सरफरोश, वेनस्डे व बॉर्डर या चित्रपटांनी भारतीयातील तात्कालीक वा क्षणभंगुर का असेनात, पण देशप्रेम चढत्या क्रमाने जागे केले. या तीनही चित्रपटांच्या कथानकात, सादरीकरणात, मनोरंजन मूल्य वाढवण्याच्या शैलीत प्रचंड फरक आहे. सरफरोशमध्ये प्रेम आहे, गीते आहेत, धबधब्यात मारलेल्या मिठ्यासुद्धा आहेत. त्याशिवाय सरफरोशमध्ये जळजळीत सत्य आहे की पाकिस्तानमधून मृत्यू कसा चोरून सीमापार आणला जातो. वेनस्डेमध्ये एकही गीत, नृत्य न घेता एक सामान्य माणूस तथाकथित कर्तव्यदक्ष यंत्रणा कश्या मुळापासून हालवून सोडू शकतो आणि सामान्य माणसाच्या शांततेबाबत व सुरक्षितेबाबत किती सामान्य अपेक्षा असतात याचे प्रभावी चित्रण आहे. बॉर्डर हे सरळसरळ युद्ध आहे. देशप्रेमाच्या सुप्तावस्थेतील ठिणगीला फुलवणारी आणि आग बनवणारी ही कथा आहे. रक्त सळसळवणारी कथा आहे. तरीही या तीनही कथांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे कोठेतरी सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप, देशप्रेम, कर्तव्यतत्पर अधिकारी आणि भारतीयाला जागृत करणारी आणि देशाप्रती आपल्या असलेल्या जबाबदारीचे भान देणारी कथा!
मद्रास कॅफेमध्येही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप आहे. अंगावर येणारी हिंसा आहे. ढवळाढवळ आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे. मृत्यूचे तांडव आहे. कर्तव्यतत्पर अधिकारी आहे. भ्रष्ट अधिकारी आहे. मद्रास कॅफेमधील कर्तव्यतत्पर अधिकार्याच्या पत्नीलाही प्राण गमवावे लागलेले आहेत जसे सरफरोशमध्ये आमीर खानच्या भावाला गमवावे लागलेले असतात. येथेही अत्यंत सरस चित्रण, एकही फ्रेम अनावश्यक नसणे, बेफाम वेगाचे कथानक, सहसा सामान्यांना न बघता येणारे जीवनाचे रौद्र आणि क्रूर रूप या सर्व गोष्टी आहेत.
मद्रास कॅफेमध्ये फक्त एकच नाही आहे. देशप्रेम जागृत करण्याचा कथेचा हेतू! संपूर्ण कथानक माजी पंतप्रधानांना वाचवण्याच्या कामगिरीभोवती फिरते. या पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीर्दीत परदेशातील राजकारणात किंवा स्थानिक लढ्यात ढवळाढवळ केलेली असते. ही ढवळाढवळ कागदोपत्री शांतता करार म्हणून मान्यता पावलेली असली तरी ती एक राजकीय खेळी असते व तिचा उद्देश स्वतःच्या देशाच्या सुरक्षिततेला धोका होऊ नये असा असतो. हा उद्देश कितीही योग्य असला तरी या लहानश्या भूभागात या उद्देशाच्या पूर्ततेसाठी केली गेलेली कृती ही अंकल सॅमच्या दादागिरीपेक्षा भिन्न नसते. मुळातच, ती त्या विशिष्ट कालावधीत एका परदेशात केली गेलेली ढवळाढवळ असते. याचे भीषण परिणाम त्या भूभागात स्थायिक असलेल्यांना भोगायला लागतात. या राजकीय खेळीतून तेथे शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने एका कर्तव्यतत्पर अधिकार्याची तेथे बदली करण्यात येते. तो अधिकारी शांततेच्या चिंधड्या उडवणार्याच्या मार्गात विविध अडथळे कसे आणता येतील या दृष्टीने प्रयत्न करू लागतो.
हे सर्व प्रेक्षणीय आहे. त्या अधिकार्याचा लढा, त्याच्यावर झालेले हल्ले, आपल्याच प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, नवी दिल्लीच्या सुपर हाय कमांडकडून एक्झर्ट झालेली हाय प्रेशर्स, अधिकार्याच्या पत्नीला मारण्यात येणे, साऊंड इफेक्ट्स, चित्रण, सत्याचा विजय, काय नाही या चित्रपटात जे प्रेक्षणीय नाही?
मात्र हे सगळे केंद्रीत आहे दोनच गोष्टींभोवती! माजी पंतप्रधानांची हत्या टाळणे आणि स्वतः दुसर्याच्या देशात केलेल्या ढवळाढवळीला 'एक जेन्युईन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न' म्हणून ग्लोरिफाय करणे!
यात देशप्रेमाचा लवलेशही नाही. असावा ही अपेक्षा नाहीच, पण आव मात्र तसा आणला आहे याचा संताप येतो. चित्रण असे करण्यात आले आहे जणू भारतापुढे किती परकीय समस्या होत्या आणि त्यातून सर्व कर्तव्यतत्पर अधिकार्यांनी कसा मार्ग काढला वगैरे! एका नेत्याच्या वैयक्तीक मूर्खपणामुळे (या शब्दांसाठी क्षमस्व, पण याहून उचित शब्द सापडत नाही) त्याच नेत्याला प्राण गमवायला लागणे आणि व्यक्तीपूजक भारतीय समाजात अचानक त्या नेत्याच्या पक्षाबाजूने प्रेमाची लाट येऊन देशातील राजकीय चित्र पालटणे (हा दुसरा भाग चित्रपटात दाखवलेला नाही) हे ज्यांनी त्या काळी स्वतः अनुभवलेले असेल त्यांना मी काय म्हणत आहे हे समजेल.
बेसिकली, आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल.
एक चित्रपट म्हणून मात्र हा चित्रपट फारच म्हणजे फारच सरस ठरतो. वेग, अभिनय, पात्रनिवड, चित्रण, संवाद, कथानकातील सूक्ष्म धागे, प्रेक्षकाला नजरबंदी केल्यासारखे वाटावे, हे सर्व काही उत्तम जमून आलेले आहे. एकही दृष्य अनावश्यक नाही.
पण चित्रपटगृहाबाहेर पडल्यावर माझ्या मनात आलेला पहिला विचार, मला खरंच कोणत्याच पक्षाबद्दल विशेष काहीच आस्था नसली तरीही, हाच होता की या चित्रपटाने निव्वळ राजीव गांधी आणि काँग्रेसला मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचारसंहितेच्या काळात कदाचित हा चित्रपट प्रदर्शीत होऊ शकला नसता. तो परफेक्ट टायमिंगला प्रदर्शीत केला गेला आहे असे वाटते. संताप याचा येतो की स्वतःच्या देशात सुरक्षिततेच्या आघाडीवर पदोपदी नामुष्की होत असताना दुसर्या देशात पीस कीपिंग फोर्स पाठवणार्यांना महान ठरवले गेले आहे.
मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे. तसे पाहिले तर आवश्यक काहीच नसते. पण जे जे निर्माण होते त्याचा निदान मूळ हेतू तरी उदात्त असतो. जसे, उद्या निर्भया प्रकरणावर कोणी चित्रपट काढला तर तो चित्रपट पाहवणार नाही, क्रूर वाटेल वगैरे ठीक आहे, पण निदान त्याचा हेतू हा असेल की लोकांनी जागृत व्हावे आणि नराधमांना शिक्षा मि़ळावी. मद्रास कॅफेचा हेतूच समजत नाही.
एक असा माणूस, जो गोरा गोमटा होता, सगळ्या देशाचा आधारस्तंभ असलेल्या त्याच्या आईच्या हत्येनंतरही धीरोदात्तपणे सर्वांना स्वतःच धीर देत होता आणि ज्याचे वास्तव्य परदेशात असले तरीही चेहरा भारतीय होता, त्याला कसलीही पार्श्वभूमी नसताना, त्याचे काहीही कर्तृत्व नसताना एका रात्रीत त्याला एका कोट्यावधीच्या देशाचे पंतप्रधानपद मिळाले. म्हणजे त्याक्षणी तो साधा खासदारही नव्हता, तो थेट पंतप्रधान झाला. आज त्याचा मुलगा निदान पप्पूपणा करत का होईना पण काही वर्षे येथे पद न घेता अस्तित्वात आहे. हा मनुष्य थेट परदेशातून आला, त्याचदिवशी पहिल्यांदाच या देशातील असंख्य सामान्यांना दिसला आणि थेट पंतप्रधान झाला. ही तर आपली, आपल्या व्यक्तीपूजनाची अवस्था आणि दशा! मग या माणसाने अनेक चांगले वाईट निर्णय घेतले. भिंद्रानवालेंनी इंदिराजींवर सूड उगवला तसा दक्षिणेने या माणसावर! ती निव्वळ एक वैयक्तीक सूडकथा होती. त्यात भारताचा एक देश म्हणून काही संबंधच नव्हता. असो!
मद्रास कॅफेचे कनेक्शन त्या वास्तवाशी न लावता जर कोणाला हा चित्रपट पाहता आला, तर एक अफाट प्रभावी चित्रपट वाटू शकेल इतकेच खरे! अन्यथा, ही एक निव्वळ राजकीय खेळी वाटावी अशी अवस्था आहे.
-'बेफिकीर'!
त्रयस्थ विचारातून आणि एका
त्रयस्थ विचारातून आणि एका वेगळ्या दृष्टीकोनातून केलेले परीक्षण आवडले.
सध्या टी. व्ही. वर भारत निर्माणच्या जाहीराती सुरू आहेत तीही अशाच प्रकारची राजकीय खेळी आहे हे स्पष्ट आहे.
विचारांशी सहमत आहे. पण हेतू
विचारांशी सहमत आहे.
पण हेतू असलाच पाहिजे, असे काही मला वाटत नाही. शाखा तर जवळजवळ अख्खाच्या अख्खा 'उगाच' म्हणायला हवा. आणि सखा तर अगदी १००%.
मी हा चित्रपट एक कहाणी म्हणूनच पाहीन आणि परीक्षणावरून असंच वाटतंय की मला आवडेल. पण प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात थेटरात न जाता आल्यास, नंतर जाणे माझ्या तत्वांत बसत नसल्याने मी हा टिव्हीवर आल्यावरच बघीन !!
सुंदर लेख..
फार आवडला.
बेफी... वेगळा दृष्टीकोन ठेवुन
बेफी... वेगळा दृष्टीकोन ठेवुन बघिताला..तुम्ही...... अभिनंदन
याच प्रमाणे मग... स्टार न्युज वर "पंतप्रधान" , आज तक वरचे "वंदेमातरम" सारखे कार्यक्रम सुध्दा "हेतु" ठेवुनच दाखवण्यात येत आहे.. असेच म्हणावे लागेल...
मग "पंतप्रधान" यात आधी सगळे काँग्रेसी पंतप्रधान चे कार्य दाखवत आहे....;)
आणि ऐन निवडनुकीच्या काळात वाजपेयींवर एपिसोड येणार .....मग तेव्हा पण हाच हेतु राहणार का ?
बेसिकली, आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल.>>>>>
मग "गदर" सारख्या चित्रपटावर बंदीच आणायला हवी होती त्याने सुध्दा तोच इतिहास दाखवला जो आपल्याला विसरायचा होता.... मग तेव्हा का नाही असे वाटले ?
वरच्या लेखातले काही लेख
वरच्या लेखातले काही लेख चित्रपटाशी संबंधित आहेत की वास्तवाशी हे कळले नाही. चित्रपट पाहिला नाही त्यामुळेही.
एक असा माणूस, जो गोरा गोमटा होता...या शब्दांनी सुरू होणारा परिच्छेद चित्रपटाशी संबंधित आहे की वास्तवाशी?
<चित्रण असे करण्यात आले आहे जणू भारतापुढे किती परकीय समस्या होत्या आणि त्यातून सर्व कर्तव्यतत्पर अधिकार्यांनी कसा मार्ग काढला वगैरे! एका नेत्याच्या वैयक्तीक मूर्खपणामुळे (या शब्दांसाठी क्षमस्व, पण याहून उचित शब्द सापडत नाही) त्याच नेत्याला प्राण गमवायला लागणे आणि व्यक्तीपूजक भारतीय समाजात अचानक त्या नेत्याच्या पक्षाबाजूने प्रेमाची लाट येऊन देशातील राजकीय चित्र पालटणे (हा दुसरा भाग चित्रपटात दाखवलेला नाही) हे ज्यांनी त्या काळी स्वतः अनुभवलेले असेल त्यांना मी काय म्हणत आहे हे समजेल. >
हे मी अनुभवलेले आहे. तरीही पटले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण इतके सोपे सरळ असते तर आणखी काय हवे होते?
परीक्षण अजिबात पटलं नाही. एका
परीक्षण अजिबात पटलं नाही. एका पंतप्रधानाची हत्या कशी झाली, हे सांगणारा हा चित्रपट आहे. 'जेएफके'सारख्या अप्रतिम चित्रपटांतूनही हे पूर्वी दाखवलं गेलं आहे.
चित्रपटात तर हे ही दाखवले
चित्रपटात तर हे ही दाखवले की.. सत्तारुढ पक्षाने माजी पंतप्रधानांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यास नकार दिला.
.तसेच काही पक्षांनी सरळ सरळ प्रभाकर ला शांतीसेनेच्याविरुध्द छुप्यामार्गाने मदत केली..आणि हा प्रयत्न केला की जनमत त्यांच्य विरुध्द जावे..परंतु जेव्हा विदेशी लोकांनी प्रभाकरच्या लोकांना दाखवले की .. जनमत माजी पंतप्रधाना बरोबर आहे.... तेव्हा त्यांचे सगळ्यांचे प्लॅन फसले.... आणि सत्तेपासुन दुर राखण्याचे मनसुबे उध्द्वस्त झाले... त्यामुळे केवळ सत्तेपासुन दुर राखवण्यासाठीच ........ शेवटचा उपाय आणि आंतराष्ट्रीय आणि विरोधीपक्षांच्या दबावामुळे ही हत्या झाली......... चित्रपट मधे सरळ उल्लेख केलेला आहे...
श्रीलंका मधे भारताने शांतीसेना गेली कशाला ? यावर आधी विचार करायला हवा.. >>
एका बाजुने पाकिस्तान आणि दुसर्या बाजुने चीन आपल्याशी दोन हात करायला उत्सुक्त होते....अश्या वेळेला दक्षिणेकडुन श्रीलंका सुध्दा आपल्या विरोधात उभा राहिला असता ...तर आपण चारही बाजुंनी वेढलो असतो..
चीन ला श्रीलंकन बेटांवर नाविक तळ उभारण्यास मंजुरी मिळाली असती आणि चीन सरळ दक्षिण हिंद महासागरात आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाला असता.. त्यामुळे आपली सागरी हद्द.. अत्यंत मर्यादित झाली असती..सगळ्याच बाजुनी कोंडी...... अशा वेळेला काय करणे योग्य होते ????? आहे का कुणाकडे उत्तर ? की उगाच प्रश्न पडतात ? ...
तसेच दुसर्याबाजुंना तामिळ लोकांचे हितसंरक्षण यासाठी दक्षिण भारतातुन प्रचंड दबाव होताच...आंध्र प्रदेश, तामिळनाडु , केरळ कर्नाटक..४ राज्यांतुन दबाव वाढला होता... या करिता आधी प्रभाकरन ला मदत केली...पण प्रभाकरन चा उद्देश फक्त आणि फक्त "रक्तरंजित क्रांतीच" होती हे दिसुन आल्यानंतर भारताने रोख बदलला...आणि श्रीलंकन सरकार च्या मदतीने तिथे शांततेच्या वातावरणात निवडणुका घेउन... तामिळ लोकांना घटनात्मक अधिकार मिळाण्यासाठी प्रयत्न सुरु केले..........
कारण रक्तरंजित क्रांती साठी पाठिंबा देणे एक तर भारताला मंजुर नव्हते...( मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार का असेना..)...दुसरे त्यामुळे दोन्ही देशांमधे तनाव जास्तच वाढिला लागला होता..... अशा वेळेला काहीतरी कोणत्यातरी बाजुला झुकावेच लागणार होते...
प्रभाकरणच्या बाजुला झुकले असते तर... श्रीलंका कायमची दुरावली गेली असती.. पाकिस्तान , चीन, श्रीलंका ३ ही देश एकत्र आपाल्या विरुध्द आले असते..आणि आपल्या भोवती त्यांनी सैनिक कडे उभारले असते... आणि आपली कोंडी केली असती..
आणि श्रीलंका सरकार च्या बाजुने झुकले असते तर.... एक तर आपल्या तामिळ लोकांविरुध्द गेल्याची भावना वाढीस लागली असती..जनमत विरोधात गेले असते...संपुर्ण चारही राज्यातुन प्रचंड विरोधास तोंड द्यावे लागले असते... एकतर आधीच दक्षिण भारत उत्तर भारताच्या विरोधात उभा असतो.. तो वाढीस लागला असता..प्रभाकरण देशाच्या इतरभागात सुध्दा आपल्या कारवाई करण्यास सुरुवात केली असती...
अश्या परिस्थितीत... त्याला समजावुन शांततेच्या मार्गाने श्रीलंकन सरकार वर तामिळलोकांच्या वतीने दबाव आणुन त्याभागात निवडणुका घेउन ..तामिळ समाजाला त्त्यांचा हक्क मिळवुन द्यावा..... असा एक विचार पुढे आलेला...ज्यात रक्तरंजित क्रांती थांबली जाईल....श्रीलंकेतुन तामिळ लोक जी विस्थापित होत होती ते एक थांबले जाईल...वर श्रीलंकन सरकार निवडणुका घेउन तामिळ लोकांना त्यांचा अधिकार देईल... ही एक आशा होती..
चित्रपट पाहिल्यावरच
चित्रपट पाहिल्यावरच परीक्षणाबद्दल कॉमेण्ट देता येइल. पण राजीव गांधी १९८४ मधे खासदार होते. बहुधा अमेठीतच. युवक काँग्रेसमधेही होते बहुधा.
http://en.wikipedia.org/wiki/Amethi_%28Lok_Sabha_constituency%29
हो संजय गांधींच्या मृत्यूनंतर
हो संजय गांधींच्या मृत्यूनंतर ते राजकारणात आले. युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९८१ साली खासदार होते.
त्यापूर्वीही परदेशातच राहत होते असे एकाच ठिकाणी वाचले होते, तेही मायबोलीवरच
http://164.100.47.132/LssNew/biodata_1_12/2731.htm
चित्रपट बघितल्यानंतर - १. हा
चित्रपट बघितल्यानंतर -
१. हा चित्रपट देशप्रेमाला ग्लोरिफाय करतो, असं वाटत नाही.
२. शांतिसेना श्रीलंकेत पाठवली, हे वास्तव आहे. चित्रपटानं ते तयार केलेलं नाही.
<बेसिकली, आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल. >
केवळ देशाप्रती भावना जागृत व्हाव्यात म्हणून चित्रपट तयार केले जात नाहीत.
विसरावासा इतिहास असं काही नसतं.
<मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे. >
कुठलीही कलाकृती अनावश्यक नसते.
<पण जे जे निर्माण होते त्याचा निदान मूळ हेतू तरी उदात्त असतो.>
प्रत्येक कलाकृती फक्त 'उदात्त हेतू'नेच तयार केली जावी, असा नियम नाही.
<एक असा माणूस, जो गोरा गोमटा होता, सगळ्या देशाचा आधारस्तंभ असलेल्या त्याच्या आईच्या हत्येनंतरही धीरोदात्तपणे सर्वांना स्वतःच धीर देत होता आणि ज्याचे वास्तव्य परदेशात असले तरीही चेहरा भारतीय होता, त्याला कसलीही पार्श्वभूमी नसताना, त्याचे काहीही कर्तृत्व नसताना एका रात्रीत त्याला एका कोट्यावधीच्या देशाचे पंतप्रधानपद मिळाले. म्हणजे त्याक्षणी तो साधा खासदारही नव्हता, तो थेट पंतप्रधान झाला. आज त्याचा मुलगा निदान पप्पूपणा करत का होईना पण काही वर्षे येथे पद न घेता अस्तित्वात आहे. हा मनुष्य थेट परदेशातून आला, त्याचदिवशी पहिल्यांदाच या देशातील असंख्य सामान्यांना दिसला आणि थेट पंतप्रधान झाला. ही तर आपली, आपल्या व्यक्तीपूजनाची अवस्था आणि दशा! मग या माणसाने अनेक चांगले वाईट निर्णय घेतले. भिंद्रानवालेंनी इंदिराजींवर सूड उगवला तसा दक्षिणेने या माणसावर! ती निव्वळ एक वैयक्तीक सूडकथा होती. त्यात भारताचा एक देश म्हणून काही संबंधच नव्हता. असो! >
हा संपूर्ण परिच्छेद खोटा ठरवणारे हजारो संदर्भ उपलब्ध आहेत.
बेफिकिर, तुम्हाला
बेफिकिर,
तुम्हाला भाजपाप्रेमाचे उमाळे किंवा काँग्रेस द्वेषाचे बुडबुडे येत आहेत हे समजू शकतो. तुमचा राजकिय प्रेफरन्स ही तुमची वैयक्तिक बाब आहे.
पण, तुमचे पप्पू वगैरे उथळ शब्द व तुमच्या वैयक्तिक मूर्खपणाचे*(*माफ करण्याचा संबंधच नाही. तुमचेच शब्द आहेत) दर्शन देणारे धागे तेच दाखवतात, जे जीएस यांच्या धाग्यावर कुणीतरी लिहिले आहे. नावडत्या लोकांबद्दल अत्यंत हीन भाषा वापरत कुचाळक्या करणे याचे स्पेशल ट्रेनिंग मिळते का हो तुमच्यात?
तुमच्या खिशातून पैसे काढून त्याने पिच्चर काढला आहे का तो? का कांग्रेस सरकारने तुम्हाला सक्ती केली होती तो पहायची? कशाला कोरड्या डेंडारण्या देऊ र्हायले? बास करा की आता.
काल मद्रास कॅफे पाहिला.
काल मद्रास कॅफे पाहिला. आवडला. टिपिकल वेस्टर्न पोलिटिकल थ्रिलरच्या साच्यात बनवलेला सिनेमा आहे
स्पॉयलर अॅलर्ट - गोष्ट नसली तरी थीम तपशीलात लिहित आहे
टिपिकल वेस्टर्न पोलिटिकल थ्रिलरच्या साच्यात बनवलेला सिनेमा आहे. ऑन-फील्ड एजंट, फील्डवरती आणि वरच्या हायरार्कीत डबलक्रॉस, वरती डिसिजनमेकर्समधला नेहेमीचा नोकरशहा आणि हेरखात्याचे एक्स्पर्ट अधिकारी यांच्या दृष्टीकोनातला आणि उद्दिष्टांमधला फरक, सुप्त संघर्ष/मतभेद आणि हे सगळं काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर. फॅक्ट आणि फिक्शन यांचं बेमालूम मिश्रण करत (फोर्सिथच्या पुस्तकांसारखं) कथा पुढे जाते. मग त्यात एजन्टच्या वैयक्तिक आयुष्यात या सगळ्याचा फॉल आउट, इ. इ. नेहेमीची वळणे आहेत.
स्पॉयलर अॅलर्ट संपला
ज्यांनी अशा कादंबर्या, हॉलिवूडचे चित्रपट पाहिलेत त्यांना तसं नावीन्य वाटणार नाही. नावीन्य हेच की हे सगळं भारतीय चित्रपटात एक अतिशय या मातीतला विषय घेऊन चित्रपट बनवलाय. तांत्रिक बाजूतली सफाई, दिग्दर्शन, अभिनय, एकूण टेकिंग सगळंच सुरेख जमून गेलंय. जॉन अब्राहम करून करून किती अभिनय करणार? पण ठीक आहे. तोही अजिबात खटकत नाही हेच त्याचं यश.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकारण नेहेमीच खूप गुंतागुंतीचं असतं. त्यात चूक-बरोबर, काळं-पांढरं ठरवणं सोपं नसतं किंवा अशा सरळसोट निकषांवर निर्णयही घेता येत नाहीत. प्रत्येक निर्णयाचे विविध पातळ्यांवर विविध बरेवाईट परिणाम (लगेचचे आणि दीर्घकालीन) होत असतात. हे सगळं पाश्चिमात्य राजकारण, शीतयुद्ध अशा थीम्सवरच्या इंग्लिश कादंबर्र्यांत वाचत असतो. पण भारतीय राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून अशी गोष्ट बघायला मनापासून आवडलं
<< 'जेएफके'सारख्या अप्रतिम
<< 'जेएफके'सारख्या अप्रतिम चित्रपटांतूनही हे पूर्वी दाखवलं गेलं आहे.>>
मला वाटत बेफ़िकिर यांचा आक्षेप पिक्चरच्या टायमिंग वर आहे. "सहानुभूतीची लाट" निर्माण करण्याचा प्रयत्न असावा.
बायदवे, जेएफके चित्रपटाचा उपयोग पोलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी केला गेला असं कुठे वाचण्यात आलं नाहि.
सर्वांचा आभारी आहे. (अवांतर
सर्वांचा आभारी आहे.
(अवांतर - चिनूक्स, तुम्ही ठळक केलेले वाक्य मी स्वतःही माझ्या लेखात लिहिलेले आहेच)
जॉन अब्राहम करून करून किती
जॉन अब्राहम करून करून किती अभिनय करणार?
>>
आनंदयात्री.............तुझी
आनंदयात्री.............तुझी या पोस्टीचा स्क्रिन शॉट घेतला आहे...........:खोखो:
उदया &^%॓^@%&॓@
उदया &^%॓^@%&॓@

ज्यांनी अशा कादंबर्या,
ज्यांनी अशा कादंबर्या, हॉलिवूडचे चित्रपट पाहिलेत त्यांना तसं नावीन्य वाटणार नाही. नावीन्य हेच की हे सगळं भारतीय चित्रपटात एक अतिशय या मातीतला विषय घेऊन चित्रपट बनवलाय.>>> +१.
चित्रपट पाहिला नाही त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही.
मध्यंतरी कुठेतरी "भावना दुखावणे" या विषयावर लिहिलं होतं मी. आपल्याकडे काहीही विषय असला तरी त्यामधून आपल्याला हवा तसा अर्थ काढून त्याचे राजकीय भांडवल करणारे लोक असतात. तसंच दिसतंय हे पण. मद्रास कॅफेचे शूटिंग दोन वर्षापासून चालू आहे. तशी सहानुभूतीची लाट निर्माण करायचीच असती तर अजून सहा महिन्यांनी रीलीज केला असता तर जास्त फायदा झाला असता की. सिनेमाच्या रीलीजआधी जॉन अॅब्राहमला चेन्नईमधे येऊन "हा सिनेमा कुठल्याही तमिळी भावना दुखवत नाही" अशी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली नसती, आणि तरीदेखील हा सिनेमा फार तुरळक मलिटीप्लेक्सेस मधे रिलीज झालाय इथे.
आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल.
या पॅराला प्रचंड हसू आले. एखादा दिग्दर्शक जेव्हा एखादी देशाच्या इतिहासाबद्दल कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्यामागे देशाप्रति भावनाच जागृत व्हायला हव्यात असा काही नियम आहे का? विसरणार्या इतिहास म्हणजे नक्की कसा? जागतिक महायुद्ध. भारत पाक फाळणी अशा अनेक घटना आहेत ज्या लोकांना विसरायला आवडेल, म्हणून त्यावर आधारित कसलीही कलाकृती बनवायचीच नाही का?? आपलाच इतिहास आपण तटस्थपणे कधी बघायला शिकणार आहोत? दरवेळेला इतिहास म्हटला की "अभिमान, जाज्वल्य,वगैरे" भावनाना ऊत यायलाच हवा का? प्रत्येक गोष्टीमधे कन्स्पिरसी थेअरी शोधू शकणार्यांचे फार कौतुक वाटते मला तरी. आणी थेअरी तरी काय???? म्हणजे कॉन्ग्रेसने हा सिनेमा बनवायला जॉन अब्राहमला पैसा दिला ही ?????
आंतरराष्ट्रीय राजकारण हे कधीच वन प्लस वन टू नसते, त्याचे अनेक कंगोरे असतात, किमान ते आधी समजून घेऊन मग तरी अशा थेअरीज मांडाव्यात. राजीव गांधी पंतप्रधान व्हायच्या आधी खासदार होते.
अजूनही भारतीय नागरिक "सीमेपलिकडचा दहशतवाद" याचा अर्थ फक्त पाकिस्तान एवढाच घेतात. त्यांना लिट्टे, श्रीलंका, तिथून चालणारे लष्करी हालाचाली या फार लांबच्या वाटतात. मध्यंतरी प्रभाकरनच्या मुलाला मारल्याचे व्हीडीओ मीडीयामधे फिरत होते. त्याविरोद्धा तमिळनाडूतल्या चौकाचौकातून आंदोलने झाली. इंग्रजी मीडीया सोडल्यास इतरत्र त्याबद्दल काहीही विशेस। बातम्या नव्हत्या.
मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे. तसे पाहिले तर आवश्यक काहीच नसते. पण जे जे निर्माण होते त्याचा निदान मूळ हेतू तरी उदात्त असतो.>>> आं????? चित्रपटांचा मूळ हेतू उदात्त असतो?? की प्रत्येक कलाकृतीचा (लेख, कादंबरी, कथा, गझला, विडंबने) सर्वांचे हेतू उदात्त असतात का? अशा उदात्त हेतू वाल्या कलाकृतींची ऊदाहरणे वाचायला आवडतील.....
एका माणसाला एक कलाकृती
एका माणसाला एक कलाकृती निर्माण करण्याची उर्मी येण्यामागे एक प्रमुख कारण हे असते की त्या माणसाच्या मनावर कशाचातरी एक तीव्र प्रभाव पडलेला असतो. हा प्रभाव त्याला स्वस्थ बसू देत नाही व व्यक्त होण्यास भाग पाडतो. (तेवढ्यापुरता, तो माणूस हा प्रभाव व कलाकृती यांचे माध्यम झालेला असतो).
सहसा माणसाच्या मनावर (सापेक्षता मान्य करूनही) चांगले संस्कार झालेले असतात. हिंसा करू नये, क्रूर वागू नये, इतरांना त्रास देऊ नये, न्यायीपणे वागावे, सत्य वागावे ह्या व अश्या प्रकारची तत्वे सामान्यतः माणसाच्या मनावर बिंबवली गेलेली असतात.
याचा परिणाम असा होतो की मनावर पडलेला प्रभाव जी कलाकृती निर्माण करण्यास भाग पाडतो ती कलाकृती मूलतः सत्य, न्याय, अहिंसा, शांतता, समाधान यांची प्राप्ती कशी होईल, कश्यामुळे झाली, काय केले असते तर झाली असती हे दर्शवते.
याला मी कलाकृतीमागचा उदात्त हेतू म्हणत आहे. म्हणजे असे, की भरपूर दारू प्यावी, दुर्बल घटकांना पिटून काढावे, भ्रष्टाचार करावा अशी शिकवण देणार्या कलाकृती कोणी निर्माण करत नाही. मात्र चांगले वागावे हे सांगनार्या अगणित कलाकृती निर्माण होतात.
या दृष्टीने पाहिल्यास, मद्रास कॅफेचा हेतू मला उदात्त वाटला नाही. या कलाकृतीमार्फत जो संदेश मिळेल तो काहीसा असा असेल असे वाटले:
परदेशातील राजकारणात ढवळाढवळ केल्यामुळे तेथील जो एक गट असंतुष्ट झालेला होता त्याने आपल्या देशातील माजी पंतप्रधानांची हत्या करण्याचा रचलेला कट हा आपल्याकडील माणसांच्या अथक प्रयत्नांनतरही यशस्वी झाला.
आता यात नेमके असे काय आहे की ज्याला महान म्हणावे?
आता यात नेमके असे काय आहे की
आता यात नेमके असे काय आहे की ज्याला महान म्हणावे?>> काहीच नाही. हा एक सरधोपट पोलिटिकल एस्पिओनाज थ्रिलर आहे. हिंदीत/ भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या उत्तम रीतीने बनवलेला, तोही भारतीय राजकारणातल्या काही घटनांचा आधार घेऊन. आणि हे उत्तम रीतीने जमलंय. तरीही काही गोष्टी खटकल्या/ओव्हरसिम्प्लीफाईड दाखवल्यात (उदा: जॉन त्याला हव्या त्या माणसांना फक्त एकाच माणसाच्या तर्फे सहजी भेटू शकतो, किंवा ज्या पद्धतीने श्रीलंकेत ये-जा करतो, एक्स-टेररिस्टला उचलून नेऊन चौकशी करतो, इ.)
आपण भारतीय आहोत आणि गोष्ट भारतीय राजकारणावर आहे म्हणून देशप्रेम वगैरे शोधलंच पाहिजे असं नाहीये असं मला वाटतं. किंवा यातून कुणाचं उदात्तीकरण होतंय असंही मला वाटलं नाही. पण प्रत्येक कलाकृतीतून संदेश शोधायला मी जातच नाही. हा सिनेमा पहायला जाताना मी पोलिटिकल एस्पिओनाज थ्रिलर्स पहायला मनापासून आवडतात म्हणूनच गेले होते, ती अपेक्षा पूर्ण झाली.
<याचा परिणाम असा होतो की
<याचा परिणाम असा होतो की मनावर पडलेला प्रभाव जी कलाकृती निर्माण करण्यास भाग पाडतो ती कलाकृती मूलतः सत्य, न्याय, अहिंसा, शांतता, समाधान यांची प्राप्ती कशी होईल, कश्यामुळे झाली, काय केले असते तर झाली असती हे दर्शवते.
याला मी कलाकृतीमागचा उदात्त हेतू म्हणत आहे. म्हणजे असे, की भरपूर दारू प्यावी, दुर्बल घटकांना पिटून काढावे, भ्रष्टाचार करावा अशी शिकवण देणार्या कलाकृती कोणी निर्माण करत नाही. मात्र चांगले वागावे हे सांगनार्या अगणित कलाकृती निर्माण होतात. >
अरे देवा!
आता यात नेमके असे काय आहे की
आता यात नेमके असे काय आहे की ज्याला महान म्हणावे?>>> राजकीय घटनेची पार्श्वभूमी असलेला चित्रपट जर चांगला थ्रिलर असेल, तो पाहताना ढोबळ चुका न दिसता पटकथा, अभिनय तुम्हाला खिळवून ठेवत असेल तर माझ्या दृष्टीने तो चित्रपट म्हणून महान आहे.
वरदा - पोस्ट्स आवडल्या. चित्रपट पाहून आणखी लिहीतो.
समांतर धावणार्या रेषा
समांतर धावणार्या रेषा एकमेकांना स्पर्श करत नाहीत.
तुमच्या सुरूवातीच्या ऊर्मी
तुमच्या सुरूवातीच्या ऊर्मी वगैरे मुद्द्याला अनुमोदन देणार, तेवढ्यात त्यापुढे असंबध्द वाटेल अशी पोस्ट वाचली. अशा चित्रपटातुन 'अजेंडा' शोधणं चुकीचं वाटतं. हा सापेक्श मुद्दा म्हणून सोडुन दिला तरी चित्रपटांतून आणि कलाकृतींतून उदात्तवाद आणि 'संदेश ' शोधणं/ मागणं हे बा़बोध तर आहेच, पण त्या त्या कलाकृतीवर अन्याय करणारंही आहे .
वासेपूर सारख्या कलाकृतींतून काय उदात्तवाद नि संदेश शोधणार? हे फक्त उदाहरणार्थ.
पंतप्रधानाची कारकीर्द आणि कार्यक्शमता हा वेगळा मुद्दा. मात्र कुठचाही पंतप्रधान त्याच्याच देशात अशा पध्दतीने मारला जाणे हे त्या देशाला भुषणावह नक्कीच नाही. एक चित्रपट म्हणून उत्तम आहे, असं तुम्ही न्हटलेलं योग्यच आहे. पण या लेखाचा मूळ उद्देश तो नसल्याने इतर मतांकडे दुर्लक्श करता येत नाही.
मद्रास कॅफेचा हेतू मला उदात्त
मद्रास कॅफेचा हेतू मला उदात्त वाटला नाही>>
आता यात नेमके असे काय आहे की ज्याला महान म्हणावे?>>>>
उदात्तिकरण आणि महान कलाकृती या अपेक्षा काय "डर्टी पिक्चर" सारख्या चित्रपटांकडुन ठेवायच्या .. ?
.:खोखो:
प्रतिसाद संपादीत. सिनेमा
प्रतिसाद संपादीत.
सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे शिनेम्याबद्दल नो कमेण्टस. एलटीटीईच्या संदर्भाने विजय देवधरांचा लोकप्रभाच्या जुन्या अंकातला एक लेख आठवला. मिळाला तर अवश्य वाचा. खूप वेगळा अँगल दिलाय त्यात.
राजीव परत सत्तेत येतील आणि मग
राजीव परत सत्तेत येतील आणि मग परत एकदा शांतता वाटाघाटी , शांती सेना (?) इत्यादी होईल या भीतीने लिट्टे (चित्रपटात एल टी एफ ) त्यांची हत्या करतात असे दाखवले आहे. वास्तविक १९९१ ला राजीव सत्तेत येण्याची शक्यता कमी होती. १९८९ किंवा ९६ सारखी त्रिशंकू अवस्था येण्याची शक्यता जास्त होती. राजीव गांधी हत्या होवून सुद्धा कॉंग्रेस ला पूर्ण बहुमत मिळाले नाही (नरसिंह राव यांनी ५ वर्षे हिकमतीने अल्प मतातील सरकार चालवले). तेव्हा राजीव परत सत्तेत येतील यापेक्षा पूर्वी ते सत्तेत असताना जे काही केले त्याचा बदला / सूड म्हणून हत्या झाली असावी हे जास्त पटते.
-अवांतर हत्या होईल असा इशारा RAW चे ज्येष्ठ अधिकारी देत होते तरीही राजीव सभा घेत राहिले आणि लोकांत मिसळत राहिले हा निष्काळजी पणा नाही का? २ दिवस दौरे करू नका हा सल्ला त्यांने मानावायला हवा होता.
डर्टी पिक्चरमधील संदेश
डर्टी पिक्चरमधील संदेश 'प्रसिद्धीच्या शिखरावर असताना यशाचे सातत्य गृहीत धरू नये व सर्वांचे सर्व दिवस सारखे नसतात' असे होते.
राजीव परत सत्तेत येतील आणि मग
राजीव परत सत्तेत येतील आणि मग परत एकदा शांतता वाटाघाटी , शांती सेना (?) इत्यादी होईल या भीतीने लिट्टे (चित्रपटात एल टी एफ ) त्यांची हत्या करतात असे दाखवले आहे.>> हा सिनेमा आहे, सत्यघटनेवर आधारित असला तरी सत्यच दाखवणारा नव्हे! तेव्हा त्यांनी एक घटना घेऊन वेगळ्या पद्धतीने मांडली आहे - त्याच्यावरून खरं खोटं करायची काहीच आवश्यकता नाही.
तरीही राजीव सभा घेत राहिले आणि लोकांत मिसळत राहिले हा निष्काळजी पणा नाही का? २ दिवस दौरे करू नका हा सल्ला त्यांने मानावायला हवा होता.>> व्होट और राजनीती का तकाजा है भाई! आणि हल्ला व्हायचा तो दोन दिवसांनंतर व्हायचा थांबला नसताच की...
किरणु, हो असा काहीसा लेख वाचलेला आठवतो आहे. मोसाद, अमेरिका, चीन, भारत, शस्त्रास्त्रकारखानदारांच्या लॉबीज अशा विविध स्टेकहोल्डर्सवर बरेच दिवस चर्चा झालेली आठवते आहे. पण विषयाचा अभ्यास नसल्याने तपशीलात सत्यासत्यता माहित नाही. आणि हो, श्रीलंकेचा किनारा हा फार प्राचीन काळपासून अत्यंत स्ट्रॅटेजिक (आर्थिक-राजकीय दृष्ट्या) भूभाग मानला गेलेला दिसतो. तेव्हा तो ताब्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्लेयर्सनी यात उतरणं फारसं आश्चर्याचं नाही
एक शंका : नेटवर कुठेही लेख
एक शंका : नेटवर कुठेही लेख सापडत नसल्याने इथे ही माहिती देणं योग्य राहील का ? पोस्ट काढून टाकाविशी वाटतेय.
नेटवर कुठेही लेख सापडत
नेटवर कुठेही लेख सापडत नसल्याने इथे ही माहिती देणं योग्य राहील का ?>>
तुम्ही लेखकाच्या नावासह देत आहात आणि त्यातून तुमचा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही. तसेच तुम्ही स्वतःच्या शब्दातही देत आहात....
मला नाही वाटत असं देण्यात कायद्याने काही गैर आहे आणि समजा असेलच तर तुम्ही 'कुणा तरी मायनरने पोस्ट केले होते' असे सांगू शकालच..
Pages