आता ती माझी नाही

Submitted by वैवकु on 2 September, 2013 - 15:58

कुठलाच शब्दही नाही की जाती माझी नाही
जी गझल तुम्हा आवडली बहुधा ती माझी नाही

ह्या इथे मला पिकवाया मी चुकुन पेरले होते
ही जमीन माझी नाही ही माती माझी नाही

मी तिच्या सावलीमध्ये हा जन्म जाळला अवघा
म्हणतेच कशी मग माया सांगाती माझी नाही

आकाशावरही त्यांनी हा दगड फेकला होता
आकाश फाटले होते ...पण छाती माझी नाही !

तुमच्या हृदयाच्या डोही जो तरंग उठला आहे
ती मुकी वेदना माझी ही गाती माझी नाही

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला, तिसरा आणि शेवटचा शेर आवडला.

गाती हा शब्द समजला नाही.

चुकुन हा शब्द चुकून असा हवा होता का? की सूट घेतली आहे?

मतला सुरेख आहे, जाती चा संदर्भ लागायला जरा वेळ लागला, पण मग अगदीच भावला.

जमीन आणि माती पुनराव्रुत्ती आहे का? असल्यास ती तशी का आहे हे समजले नाही.

ही जमीन माझी नाही ही माती माझी नाही

मी तिच्या सावलीमध्ये हा जन्म जाळला अवघा
म्हणतेच कशी मग माया सांगाती माझी नाही

मस्त!

शेवटचा शेर मिश्कीलीला दु:खाची किनार असल्याने तोही आवडला.

गाती म्हणजे काय?

दगडाच्या शेरावरून अपरीहार्यपणे 'दुष्यंतकुमार' आठवले(संदर्भ : एक पत्थर तो तबीयत से उछालो दोस्तो)

शुभेच्छा!

कुठलाच शब्दही नाही की जाती माझी नाही
जी गझल तुम्हा आवडली बहुधा ती माझी नाही

तुमच्या हृदयाच्या डोही जो तरंग उठला आहे
ती मुकी वेदना माझी ही गाती माझी नाही

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही

>> हे तिन्ही आवडले.
मतला आणि 'गाती' मधून साधारण सारखीच अनुभूती मिळाली, तरी दोन्ही आवडले.
शेवटचा शेर सरळ आणि थेट आहे.

उर्वरित शेर मात्र गूढ व संदिग्ध वाटले. वाचताना मजा आली, पण नेमके काय हाती लागले ते सांगता येणार नाही.

------------------------------------------------

अवांतर - विठ्ठल कुठाय ? Wink

कणखरजी,

गाती म्हणजे काय? >>>>

'गाणारी' असं म्हणायचं असावं.
हृदयात मूकपणे तरंग उठवणारी मूक वेदना माझी आहे. कविता सुचवणारी, गाणं स्फुरवणारी वेदना माझी नाही. - असं काहीसं असावं.

दगडाच्या शेरावरून अपरीहार्यपणे 'दुष्यंतकुमार' आठवले(संदर्भ : एक पत्थर तो तबीयत से उछालो दोस्तो) >>>>

अगदी अगदी !! Happy

कोरा ,कणखरजी, जितू मनःपूर्वक आभार

गाती म्हणजे गात असलेली !!
ही लय हे सूर हे शब्द ह्यत जी वेदना दिसते आहे ती माझी नाही (ती तुमची असावी )व म्हणून तर ही गाणारी वेदना पाहून तुमच्या हृदयाच्या डोही जो तरंग उठला आहे ती आह आहे ती माझी आहे तिच्यावर माझा अधिकार मी सांगतो आहे
शायराचे शेर तेव्हा आवडतात जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होवून ते अनुभवू / महसूस करू शकतो अश्यावेळी दोनो तरफ जी एक कळ उठलेली असते ती नक्की कुणाची म्हणायची ? तिच्यावर अधिकार कुणाचा Happy
मुळात आपण म्हणतो की शेरात एक संवेदना असते संवेदना म्हणजे बाहेरून आलेल्या एका वेदनेला मनाने दिलेला रिप्लाय ! आता मी शेर ऐकवल्यावर तुमच्या हृदयाच्या डोही मूक तरंग उठणे हीतुमची संवेदना आहे की माझ्या वेदनेचे तुमच्या हृदयात उमटलेले प्रतिबिंब !!
संवेदना तर मी माझ्या शेरात गुंफली होती ती तुमच्या हृदयात आता दिसत असली तरी मीही तिच्यावर अधिकार सांगू शकतो तद्वत अश्या शेरावर तुम्ही रसिकही तितकाच अधिकार सांगू शकता Happy

दगडाच्या शेराबाबत मलाही तसेच वाटते आहे दुष्यंतकुमारांची कृपादृष्टीच म्हटली पाहिजे

विठ्ठलाचा शेर आहे की .............शेवटचा शेर बघ जितू ....तो विठ्ठल आहे आणि ती माझी गझल !!!!! Happy

कुठलाच शब्दही नाही की जाती माझी नाही
जी गझल तुम्हा आवडली बहुधा ती माझी नाही
>>>
हा शेर मस्त असणारेय पण जाती माझी नाही मधुन नेमकं काय सांगायचय ते मला कळालं नाहीये

ह्या इथे मला पिकवाया मी चुकुन पेरले होते
ही जमीन माझी नाही ही माती माझी नाही
>>> खूप आवडला...

मी तिच्या सावलीमध्ये हा जन्म जाळला अवघा
म्हणतेच कशी मग माया सांगाती माझी नाही
>>>> ठिक आहे Happy
आकाशावरही त्यांनी हा दगड फेकला होता
आकाश फाटले होते ...पण छाती माझी नाही !
>>>> खुप मस्त!

तुमच्या हृदयाच्या डोही जो तरंग उठला आहे
ती मुकी वेदना माझी ही गाती माझी नाही
>>>>> गाती शब्द पटला नाही.

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही
>> यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे विठ्ठल काही सापडला नाही....
पण जो मला लागला तोच अर्थ मला जास्त आवडलाय आणि त्यामुळे माझ्यासाठी हा शेर आणि माती वाला शेर सगळ्यात बेस्ट आहेत Happy

(गझलेतलं मला इतकंच कळतं Happy )

धन्स रिया
जाती हे मात्रावृत्त चे सिनॉनिम आहे ( ही गझलही मात्रावृत्तात आहे )
गाती हा शब्द सर्वार्थाने बरोबरच आहे रिया ..मराठीच्या व्याकरणात 'गाणारी' हा शब्द अश्याप्रकारे बसतोच बसतो नक्कीच तू पाहिला नसावास म्हणून तुला असे वाटत असावे पण आता तुला माहीत झाला आहे त्यामुळे होप्स की आता यापुढे असे शब्द तुला अन्यूज्युअल वाटणार नाहीत Happy

पुनश्च धन्स

गाती शब्द बरोबरच आहे
गाणे फुले गाती, सवे वृक्ष हे डोलती असली काही तरी कविता मी लहानपणी केलेले मला स्पष्ट आठवतेय... पण तो शब्द मला इथे पटला नाही इतकंच Happy
मला पटायलाच हवा असं काही नाही:)

जाती हे मात्रावृत्त चे सिनॉनिम आहे ( ही गझलही मात्रावृत्तात आहे )
>>>
मला वाटलेलंच की हे अस्लं काही तरी असणार Happy
छान आहे हा ही शेर!

>>विठ्ठलाचा शेर आहे की .............शेवटचा शेर बघ जितू ....तो विठ्ठल आहे आणि ती माझी गझल !!!!>>>>

_/\_ वैभव !!!

आकाशावरही त्यांनी हा दगड फेकला होता
आकाश फाटले होते ...पण छाती माझी नाही !

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही

हे दोन सर्वात विशेष वाटले.

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही<<< वा वा

मी काल तिच्या नवर्‍याची थोडीशी गम्मत केली
ती हिरमुसल्यावर कळले आता ती माझी नाही >>>>>लै भारी