पुनरागमनं करोम्यहं!

Submitted by संयोजक on 3 September, 2013 - 07:25

बाप्पा : आलो, एकदाचा मंडपापर्यंत आलो.. आता कानावरचे हात काढायला हरकत नसावी..

मूषक : तुम्हाला चार हात असल्यानं तेवढं तरी शक्य आहे, मी कानावर हात घेतले तरी डिजे च्या आवाजानं एकदा इकडे तर एकदा तिकडे असा धडपडत असतो !

बाप्पा : अच्छा, म्हणजे मघाशी माझ्या पाठीवर जे काही हुळहुळलं तो तू होतास..

मूषक : काय करणार बाप्पा, लोकं लुंगीडान्स करत होते, हातापायांचा काहीच अंदाज येईना म्हणून लपलो तुमच्या मागे.

बाप्पा : अरे पण एकानंही लुंगी घातलेली पाहिली नाही मी, मग कसा लुंगी डान्स ?

मूषक : बाप्पा, आत्ताच्या काळातलं ते प्रसिध्द गाणं आहे, हल्ली अशीच गाणी चालतात बाप्पा .

बाप्पा : म्हणूनच मी कानावर हात घेतलेत, इथून असं काही ऐकून पाहून जातो आणि घरी गेल्यावर उगीचच माता पार्वतीचा ओरडा खातो.. नकोच.

मूषक : म्हणूनच यंदा आगदी काटेकोरपणे वेळापत्रक आखलंत वाटतं, येण्याजाण्याचं..

बाप्पा : नाहीतर काय करू ? तेच ते ध्वनी प्रदूषण, तीच गर्दी, लोडशेडींगचा झटका बसणार हे माहित असताना केलेला खोटा झगमगाट, हल्ली कंटाळा येतो रे..

मूषक : असं नाही हं बाप्पा, आत्ता आपण ज्या मंडपात आलोय ते मंडळ इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणार आहेत..

बाप्पा : रे मूषका, हा मंडप उभा आहे याच जागी पंधरा दिवसांपूर्वी बाग होती.. खरंतर तुला माहीत असायला हवं होतं, मी तुला कितीतरी दिवस आधी पुढे पाठवलेलं होतं.

मूषक : तुमचं बरोबर आहे बाप्पा, मीपण रूबाबात आलो पण बाप्पाशिवाय मूषक हा साधारण `उंदीर' असतो याची ताबडतोब प्रचिती आल्यानं मी पळालो.

बाप्पा : असं काय झालं रे ?

मूषक : बाप्पा अधेमधे लोकांच्या मागण्यांची डेटाएंट्री बंद करून मराठी संस्थळांवरही चक्कर मारत जा हो ..

बाप्पा : तिथे काय नवीन चालू असतं ?

मूषक : काय नसतं ते विचारा, डॉलर घसरला आला धागा.. नवीन चित्रपट आला, आला धागा ! रोजच्या प्रत्येक घडामोडीचे धागे असतात तिथे

बाप्पा : काय सांगतोस काय ?

मूषक : जे पाहिलं तेच सांगतोय बाप्पा, एकेका धाग्याला दोन-दोनशे प्रतिसाद असतात

बाप्पा : खूप विचारवंत झालेयत लोक, असं दिसतंय !

मूषक : ते धागे वाचून तुम्ही ठरवायचं..
बाप्पा : गणेशोत्सव मंडळांची तयारी काय म्हणतेय ?

मूषक : ती तर गेल्यावर्षी तुमच्या विसर्जनानंतर लगेच चालू झालीय

बाप्पा : वा वा ! म्हणजे टिळकांची इच्छा पूर्ण झाली म्हणायची !

मूषक : कसली काय बाप्पा, व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लाईनसाठी पावती पुस्तकं छापायची तयारी चालू झालीय .

बाप्पा : अरे पण मला सगळे भक्त सारखेच !

मूषक : पण मंडळांना नाहीत ना ! काही लहानसहान मंडळं आहेत त्यांची धावपळ आत्ता सुरू होईल.

बाप्पा : होणारच, या वर्षी मी वेळेत निघणार म्हटल्यावर पूजा, आरतीसाठी धावपळच होणार थोडी..

मूषक : त्यासाठी नाही बाप्पा, आता त्यांना मंडपाखाली पत्ते खेळायला वेळ कमी मिळणार.. म्हणजे दिवसरात्र एक करून कोटा पूर्ण करायला लागणार

बाप्पा : असं शक्य नाही मूषका, दरवेळी मी इथे आल्यावर बुध्दी प्रदान करत असतो प्रत्येकाला..
मूषक : तुम्ही देऊन जाता हो बाप्पा, पण काही जण ती गहाळ करतात, काही कदाचित महागाईमुळे गहाण टाकतात, काही वापरतच नाहीत त्यामुळे गंज चढतो मग उरलेल्यांची बुध्दी नष्ट करण्यासाठी त्यांच्याच पैशाने आणलेला डि.जे. बडवत बसतात.

बाप्पा : अरे मूषका, तू फक्त वाईट गोष्टीच सांगणार आहेस का ? की मनुष्य हल्ली मला पार विसरूनच गेलाय ?

मूषक : नाही बाप्पा, खाताना गोडधोड जसं शेवटाला ठेवतो तश्या काही गोष्टी मी मागे ठेवलेल्या आहेत..

बाप्पा : आता त्या सांगून टाक बघू !

मूषक : घरोघरी तुमच्यासाठी रंगरंगोटी, चाकरमान्यांची वेळेत गावी पोहोचण्याची धावपळ तुमच्यावरच्या प्रेमानंच चाललीय की, आपल्या मराठी संस्थळांवरतर तुमच्या आगमनाच्या दवंड्या कित्येकदा पिटून झाल्या असतील, अनेक खास कार्यक्रम ठरवले असतील .

बाप्पा : काय खास कार्यक्रम ठेवलेयत ? ते लुंगीडान्स वगैरे नाही ना ? नाहीतर मी आपला न्यायदेवतेकडून डोळ्यावर बांधायची पट्टी घेतो काही दिवस उसनी !

मूषक : तसलं काही नाही बाप्पा, छान कार्यक्रम आहेत, देशाच्या गौरवास्पद टप्प्यांवरची माहितीपूर्ण लेखन स्पर्धा आहे, बालगोपालही नव्या उपक्रमात रंगलेयत.

बाप्पा : अरे वा, बालगोपालसुध्दा ? मग हे आधी का सांगितलं नाहीस ?

मूषक : मुद्दामच नाही सांगितलं, त्यांची पत्र पोहोचली तुमच्याकडे की आज-उद्या कळेलच तुम्हाला..

बाप्पा : मूषका, बच्चेकंपनीसुध्दा मागण्याच करतेय की काय ?

मूषक : बाप्पा आता तेच राहीलेत ज्यांच्या मागण्या वाचतानाही तुम्हाला आनंद होईल.

बाप्पा : म्हणजे माबोकरांनी आपल्या मागण्यांसाठी मुलांना तर पुढे नाही ना केलं ?

मूषक : तुम्ही पहा तर खरं..

बाप्पा : खरंतर आधी सगळी रडगाणी ऐकून मी परत जायच्याच तयारीत होतो, पण आता तू म्हणतोयस म्हणजे काहीतरी खास असणार संस्थळांवर.. चल मूषका मला तुझ्यावर स्वार होऊ दे, संस्थळांचा फेरफटका मारू !

मूषक : बाप्पा इथे माझा उपयोग नाही ,माझ्या तंत्रक्षेत्रातल्या दुसर्‍या अवताराचा उपयोग आहे, हा घ्या माऊस आणि करा फेरफटका !!

*************************************************************
- कवठीचाफा

तेंव्हा मंडळींनो, मायबोलीवरही गणपती बाप्पांचं आगमन झालंय बर कां! चला तर मग करुयात आपल्या लाडक्या बाप्पाचं जोरदार स्वागत! खुप उत्साहाने आणि मनापासुन या 'घरच्या' गणेशोत्सवात भक्तीभावाने, आनंदाने सहभागी व्हा! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूषक : तुमचं बरोबर आहे बाप्पा, मीपण रूबाबात आलो पण बाप्पाशिवाय मूषक हा साधारण `उंदीर' असतो याची ताबडतोब प्रचिती आल्यानं मी पळालो.
>>>
भारीये Lol

बघ ग सुमेधा! काय तू Lol

:))