बालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 August, 2013 - 12:06

लहान मुलांमध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेला योग्य वळण लागलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात, असं हल्ली वर्तमानपत्रांमध्ये अल्पवयीनांकडून घडणार्‍या गुन्ह्यांच्या, आत्महत्यांच्या वाढत्या संख्येबद्दल, लहान मुलांना सामोरं जाव्या लागणार्‍या ताणाबद्दल बोलताना समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ सांगतात.

अशाच एका लहान मुलाबद्दल, त्याच्यातल्या ऊर्जेला लागलेल्या चुकीच्या वळणाबद्दल आणि त्याला राजकारणी म्हणून वाढवण्याचं स्वप्न बघणार्‍या त्याच्या आईवडलांबद्दल रत्नाकर मतकर्‍यांनी काही वर्षांपूर्वी एक कथा लिहिली. या कथेवर आधारलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.

लहान मुलं, त्यांचं भावविश्व यांच्याशी रत्नाकर मतकरी यांचं फार गहिरं आणि जुनं नातं आहे. कॉलेजातून बाहेर पडल्यापडल्या श्रीमती सुधा करमकरकरांच्या आग्रहास्तव त्यांनी लहान मुलांसाठी नाटक लिहिलं - 'मधुमंजिरी'.

मुंबई मराठी साहित्य संघानं या नाटकाची निर्मिती केली होती. मतकर्‍यांचं बालवाङ्मयावर, बालचित्रपटांवर मनापासून प्रेम. त्यामुळे या नाटकाच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांना समाधान देऊन गेली. ’कळलाव्या कांद्याची कहाणी’ हे त्यांनी लिहिलेलं बालनाट्यही नंतर दिमाखात रंगभूमीवर आलं.

मुलांच्या नाटकांत प्रवाहित्व आणि कल्पनाशक्तीला आवाहन या दोन गोष्टी (व त्यांच्या अनुषंगानं प्रसंगपरिपोष, व्यक्तिचित्रण, विनोद इत्यादी) आणता येतील का, हे पाहण्यासाठी त्यांनी काही एकांकिका लिहिल्या, आणि त्या रंगभूमीवर सादर करण्यासाठी ’बालनाट्य’ या संस्थेची स्थापना केली.

’निम्मा शिम्मा राक्षस’ हे ’बालनाट्य’चं पहिलं नाटक. सूचक नेपथ्य, कथेला अनुसरून बदलणारी स्थळं, विनोद, सांकेतिक कल्पनांचं विडंबन इत्यादींमुळे हा प्रयोग फार गाजला. एक प्रकारचं शहाणपण आणि सर्जनशीलता वापरून केलेलं हे नाटक मुलांना फार आवडलं.

पुढल्या विसेक वर्षांमध्ये ऐतिहासिक, फार्स, विद्न्यानकथा, परीकथा अशा अनेक जातींच्या नाटकांमधून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, वेशभूषा असे कितीतरी प्रयोग रत्नाकर मतकर्‍यांनी केले. नाटकं मुलांपर्यंत पोहोचावीत, म्हणून त्यांनी व प्रतिभा मतकर्‍यांनी जिवाचं रान केलं. सुमारे पस्तीस वर्षं मतकरी दांपत्यानं व त्यांच्या सहकार्‍यांनी एका चळवळीच्या निष्ठेनं मुलांसाठी नाटकं केली. मतकरी लिहितात - ’बालरंगभूमीकडे मी केवळ मुलांसाठी केलेले नाटक म्हणून पाहत नव्हतो, तर तिला, ज्यात अनेक नवनवीन प्रयोगांना वाव आहे, असे रंगभूमीचे एक वैशिष्ट्यपूर्ण दालन मानत होतो. दिलीप प्रभावळकरसारख्या नटांनीही जे प्रयोग पुढे त्यांच्या प्रौढ रसिकांसाठीच्या अभिनयात केले, त्यांपैकी कितीतरी, आधी बालनाट्यामध्ये करून पाहिले होते. दुर्दैवाने आपल्याकडे बालरंगभूमीकडे, पोरांची नाटके म्हणून पाहिले जाते, त्यामुळे या प्रयोगांची, रंगभूमीचा गंभीरपणे विचार करणार्‍यांकडूनदेखील घ्यवी तेवढी दखल घेतली गेली नाही. परिणामी हे दालन अधिक संपन्न होण्याऐवजी दिवसेंदिवस ओसाड पडत गेले’.

लहान मुलांच्या घडवणूकीत योग्य ती इन्व्हेस्टमेंट केली नाही, तर विचित्र प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे रत्नाकर मतकर्‍यांप्रमाणे जाणवलं श्रीमती सुलभा देशपांडे यांना.

सुलभाताई गेली अनेक दशकं बालरंगभूमीच्या विकासासाठी झटत आहेत. 'आविष्कार - चंद्रशाला' या त्यांच्या संस्थेद्वारे त्यांनी अनेक बालनाट्यं रंगभूमीवर आणली. आज रंगभूमीवर नाव कमावलेले अनेक नट-दिग्दर्शक सुलभाताईंच्या 'आविष्कार - चंद्रशाला'मधून प्रकाशात आले.

२० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या 'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटात त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे.

या निमित्तानं सुलभाताईंनी त्यांच्या जडणघडणीबद्दल, बालरंगभूमीबद्दल आणि लहान मुलांच्या भावविश्वाबद्दल लिहिलेला लेख -

sulbhatai.jpg

अडीच हजार स्क्वेअर फुटांचं मोठ्ठं घर. तीस बाय आठची एक गॅलरी. डाव्या बाजूला पाहिलं तर अथांग समुद्र. समोर शिवाजी पार्क. उजव्या बाजूला इंजिनीयर मोडकांचा बंगला. अभिनेत्री निरुपा रॉयच्या मालकीच्या इमारतीतल्या तिसर्‍या मजल्यावरच्या त्या भाड्याच्या घरात तीसबत्तीस माणसांच्या कुटुंबात मी राहत होते. माझ्या आजोबांचं पुण्यात दुकान होतं. बिडीतंबाखूचं. शास्त्रीय गायन त्यांच्या अंगात भिनलेलं होतं. नाटकांमध्ये स्त्रीभूमिका करण्यासाठी दुकानाकडे पाठ फिरवून बायकोमुलांसह ते मुंबईला आले. जवळ पैसे नव्हते. चाळीच्या एका खोलीत ते राहायचे. रंगभूमीचा तो पडता काळ होता. चित्रपटांचं युग सुरू झालं होतं. त्यामुळं नाटकांमध्ये काम काही त्यांना मिळालं नाही. पोट भरण्यासाठी मंदिरांमध्ये ते कीर्तन करू लागले. त्यांची चारही मुलं हार्मोनियम उत्तम वाजवत. वडिलांचं गाणं सतत ऐकल्यानं त्यांचे कान उत्तम तयार झाले होते. पण ही भावंडं फारसं शिकली मात्र नाहीत. त्यांचा एकच मुलगा मॅट्रिक होऊ शकला. हे वसंतराव कामेरकर, म्हणजे माझे वडील. सासवण्याच्या राष्ट्रीय शाळेत राहून ते शिकले होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला होता. गाण्यामुळं त्यांना मुंबईतल्या एचएमव्हीमध्ये नोकरी मिळाली होती. कलकत्त्यातल्या या कंपनीची शाखा मुंबईत सुरू झाली होती, आणि तिथले ते पहिले रेकॉर्डिस्ट होते.

रेकॉर्डिगसाठी नव्या कलाकारांच्या शोधात माझे वडील सतत असत. त्यांना गाण्याचं, नाटकांचं प्रचंड वेड होतं. नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मा. दत्ताराम, दुर्गाबाई खोटे यांच्या नाटकांच्या तालमी आमच्या घरी चालत. गदिमा, सुधीर फडके, शोभा गुर्टू, मल्लिकार्जुन मन्सूर, स्नेहल भाटकर रेकॉर्डिंगच्या निमित्तानं घरी नेहमी येत असत. आशाताई भोसल्यांचं पहिलं रेकॉर्डिंग माझ्या वडिलांनी केलं होतं. माझ्या आजीशी गप्पा मारायला त्या घरी येत असत. काही नवीन लिहिलं की गदिमाही आजीला वाचून दाखवायला यायचे. आमच्या घरात चोवीस बाय चोवीसचा एक मोठ्ठा हॉल होता. या हॉलमध्ये नाटकांच्या, गाण्याच्या तालमी चालत. बरीच लहान होते मी तेव्हा, पण नाटकातल्या तालमी मी मनापासून बघत असे, आणि सगळी मंडळी आपापल्या घरी गेली की, त्यांनी म्हटल्याप्रमाणे नाटकातले संवाद म्हणत असे. आजी मला गाण्याच्या तालमी ऐकायला बसवायची. तिला गाण्याची विलक्षण आवड होती. कान फार तयार होता तिचा. त्यामुळं उत्तम गाणं आम्हां भावंडांनी ऐकलंच पाहिजे, असं तिचं फर्मानच होतं. ’मला गाणं बघायला आवडत नाही, ते विचित्र हातवारे करतात’, असं मी म्हटलं की ती म्हणायची, ’तोंड फिरव आणि कान तिकडं कर’. अशा अतिशय समृद्ध वातावरणात मी वाढले. पण मी नाटकाकडं वळले, त्याचं कारण मात्र वेगळंच होतं.

आम्ही अकरा भावंडं. माझी मोठी बहीण म्हणजे प्रेमा साखरदांडे. मग भाऊ बापू कामेरकर. तिसरी बहीण ज्योत्स्ना कार्येकर, आणि चौथी मी. माझे बहीणभाऊ दिसायला देखणे होते. माझं रूप मात्र अगाधच. सावळा रंग, बारीक अंगकाठी. घरच्यांनी कधीच मला माझ्या रूपाबद्दल जाणीव करून दिली नाही. बाहेरचे मात्र फार बोलत असत. घरी आलेले पाहुणे चेष्टेत विचारत, हिला भाकरीवर घेतलं का, म्हणून. हे ऐकलं की वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात यायचे. मी तर सगळ्यांत धाकटी, मग मला भाकरीवर का घेतलं असेल? आणि जर भाकरीवर घेतलं असेल, तर आपण आता नक्की करायचं काय, हे मला काही कळत नसे. पण एके दिवशी मला ते कळलं. माझा आवाज तसा चांगला होता. मी गायचेही सूरात. शाळेत मी एकदा गाणं म्हटलं होतं - ’खबरदार जर टाच मारुनि’, आणि ते ऐकून मला आठ आणे बक्षीस मिळाले. त्या काळातले आठ आणे. मी चांगलं गाऊ शकते, हे मला तेव्हा कळलं. मग माझे वडील मला म्हणाले की, गाणं शीक. पण मला गाणं शिकायचं मात्र नव्हतं, कारण त्या हातवार्‍यांची मला भीती वाटायची. आधीच मी भाकरीवर घेतलेले, त्यात परत गाताना तोंड वेडंवाकडं केलं तर लोक काय म्हणतील? म्हणून आवाज बरा असूनही मी गाणं काही शिकले नाही. एक दिवस नानासाहेब फाटकांची तालीम आमच्या घरी सुरू होती. हातवारे करत पल्लेदार संवाद ते म्हणत होते, आणि मी तल्लीन होऊन त्यांच्याकडे बघत होते. तालीम संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले, आणि मी नानासाहेबांनी तालमीत केलेला प्रवेश जसाच्या तसा करून दाखवला. घरी स्वयंपाकाला, वरकामाला असणार्‍या स्त्रिया या माझ्या प्रेक्षक. ’काय छान काम करतेस गं! अगदी हुबेहूब नानासाहेबांसारखं!’ असं त्या म्हणाल्या. अरेच्चा! म्हणजे मला चांगलं कामही करता येतं तर, आणि हे असे नाटकातले संवाद म्हणून दाखवले की, कौतुकही होतं आपलं. दहा वर्षांची असेन मी तेव्हा. माझी मोठी बहीण तेव्हा कथ्थक शिकायची. दोन्ही बहिणी, भाऊ सुरेख गायचे. अधूनमधून नाटकांत कामंही करायचे. त्यांचं घरात होणारं कौतुक मी बघत होतेच. मी म्हटलेल्या संवादांमुळं मला शाबासकीची थाप मिळाली. असे नाटकातले संवाद छान म्हटले की शाबासकी मिळते हे मला कळलं आणि आपणही नाटकात काम करायचं, असं मग मी ठरवूनच टाकलं.

म्यूनिसिपल शाळेत मी तेव्हा जात असे. खूप आवडायची मला ही शाळा. माझं गाणं, गाण्यात अभिनय करणं यांमुळं शाळेत मी सर्वांची लाडकी होते. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. पाचवीत नव्या शाळेत प्रवेश घेतला तोपर्यंत माझी भीड चेपली होती. या माझ्या नव्या शाळेचं नाव होतं छबिलदास, आणि आमच्या प्रिन्सिपॉलबाई होत्या ताराबाई खेर. खेरबाईंना शाळेला ’छबिलदास’ म्हटलेलं आवडायचं नाही. ’जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्यूट मुलींची शाळा’ असं म्हणायचं. मी मात्र ’छबिलदास मुलींच्या शाळेत जाते’ असंच सगळ्यांना सांगत असे. या शाळेत माझी ऐट होती. ही मुलगी गाते, बर्‍यापैकी अभिनय करते, हे या शाळेतही कळलं होतं. गाणं म्हटलं, त्या गाण्यावर अभिनय केला की लोक आपल्याकडे बघतात, आपलं कौतुक करतात याची जाणीव मला झाली होती. जणू माझं अस्तित्व नव्यानं मला कळलं होतं.

१९४४ सालच्या सुमारास मुंबईच्या गोदीत मोठा बाँबस्फोट झाला. वातावरण अस्थिर होतं. म्हणून माझ्या वडिलांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला सांगलीला पाठवून दिलं. नोकरी करणारी पुरुष मंडळी तेवढी मुंबईत राहिली होती. तीनचार महिने असू आम्ही सांगलीत. तिथे घराशेजारीच एक थिएटर होतं आणि आम्हांला फुकटात नाटकं बघायला मिळत. या थेटरात मी पहिल्यांदाच एक बालनाट्य बघितलं. शिरगोपीकरांचं असावं ते बहुतेक. नाव आठवत नाही आता, पण त्या नाटकात झाशीची राणी होती. आणि राणीला आणि तिच्या बाळाला पाठीवर घेतलेला घोडा रंगमंचावर उडला होता. मी आ वासून बघतच राहिले. थरारले होते मी. आपणही असं काहीतरी केलंच पाहिजे, असं मला वाटायला लागलं. मुंबईला परत आलो तेव्हा मी ठरवूनच टाकलं होतं की, आपणही अशा नाटकात काम करायचं. झाशीच्या राणीचं काम मिळालं नाही तरी चालेल, निदान तिच्या पाठीला जे बाळ बांधलं होतं, त्या बाळाचं काम करायचं. नाटकानं माझ्या मनावर गारुड केलं होतं. सहावीत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनात ’हरिजन बालक कि फरियाद’ असं पद अभिनयांकित करायचं होतं, आणि हरिजन बालक म्हणून माझी निवड झाली. माझ्या मोठ्या बहिणीला, ज्योत्स्नाला, देवाचं काम मिळालं. पण देवाचं काम करायचं होतं मला. हरिजन बालकाची भूमिका मी का करायची? मी चांगली दिसत नाही म्हणून? मी गेले तक्रार घेऊन ताराबाई खेरांकडे. त्यांना सांगितलं की, मुकुट, दागिने वगैरे घातले, चेहर्‍याला पावडर लावली की मीही बर्‍यापैकी देव दिसू शकेन. त्या म्हणाल्या, अगं वेडे, या नाटिकेत हरिजन बालकाची मुख्य भूमिका आहे. त्यात तुला गाणं म्हणायचं आहे. अभिनय करायचा आहे. देवाला काय काम या नाटिकेत? तर सिंहासनावरून खाली उतरायचं आणि त्या बालकाला मिठी मारायची. मला काही खेरबाईंचं म्हणणं पटलं नाही. माझ्या दिसण्यावरून माझी कुचेष्टा होते, असं माझं ठाम मत होतं, आणि मला एकदा सर्वांना देवासारखं दिसून दाखवायचंच होतं. मी बराच हट्ट केला, पण मला काही देवाचं काम मिळालं नाही. फुणफुणतच मी हरिजन बालकाचं काम केलं खरं, पण माझ्या गाण्याचं, अभिनयाचं फार कौतुक झालं. तरी माझा चेहरा पडलेलाच. कार्यक्रम संपल्यावर मला शाळेच्या ऑफिसातून बोलावणं आलं. या वार्षिक संमेलनाला अध्यक्ष म्हणून आले होते साने गुरुजी. त्यांनी मला कार्यक्रमानंतर शाळेच्या ऑफिसात बोलावलं. रडवेल्या चेहर्‍यानंच मी त्यांना भेटायला गेले, आणि त्यांनी मला मिठीत घेतलं. माझ्या पाठीवरून हात फिरवला. म्हणाले, "तू खूप मोठी अभिनेत्री होणार आहेस". त्यावेळी काय वाटलं हे मला शब्दांत सांगता येणार नाही. साने गुरुजी किती थोर आहेत, हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. त्यांची पुस्तकं वाचली होती मी, त्यांना मिळणारा मान मी बघितला होता. त्यामुळं त्यांनी माझं कौतुक केलं, याचं बरेच दिवस अप्रूप वाटत राहिलं. शाळेत आता माझी ऐट वाढली. नाटकात मी मुख्य भूमिका करायची, हे आता ठरूनच गेलं होतं. शिक्षकांच्या नाटकांतही मी काम केलं. दहावीत असताना रामचंद्र वर्द्यांच्या ’देवमाणूस’ या नाटकात मी काम केलं होतं. या नाटकाच्या वेळी वर्द्यांचे साहाय्यक दिग्दर्शक होते श्री. अरविंद देशपांडे.

invsulabha2.jpg

अकरावी झाली, आणि मी सिद्धार्थ कॉलेजला प्रवेश घेतला. काकांनी हातावर एकशे पस्तीस रुपये ठेवले, आणि म्हणाले, "यापुढे तुझं शिक्षण तुलाच करावं लागेल". वडील बिचारे दुसरीकडे तोंड करून बसले होते. मऊ आवाजात म्हणाले, "शिकायचंय ना? मग नोकरी करावी लागेल". घरातली परिस्थिती मला दिसत होती. व्याप मोठा, आणि सांभाळणारं कोणी नाही. त्यात वडिलांचं नाटकाचं, गाण्याचं वेड. शिक्षणासाठी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण कॉलेजातही माझं नाटकात काम करणं थांबलं नव्हतं. ’सुलभा कामेरकर नावाची एक मुलगी आपल्या कॉलेजात येणार आहे, ती उत्तम काम करते, तिला या वर्षीच्या नाटकात घ्या’, असा निरोप अरविंद देशपांडे कॉलेजच्या सांस्कृतिक विभागात ठेवून गेले होते. तेही सिद्धार्थ कॉलेजचेच विद्यार्थी, पण माझ्या आधी पास होऊन बाहेर पडले होते. माझं कॉलेज आणि नोकरी असं दोन्ही सुरू झालं. विद्याधर पुंडलीक आम्हांला इतिहास शिकवायला होते. इतिहासाचा तास शेवटचा असायचा आणि तो बुडवून मला नोकरीला जावं लागायचं. सेल्सटॅक्स ऑफिसात. तिथं आकडेमोड करावी लागायची. एकदा चुकून मी त्यांच्या तासाला बसले. त्यांनी माझ्याकडे बघितलं, आणि म्हणाले, "तुम्ही माझ्या वर्गात आहात? या कॉलेजात आहात हे माहीत होतं. नाटकातलं काम फार छान झालं होतं तुमचं". मी गप्प. बोलणार काय? पण त्यांना सगळी परिस्थिती सांगितली मी. मी नोकरी करते, नाटकांमध्ये कामही करते, रामचंद्र वर्द्यांच्या नाटकांमध्ये काम केलं आहे, हे कळल्यावर त्यांनी माझं फार कौतुक केलं. नाटकामुळं पुन्हा एकदा मला शाबासकी मिळाली.

कॉलेजात असतानाच अरविंद देशपांड्यांनी मला त्यांच्या नवनाट्याच्या चळवळीत ओढलं. या चळवळीत दामू केंकरे होते. विजया मेहता होत्या, माधव वाटवे होते. तेंडुलकर होते. पुष्पा भावे होत्या. बरीच मोठी मंडळी या चळवळीशी संबंधित होती. ’रंगायन’चे अगदी सुरुवातीचे दिवस होते ते. त्यांच्या नाटकांमध्येही काम करणं मग सुरू झालं. पण नंतर झालं असं की, नोकरीचा व्याप सांभाळून कॉलेजकडे नीट लक्ष देणं होईना, आणि मी आजारी पडले. सेल्सटॅक्सची नोकरीही सुटली कारण ती तात्पुरती होती. त्यामुळं शिक्षण पुरं कसं करायचं, हा प्रश्न उभा राहिला. आमच्या शाळेच्या प्रिन्सिपॉल ताराबाई खेर यावेळी पुन्हा माझ्या मदतीला आल्या. मला म्हणाल्या, एका वर्षाचा सीपीएडचा कोर्स आहे, तो तू कर. म्हणजे आपल्या शाळेत तुला नोकरी करता येईल, आणि शिक्षणही पुरं होईल तुझं. हा कोर्स मी पूर्ण केला आणि छबिलदास शाळेत नोकरीला लागले. तेव्हा खेरबाई मला म्हणाल्या की, आंतरशालेय नाट्यस्पर्धा असतात, त्यांसाठी नाटकं तू बसव. मोठ्यांच्या स्पर्धांसाठी नाटकं बसवायला अनेकजण होते, पण मुलांच्या स्पर्धांची जबाबदारी घेणारं कोणीच नव्हतं. ’रंगायन’मुळे मला नाटकांचा अनुभव होता. शिवाय बी.एड.साठी मानसशास्त्र हा विषयही होता. त्यामुळं मुलांबरोबर मी चांगलं काम करू शकेन, असं मला वाटत होतं. मी खेरबाईंना होकार दिला आणि स्पर्धेसाठी नाटक शोधायला सुरुवात केली. अगोदर प्रयोग झालेली नाटकं मला परत करायची नव्हती. म्हणून मी विजय तेंडुलकरांकडून बालनाट्य लिहून घेतलं. ’पाटलाच्या पोरीचं लगीन’ हे या एकांकिकेचं नाव. त्यापूर्वी त्यांनी एका संस्थेसाठी 'येथे बाळे मिळतात' हे बालनाट्य लिहिलं होतं. आणि विजयासाठी (श्रीमती विजया मेहता) 'अंधेरनगरी'. 'अंधेरनगरी' विजयानंच बसवलं होतं 'रंगायन'साठी. पुलंची एक एकांकिका जोडीला होती. 'पुलं आणि तें' असं त्या प्रयोगाचं नाव होतं. पण 'येथे बाळे मिळतात' मला पुन्हा करायचं नव्हतं, म्हणून मी तेंडुलकरांना नवीनच एकांकिका लिहून मागितली. पुढे मग दरवर्षी या स्पर्धेसाठी मला ते एक नवीन एकांकिका लिहून देत. 'अंधेरनगरी'नंतरच्या लहान मुलांसाठीच्या सगळ्या एकांकिका त्यांनी खास माझ्यासाठीच लिहिल्या.

या एकांकिकांमध्ये माझ्या अर्ध्या-पाऊण वर्गाला तरी भाग घेता आलाच पाहिजे, असं मी तेंडुलकरांना सांगितलं होतं. दोनतीन विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसवणं काही मला पटत नव्हतं. वर्गातल्या जास्तीत जास्त मुलांना नाटकात भाग घेता येणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं. नाटक म्हणजे काय, त्यातून आपल्याला ऊर्जा कशी मिळते, नाटक करण्यात कशी मजा आहे, हे सर्व या मुलांना लहानपणीच कळलं तर मला हवं होतं. माझ्यासाठी म्हणून त्यांनी लहान मुलांच्या एकंदर सहा एकांकिका लिहिल्या. मला त्या एकांकिकांत नक्की काय हवं आहे, हे त्यांना ठाऊक होतं. ते छान, सोपे संवाद लिहीत. त्यामुळे मुलांचा वावरही खूप मोकळा असे. शिवाय मुलांना त्या नाटकांतून काहीतरी मिळालं पाहिजे, आणि मुलांच्या अंगी असलेली ऊर्जा त्या नाटकात वापरली गेली पाहिजे, याची ते काळजी घेत. माझी सर्व मुलं अक्षरशः दरवर्षी या स्पर्धांची वाट बघत असत. नाटक बसवताना खूप मजा यायची त्यांना. अतिशय उत्साहानं ती मुलं नाटक बसवण्याची आणि ते सादर करण्याची सर्व प्रक्रिया मस्त एंजॉय करायची. सहाही वर्षं आम्हांला पहिलं बक्षीस मिळालं होतं.

'पाटलाच्या पोरीचं लगीन'नंतर 'राजाराणीला घाम हवा' आम्ही केलं होतं. 'घाशीराम कोतवाल'मध्ये वापरला आहे, त्या फॊर्मचा प्रयोग त्यांनी आधी या एकांकिकेत करून बघितला असावा. म्हणजे संगीत-नृत्याचा एकत्रित वापर त्यांनी या नाटकात केला होता. 'घाशीराम'मध्ये ब्राह्मणांची भिंत होती तशी इथे राजाराणी आणि त्यांच्या प्रजेची भिंत होती. 'घाऽम.. घाऽम..' असं म्हणत ती भिंत झुलत असे. दोन्हींचं संगीत तालबद्ध होतं. अनेक नृत्यंही सारखी होती. या एकांकिकेत राजाराणीला घाम म्हणजे काय, हेच ठाऊक नसतं. मग निघतात ते बाहेर घाम शोधायला. घाम काही त्यांना सापडत नाही. मग एकदा राणीच्या कपाळावरून पाणी खाली येतं. राजाला आनंद होतो. 'घाम म्हणजे काय ते एकदा कळलं तरी', असं त्याला वाटतं. पण ते पाणी असतं काळं. घामाला रंगच नसतो असं त्याला सांगितलं असतं. म्हणजे हा घाम नाहीच. मग पुन्हा घामाचा शोध सुरू. लहान मुलांना आवडतील, समजतील असे विषय घेऊनच ते एकांकिका लिहीत. मुलांना गोष्ट सांगताना आपण काही सरधोपट प्रतीकं वापरतो. म्हणजे लबाड कोल्हा, चतुर लांडगा, गरीब हरीण वगैरे. आणि मग लहान मुलांच्या नाटकांतही प्राणी, राक्षस, चेटकीण वगैरेच असतात. तेंडुलकरांनी लिहिलेल्या एकांकिका फार वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, 'चिमणा बांधतो बंगला'. एका झाडावर एक चिमणा बंगला बांधतो. चिमणीसाठी आणि पिल्लांसाठी. त्याच झाडावर एका चिमण्याचं घरटं असतं. साधंच. काट्याकुट्यांचं. हा बंगला मात्र एकदम पॉश. तसंच मग तो चिमणाही राहतो एकदम पॉश. पण एकदा खूप मोठ्ठं वादळ येतं. बंगला पडतो. वरचं साधंच घरटं मात्र तसंच असतं. मग त्या घरट्यातला म्हातारा चिमणा त्या बंगलेवाल्या चिमण्याला आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या घरट्यात आश्रय देतो वगैरे. आता मुलांना चिमण्याचा बंगला ही कल्पनाच खूप अद्भुत आणि मस्त वाटायची. जुनं ते वाईट आणि नवीन ते चांगलं असं मानणार्‍या चिमण्याची गोष्ट त्या नाटकातून तेंडुलकर इतकी मस्त सांगायचे की सर्वच वयाच्या विद्यार्थ्यांना त्यातून बर्‍याच गोष्टी समजत असत.

पुढे एकदा कधीतरी 'यांच्याच नाटकांना बक्षीसं मिळणार.. तेंडुलकर लिहितात, आणि ह्या सादर करतात, मग आम्ही कशाला भाग घ्यायचा', असं काहीसं बोलणं कानावर आलं आणि मी त्या स्पर्धांमध्ये भाग घेणं थांबवलं. त्यानंतर अर्थातच मी तेंडुलकरांकडे बालनाट्य लिहून मागितलं नाही आणि त्यांनीही परत कधी बालनाट्य लिहिलं नाही. स्पर्धेत पुन्हा भाग घेतला नाही, तरी शाळेसाठी आणि ’आविष्कार’साठी बालनाट्यं मी केली. वंदना विटणकरांचं ’रॉबिनहूड’ केलं. त्यांचंच ’खोट्याच्या कपाळी गोटा’ केलं. ’आला अडाण्याचा गाडा’ केलं. नाना पाटेकर, सतीश पुळेकर, रामनाथ थरवळ, बापू कामेरकर, विद्या पटवर्धन असे कलाकार त्यात होते. या बालनाट्यांच्या निमित्तानं मला माझ्या मनातल्या बालनाट्याशी संबंधित असलेल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या.

माझ्या दृष्टीनं बालनाट्य आणि बालरंगभूमी या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. नाटकातून विचार मांडला जातो. नाटकासाठी प्रेक्षकांची आणि जागेची गरज असते. नाटकात लेखक महत्त्वाचा असतो. त्याला जे सांगायचं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो व्यक्तिरेखा निर्माण करतो. या व्यक्तिरेखा लहान मुलांसाठी निर्माण करायच्या असतील, तर त्यांची आकलनाची क्षमता, ती एका जागी किती वेळ बसू शकतील, याचा अंदाज घ्यायला हवा. नाटकाचा विषय मुलांना रंजक वाटेल, ओळखीचा असेल, असाच हवा. विषयाचा त्यांच्या जगण्याशी संबंध असला पाहिजे. त्यांच्या मनांत सारखे जे प्रश्न उमटत असतात, त्यांची उत्तरं त्यांना नाटकातून मिळाली, तर उत्तमच. किंवा नवे प्रश्न मनात तयार होऊन त्यांची उत्तरं शोधायला ती उद्युक्त व्हायला हवीत. नाटकांचे विषय प्रेक्षकांच्या वयाप्रमाणंही बदलले पाहिजेत. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग वेगळं असतं. लहानपणी अनुकरणावर जास्त भर असतो. थोडी मोठी मुलं मात्र आपली कल्पनाशक्ती वापरत असतात. त्यांना पडणारे प्रश्न वेगळे असतात. हे लक्षात घेऊन नाटकांचे विषयही बदलले पाहिजेत. आविष्करण बदललं पाहिजे. याचा मोठा फायदा असा की, अशा नाटकांचा अनुभव घेतलेली मुलं झापडं बांधत नाहीत. बालरंगभूमीचं काम म्हणूनच फार मोठं आहे.

invsul1.jpg

नाट्य जास्त व्यापक आहे. सगळ्यांच्या जीवनात नाट्य सतत घडतच असतं. प्रत्येकाचा स्वतंत्र असा स्वभावधर्म असतो. दोन वेगळ्या प्रवृत्ती एकत्र आल्या की तणाव निर्माण होतो आणि त्यातून नाट्य निर्माण होतं. अग्नी आणि जल यांचे धर्म वेगळे आहेत, पण ते एकत्र आले की आग विझते. म्हणजे एक तिसरीच क्रिया घडते. पण अग्नी आणि वायू एकत्र आले तर आग भडकते. पाण्याच्या गुणधर्म वाहणं. दगड स्थिर असतो. पण दगडावर पाणी पडलं की, तुषार तयार होतात. अशा संघर्षातून, समन्वयातून नाट्य निर्माण होतं. हे नाट्य प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. लहान मुलांच्या आयुष्यातही असतं. सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते, आणि त्यातूनच नाट्य जन्माला येतं. ’सत्यं शिवं सुंदरम’ या वचनातल्या सत्याचा शोध विज्ञान घेतं. शिव म्हणजे तुमचं जगणं असतं. या जगण्यात सौंदर्य निर्माण करणं, हे कलाकाराचं काम. हे सौंदर्य अमूर्त असतं, आणि प्रत्येक कलेत ते असतं. कलाकार आपल्या कलेद्वारे हे सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचवतात. लहान मुलं निष्पाप असतात. ती प्रत्येक गोष्टीला नव्यानं सामोरी जात असतात. नवे अनुभव घेत असतात. या अनुभवांतून ते जे शिकतात ते त्यांना कृतीत आणायचं असतं. त्यांनी जे ऐकलं आहे, पाहिलं आहे, ते कोणाला तरी सांगायचं असतं. हे कसं जमणार? इथं नाट्य उपयोगास येतं. नाट्य त्यांना नवे अनुभव देतं. तर्कबुद्धी, कल्पनाशक्ती विकसित करतं. मनात अनेक प्रश्न निर्माण करतं. जास्तीत जास्त मुलांना नाट्याचा स्पर्श व्हायला हवा म्हणून वर्गातल्या सगळ्यांना भाग घेता येईल, असंच नाटक मला लिहून द्या, हे मी यासाठीच तेंडुलकरांना सांगितलं होतं. या आमच्या नाटकांमध्ये कोणी लेखन करत होतं, कोणी अभिनय करत होतं, कोणी गाणी गात होतं. स्पर्धेसाठी आणि शाळेत मी जी बालनाट्यं बसवली त्यांत मला नाट्यामुळं मुलांचा होणारा विकास चांगलाच अनुभवता आला.

बालनाट्यचळवळीचा विकास व्हावा, या चळवळीत सामील असणार्‍यांचा एकमेकांशी संवाद व्हावा, या हेतूनं कार्यरत असलेल्या ’अ‍ॅसिटेज’ या संस्थेमार्फत या अनुभवांमुळंच मला रशिया, अमेरिका, जपान या देशांमध्ये तिथल्या चळवळींचा अभ्यास करण्यासाठी जाता आलं. मॉस्कोला मी गेले होते, तेव्हा तिथं एकशे सव्वीस दालनांचं थिएटर होतं लहान मुलांसाठी. ही एकशे सव्वीस दालनं कशासाठी? तर मुलांना त्यांच्यातल्या कलागुणांचा शोध घेता यावा यासाठी. मुलांमधला सुप्त कलाविष्कार बाहेर काढण्यासाठी. मुलांचे पालक मुलांना तिथं रोज घेऊन यायचे. त्यांना हव्या त्या दालनात मुलं जात. प्रत्येक दालनात एक मार्गदर्शक असे. प्रत्येक खोलीत त्या त्या कलाप्रकाराला आवश्यक अशी सगळी सामुग्री असे. काही खोल्यांमध्ये वाद्यं होती, एका खोलीत मुलांचं मातीकाम सुरू होतं. एका खोलीत कठपुतळ्यांचा खेळ शिकवला जात होता, तर एका खोलीत जादूचे प्रयोग सुरू होते. आपल्याला हव्या त्या दालनात जायचं, हवा तितका वेळ तिथं घालवायचा. करमलं नाही तर दुसरं दालन आहेच. आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला कशात गती आहे, हे किती लवकर त्या मुलांना कळत होतं! शिवाय असंख्य कलाप्रकारांशी त्यांची योग्य त्या वयात ओळख होत होती. ही १९७८ सालची गोष्ट. रशियातून परत आल्यावर पुढच्याच वर्षी आम्ही ’चंद्रशाला’ सुरू केलं. ’आविष्कार’ची ही लहान मुलांसाठीची शाखा.

’चंद्रशाला’ ही खरं म्हणजे माझ्या वडिलांची कल्पना होती. मुलांच्या कलाविष्कारासाठी एखादं केंद्र असावं, अशी त्यांची इच्छा होती. ’चंद्रशाला’ हे नाव मात्र गदिमांनी सुचवलं होतं. व्ही. शांतारामांनी उद्घाटन केलं होतं. स्थापनेनंतर लगेच आम्ही एक प्रयोग केला होता. दहा शाळांमधली प्रत्येकी दहा मुलं आम्ही निवडली, आणि या मुलांचं एक शिबिर घेतलं. या शिबिरात सुरुवातीला आम्ही या मुलांची ओळख पिंगुळी चित्रकथीशी करून दिली. आपल्या लोककलेचा फार जुना आणि महत्त्वाचा भाग आहे हा. चित्रकथी म्हणजे चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणे. या कथा बहुतांशी पुराणातल्या किंवा पंचतंत्रातल्या असतात. अनेक कुटुंबं चित्रकथीचे खेळ करत गावोगाव हिंडतात. अनेक शतकांपासून त्यांचा या कलाप्रकाराशी संबंध आहे. तर या शिबिरामध्ये एकूण शंभर मुलं होती, आणि प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक होते. एक चित्रकलेचे आणि ज्यांच्यावर शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी असते, असे दुसरे. एकूण पंधरा दिवसांचं हे शिबिर होतं. पहिले दोन दिवस आम्ही आमंत्रित केलेल्या कलाकारांनी मुलांना चित्रकथीचे खेळ दाखवले. या खेळात एक कथा सांगणारा होता, काहीजण गाणारे होते आणि इतर काही चित्रं हलवत होते. या सगळ्यांच्या समन्वयातून चित्रकथी साकार होत होती. मुलांना या चित्रकथी फार आवडल्या. अगदी गुंगून गेली होती ती. हलती चित्रं, गाणी हे नाहीतरी मुलांच्या आवडीचं असतंच. मग तिसर्‍या दिवशी आम्ही मुलांचा आणि कलाकारांचा संवाद घडवून आणला. मुलांना काय काय प्रश्न पडले होते. ही चित्रं तुम्ही कशी काढता, नेमकं कुठलं चित्र कधी दाखवायचं हे लक्षात कसं ठेवता असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले. त्या दिवशी ही कलाकार मंडळी आपल्या गावी परतल्यावर आम्ही मुलांना सांगितलं की, आता आपणही चित्रकथीचा एक खेळ करायचा. आपण चित्रं काढायची, संवाद लिहायचे आणि गाणी म्हणायची. मुलं एकदम खूश झाली. त्यांना विचारलं की, कुठली कथा आपण चित्रकथीसाठी निवडायची? मुलं म्हणाली, ससा आणि कासवाची गोष्ट. मी त्यांना म्हटलं की, ही कथा तर तुम्हांला अगदी छान ठाऊक आहे. आपण काहीतरी वेगळं करू. हा ससा का हरला, आणि हरल्यानंतर पुढं काय झालं, ती गोष्ट आपण लोकांना सांगू. ही नवी गोष्ट तयार करण्यासाठी मुलांना त्यांची कल्पनाशक्ती वापरावी लागली, त्यांच्या निरीक्षणशक्तीचा कस लागला, आणि त्यांच्या तर्कबुद्धीला चालना मिळाली. मुलांनी एकमेकांना प्रश्न विचारून, एकमेकांशी बोलून ही नवी गोष्ट तयार केली.

मुलांना आम्ही ही गोष्ट लिहून काढायला सांगितली. तशी त्यांनी ती लिहिली. पण चित्रकथीतून ही गोष्ट सांगायची तर नुसती सलग गोष्ट लिहून उपयोगाची नाही. प्रसंग तयार करायला हवेत. असे आठ प्रसंग मुलांनी तयार केले. तो ससा त्याच्या आईकडे रडतरडत गेली. आईनं विचारलं की, तू शर्यतीत झोपलास कसा? मुलांनी कारण सांगितलं, त्याला कोवळं, लुसलुशीत गवत दिसलं आणि त्यानं ते खाल्लं. मग आईनं विचारलं, गवत खाल्लंस तरी शर्यत सोडून झोपला का तू? गवत खाऊन झाल्यावर पुन्हा पळायला सुरुवात करायचीस. मुलं म्हणाली, असं दुपारी अवेळी गवत खाल्ल्यावर त्याला झोप आली, आणि तो झोपला. त्याला उठवायला तिथं त्याची आई नव्हती, म्हणून तो झोपूनच राहिला, आणि तो हरला. मग या गोष्टीचं तात्पर्य काय? मुलं म्हणाली, फार वेळ झोपू नये. ससा जर थोडाच वेळ झोपला असता तर तो हरला नसता. गवत खाल्ल्याचं त्याला वाईट वाटलं नसतं. आता ही गोष्ट तयार झाल्यावर ती सांगायची कोणी? गोष्ट सांगणारं एक पात्र हवं. ते कोण असावं? मुलं म्हणाली, कोल्हा. कोल्हाच का? तर तो चतुर असतो म्हणून. हा कोल्हा सशाची गोष्ट सांगणार म्हणजे तो त्याला ओळखत असावा. त्याच्या शेजारी राहत असावा. म्हणून तर त्यानं सशाचं आणि त्याच्या आईचं बोलणं व्यवस्थित ऐकलं. हे नावं पात्र चित्रकथीत आणल्यावर काही मुलांना एक मजेदार गणित मांडलं. शर्यत जिंकायला कासवाला किती वेळ लागला? सशाला किती लागला असता? हा फरक किती मिनिटांचा? म्हणजे ससा किती वेळ झोपू शकला असता? मग तो ससा जर छोटंसं घड्याळ खिशात घालून शर्यतीत गेला असता, तर त्याला गजर लावून उठता आलं असतं, आणि तो शर्यत जिंकला असता. अशा कितीतरी शक्यतांचा त्या मुलांनी विचार केला. आम्ही फक्त त्यांना सुरुवात करून दिली, आणि नंतर त्या मुलांनी त्यांच्या जबरदस्त विचारशक्तीनं आम्हांला थक्क केलं.

आता मुलांनी तयार केलेली गोष्ट चित्रकथीतून सांगायची होती. मुलं म्हणाली, आम्ही दोन दिवस पाहिलेली चित्रं फार लहान होती आकारानं. आपण मोठ्ठी चित्रं काढूयात. तशी त्यांनी ती काढली. ही चित्रं काढतानासुद्धा फार विचार मुलांनी केला. कुठला भाग चित्रांतून सांगायचा, आणि कुठला भाग गाण्यातून हे त्यांनी ठरवलं. त्यानुसार प्रसंगांचे भाग केले. पहिल्या प्रसंगात शर्यतीत हरल्यावर ससा रडत घरी गेला. म्हणजे चित्रात रडणारा ससा दाखवायला हवा. त्याचं रडणं नीट दिसायला हवं. पण चित्र कितीही मोठं काढलं, तरी ससा लहानच दिसणार. मग काय करायचं? फक्त डोळे आणि अश्रू दाखवायचे. पण ते डोळे आणि अश्रू सशाचे आहेत हे कसं कळणार? सशाचे कानही दाखवायचे. आता या चित्रात रडणारा ससा आहे हे कळलं. पण तो धावत घरी आईकडे गेला, हे कसं दाखवणार? मग दोन मुलांनी ते चित्र हातात घेऊन धावायचं, असं ठरलं. मुलांनीच आपापसात बोलून हा सगळा विचार केला. आमचा त्यात सहभाग नव्हता. मुलांनी प्रचंड मेहनत घेऊन आठ प्रसंगांची सगळी चित्रं काढली, आणि पंधराव्या दिवशी चित्रकथीचा प्रयोग केला. यानिमित्तानं मुलांमधले सुप्त गुण बाहेर आले. कोण लिहू शकतं, चित्रं उत्तम काढणारा कोण, अभिनय कोणाला आवडतो, हे कळलं.

मग दोन महिन्यांनंतर आम्ही या शिबिरात सहभागी झालेल्या शाळांच्या स्पर्धा घेतल्या. आंतरशालेय चित्रकथी स्पर्धा. मुलांनीच गोष्ट निवडायची होती, आणि ती चित्रकथीतून सांगायची होती. ही स्पर्धा बघायला गुरू पार्वतीकुमार आले होते. मुलांनी काढलेली चित्रं, त्यांची गाणी, त्यांचा रंगमंचावरचा वावर बघून ते अतिशय आनंदित झाले, आणि ’मला मुलांबरोबर काम करायला आवडेल’, असं मला म्हणाले. त्यांच्याबरोबर आम्ही ’आपला हात जगन्नाथ’, ’पंचतंत्र’ आणि ’दुर्गा झाली गौरी’ अशी नाटकं केली. ’दुर्गा झाली गौरी’ १९८२ साली आम्ही केलं. अनेक बक्षिसं या नाटकानं मिळवली. गेल्या वर्षी असा विचार पुढे आला की, बालकदिनी, म्हणजे १४ नोव्हेंबरला, प्रत्येक शहरात या नाटकाचे प्रयोग तिथल्या मुलांनी करायचा. सिडनी, न्यू जर्सी, दुबई इथे तसे प्रयोग झाले. महाराष्ट्रात असे प्रयोग केले, तर बालरंगभूमीशी निगडित असलेले कितीतरी लोक यानिमित्तानं एकत्र येतील. बालरंगभूमीशी संबंधित असलेल्यांची संघटना सध्या नाही, ती बांधता येईल. तसंच दर तीन वर्षांनी लहान मुलांसाठीचं एकच नाटक एकाच दिवशी महाराष्ट्रभर करावं, असाही विचार आहे.

बालनाट्याचा खरा उद्देश आहे व्यक्तिमत्त्वविकास. आम्ही मध्यंतरी शाळेतल्या मुलांसाठी काही खेळ तयार केले होते. पाच मिनिटांचे हे खेळ होते. शाळेत शिक्षकांबरोबर मुलांना ते खेळता येत. हे खेळ खेळताना मुलांचं मनोरंजन तर होईच, पण अनेक गोष्टी त्यांना शिकायलाही मिळत. उदाहरण द्यायचं तर, एक खेळ कानगोष्टीसारखा होता. कोणीतरी एकानं एक नाव सांगायचं. मग त्याच्या शेजारी बसलेल्यानं आडनाव सांगायचं. मग हे पूर्ण नाव तयार झाल्यावर ती व्यक्ती काय करते, हे पुढचा सांगेल. ती कुठे राहते, किती शिकली आहे, कशी वागते, काय बोलते अशी भर त्यात पडत राहील. अशाप्रकारे एक संपूर्ण व्यक्तिरेखा या मुलांच्या कल्पनेतून तयार होईल, आणि एखादा विद्यार्थी या व्यक्तिरेखेला अभिनयांकित करेल. म्हणजे या व्यक्तिरेखेसारखं बोलून, चालून दाखवेल. दुसर्‍या एका खेळात वेगवेगळ्या हावभावांच्या चेहर्‍यांची चित्रं मुलांना दाखवायची, आणि एखाद्या चित्रात जी भावना असेल, त्या भावनेला अनुसरून आधीची आणि नंतरची चार वाक्यं मुलांनी तयार करायची. मुलांच्या तर्कबुद्धीला, निरीक्षणशक्तीला, कल्पनाशक्तीला, अभिनयगुणांना या अशा खेळांतून वाव मिळतो. एकाग्रता वाढते. संघभावना वाढते. भाषेशी, भावनांशी परिचय होतो. अजूनही आम्ही असे खेळ तयार करत आहोत. बालनाट्याशी फार जवळचा संबंध असलेल्या या खेळांच्या व्यक्तित्त्वशोधासाठी फार मोठा उपयोग होतो.

बालनाट्याचा आणि बालरंगभूमीचा व्यक्तित्वविकासातला सहभाग लक्षात घेऊन बालनाट्यचळवळीच्या विकासासाठी रंगकर्मी, नाट्य परिषद, शाळा, पालक या सर्वांनीच एकत्र यायला हवं. जपानमध्ये अनेकजण एकत्र येऊन करत असलेलं सुरेख काम मला बघायला मिळालं होतं. तिथं एका नाट्यप्रेमी गृहस्थानं बोटीवर थिएटर बांधलं होतं. त्याच्या मालकीचीच बोट होती ती. बोट किनार्‍याला लागली की त्या थिएटरच्या सभासद असलेल्या शाळा मुलांना त्या बोटीवर नाटकं दाखवायला घेऊन यायच्या. तसंच जपानमध्ये तिथल्या नाट्य महाविद्यालयातली मुलं तीन वर्षं बालरंगभूमीसाठी वेळ द्यायची, असं मी बघितलं. आपल्याकडेही नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी बालरंगभूमीसाठी वेळ द्यायला हवा. तसंच प्रत्येक गावी बालरंगभूमीनं बाळसं धरावं म्हणून एका संघटनेची गरज आहे. मी एकटी, किंवा एखादी संस्था या कामासाठी पुरेसे नाहीत. प्रत्येकानं स्वतंत्रपणे किंवा नव्यानं काम सुरू करण्यापेक्षा या चलवळीशी बांधिलकी जपणार्‍या प्रत्येकानं एकत्र येऊन काम कर्रायला हवं, आणि नाट्य परिषदेनं या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे.

माझ्या लहानपणी नाटकांमुळं मला माझा शोध लागला. घरातल्या कलासंपन्न वातावरणामुळं जीवनातल्या सौंदर्याशी ओळख झाली. आपल्याला काय चांगलं करता येतं, आयुष्यात पुढे काय करायला आवडेल, हे लवकर कळल्यानं माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. कौतुकासाठी आसुसलेल्या मला नाटकांमुळंच कौतुक मिळालं, आत्मविश्वास मिळाला. हे सर्व मुलांच्या बाबतीत घडावं, हे मला नेहमी वाटतं. माझ्या कलाक्षेत्रातल्या कारकिर्दीचं मूळ माझ्या बालपणात आहे. मला मोठ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनात आहे. आणि म्हणूनच बालनाट्याविषयी, बालरंगभूमीविषयी लिहिताना मी माझ्या लहानपणीच्या नाट्यानुभवाविषयी लिहिलं आहे. एक फूल दुसर्‍या फुलासारखं नसतं. एक मूलसुद्धा दुसर्‍या मुलासारखं नसतं. प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, आणि प्रत्येकात निदान एखादं कौशल्य दडलेलं असतं. कलागुण दडलेले असतात. प्रत्येकाची काहीएक खासियत असते. शाळेत मिळणारं शिक्षण क्वचितच हे गुण शोधतं. पालकही क्वचितच मुलांमधले कलागुण शोधण्याच्या भानगडीत पडतात. खरं म्हणजे मुलांचा विकास कुटुंबात होतो. शाळेतलं शिक्षण त्यांना समाजात वावरायला शिकवतं. हल्ली मात्र मुलांच्या खांद्यांवर पुस्तकांची बोचकी असतात, आणि वेगवेगळ्या क्लासांमध्ये जातायेता स्वत:चा शोध घेण्याचं राहूनच जातं. आपण फार साचेबद्ध, झापडबंद आयुष्य जगलो हे उशिरा लक्षात येतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून रंगभूमीच्या ज्या काही शक्ती आहेत, त्या मुलांच्या उपयोगात यायला हव्यात आणि बालनाट्यचळवळ फोफावली पाहिजे.

investposter2.jpg

या लेखातला काही भाग 'माहेर'च्या २०११च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख.
जाता जाता, मुलांच्या नाटकांत प्रवाहित्व आणि कल्पनाशक्तीला आवाहन ऐवजी आव्हान पाहिजे का?

खूप छान. लेख आवडला. सुरुवातीचा काही भाग तन्वीर पुरस्कार सोहळ्याच्या क्लिप्स मध्ये ऐकला होता.
सुलभा देशपांडे अतिशय टॅलेंटेड आहेत. दुर्दैवाने त्यांनी काम केलेली नाटके पहायला मिळाली नाहीत. शाळेत असताना एकदा त्या गॅदरींगला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या, अतिशय प्रसन्न, हसरं व्यक्तीमत्व.

लेख छानच झाला आहे. पहिला फोटो खुप आवडला, किती प्रसन्न भाव आहेत.
पिंगुळी चित्रकथी >> हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.
लहान्पणी पुण्यास येणे-जाणे असल्याने बरीच बालनाट्य बघितली होती, पण कितीतरी राहुनच गेली हे हा लेख वाचल्यावर जाणवले.

शेवटचा संपुर्ण परिच्छेदच आवडला.