सारे प्रवासी घडीचे

Submitted by रैना on 11 June, 2009 - 14:28

केदारनी पुस्तकांच्या सुलभवर्गीकरणाची कल्पना मांडली आहे म्हणून आपल्यापरीने मॉडसचे काम थोडे तरी हलके व्हावे म्हणून - याच पुस्तकावरची मतं इथे एकत्र केलीत.

जयवन्त दळवींचे सारे प्रवासी घडीचे.
मॅजेस्टिक प्रकाशन

tanyabedekar | 12 ऑगस्ट, 2008 - 12:12
सारे प्रवासी घडीचे - ले. जयवंत दळवी.

कित्येक वर्षं झाली हे पुस्तक वाचुन पण मनातुन पुसले नाही गेले कधी. नरु, बिड्या आणायला पैसे देणारी आजी आणि त्यातुन कडक लाडू आणणारा नातू, दादू गुरवाचो वस्त्रहरण, बाबल्याच्या मुलीबरोबरची छोटीशी प्रेमकहाणी, शिरोड्याचं वर्णन, गावतलं देउळ, तिथला उत्सव, नवस.. i am neru म्हणणारा नरु.. अतिशय सरळ साध्या भाषेत लिहिलेलं, उगा कोट्या करत विनोदनिर्मिती न करता पात्रं, प्रसंग आणि कथानकातून विनोद निर्माण केलेले हे माझ्या मते मराठि मधील सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकांपैकी एक आहे.

ह्या पुस्तकाच्या शेवटचे कंसातले वाक्य: 'ह्या पुस्तकातील सर्व वर्णने व पात्र काल्पनिक आहेत' हे वाचुन मला उगाचच तेव्हा दळवींचा राग आला होता इतकी ही पात्रं खरी उभी केलेली आहेत (अर्थात ह्यातले अनेक प्रसंग आणि पात्रं ही खर्‍या व्यक्तिरेखांवरुन व प्रसंगावरुनच उचललेली असणार)

शिरोड्याला मंदिरात गेल्यावर तिथल्या सपाता बघुन ह्या पुस्तकाची प्रचंड आठवण आली.. आजही तिथे तितक्याच उत्साहाने दशावताराचे प्रयोग होतात.. पुरुष नट स्त्रीपार्टीचे काम करतात.. लोकं मधेच उठुन बक्षिस देतात आणि प्रयोग थांबवून ज्याने बक्षिस दिले आहे त्याचे नाव मोठ्याने जाहिर केले जाते.

srk | 10 जून, 2009 - 06:39
दळवींचं "सारे प्रवासी घडीचे" वाचलय का कुणी? अतिशय उदास आणि अतिशय विनोदी यांचं अफलातून मिश्रण यात आहे.
_______________________________
"शापादपि शरादपि"

शास्त्रींच्या कृपेनी वाचायला मिळाले. धन्यवाद टण्या.
भौगोलिक दृष्ट्या ज्या गावाचा नकाशा काढता येणार नाही अशा उशीकडे डोंगर, पायाकडे समुद्र आणि अंगाखाली लाल मुरमाड मातीच्या गावातली जबरी तर्कट पात्र आहेत यातली सगळी. एकाहून एक दळिद्री आणि विक्षिप्त माणसे, आणि त्यांच्या तिरसटपणाचे करुणविनोदी किस्से. एकेकाच्या वर्णनाला कप्पाळाला हात मारावसा वाटतो, आणि घशात आवंढा दाटतो.
"कुठलेही वादी इथे रुजले नाहीत. फक्त वादी आणि प्रतिवादी हे दोनच वादी तेवढे मूळ धरुन राहिले. सारे काही तिरकस नजरेने पाहायचे हे आमच्या अंगवळणी पडलेले. लहानपणापासून तेच एक बाळकडू."
"(माणसं) बिचारी दु:खात मुरलेली होती. दु:ख म्हणजे काय याची निराळी कल्पना नव्हती. दु:खाचा अलग विचार त्यांच्या मनात कधी आला नाही. जसे जमले तशी जगली. वागण्यात सांगड नव्हती. स्वभावावर बेगड नव्हती."

""कृष्णा धाव रे ! धावून ये इकडे !
नराधम सोडतो लुगडे ""
अफाट आहे हे द्रौपदीवस्त्रहरण प्रकरण !! आणि वर उल्लेखिलेली सगळीच प्रकरणं.

वाचाच !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही टण्याचंच कौतुक ऐकून (वैतागून Happy ) शोनूकडून घेऊन वाचलं. आवडलं. व्यक्तिचित्रणं सगळीच झकासच आहेत. माणसं कागदातून उठून उभी होवून भेटतात असं वाटतं.

(तरीही पुलंपेक्षा हा विनोद वरच्या दर्जाचा कसा हे मात्र कळलं नाही ते नाहीच. लिखाणाचा ए़कूण बाज आणि दर्जाही. आमचा अंतू बर्वा काय वेगळा आहे हो?) Happy

विनोदाचा भाग (दोन्ही अर्थी) जाऊ दे, पण एकूण nostalgia sells हे मनात येत राहिलं बाकी वाचताना.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

सगळीच व्यक्तिचित्रणं मस्त आहेत. सगळी पात्र जिवंत होऊन पुढे येतात.
दर्जा ठरवण्याची माझी लायकी नाही. पण पुलंपेक्षा शैली वेगळी आहे हे नक्की.
nostalgia sells >>> अनुमोदन.

रैना मी त्या "धावुनी ये इकडे" बद्द्ल लिहीणार होते पण सध्या ज्वलंत परीस्थिती असल्यामुळे आवरलं. द्रौपदी वस्त्रहरणाचं नाटक वाचतांना अक्षरशः हसुन हसुन पोटात दुखतं अजुनही. कितीही वेळा वाचलं तरी.
द्रौपदीच्या बायकोनं "मेल्या सोड सोड. पडतील ते" म्हंटल्यावर त्याला (दु:शासनाला) आणखी जोर आला.
आणखी
(आईच्या हृदयाला पाझर फुटावा म्हणुन जमिनीवर गडबडा लोळल्यावर आईचं हे वाक्य)
"मेल्या डुकरासारखो लो़ळतय कित्याक!" हे तर इतक्यांदा वाचुन घरातले सगळे हसुन बेजार होतो तरी शिळं व्हायला तयार नाही.
पावट्या, निवडणुक, सहभोजन त्यातलं पूर्णान्न, "नाही कुत्रं तरी तोंड लावतय का ते बघतय"
देवा रे! नुसतं आठवुन एकटीच हसत बसलेय.

खरं तर मला मामाकडे जातांना बसच्या सीटवर या पुस्तकाची दोन पानं सापडली होती. त्या पानांनी असं बांधुन टाकलं की घरी परतल्यावर लायब्ररीतल्या काकांना हैराण करुन सोडलं. कारण मी "घडीचे प्रवासी" असं नाव सांगत होते. पण शेवटी त्यांना बिचार्‍यांना कोकणची पार्श्वभुमी सांगितल्यावर कळलं एकदाचं. वाचुन झाल्यावर आईबाबांनी ते विकतच आणुन दिलं. Happy

_____________________________
"शापादपि शरादपि"

मला दोन्ही प्रकारचे विनोद आवडतात. पुलंचं सगळंच लिखाण मला आवडतं. त्यांच्या लिखाणात आशेचा धागा न सुटल्यामुळे ते खूप जणांना ते आवडत असावं.
आंबा आवडला म्हणुन चीकु आवडु नये असं कुठे आहे? त्या त्या चवीसाठी ते ते फळ आवडतं.
_______________________________
"शापादपि शरादपि"

आमचा अंतू बर्वा काय वेगळा आहे हो? >> अंतू बर्वा ही एक उत्तम कलाकृती आहेच. मी दुसर्‍या एका बाफवर उल्लेख केल्याप्रमाणे बटाट्याची चाळ आणि व्यक्ति आणि वल्ली ही दोन पुस्तके पुलंची फिक्स्ड डिपॉझिट. पण व्यक्ति आणि वल्लीतले व्यक्तिचित्रण हे कथाकथनाच्या बाजाने जाणारे आहे. दुसरे म्हणजे त्याला त्रोटक व्यक्तिचित्रणाची अंगभूत मर्यादा आहे. उदाहरणार्थः जुम्मन (की ओड्डल? मूळ कथेचे नाव आठवत नाही पण पुढे तुंबाडात त्याचा ओड्डल झाला) नावाच्या कथेत ओड्डलचे व्यक्तिचित्रणच आहे. पण त्याची पुढे तुंबाडसारखी एक सशक्त कलाकृती जन्माला आली. आणि व्यक्ति आणि वल्लीमधील काही व्यक्तिचित्रे ही ओढून ताणून चमत्कृती निर्माण केलेली मला वाटली: उदा नंदा प्रधान.

माझा आक्षेप पुलं आवडण्याला नाही. तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण पुलं हे मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक आहेत ह्या विधानास माझा विरोध राहिल. (आता असा विरोध केल्याने काही फरक पडणार आहे का? छे! पण जित्याची खोड. तीच गोष्ट बाकी अनेक हिट पुस्तकांची. हीच गत इंग्रजीत आहे, इतर कलाप्रकारात जसे चित्रपट ह्यात आहे.)

'बाकी विनोदासाठी विनोदनिर्मिती ('असामी असामी', अघळ पघळ चघळ वगैरे वगैरे)' ह्यावर माझे मत ठाम आहे.

नाटक, सिनेमा, रुपांतरे, संगीत, साहित्यीक मिमांसा अश्या अनेक बाबतीत हा मनुष्य सामान्यांपेक्षा अनेक अंगुळे वरती होता ह्यात वादच नाही.

खुप लहानपणी वाचलं होतं हे पुस्तक. ह्या कादंबरीवर दूरदर्शनव्र एक मालिका बनणार होती 'सारे प्रवासी घडीचे' ह्याच नावाने, त्यात एका वर्गमित्राला घेतलं होतं म्हणून तेव्हा फार उत्सुकतेने हे पुस्तक वाचलं होतं आणि आवडलंही होतं. आता सगळे संदर्भ धूसर झालेत, परत मिळवून वाचलं पाहिजे.

ती मालिका मात्र एका शेड्यूलचं चित्रिकरण पूर्ण होऊनही डब्यात गेली. कदाचित 'कुछ खोया कुछ पाया' ला स्पर्धात्मक वाटली असावी.

स्वाती मला पण पुलंपेक्षा वगैरे काय वाटलं नाही. ( पण पुलंची सगळीच पुस्तकं महान आहेत असंही वाटत नाही). अभिरुची घडवायला पुलंचे योगदान विसरता न येण्यासारखे वाटते आणि अनेकदा, अक्षरशः अनेकदा झाकोळल्या मनःस्थितीत पुलं हे माझं वर्षानुवर्षांचं आनंदाच झाड आहे.
मला पुलंची खालील पुस्तकं आवडतात. पु.ल. एक साठवण, बटाट्याची चाळ, असामी, व्यक्ति आणि वल्ली, जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, मैत्र, गाळीव इतिहास.
पाहायला वा-यावरची वरात, ऐकायला वटवट वटवट, असामी, बिगरी ते मॅट्रिक.

टण्या-सारे प्रवासी ला सुद्धा त्रोटक व्यक्तिचित्रणाची मर्यादा आहेच. त्या संदर्भानेच सर्व व्यक्तिचित्रणं येतातच ना ?

बाकी शिल्लक मध्ये दळवींनी विनोद विषयक भुमिका स्पष्ट केली आहे. मला समजलं आणि आठवतय तसं माझ्या शब्दात लिहिते. त्यांच्या मते सर्वाथाने विनोदी असं काही असत नाही, तो एक नऊ रसातील रस. विनोद येतो तो अगदी सहज, तो कुठल्याही प्रसंगाला किनार म्हणून, अनेक रंगांपैकी एक. म्हणून विनोदीच फक्त लिहायचा अट्टाहास केला की तो कृत्रिम होतो.

पुलंनी बहूधा पुंडलिकांनी घेतलेल्या मुलाखतीत विनोदकाराला "sense of proportion " असणं फार सुंदर विषद करुन सांगीतलं होतं.
त्यांची विनोदबुद्धी फारफारतर तिरकस, छद्मी आणि अंगावर येणारी तुच्छ कधीच नाही. निर्मळ.
त्यांनी कुठेतरी- आमच्या वेळी मराठी भाषा भरजरी शालूपैठण्या लेऊन असायची, तिला नेसुच्या वस्त्रात आणेस्तोवर.. वगैरे म्हणलय. पण ही त्यांची स्वतःला दिलेली सूट असावी. ती उणीव त्यांनी आस्वादकाच्या भुमिकेतून शतश: भरून काढली.

पुलं जेवढे उत्तम आस्वादक होते तेवढे उत्तम लेखक झाले नाहीत असं मला वाटतं. (पुन्हा आपली स्वतःची लायकी काय हा प्रश्न बाजूला ;-)) . पण त्यांच्या इतकं ऑलराऊंडर आणि संपन्न आयुष्य पाहिलं की हेवा वाटतो. त्यात सुनिताबाईंच योगदान किती मोठं हेही पदोपदी जाणवतं.

एक अप्रतिम पुस्तक!!! मी कोरं करकरीत वाचलंय, त्यामुळे अजूनच आवडलं. (कोणाला काय, तर कोणाला काय! :))
हातात घेताना 'जयवंत दळवींचं आहे, आपल्याला समजेल की नाही?' अश्या धाकधुकीनंच घेतलं होतं, पण पहिल्या पानापासून पकड घेतं. सशक्त आणि समर्थ व्यक्ती/ स्थलचित्रण. जस्ट टू गूड! Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

वाचले नाही अजून हे. राहून गेले. आता आणतो.

'जयवंत दळवींचं आहे, आपल्याला समजेल की नाही?'
>>>
अगो, दळवी म्हणजे तुला काय सार्ते वाटला की काय? (त्या सार्तेचे बीइंग अँड नथिंगनेस नावाचे पुस्तक आहे. त्याला माझा मित्र श्रीखंडात पोहणे असे म्हणत असे Proud )
बरे आता समग्र दळवी कुणाला मिळाला तर घेउन ठेवा माझ्यासाठी. त्यातल्या त्यात चक्र, धर्मानंद, वेडगळ (हे वेडगळ एक दुर्लक्षित पुस्तक). पुरुष मूळ संचात बघितलेले कुणी भाग्यवान आहेत का? त्याबद्दल दुसर्‍या कुठल्यातरी बाफ वर लिहा.

>> त्यांची विनोदबुद्धी फारफारतर तिरकस, छद्मी आणि अंगावर येणारी तुच्छ कधीच नाही. निर्मळ. >>> कदाचित ह्यामुळे ते मला आवडत नसेल. माझ्यामते निर्मळ वगैरे कधी काही नसते. जे असते ते उघडे, बोडके, स्वार्थी. म्हणुन 'मला' त्यांचे लिखाण सच्चे वाटत नाही.

टण्या-सारे प्रवासी ला सुद्धा त्रोटक व्यक्तिचित्रणाची मर्यादा आहेच. त्या संदर्भानेच सर्व व्यक्तिचित्रणं येतातच ना ?
>>>
मी सहमत नाही. सारे प्रवासी घडीचे मध्ये व्यक्तिचित्रणासाठी कथानक येत नाही तर कथानकात व्यक्तिचित्रण येते. 'ढगळ खाकी रंगाचा सदरा, त्याला वर दोन खिसे - त्या खिशात पेन, पेन्सिल, सुइ-दोरा, पंचांग, बिब्बा, अमृतांजन, काड्यापेटी अशी एकाशी दुसर्‍याचा संबंध नसलेल्या वस्तु (इथे जीआयपीच्या डब्यासारखी काहीतरी फुटकळ उपमा) - डोक्यावरची टोपी कललेली, धोतराला क्लिपा घातलेल्या आणि एका हातात सायकल घेउन वरच्या आळीतल्या मामा की काकांना जोरात हाक घालणारा हरितात्या मला आजही डोळ्यासमोर दिसतो' असलं काहितरी हे व्यक्तिचित्रणासाठी लिहिलेलं झालं. (आणि हे सगळं एखाद्या घरात टेपवर पुलंच्या आवाजात लागलेले आहे आणि त्याच टेपमधले ह्याह्याह्या-ख्याख्याख्या असले हशाचे आवाज अशी कल्पना करा. आता ह्या वाक्यावर हसण्यासारखे काय हे मला न उलगडलेले कोडे आहे. ह्म्म्म्म. असो. मी बीभत्स असा शब्द लिहिणार होतो पण आता तो मागे घेतला Proud ) मग त्यात एखादं लग्न घाला नाहीतर मयत घाला नाहीतर तेरावा. फारसा फरक पडणार नाही.
बिड्या ओढणार्‍या आजीपासून बाबुल्यापर्यंत सगळे कादंबरीसाठी येतात. बाबल्याने काय घातले होते? असा एका वाक्यात उत्तर द्या असा प्रश्न सारे प्रवासी वाचून विचारता येणार नाही.

पुरुष मूळ संचात बघितलेले कुणी भाग्यवान आहेत का? त्याबद्दल दुसर्‍या कुठल्यातरी बाफ वर लिहा.

मी पाहिले आहे. नाना पाटेकर , रीमा लागू अन चंद्रकन्त गोखले होते तेच ना?

टण्या,
व्यक्ति आणि वल्ली ही कादंबरी असल्याचा दावा करते का? किंवा तेवढ्यासाठीच सर्व व्यक्तिरेखांना एका तालात मार्च करायला लावते का ?
बाबुली आणि आपुच्या वडलांचे वैर अधोरेखीत करायला आणि दोघांचे कुरघोडींचे नमुने म्हणून अनेकदा अनेक पात्र समोर येतात. त्यांचे प्रयोजन गावगाड्याच्या रचनेनुसार अफलातून असले, तरी कादंबरीत ते एका संदर्भानी येतात, आपुच्या स्मृतीतून जीवंत होतात आणि खो दिल्यासारखे दुसरे पात्र येते आणि त्यात काही गैर आहे असं नाही. मण्यांची माळ महत्वाची आहे, मणी नाही. एकसंधपणा महत्वाचा आहे. डॉ रामदासांचे, केशा चांभाराचे, पावटे मास्तरांचे, बागाईतकरांचे कथानकाच्या अनुषंगाने येणारे व्यक्तिचित्रणच आहे ना?

रस्त्याच्या कडेने:- मला जेव्हा एखाद्या गोष्टीचा अगदी पोटतिडकीनी संताप किंवा शिसारी येतो/येते तेव्हा There is something of that object in me that I have not owned up असं प्रकर्षाने जाणवतं. आणि ते तपासून पाह्यला लागतं. डोळसपणाची एवढी किंमत मोजावीच लागते तरच मी हा व्हेरीअबल जरासा बाजूला काढून डोळसपणा साधू शकतो. त्याचं तरी काय लोणचं घालायचय का ? हा प्रश्न आहेच, पण ते एक असो. Pls. see if this makes sense, ignore if it does'nt.

>> व्यक्ति आणि वल्ली ही कादंबरी असल्याचा दावा करते का? किंवा तेवढ्यासाठीच सर्व व्यक्तिरेखांना एका तालात मार्च करायला लावते का ?

अगदी हेच लिहायला आले होते रैना! हे दोन स्वतंत्र लेखनप्रकार आहेत, त्यांची तुलना होऊ शकत नाही.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

आज पुलंची पुण्यतिथी आहे. टीका करण्याकरता का होईना त्यांचे स्मरण होतेय हे पाहुन बर वाटले.

सारे प्रवासी घडिचे नुकतेच वाचले... अप्रतिम पुस्तक आहे !
अगदी पहिल्या पानापासून पकड घेते .. मधे अजिबात थांबवत नाही...

सारे प्रवासी घडीचे मध्ये व्यक्तिचित्रणासाठी कथानक येत नाही तर कथानकात व्यक्तिचित्रण येते. >>>> हे एकदम पटले... वर लिहिलय तसं व्यक्ती आणि वल्ली आणि ह्याची तुलना होऊ शकत नाही असं वाटलं... कारण दोन्हीचा प्रकारच वेगळा आहे...

सगळी पात्रे एकामागून एक येत जातात खो दिल्यासारखी.. ते खूप मस्त लिहिलय..
एकूण सगळ्याच विनोदांना एक उदासिची झाक वाटते.. वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे हसता हसता कुठेतरी वाईट ही वाटून जात...