एकंब्याच्या स्टोपवर उत्तम उतरला. पांढऱ्या धुळीच्या लोटाकडे वैतागून पहात त्याने आपला पांढराच शर्ट झटकला. मागून प्यांटही झटकली आणि कुणी ओळखीचं दिसतंय का म्हणून इकडे तिकडे पहिले. आता कुणी न्यायला आलं असलं पाहिजे असं तर नव्हतच. तो कुणालाही न कळवता आला होता. जावई म्हणून एरवी असणारा माज त्याला आज करता येत नव्हता. नाहीतर रहिमतपूरातून निघालं की फक्त कोरेगाव गाठायचं काम होतं त्याचं. बाकी मग पाटील कुणाला तरी पाठवायचेच त्याला आणायला. त्यामुळे बसने असं एकंब गाठायला त्याला जर चिडचिड झाली होतीच. पण पर्याय नव्हता. त्या वीस फुटी रस्त्यावरून मग उगाच म्हशी घेऊन जाणारी पोरं, तर कुठे शेतात खुरपत असणारा बायकांचा कळप तर कुठे शाळा बुडवून बोरं तोडणारी पोरं निरखत निघाला. त्याला आक्कीचे शब्द आठवत होते,'जावयासारखं वाग जरा. पोरीच्या नादात सौताची अशी किंमत घालवू नकोस.'
पंधरा-वीस मिनिटांनी त्याच्या जवळ एक एम-एटी थांबली. अंकुशबुवानी उत्तमला जोरदार हाक मारली, 'अवोSS जावई बापू? असं चालत का चाल्लासा? चला सोडतो तुम्हाला चावडीपतूर.' उत्तमने पडत्या फळाची आज्ञा मानून गाडीवर टांग मारली. उन्हाची वेळ असूनही गाडीच्या वेगात वारं लागून त्याचं घामेजलं अंग जरा सुखावलं. पायांनाही कसं बरं वाटलं. गाव दिसायला लागल्यावर त्याला जर बरं वाटलं. 'कुणाशी जास्त न बोलता पोचलो ते बरचं म्हणायचं' असा विचार करत होता तो तशातच त्याला गौराक्का म्हशीवरून जाताना दिसली. त्याला लग्न ठरताना काकानं सांगितलेली गोष्ट आठवली,'अरं ही गौराक्का लई खाष्ट हाय. जरा जपूनच. ' तिच्या या म्हशीच्या स्वारीबद्दलही ऐकलं होतंच पण आज प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याला हसू आल्याशिवाय राहवलं नाही. अमरीला कितीतरी वेळा त्यानं चिडवलं होतं यावरून. गौराक्कानं जोरदार हाक दिली,'अन्कुशबुवाssss '. पुढं गेलेली गाडी झटक्यात थांबली. आपल्या साडीला सांभाळत म्हशीच्या शिंगाला डाव्या हातानं पकडून एमेटि वरून उतरावं इतक्या सहजपणे गौराक्का म्हशीवरून उतरली. उत्तमही उतरून गौराक्का जवळ आला.
'जावैबापू?' जरा आश्चर्याने ती उद्गारली. 'भर उन्हाचं असं न कळवता आलासा? कुनाला तरी धाडलं असतं की कोरेगावला? मी म्हशींना आंघोळीलाच न्हेत व्हतो वड्याला. राहू दे ते. चला घरीच जाऊया.' तिच्यासमोर काही बोलायची त्याची हिम्मत नव्हती. तिनं सगळ्या म्हशी घराकडं वळवल्या. मध्येच म्हशींना मार्गाला लावत, त्याच्याशी बोलत गौराक्का निघाली.
'काय म्हन्तासा? सगळं बरं हाय न्हवं? ताईबाई काय म्हनत्यात?' तिला काय बोलावं कळत नव्हतं.
जावयाला असं इतक्या दिवसांनी बघून तिची धावपळ झाली होती. गौराक्का साधारण पन्नास-पंचावन ची असावी. वयानुसार वजन वाढलेलं पण अंगातली चपळाई कमी झालेली नव्हती. घरी आल्या आल्या तिने पटापट ४-५ गोष्टी केल्या. उत्तमला बादलीभर पाणी , तांब्या आणि टॉवेल दिला आणि पटकन पाटलाना फोन लावला. 'आवं, जावैबापू आल्यात. व्हय, आत्ताच आल्यात. अकुंशबुवाच्या गाडीवर व्हतं. मी घेऊन आलोय त्यांना घरी. हां हां, बरं हाय. या तुम्ही मग.' तिने फोन ठेवून उत्तमला ओसरीवर बसायला सांगून बाहेर शेजारच्या मुलाला कनवटीचे पैसे काढून दिले,' जा चार अंडी घेऊन ये.' म्हणून त्याला पिटाळंलं. तोवर तिचा धाकटा मुलगा शाळेतून घरी आला होता. तिने त्याला आल्या-आल्याच सुनावलं, 'जा रे, अमरीताला घेऊन ये जा. पाव्हणे आलेत म्हणावं.'
ती बोलेपर्यंत उत्तमने ओसरीवरचा पुढारी चाळून झाला होता. येता- येता सासूला जे काही चार प्रश्न विचारू शकतो ते विचारून झाले होते. त्यामुळे घरी असं किती वेळ अवघडून बसायचं हे त्याला कळत नव्हतं. 'अम्या !' त्याने मेव्हण्याला हाक मारली. अम्या थांबला. 'चल मी पण येतो तुझ्याबर.' म्हणून उत्तम उठलाच. तो निघाल्यावर गौराक्काला पण जरा बरंच वाटलं. तिच्यावर त्याला कंटाळा न येऊ द्यायची नैतिक जबाबदारी नव्हती आता.
'काय म्हणताय अमितराव? कसा चाललाय अभ्यास? परीक्षा आली जवळ, पास होणार की नाही?'
'होनार तर ! चाचनी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळालेत. बोरं खानार?' अम्याने खिशातून १५-२० बोरं काढून दाखवली. ते दोघेही मग बोरं चघळत निघाले. मध्येच अम्याने विचारलं,'तुम्ही ताईला न्यायला आलाय?' उत्तमने नुसतंच 'हम्म' केलं. आता त्याने लाख म्हटलं तरी ती तयार व्हायला पाहिजे ना? खरंतर उत्तमला कळत नव्हतं की तो कुठे चालला आहे पण अमरीला बघायची त्याला घाई झाली होती. ते शाळेजवळ येउन पोचले आणि अम्याने नजर इकडे तिकडे फिरवली. पटांगणावर २००-३०० मुलं होती आता त्यात अमरीला कुठे शोधणार? एका ठिकाणी १५-२० मुलं घोळका करून बसली होती आणि अमृता पण त्यांच्यासोबत होती. अम्या उत्तमला घेऊन तिच्यासमोर उभा राहिला आणि तिला एकदम धक्काच बसल. काय करावं, कसं बोलावं काही सुचत नव्हतं.
सहा महिन्यापूर्वी उत्तमचा डोक्यातल्या 'मला याच्यापेक्षा चांगली बायको मिळू शकते' विचाराने उचल खाल्ली होती. लग्नाला पण खूप काही वर्षं झाली होती असं नाही पण बी. एस्सी. बी. एड. झालेल्या मुलाला १२ वी पास थोडीच शोभते. अमृता दिसायला सुंदर होतीच त्यात पाटलांचा पैसा, शेवटी तो 'हो' म्हणालाच. कधी तिला रसायनशास्त्रातील गम्मत सांगावी, गणितातील कोडी सांगावी खूप वाटायचं त्याला. तिचा त्या गोष्टीतला नीरस त्याला दुखावयाचाच. कधी शाळा कॉलेजातल्या गोष्टी सांगायच्या तर तिचं जगच इतकं छोटं होतं की त्यात बाकी गोष्टींना जागाच नव्हती. एका छोट्या गोष्टीवरून झालेल्या वादातून सगळं वाढलच. अमृता घरी आली, एक आठवडा, दोन, चार सहा महिने होऊन गेले. पाटीलांनी प्रयत्न केला समजवण्याचा पण सर्व व्यर्थ. मुलीला घरी तरी किती दिवस ठेवणार म्हणून मग ती आंगणवाडीत जाऊ लागली मदतनीस म्हणून. मुलांसोबत तेव्हढाच विरंगुळा तिलाही. किती दिवस कुढत राहायचं?
शाळेत उत्तमला समोर बघून ती जरा कावरीबावरी झाली. तिने बाईंकडे बघितलं. त्यांनी खुणेनंच मान हलवली. अम्या मध्ये, एकीकडे ती आणि दुसरीकडे उत्तम अशी स्वारी परत घरी चालू लागली. आजूबाजूने बघणाऱ्या लोकांकडे बघून दोघेही थोडे अवघडले होते. बराच वेळ अम्याच बोलत राहीला. बोरीखाली आल्यावर एकदम अमृता आणि अम्या एकदम जोरात पळत सुटले आणि टपाटप बोरं वेचू लागले. एखाद्या बोरावर दोघांची नजर गेली तर भांडू लागले. शेवटी अम्याचे दोन्ही खिसे आणि तिचा पदर दोन्ही भरल्यावर दोघांनी वर पाहिले. उत्तम तसाच उभा होता. मग लाजून दोघांनीही हात पुढे केले. बोरं खाताना जरा अमृताच्या तोंडात शब्द आले.
ती, 'केव्हा आलासा?'
उत्तम,'आताच, अन्कुशबुवानी सोडलं गाडीवरनं'.
'आई काय म्हणत्यात? बराय ना सगळं?'
होय बरंच म्हणायचं. '
'शाळा कशी हाये?'
'चालूय. आता आठवीला शिकवतोय गणित. पोरं आगाव आहेत, जरा जोर द्यायला लागतोय शिकवताना. तुमी पन मास्तरीन झाला म्हणायचं की.'
अमृता लाजली. 'नाय, नुसतंच मदतीला जाते. ३-४ वर्षाची पोरं, त्यांना काय शिकवाय लागतंय व्हय.जरा फक्त खायचं, प्यायचं, रडू द्यायचं नाही इतकंच'
'आमच्या आठवीच्या पोरांपेक्षा हे काम अवघडच म्हनायचं तरी. आमची रडत तरी नायीत.'
हळूहळू अम्याला त्यांनी पुढं जाऊ दिलं. आणि त्यांची बोलणी चालूच राहिली. बोरं, चिंचा, ओढा, तिथं म्हशींवर जाणारी गौराक्का सगळ्या सगळ्या गप्पा झाल्या. संध्याकाळ कधी झाली हे दोघांनाही समजलं नाही. घर आलं तरी बोलणं सम्पेना.
'अमरे, किती वेळ गं? कव्हाशी वाट पाहतोय. ताट कर गं, पप्पा पन आल्यात बग. ' आईच्या खणखणीत आवाजानं अमृता भानावर आली. इतक्या दिवसांनी नवऱ्याशी बोलताना, पहिल्यांदाच चांगलं वाटत होतं, कुठेतरी एकमेकांना समजून घेतल्यासारखं. तिनं ताट करायला घेतली, कांदा चिरून घेतला पाटील आणि उत्तम जेवायाला बसले.
'काय म्हनताय उत्तमराव? बरं हाय न्हवं? ताईबाई काय म्हनत्यात? बराय सगळं?'
'होय, बराय.'
'शाळा काय म्हणतीय? पोरं बरी हायेत न्हवं?'
'बरी आहेत.' पाटलांसमोर त्याच्या तोंडातून शब्द काही फुटत नव्हते.
'आमची अमरी पन जातीय आता अंगनवाडीत.'
'हो पाहिलं मगाशी.' त्याने मिश्कीलपणे तिच्याकडे पाहिलं. त्याच्याकडे पाहत पटकन तिने पप्पा तर बघत नाहीयेत ना हे पण पाहून घेतलं.
'अगं, जरा ताटाकडे बघ की, पाव्हन्याना भाकरी वाढ.' गौराका भाकरी थापता थापता बोलली. जेवण झाल्यावर
बातम्या बघत दोघे बसले. प्रश्न काय आणि कुणी विंचारायचा हे कोडंच होतं.
शेवटी पाटील म्हणाले,'काय बेत मग तुमचा उत्तमराव? आजची रात्र थांबा इथेच. आज शेतावर पाणी आलंय त्यामुळं जावंच लागल. मी येईपतूर लई उशीर व्हुइल. सकाळी निवांत बोलुय. कसं?'
उत्तमने मान डोलावली. असेही या विषयावर काय बोलायचं हे त्यालाही समजत नव्हतं. पाटील बाहेर पडले आणि त्याने सुस्कारा सोडला . अम्याला चार गणितं सोडवून दिल्यावर तो बाहेर आला. अमृता दोन वह्या घेऊन बसली होती.
'हे काय म्हणायचं?' त्याने विचारलं.
'वर्गात काय लागेल ते सामान जमेल तसं नेते ना मीच. त्याचाच हिशेब हाये.'
तिच्या मन लावून हिशोब करण्याकडे तो बघत राहिला थोडा वेळ. तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला.
मेसेज पाहून हळूच हसला तो. तिनं प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला तो जोक दाखवला आणि मग तीही हसली जोरात.
'मी केला होता असाच विनोद तुला फोरवड.', उत्तम बोलला.
'कधी?' ती.
'मध्याच्या नंबर वरून केला होता.'
'काय नंबर हाये भौजींचा?' तिने विचारलं.
त्याने तिला नंबर सांगितल्यावर ती पळत आतून पप्पांचा फोन घेऊन आली. त्याच्यावर ५ - ६ मेसेज होते. तिने पटापटा ते वाचून पहिले आणि हसली, हसतच राहिली. त्याचे डोळे तिच्यावरून फिरले. केव्हढीशी ती! आधीच वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न झालं त्यात हे असं माहेरी राहणं नशिबी आलेलं. थोडी बारीकच झाली होती ती आणि उगाचच पोक्त वाटत होती. पण हसणं अजूनही अवखळ.
'फोन कधी न्हायी केला ते? ' तिने एकदम विचारलं. तो कावराबावरा झाला.
'आता तुमच्या पप्पांचा फोन तो. माझी काय हिम्मत फोन लावायची? ' तो कसंतरी म्हणाला.
'बघू तुमचा फोन?' तिने विचारलं. 'काय प्लान हाये? पप्पांचा वोडाफोन हाय. ५० म्येसेज फ्री हायेत'.
मग तिनेही एक मेसेज त्याला दाखवला. तो हसला खळखळून.
'थांब तुला गम्मत दाखवतो', असं म्हणून त्याने एक गेम काढला. 'त्या गेम मध्ये साप कसा वाढत जातो हे त्याने तिला दाखवलं. मग तिला म्हणाला 'हे घे.' तिला काही ते जमेना सापाला पकडायला. मग तो आपल्याच शेपटीला टेकला की गेम संपला. मग ती हिरमुसली. हे बघ मी शिकवतो म्हणून त्याने तिच्यासोबत आपलीही बोटं लावली फोनला. त्याच्या स्पर्शाने ती एकदम बावरली. चटका लागल्यासारखी झाली. पण त्याची बोटं तिच्या बोटांवर पक्की बसली होती. सापासोबत तीही मग फिरू लागली, तिचं लक्ष फोनवर कमी आणि त्याच्याकडे जास्त होतं. तोही गेल्या काही दिवसांत वाळला होता. त्याचे डोळे थोडे खोल गेले होते. एरवी दिसणारा तजेला कमी झाला होता. मधेच साप तुटला आणि त्याच्या आवाजाने ती परत फोनवर लागली. मग तिने आपल्या अंगणवाडीतील पोरांच्या गोष्टी सांगितल्या. एका रडक्या मुलाने तिलाच कसे रडवले त्याचीही. मग त्याच्या गोष्टी, आठवीतल्या मुलांच्या. किती त्रास देतात, 'मी पण काही कमी नाही' या आवेशातल्या त्याच्या यशगाथा.
बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला. म्हटला,'चुकलंच माझं. लोकांच्या बोलण्याला मीही बळी पडलो. मीच किती भारी म्हणून विचार करत होतो. मागच्या महिन्यात शेजारच्या मावशीनी सांगितलं तू अंगणवाडीत जातेस म्हणून. वाटलं मी इतका शिकून पण छोटाच राहिलो तू मात्र आहे त्यातून मार्ग काढून पुढे जात राहिलीस. बरेच दिवस हिम्मत होत नव्हती यायची. येताना आक्की पण होतीच आडवायला. शेवटी आज ठरवलंच जायचं म्हणून तुला भेटायला. तुला शाळेत पाहिलं, छान वाटलं एकदम.'
'मी पन हट्टानेच आलो की घरी. वाटलं तुम्ही याल म्हनून. आई-बाप हायेतच मदतीला. पन स्वत:च सर्व आपनच करावं लागतं. शिकावं-सावरावं लागतं. हे शाळेत जायला लागल्यापास्न तुमची लई आठवन काढली, तुम्ही काय बोलत व्हतात ते सगलं आठवलं. मग मन लावून काम करायचं ठरवलं.'
तिच्या खांद्यावर हात टाकून तो तिला जवळ ओढून म्हणाला,',मग मास्तरीणबाई तुम्ही, जमणारच सगळं तुम्हाला.'
तीही त्याच्या खांद्यावर डोकं टेकून विसावली होती, विश्वासाने, प्रेमाने. त्याच्या डोक्यात मित्राचे शब्द घोळवत होते,' अरे बायको कमी शिकली तरी काय झालं? पोरं झाली ना मग बास. त्यांना किती शिकवायचं हे तुझ्याच हातात हाये की?'
-विद्या.
व्वा.... विद्या. सुंदरच कथा.
व्वा.... विद्या. सुंदरच कथा. अगदी धाकट्या माडगुळकरांची वा मिरासदार, शंकर पाटील यांच्यासोबतीने कथानकांच्या शेतात जाऊन तिथल्या कथा वेचत आहे असेच शेवटपर्यंत वाटत राहिले. कथेच्या भाषेतील बाज, ते नैसर्गिक बोलणे, गावाचे वर्णन, आमच्या कोल्हापूरच्या 'पुढारी' चा उल्लेख..... शिवाय मराठी शुद्धतेचा न धरलेला हट्ट....मला खूप भावले.
१९३०-४० पासून मराठी ग्रामीण कथेने इथे आपली जमीन कसदार केली आहे, त्याच पंथातील ही एक [जरी मला शीर्षक काहीसे खटकले असले तरी.....] आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कथेत मोबाईल्सचा सहजी वापर असा काही झाला आहे की भारताची तांत्रिक प्रगती प्रकर्षाने कथाप्रवासात उमटली आहे.
उत्तमराव आणि अमृता.....नक्की राहतील सुखाने. तुमच्या पुढील लेखन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
अशोक पाटील
छान आणि सहजसुन्दर लिहिलय!
छान आणि सहजसुन्दर लिहिलय! आवडली. पु. ले. शु.
मस्त कथा. नवर्याला आपला
मस्त कथा. नवर्याला आपला कमीपणा वाटतो हे पाहून घराबाहेर पडणारी आणी तरीही रडत न बसणारी मानी नायिका आवडली. अशोककाका म्हणाले तसं मोबाईलचा उपयोग फार सही घेतलाय कथानकात.
होय नंदिनी..... 'रडत न बसणारी
होय नंदिनी..... 'रडत न बसणारी मानी नायिका'.....परफेक्ट कॉमेन्ट. मी विसरलोच हा शब्दप्रयोग.
'कन्यादान' नावाचा उषा किरण नायिका असलेला एक चित्रपट आला होता....साल असावे १९६५. त्यातील अपघाताने विधवा झालेल्या नायिकेला त्या काळातही 'रडत न बसणारी' दाखविले होते.
मला वाटते जया भादुरीचाही अशाच कथानकाची सावली असलेला एक चित्रपट होता...पण आता नाव विसरलो.
विद्या भुतकर हे नाव प्रथमच मी इथे पाहात आहे......छानच लेखनशैली आहे.
अशोक पाटील
कथा आवडली पुलेशु
कथा आवडली
पुलेशु
एकदम मस्त वर्णन, वातावरण
एकदम मस्त वर्णन, वातावरण निर्मिती वगैरे पण शेवटचे वाक्यातले " अरे बायको कमी शिकली तरी काय झालं? पोरं झाली ना मग बास" हे (वास्तववादी असले तरी) थोडे खटकलेच.
लिहित रहा, पुलेशु.
हर्पेन..... मला "ते" वाक्य
हर्पेन..... मला "ते" वाक्य नाही खटकले, कारण ग्रामीणच काय पण शहरी भागातही तशा मताची वस्तुस्थिती आहे. मी खूप भटकलो आहे तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात आणि तेथील युवा वर्ग अशा संबंधाबाबत काय रोखठोक बोलत असतो हेही टिपले आहे. काही वाक्ये तर इथे देताही येणार नाहीत इतक्या वरचढपणाचे प्रतिक आहेत. या कथेत तर बायको कमी शिकलेली आहे; पण अशीही उदाहरणे मी पाहिली आहेत की नवर्यापेक्षा अधिक शिकलेल्या बायकोविषयीही असेच मत व्यक्त करताना दिसते.
विद्या यानी संयतपणे ती वस्तुस्थिती चितारली आहे असे मला वाटते....आपण त्याना अधिक प्रोत्साहन देवू.
अशोक पाटील
धन्यवाद. खरतर मी लघुकथा
धन्यवाद. खरतर मी लघुकथा आधीपासुन लिहिते आहे, माझ्या ब्लॉगवर. मायबोलीवर प्रथमच दिली आहे. या कथेचा शेवट जाणिवपूर्वक असा दिला आहे.नायक शिक्शक असूनही असा विचार करतो हे दुर्दैव आहे आणि बरेचदा सत्यही. म्हणून हा शेवट.
-विद्या.
प्रोत्साहन नक्कीच आहे, विद्या
प्रोत्साहन नक्कीच आहे, विद्या यांना, लिखाणाची धाटणी खूप मस्त आहे, अजून खूप लिखाण वाचायला मिळावे अशी ईच्छा आहेच
विद्या, शीर्षक बदलाल का
विद्या, शीर्षक बदलाल का प्लीज? पूर्ण कथेला ते अजिबात मेळ खात नाही.
छान.
छान.
लिखाणाचा बाज आवडला... ग्रामीण
लिखाणाचा बाज आवडला... ग्रामीण कथा बर्याच दिवसांनंतर वाचायला मिळाली.
अशोकजी तुमच्या दुसर्या पोस्टशी सहमत. मी स्वतः तीन वर्षे सांगली भागात काढली आहेत. ग्रूपमध्ये तर कित्येकदा अशा मतांवर मूग गिळून गप्प बसावं लागलं होतं...
त्यामानाने कथानायक चांगलाच समजदार दाखवला आहे.. (सुबहका भुला!)
कथेच्या शीर्षकाबद्दल मलाही वाचलं तेव्हा सुरूवातीला असंच वाटलं होतं की बदललं असतं तर... पण दोघांची भौगोलिक विचारसरणी पाहता... त्यांचं सुख त्यांनी त्यांना हव्या त्या पद्धतीने शोधलं आहे...
संसारात खरं तर हेच मॅटर करतं नं? दोघांच्याही गरजा, भविष्यातील स्वप्ने आणि जगण्याची पद्धत एकरूप झाल्या की प्रत्येक स्टोरीचं टायटल दे लिव्ह्ड हैपिली एवर आफ्टर…. अन्यथा दुरून डोंगर...
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त..
मस्त..
कथा आवडली... विद्या, शीर्षक
कथा आवडली...
विद्या, शीर्षक बदलाल का प्लीज? पूर्ण कथेला ते अजिबात मेळ खात नाही. >>>> +१
१. विद्या ~ तुम्ही वर लिहिले
१. विद्या ~ तुम्ही वर लिहिले आहे....."...नायक शिक्शक असूनही असा विचार करतो हे दुर्दैव आहे..." ~ पण हा विचार नायक उत्तम याचा नसून कथेत त्याच्या मित्राचा विचार दाखविला आहे असे दिसत्ये.... आणि नेमके त्याच क्षणी अमृता त्याच्या "...त्याच्या खांद्यावर डोकं टेकून विसावली होती, विश्वासाने, प्रेमाने...." असेही रंगविले आहे. जर नायिका इतका विश्वास अन् तितकेच प्रेम दाखविणारी असली तर कोणत्याही नवर्याला मित्राचे तसेल शब्द (त्या अवस्थेत तरी) आठवू नयेतच; तरीही कथानकाच्या दृष्टीने तुम्ही तिथे ते घेतले जरी असले तरी त्यामुळे कथेच्या बाजाला अजिबात धक्का लागत नाही....इतकी ती मुळातच हळवी झाली आहे.
२. नंदिनी ~ शीर्षकाबद्दल मी देखील असेच मत व्यक्त केले आहे...पण चला, तो लेखिकेच्या मताचा प्रश्न आहे.
२. ड्रीमगर्ल ~ मी कोल्हापूर सांगली आणि सातारा [काही प्रमाणात सोलापूरही] हे जिल्हे पिंजले आहेत कामानिमित्ताने अक्षरशः. तेथील मुक्कामाच्या ठिकाणी असे डझनावारी नमुने पाहायला, बोलायला भेटायचे. तो काळही दूरदर्शनच्या जमान्यापूर्वीचा असल्याने वडाखाली, पारावर, देवळत गप्पांचे मनसोक्त अड्डेच जमायचे. मी तसा तिथे पाहुणाच असल्याने एखाद्या मताला विरोध करायचाच झाला तर सौम्य भाषा वापरावी लागत असे. पण मतभेदाचे काही प्रकार तर मस्तकात तिडीक उभी करत..... फार कमी लेखत असत स्त्री आणि स्त्री शिक्षणाला काही ठिकाणी.....पण हल्ली मात्र हा प्रकार खूपच कमी झाल्याचे आशादायक चित्र दिसत आहे.
अशोक पाटील
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्तं कथा. मला पण व्यंकटेश
मस्तं कथा.
मला पण व्यंकटेश माडगूळकरांच्या कथाच आठवल्या.
मला शीर्षकही योग्य वाटतंय.
लिहित रहा.
कथा आवडली पुलेशु
कथा आवडली
पुलेशु
मस्त कथा.. आवड्ली..
मस्त कथा.. आवड्ली..
छानच आहे
छानच आहे
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
कांदा चिरून घेत>>> मस्त
कांदा चिरून घेत>>> मस्त
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्तं लिहिलय.
मस्तं लिहिलय.
मस्त ! आवडलीच
मस्त ! आवडलीच
आवडली
आवडली
छाने!
छाने!
गोष्ट छानच लिहीली आहे.
गोष्ट छानच लिहीली आहे. वाचायला सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत वाचाविशी वाटली. माझ्यासारख्या 'साहित्यमूल्ये' वगैरे न कळणार्या सर्वसामान्य माणसाच्या मते लिखाण चांगले असल्याचे हेच लक्षण.
सर्वात महत्वाचे म्हणजे या कथेत मोबाईल्सचा सहजी वापर असा काही झाला आहे की भारताची तांत्रिक प्रगती
नुसतीच भारताची नव्हे तर भारतीयांची पण. कुणीहि चटकन मोबाईल वापरतात. इथे कित्येक जण असे आहेत की त्यांच्या कडे मोबाईल नसतो, किंवा असून वापरता येत नाही.
Pages