का रे इतका लळा लावूनी...

Submitted by कविन on 6 September, 2013 - 02:46

हॉस्पिटलमधे डॉक्टर नवजात बाळ जेव्हा आई बाबांच्या हातात देतात तेव्हा कशा मिश्र भावना असतात ना मनामधे. आनंद, भीती थोडं नवखेपणाच दडपण, उत्सुकता सगळच एकाचवेळी चेहऱ्यावरुन.. देहबोलीतून ओसंडून वहात असतं.

तुला पहिल्यांदा बघितलं ना आम्ही तेव्हाही असच झालं होतं आमचं.

तुझ्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करून मग अनुभवी दाई, ताई, मावशी, काका, मामा सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली. सगळ्यांकडून हे भरमसाठ सल्ले पोतडीत जमा झाले. गुगलबाबाही होताच मदतीला, त्याचीही वेळोवेळी मदत घेऊन झाली.

तुझ्या परीने तू स्वत:ला व्यक्त करत आमच्या पोतडीत दरवेळी नव्या गोष्टींची भर घालत होतास ते वेगळच.

वाट चुकून आलेला तू... तुझे सखे सोबती "सर्व्हावयल ऑफ़ द फिटेस्ट" च्या शर्यतीत कुठेतरी कमी पडले आणि उरलास तू आणि अजून दोघे. म्हणून मग तुम्ही तिघे तीन घरात दत्तक गेलात, आमच्या दृष्टीने तुमची जगण्याची दोरी प्रबळ करण्याच्या हेतूने.

पहिले आठ दिवस अगदी रूसून बसलेलास, नवीन वातावरणाशी जुळवून घ्याव की नाही? असा विचार करत होतास की काय कोण जाणे पण अन्नालाही शिवला नाहीस. आमचं बिपी सारखं वर खाली.. मग आमची वरात तज्ञाकडे, काय होतय तुला हे विचारायला. त्यांच्या कडून फ़क्त "डोन्ट वरी" हे ऐकण्यासाठी.

मग आठ दिवसांनी तुलाच आमची दया आली असावी किंवा आलिया भोगासी असं म्हणत तू तुझा असहकार तोडत व्यवस्थीत खायला लागला असावास.

अर्थात हे सारे आमचे अंदाज. काश! तुझी भाषा आम्हाला येत असती.

मग त्यातही माझी कॉलर बरेच दिवस ताठ कारण तू प्रथम माझ्या हाताने जेवलास. आणि मग पुढे महिना दोन महिना तू फक्त आणि फक्त माझ्या हातूनच जेवायचास.

आधी वाटलं हा माझा अंदाज आहे. भास आहे. मीच नेमकी भूक लागते तेव्हा असेन समोर खाणं द्यायला. मग मी प्रयोग केले. तुझ्या भुकेच्या वेळी बाकीच्यांना खाणं द्यायला लावलं. पण तू ढुंकूनही बघितलं नाहीस. बाकीचे म्हणे भूकच नसेल तुला कदाचित त्यावेळी. मग मी चार दाणे खाऊ घालून बघायचे तर पटकन येऊन मटकवायचास. एकदम लब्बाड मुलासारखा.

मग बाकीचे उगाच हिरमुसून जायचे. मग आपणहोऊन तू त्यांच्याकडून पण खाऊन घ्यायला लागलास.

तुला टब मधून बाहेर यायचं आहे.. तुला भूक लागलेय... तुला करवंटीत लपून रहायचय... तुला आता पाण्यात वाळू दगड नको आहेत पासून ते तुला आता शी होतेय इतकं सार तुझं वेळापत्रक आम्हाला कळेल अशा देहबोलीत सांगू लागला होतास.

मग कुठून तरी गुगल बाबा म्हणाला "दे फ़ील लोनली. दे नीड कंपनी" झालं आम्ही लग्गेच गुगल बाबा की जय म्हंटलं.

अनायसे कंपनी मिळायची लक्षण दिसल्यावर लग्गेच संधी साधली.

इथेच चुकलो का रे आम्ही? तरी लग्गेच तुम्हा दोघांची वेगळी व्यवस्था केली. पण तू शॉक घेतलास एकदम शांत शांत झालास.

आणि तुला दवाखान्यात नेलं आम्ही पण तू त्या आधी कायमचाच शांत झालास.

हेतू चांगला होता रे आमचा कंपनी आणण्यामागचा पण लक्षातच नाही आलं प्रत्येकाची प्रकृती निराळी.. गरज निराळी.. तुझी भाषा कळली असती तर...

पण असो उशीराने आलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो.

आता तुला आपल्याच बागेत पुरलय. एक छानसं झाड तिथे लावायचं ठरवलय तुझी आठवण म्हणून. ते झाड तरी वाढूदे अशी प्रार्थना करशील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"...ते झाड तरी वाढूदे...."

~ ही प्रार्थना फार पोएटिक आहे......छान कल्पना आणि खरंच लावले असेल तर झाड ते तगेलही.

Sad

अंगावर आलं हे... Sad
जवळच्यांची ताटातूट झाल्यावर त्रास होतोच... अशा प्रत्येक अनुभवातून आपण मोकळे आणि कोरडे होत जातो हा अपरिहार्य निकाल...

तुझी भाषा कळली असती तर... >>>> भिडलं हे वाक्य.. माणसांनाही लागू व्हावे.. भाषा कळते समोरच्याची, पण काय हवे नको हे खरेच कळते का..

जवळच्यांची ताटातूट झाल्यावर त्रास होतोच... अशा प्रत्येक अनुभवातून आपण मोकळे आणि कोरडे होत जातो हा अपरिहार्य निकाल...
>>
हे लिहायलाच हवं होतं का? Sad
यू मेड मी क्राय अगेन नचि!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Sad

अरेरे..फार ह्रुदयद्रावक.

लेख वाचता वाचता 'ते' म्हणजे कोण याची क्रमाक्रमाने स्थित्यंतरे होत गेली.
नवजात अर्भक --> कुत्र्याचे पिलू --> माशाचे पिलू.

शेवटी अके ची प्रतिक्रीया वाचल्यावर कळाले की 'टर्टल' होतं म्हणुन. अजूनच चटका लावून गेलं मग.

Sad

Sad

Sad

अरेरे..फार ह्रुदयद्रावक.

^^^लेख वाचता वाचता 'ते' म्हणजे कोण याची क्रमाक्रमाने स्थित्यंतरे होत गेली.
नवजात अर्भक --> कुत्र्याचे पिलू --> माशाचे पिलू.

शेवटी अके ची प्रतिक्रीया वाचल्यावर कळाले की 'टर्टल' होतं म्हणुन. अजूनच चटका लावून गेलं मग.^^^

असेच वाटले... हळहळ वाटली.. कासव तर अगदी मुका जीव.
त्यामानाने भुभू आणि माऊ थोडे तरी सांगू शकतात की त्यांना काय होतेय..

ह्म्म्म्म… काय बोलणार…

आमचा साया रस्त्यावर होता पडलेला. उचलुन आणला आणि आमचाच झाला. त्याच्यासोबत कॉफी व स्पॉटी पण होते ( हा विडिओ पाहा, किती मैत्री होती तिघांची -

https://youtu.be/d-9B72S34iM?feature=shared

https://youtu.be/WxEDLkLJcKk?feature=shared )

यथावकाश स्पॉटी मोठी झाली, तिला पहिल्या खेपेस झालेल्या पिल्लात ३ फिमेल होती, ती सोडुन बाकीची पिल्ले लोक घेऊन गेले, फिमेल राहिली. नंतर स्पॅाटी व तिची पिल्ले घर सोडुन गेली. स्पॉटीत एक अवगुण होता तो म्हणजे जेलसी. मी किंवा ऐशुने कोणाला जवळ केलेले तिला आवडायचे नाही. ज्याला जवळ केले तो नंतर तिच्या तावडीत सापडला की ती त्याला बदडुन काढायची. पण सायावर कधी हा प्रयोग तिने केला नव्हता.

एका घातवारी दुपारी स्पॅाटी व तिची तिन मोठी झालेली पिल्ले व्हरांड्यात येऊन बसली. ती कधीच यायची नाहीत खरेतर. फक्त स्पॅाटी एकटीच जुने दिवस स्मरून येऊन बसायची. मी ॲाफिस कॅालवर होते व साया मला लगटुन झोपलेला. ऐशु तिथे आली आणि झोपलेल्या सायाला ऊचलुन बाहेर व्हरांड्यात गेली. त्याला हातांवर घेऊन ती लाड करायला लागली. स्पॅाटी व तिच्या मुली हे पाहात होत्या. अचानक सायाने तिच्या हातांतुन खाली ऊडी मारली. तो अंगणात धावला आणि त्याच्यामागुन स्पॅाटीच्या तिन्ही मुली धावल्या. त्यांनी सायाला कॅार्नर केले व हल्ला केला. ऐशु किंचाळायला लागली म्हणुन मी धावत गेले. त्या तिघी सायाला ऊचलुन आपटत होत्या आणि स्पॅाटी शांतपणे बघत होती. तिन कुत्र्यांना आवरणे मला शक्य नव्हते. मी शेवटी मोठी काठी आणुन त्या तिघींना मारले व सायाला सोडवले. चौघींही पसार झाल्या. साया जमिनीवर पडलेला पण जीवंत होता. त्याची हालत पाहता तो तासाभरात जाईल असे मला वाटले. ऐशु तर खुप अपसेट झाली होती. आम्ही डॅाक्टरला फोन केला. सुदैवाने एक वेट शेजारच्या गावात होता. तो दोन तासांनी आला. त्याने एक ईंजेक्शन दिले पण फार आशा दाखवली नाही.

आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला येणार होतोच, सोबत सायाला पण आणले. त्याला दोन डॅाक्टर्सना दाखवले. एक्स रे वगैरे सगळे झाले त्यात कळले की त्याचा कणा मोडलाय.

शिवडीच्या हॅास्पिटलातही फोन केला पण तिथले डॅाक्टर म्हणाले की मांजरावर ॲापरेशन सहसा करत नाही कारण खुपच लहान रचना असते, कुत्र्यांची सर्जरी करतात. ईथल्या डॅाक्टरने सायाला झोपवायचा सल्ला दिला. पण आम्हाला धीर होईना. तो अर्धवट ऊठुन बसायचा पण कुसही बदलता येत नव्हती. जमिनीवर सरकत थोडे फिरायचा. झोपवणे हाच सल्ला योग्य होता पण स्विकारणे जमेचना आम्हाला.

तो अर्धवट बसुन दिवसभर भिंतीकडे बघत बसायचा. खाणे सोडले होते. मी त्याला सांगितले की आम्ही प्रेमाने त्याला सांभाळणार. त्याचे अंग सतत ओले व्हायचे. पुसत राहावे लागायचे. चार दिवसांनी एका सकाळी मी उठले तर पुर्ण हॅालभर ओला पट्टा वेडावाकडा ओढलेला होता. साया अंग घासत हॅालभर फिरला आणि एका कोपऱ्यात जाऊन शांत झाला.

ऐशुने नंतर स्पॉटीवर राग काढायचा सतत प्रयत्न केला आणि मी तिला वाचवायचा. ऐशुचा राग यासाठीच होता की स्पॉटीने मुलींना अजिबात थांबवले नाही. ती खुप जेलस व्हायची हे आम्ही खुप वेळा पाहिले होते. ऐशुने सायाला उचलुन त्याण्च्यासमोर गोंजारत राहिली याचा स्पॉटीलाही राग आला असावा. ज्यांनी कुत्री मांजरी पाळली नाहीत त्यांना खोटे वाटेल पण हे प्राणी सगळ्या भावना बरोबर व्यक्त करतात.

साधना, खूप वाईट वाटले sayaa बद्दल वाचून.
तू घेतलेला निर्णय प्रॅक्टिकल नसला तरी योग्य होता.
जितके जमले तितके केले हे तरी मनाला शांत करते.
त्याचं आयुष्यच तेवढे होते ग आणि तुझ्या घरात त्याचे तितकेच वास्तव्य लिहिले होते...

^^ज्यांनी कुत्री मांजरी पाळली नाहीत त्यांना खोटे वाटेल पण हे प्राणी सगळ्या भावना बरोबर व्यक्त करतात.^^
अगदी खरे आहे.
मी मागच्या महिन्यात एक खूप आजारी माऊ घरी आणले होते. तर माझ्या घरच्या एका माऊ ला खूप insecure वाटले होते. तिच्या चेहऱ्यावर भाव वाचता येत होते अगदी.... तिने त्यामुळे बेडशीट फाडले, घरात सु शी केली, जी एरवी खूप शहाणे माऊ आहे.
ते आजारी माऊ बरे होऊन परत निघून गेले मग हळूहळू घरची माऊ नॉर्मल झाली.