गाडीतल्या उंटाचे तोंड पुढे बसलेल्या सफारीच्या पायांना घासले की एकच कल्ला व्हायचा. :p

प्रचि १९

नुब्रा व्हॅलीतही थंडीने टिमचा अपेक्षा भंग केला. खास थंडीसाठी लेहला स्वेटर खरेदी केली होती.

काळोख पडायची वेळ झाली तरी दिवे लागेनात. शर्माजींना दिवे लावायला सांगितले तर ते म्हणाले वीज रात्री ७ ला येणार आणि रात्री ११ पर्यंत मुक्काम करणार, परत सकाळी ३ वाजता येऊन ४ ला जाणार. दिवसाच्या २४ तासात घरात वीज फक्त येवढ्या वेळेतच येते. खोलीत टिवी का नव्हते याचे कोडे उलगडले. पुढच्या वर्षी आम्ही जनरेटर बसवणार, मग आमच्याकडेही २४ तास वीज असेल आणि सगळ्या खोल्यांमध्ये टिवी येतील असे आश्वासन शर्माजींनी दिले.

रात्रीचे जेवण मात्र अतिशय सुंदर होते. जेवणात अगदी शेवयांच्या खिरीपासुन सगळे होते. सगळे लेहवरुन आणावे लागते. इथे काहीच होत नाही हे परत एकदा शर्माजींनी ऐकवले. आमच्याबरोबर अजुन एक मराठी ग्रुप हॉटेलात उतरला होता. पन्नाशीच्या अल्याड पल्याड असलेली दोन जोडपी होती. लडाखला मराठी मंडळी भरपुर दिसली. कुठेही जा, कानावर मराठी पडतच होते. भाषेच्या बाबतीत महाराष्ट्राबाहेर आलोत असे चुकूनही वाटले नाही. लेहच्या हॉटेलातही एक मोठा मराठी ग्रुप उतरलेला. .

माझे एअरटेल आणि इतरांचे वोडाफोन लेहमध्ये चालत होते पण डिस्किटमध्ये सगळे बंद. तिथे फक्त बिएसेनेल, पोस्टपेड चालत होते. त्यातही फक्त फोन चालत होता, समस बंद. दोन दिवसांनी ईद होती. सुरक्षिततेच्या कारणाने समस बंद केलेले ही माहिती शर्माजीनी दिली. पेपरात येणा-या चिनी घुसखोरीच्या बातम्यांबद्दल त्यांना विचारल्यावर, अशा घटना घडतात हे खरे आहे पण पेपरात येणा-या बातम्या आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात खुप अंतर आहे, कधीकधी तर पेपरात काहीही अतिरंजीतही छापलेले असते म्हणुन त्यांनी सांगितले.

पुर्ण लडाखभर मे ते ऑक्टोबर हा कमावण्याचा सिजन असतो. शर्माजी साधारण १५ मे पर्यंत पंजाबहुन डिस्कीटला परततात, मग १५ दिवसात हॉटेलची साफसफाई वगैरे करुन १ जुनपासुन हॉटेल सुरू ते ऑक्टोबर पर्यंत. ऑच्टोबरनंतर परत सगळे बंद करुन आपल्या घरी जायचे.

बाहेरुन कामानिमित्त आलेले लोक बर्फ पडायला लागले की आपल्या घरी परत जातात. लडाखी लोक ६ महिन्याची रसद घरात गोळा करुन ठेवतात. एकदा बर्फ पडायला लागले की सामान्य जनजीवन जवळजवळ थंडावते. आधीच्या सहा महिन्यात कमावलेले नंतरचे सहा महिने पुरवुन पुरवुन खायचे. दिवसातुन तासभर बाहेर जायला मिळते असे लेहमधल्या हॉटेलातला लडाखी सांगत होता. पैसेवाले लोक लडाखबाहेर जातात, सामान्य जनता तिथेच राहते. इथल्या मुलांचे शिक्षण कसे काय होते देव जाणे.

रात्री बरोबर ११ वाजता वीज गडप झाली आणि सगळीकडे डिप्प काळोख पसरला. वर आकाशगंगा मस्त चमकत होती. मी खिडकीतुन जितकी दिसु शकेल तितकीच पाहिली. असल्या भयाण काळोखात अनोळख्या जागी बाहेर कोण जाईल? नेहमीसारख्या बीनागजाच्या मोठ्या खिडक्या इथेही होत्या. एक मोठी खिडकी तर गॅलरीत उघडत होती, कोणीही उडी मारुन आरामात आत येईल इतकी मोठी खिडकी. खिडकी बंद करावी तर गरम होत होते, जिथे वीजच नाही तिथे पंखे कुठुन असणार? मी जौद्या झाले करत उघड्या खिडकीकडे दुर्लक्ष करुन झोपले. तसेही लडाखी लोक बरेच प्रामाणिक आणि विश्वासपात्र आहेत.

माधवीला रात्रभर श्वासाचा त्रास होत राहिला. ऑक्षिजन सिलेंडरचा फारसा उपयोग झाला नाही. तिच्यामुळे मीही रात्रभर जागी राहिले. ऐशु मात्र डाराडुर झोपली होती. सकाळी ३ ला लाईट आली जी ४ ला परत टाटा बाय बाय करणार होती, त्यानंतर कधीतरी झोप लागली. डिस्किटला बाहेर हवा थंड होती, पण खोलीत थोडेसे गरम होत होते. रात्री कधीतरी खोलीतली हवा थंड झाली.

दुस-या दिवशी मैत्रेय बुद्धाचे दर्शन आणि मग बॅक टु लेह असे ठरलेले. बॅक टु लेह करायला दुसरा कुठलातरी मार्ग असता तर किती बरे झाले असते असे मला राहुन राहुन वाटत होते. हाय्येस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड हे विशेषण आपण सी लेवेलला असतो तेव्हा भारी रोमँटिक वाटत असते. पण प्रत्यक्ष तिथे जाणे हे खायचे काम नाहीय्ये. बॅक टु लेहसाठी परत एकदा खार्दुंग खिंड पार करणे गरजेचे होते. शर्माजींच्या मते लेहहुन नुब्राला येताना खिंडित फोटोसाठी न थांबता सरळ आलो असतो आणि मग परत जाताना वर फोटो काढत थांबलो असतो तर आम्हाला बराच त्रास टाळता आला असता. पण काय करणार? आम्ही तिथे चांगलेच हुंदडलो होतो आणि डोकी दुखवुन घेतली होती. त्यामुळे असोच.

गोल गोल फिरत एकदाचे डिस्किटच्या मठात पोचलो.

प्रचि २२

तिथली मैत्रेय बुद्धमुर्ती सिंहासनावर बसलेली आहे, आधी भेटलेली एक मैत्रेय बुद्धमुर्ती उभी होती. या मुर्ती अशा रेडी पोजमध्ये असण्याचे कारण ड्रायवरने सांगितले. तो म्हणाला, की मैत्रेय बुद्ध हा पुढचा बुद्ध आहे (सध्या ते लोक ज्याची पुजा करतात तो बुद्ध वेगळा). सध्या चालु असलेले युग संपले की नवे युग सुरू होणार, अर्थात या मधल्या काळात धर्माची हानी होणार, त्यामुळे बुद्धजगतात थोडीफार खळबळ माजणार. अशा वेळी गोंधळलेल्या लोकांना मदत करायला म्हणुन हा नवा बुद्ध रेडी पोजिशन घेऊनच तयार आहे.

प्रचि २०

प्रचि २१

तर या बुद्धाचे दर्शन घेत थोडा टाईमपास केला. मागे मंदिरात एक वही ठेवलेली. त्यात आपले नाव लिहायचे. त्या दिवशीच्या प्रार्थनेत मग पुजारी आपले नाव घेऊन एक फुल देवाच्या पायाशी वाहणार. माझ्याआधी ड्रायवरने स्वत:चे नाव लिहिले. मग मी लिहिताना त्याचे नाव वाचण्याचा प्रयत्न केला. लिहिलेले इंग्रजीतच पण मला काही ते वाचता आले नाही. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखे काहीतरी खरडलेले. अजुन ब-याच जणांनी नावे खरडलेली ज्यातली बरीचशी मला वाचता आली नाहीत. पुजारी कसा काय वाचणार होता तोच जाणे. मी आपले माझे नाव लिहायचे काम ऐशुकडे दिले. १० नावांच्या गिचमिडीनंतर एक सुवाच्य नाव दिसले तर पुजा-याला त्या नावाने फुल व्हायची बुद्धी होईल ही अपेक्षा.

बुद्धाचे दर्शन घेत असताना इंद्रवज्रची किमयाही अनपेक्षितपणे अनुभवास मिळाली.

प्रचि २३

तिथुन निघालो ते खार्दुंगवर स्वारी करायला. बरेच वर गेल्यावर गाडीतले थोडे शिलेदार पाण्यासाठी म्हणुन उतरले. सहज आकाशात पाहिले तर इंद्रवज्र अजुनही आमचा पाठलाग करत येत होते. तिथे पाण्यासाठी म्हणुन गेलेली मंडळी बराच वेळ लावताहेत म्हणुन त्यांना शोधण्यासाठी एकेक्जण गाडीतुन उतरायला लागला आणि गडप व्हायला लागला. त्यातले काहीजण हॉटेलात पोटपुजा करताहेत हे लक्षात आल्यावर उरलेले पॅसेंजरही उतरले आणि सगळ्यांनी एकत्रित पोटपुजा केली. त्यानंतर गाडी जी धुवांधार सोडली ती लेह गाठेपर्यंत.

आता उद्या जायचे होते पॅनगाँग लेकला. मध्ये एखादा दिवस विश्रांती मिळाली असती तर बरे झाले असते असे तिथे गेल्यावर वाटायला लागले. पण आता काही पर्याय नव्हता. टुर प्रोग्रॅम आधीच ठरला होता.

सगळ्यांना पॅनगाँग लेकला जायचेय याची भारी उत्सुकता लागली होती. निळ्या रंगाचा पॅनगाँग लेक हे लेह टुरचे एक प्रमुख आकर्षण होते.

(अजुन थोडे फोटो टाकायचे आहेत. काही फोटो खालीवर झालेत ते नीट लावायचे आहेत. लेख अपुर्णावस्थेत ठेवता येत नाही ही एक मोठी गैरसोय आहे, तसे असते तर सगळे नीट लावुन मग प्रकाशित करता आला असता. आता अजुन जागत बसणे मला शक्य नाही Happy सो उरलेले उद्या )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि चांगले आलेत. वर्णनंनी छान आहेत. सॅण्ड ड्युन्सचे आणखी प्रचि असतील तर टाका.
याद ताजा हो गयी.

नदीचं नाव श्योक आहे.

साधना अजून येऊ दे. खूप आवडले तुझे प्रवासवर्णन्.:स्मित: मात्र पुढे प्रवासात जातांना जरुर काळजी घे. मला तर मुलीला ( छोट्या) कुठेही नेतांना काळजीच वाटते, इतकी ती नाजुक आहे.:अरेरे: त्यामुळे फिरण्याची पण बोंब. पण तुम्हा सर्वांच्या रुपाने घरबसल्या सहलीचे दर्शन घडते हेच मुख्य.

मस्त लिहिलंयस साधना Happy

लेहमध्ये शॉपिंग कुठे करायचे याची सगळी माहिती जिप्स्याने आधीच मिळवुन ठेवलेली.>>>>यासाठी मायबोलीकर प्राचीला धन्यवाद. Happy