चिंट्या दादा गेला जीव झालाय वेडा ...

Submitted by तुमचा अभिषेक on 28 August, 2013 - 14:53

गोपाळष्टमी, गोपालकाला, कृष्णाष्टमी, कृष्णजन्म...... वगैरे वगैरे एखादे नाव चुकले असल्यास चु.भू.दे.घे.. कारण माझ्यासाठी किंवा आम्हा चाळकरी मित्रांसाठी हा सण आजही दहीहंडी म्हणूनच ओळखला जातो. अगदी बालपणाच्या आठवणी जिथून सुरू होतात तिथे जाऊन आठवायचे म्हटल्यास पहिली हंडी घरातल्या घरात वडिलांच्या किंवा बाळूमामाच्या खांद्यावर बसून फोडल्याचे आठवतेय. दाराच्या चौकटीला बांधलेला पाण्याने भरलेला फुगा फोडताना जी मजा त्यावेळच्या बालमनाला गवसली होती तीच तशीच पुढेही या हंडीचे स्वरूप बदलत गेले तरी कायम राहिली.

थोडेसे मोठे होताच म्हणजे दुसरी-तिसरी इयत्तेत गेल्यावर आम्ही, म्हणजे माझ्यासारखे घराघरातले बाळगोपाळ बाहेर पडून चाळीच्या कॉमन पॅसेजमध्ये एकमेकांच्या खांद्यावर चढून हा पराक्रम करू लागलो. पुढच्या दोन-चार वर्षात बांधलेल्या फुग्यांची उंचीच नाही वाढली तर आमच्या हंडीला आता तिसरा थर देखील येऊ लागला होता आणि त्या तीनाचे साडेतीन थर करायला म्हणून चाळीच्या मैदानात प्रॅक्टीसच्या नावावर पंधरा दिवस आधीपासूनच रात्री रंगू लागल्या होत्या. वर्षभरात येणारा हा एक असा काळ असायचा ज्यात हे वेड पोरांच्या क्रिकेटच्या आवडीवर सहज मात करून जायचे. खालचा थर, वरचा थर, डबल एक्का, टिबल एक्का, खांदा, शिडी वगैरे तांत्रिक संज्ञाशी जसे आम्ही सरावू लागलो तसे आम्हाला अचानक व्यावसायिक गोविंदा पथकात सामील व्हायचे वेध लागू लागले. काही जण त्या हिशोबाने सरकले देखील. मी मात्र स्वता बारीक असलो तरी वरच्या थराला उभा राहील असा नैसर्गिक बॅलन्स माझ्याकडे नव्हता, ना खालच्या थराला उभे राहील एवढी रग माझ्या अंगाखांद्यात होती.. पण त्यामुळे माझ्या या खेळाच्या आवडीवर काही फरक पडणार नव्हता... ना पडला !

मी साधारण सातवीत असताना आमच्या येथील माझगाव-ताडवाडीच्या सुप्रसिद्ध गोविंदापथकाबरोबर जाण्याचा योग जुळून आला. अर्थातच शाळेतले आणि माझगाव विभागातले माझ्याच वयाचे कित्येक मित्र बरोबर होते. त्यामुळे मंडळाकडून टी-शर्ट मिळाले आणि ट्रकमध्ये शिरून धुडगूस घालायची परवानगी. अर्थात तेच आमचे काम होते. या आधी दरवर्षी आमच्या बिल्डींगतर्फे बांधण्यात येणार्‍या सहा-सहा थराच्या दोन हंड्या बाहेरचे गोविंदापथक येऊन फोडताना बघायची मजा घराच्या गॅलरीत उभे राहून अनुभवत होतो, पण यावेळी मात्र चक्क दिवसभर रस्त्यावर उभे राहून आठ-आठ थर असे डोळ्यासमोर रचले जाताना अन त्यानंतर ते कोसळताना बघायचे सुख नशिबी आले होते. एकदा का ते हंडी फोडून कोसळले की मग मात्र जणू काही आपणच वरच्या थरावर चढून हंडी फोडली आहे या उत्साहात नाचणे आणि शेजारच्या ईमारतींमधील लोकांनी बादल्याच्या बादल्या रिकाम्या करत ओतलेल्या पाण्यात न्हाऊन निघणे. हंडी फोडल्याची रक्कम मिळाली की मोठ्यांनी आवाज देताच एकमेकाला हात देत ट्रकमध्ये चढणे, लटकणे अन पुढच्या टारगेटच्या दिशेने प्रयाण करणे. विशेष काही आठवायचे म्हटल्यास थोड्याफार फरकाने हेच सारे.. मात्र आता दरवर्षी आपण असेच दहीहंडी पथकाबरोबर जायचे आणि धमाल करायची या विचारानेच तेव्हा कोण आनंद झाला होता...

पण पुढच्या वर्षी मात्र पोरांचा वेगळाच बेत होता. मी तेव्हा आठवीत असावो, पण जी काही आमच्यात थोडीफार मोठी झालेली टाळकी होती, म्हणजे कॉलेजात जाऊ लागलेली, तसेच या प्रकारात प्रावीण्य मिळवू लागलेली, अश्यांनी माझगाव विभागातील हौशी कसरतपटूंना जमवून ग्रूप बनवायला सुरुवात केली होती. अन त्यातूनच स्थापना झाली ती "बाळगोपाळ गोविंदा पथका"ची. ताडवाडीच्या मानाने अर्थातच आमचा हा गोविंदा बराच छोटा होता. पण आमचा होता. मागच्या वेळी फक्त नाचायचे काम होते, यावेळी मात्र मी शिडीला होतो. बारीक असलो तरी पुरेसा काटक असल्याने एखाद्याला मांडी अन खांदा देऊन वर चढवायचे कसे हे शिकून घेतले अन भल्याभल्यांना आरामात पेलवून वर पास करू लागलो. आमच्या एकंदरीत मंडळाच्या दृष्टीने तो खारीपेक्षाही मोठा वाटा होता. पाच थर आरामात लावायची आमची प्रॅक्टीस होती पण साडेपाच सहा झाले की जरा फाफलायची. त्यामुळे आम्ही दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण मुंबई आणि दुपारी जेवल्यानंतर काळाचौकी-वडाळा परीसरातील पाच-पाच थरांचा हंड्या शोधण्यातच जास्त वेळ गेला. परीणामी दिवसभरात जेमतेम १०-१२ च हंड्या फोडल्या ज्या पाच-साडेपाच थरांच्याच असल्याने त्यांची बक्षिस रक्कमही त्या हिशोबानेच होती. एकंदरीत आर्थिक फायदा असा काही झाला नाही आणि म्हणूनच पुढच्यावेळी सहा-साडेसहा थर लावायची प्रॅक्टीस करायची असा निर्धार करतच सारे परतलो. मात्र ती पुढची वेळ कधी आलीच नाही आणि आमच्या गोविंदापथकाला स्थापनेच्या वर्षीच पुर्णविराम लागला.

काही का असेना, ते एक वर्ष, तो एक दिवस कायम स्मरणात राहील असाच होता. दहिहंडीच्या २०-२५ दिवस आधीपासून रोज रात्री जेवल्यावर उशीरापर्यंत आम्ही इकडतिकडचे मित्र माझगाव नाक्यावर एके ठिकाणी जमून सराव करायचो ते फुल्ल धमाल मस्ती करत.. आदल्या रात्री बारा वाजता नाक्यावर पूजा करून फोडलेली देवाची हंडी अन रेडिओस्पीकरचे सारे नियम धाब्यावर बसवून रात्री बारा वाजता घातलेला दंगाही आठवतोय.. टि-शर्टला स्पॉंन्सरशिप मिळणे तुलनेत सोपे गेलेले मात्र नाश्त्याला आणि जेवणाला जेव्हा मोठ्या मुश्किलीने स्पॉन्सर मिळाला तेव्हा अक्षरशा आनंदाने नाचलो होतो.. त्या वयात, त्या परिस्थितीत खाण्यापिण्याची फुकट सोय म्हणजे एक फार मोठी पर्वणी नाहीतर लॉटरी असायची.. अन ते देखील पोटभर वडापाव मिळाले तरी पुरे अशी अपेक्षा असताना एक टाईम पावभाजी आणि एकटाईम त्या भाजीसारख्याच चवीच्या पुलावाने ऐश झाली होती.. भले कमी हंड्या फोडल्या तरी ती फुटताना आपली नुसती बघ्याची भुमिका नाहीये याची जाण असणे हे देखील एक सुखच होते. तसेच त्यादिवशी एक आठवणीत राहील असा किस्साही घडला होता. चला विषय निघालाच तर थोडक्यात तो देखील सांगतो..

सकाळच्या सत्रात हंडी शोधता शोधता दक्षिण मुंबईतच एके ठिकाणी कुठल्याश्या अडनाड गल्लीत एक छोटीशी साडेतीन थरांपर्यंत बांधलेली हंडी दिसली. बक्षीस तसेच जेमतेम असले तरी आता दिसलीच आहे वाटेत तर पाच-दहा मिनिटांत फोडूनच जाऊया असा विचार केला अन ट्रकमधून भराभरा उतरलो. जवळ जाऊन पाहिले तर खरच खूप छोटी होती. सर्वांची गरज नाही इथे म्हणून काही मोजकेच जण घुसले, इतर आसपास रिलॅक्स होत पसरले. जवळच एक दोनमजली इमारत होती, बहुधा त्यांनीच ही हंडी बांधली असावी, तर त्याची बाल्कनी फुल्ल होती. बर्‍याच पोरीबाळी ज्या दिसण्यावरून आणि जेवढे संवाद कानावर पडत होते त्यावरून अमराठी वाटत होत्या, त्या हौशेने आमची करामत बघायला उभ्या होत्या अन त्यांना बघत इथे आमची रोमिओगिरी सुरू होती. पण तिथे आमच्या गोविंदापथकाचे थर रचायला सुरूवात होताच त्या इमारतीतून फुग्यांचा मारा होऊ लागला. इतरवेळीही आम्ही लगेच विनंती करायचो की थर रचताना पाणी किंवा फुगे वगैरे नकोत तसे इथेही विनंती केली पण ते थांबले नाहीत. कुठल्या मनोवृत्तीचे होते देवास ठाऊक मात्र आसूरी आनंद घेण्यात धन्यता मानणारी कॅटेगरी दिसत होती. अन अचानक अनपेक्षितपणे आमचे जेमतेम साडेतीन थर लावलेले बालगोपाल कोसळले आणि थोड्याच वेळात दंगा सुरू झाला. आता खालून आमच्यातर्फेही वरच्या दिशेने दगडफेक होऊ लागली. लागलीच त्या खिडक्या घाबरून बंद झाल्या. मी तसा सज्जन मनाचा. हे आपली कार्टी फुग्याच्या माराने कोसळली तर त्याचा राग दगडफेक करून का करताहेत हे मला आधी पटले नाही, पण नंतर समजले की वरून त्यांच्याकडून पडत असलेल्या फुग्या आणि पिशव्यांमध्ये पाण्याबरोबरच दगडमाती देखील होती आणि त्याचा फटका एकाला पडून थर कोसळले होते, तसेच एकाला त्याचा जबर मारही बसला होता. ते ऐकून रागाने दोनचार दगडी मी देखील त्या बंद खिडकीदरवाज्यांवर भिरकावली. आम्ही सारे वयाने शाळकरी तसे कॉलेजवयीन पोरेच होतो. त्यामुळे अगदी त्याला साजेसाच धुडगुस घातला. खास करून जाता जाता तळमजल्यावरच्या कुंड्या, सायकली वगैरे गोष्टींची नासधूस करूनच निघालो.. आजही आम्ही मित्र त्या वर्षीची अन त्या गोविंदापथकाची आठवण काढतो तेव्हा हा किस्सा जरूर चघळतो..

तर..... त्यावर्षानंतर जरी तो आमचा गोविंदा आटोपला तरी हौस आटोपली नव्हती. पुढच्या वर्षी पुन्हा तसा काही ग्रूप बनत नव्हता आणि विभागातील इतर प्रथितयश गोविंदांबरोबर जाण्यास आम्हा बहुसंख्य जणांना उत्साह नव्हता.. चाळीतर्फे बाहेरच्यांसाठी म्हणून लावण्यात येणारी सहा-साडेसहा थरांची हंडी फुटताना बघण्यात समाधान माना हे आता आमच्यासाठी पुरेसे नव्हते म्हणून आम्ही आमच्या बिल्डींगमध्येच आतल्या मैदानात आमची स्वताची आणि आपल्या पोरांसाठीच हंडी बांधायची प्रथा सुरू केली.. बिल्डींगमधले कच्चे पक्के लिंबू एकत्र करून आपण तीन-साडेतीन थरांपर्यंत जाऊ शकतो याचा आम्हाला शोध लागला आणि आम्ही चार थरांचे टारगेट ठेऊन पुढे दरवर्षी त्याची प्रॅक्टीस करू लागलो. आता आम्हाला बाहेर जायची गरज नव्हती, तसेही तो अनुभव आमच्यातील बरेच जणांचा एकदातरी घेऊन झाला होता. आता आम्ही हा सण पुर्ण जल्लोषात आमच्याच चाळीच्या मैदानावर साजरा करू लागलो होतो. सकाळी चाळ समितीतर्फे बांधलेल्या हंड्या बाहेरचे व्यावसायिक गोविंदे येऊन फोडून जायचे, त्यांच्यावर आणि समोरच असलेल्या ईंग्लिश कन्याशाळेतल्या (ती शाळा या दिवशीही चालू असायची) मुलींवर फुगे मारायचे. यातही कधी गैरप्रकार झाल्याचे आठवत नाही. सारे कृष्ण बनून गोपिकांच्या मागे लागलेत इतपतच त्याचे स्वरूप असायचे.

त्यानंतर मग दुपारी जेऊनखाऊन आतल्या मैदानात उतरायचे ते संध्याकाळपर्यंत दंगा घालायला. हो अगदी काळोख पडेपर्यंत धमाल चालायची. अन हे मैदान चारही बाजूने घरांच्या गॅलर्‍या आणि बिल्डींगच्या कॉमन पॅसेजने घेरलेले असल्याने पाण्याचा मारा इथून तिथून चोही कडून व्हायचा. खास त्यासाठीच आम्हीही आदल्या रात्रीच पाण्याची पिंपे भरून ठेवायचो. आपलीच पोरे खाली हंडी फोडताहेत म्हटल्यावर प्रत्येकाच्या आई आणि बहिणींना पण कसले कौतुक वाटायचे.. त्यामुळे हातचे काही न राखता पाणी उधळले जायचे.. हे ही काय कमी म्हणून आम्हा पोरांचा स्वताचा बेंजो कम नाशिक ढोल होता. आणि आमच्यातील दर दुसर्‍या पोराला ढोलताशा बडवता यायचा.. मला नाही यायचा हा.. माझे कौशल्य नाचात आणि त्या मोठमोठ्याने ठोकलेल्या आरोळ्या .. एक दोन तीन चार, श्रॉफबिल्डींगची पोरे हुशार,.. तसेच ती गोविंदा स्पेशल गाणी... लाललाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला, जीव झालाय वेडा... हा सोहळा लांबवत नेण्यासाठी म्हणून मुद्दाम प्रत्येकाचा प्रयत्न हंडी लवकर फुटू नये असाच असायचा, मग कोणाला नेम धरून फुगा मार किंवा कोणाचा पाय खेच, अगदीच नाही तर रामबाण इलाज म्हणजे एखाद्याची चड्डीच खाली सरकवा.... हुश्श... न संपणारा विषय आहे हा यार.. नाहीतर बनेल.. जेव्हा दरवर्षी घडलेले एकेक करामती किस्से सांगायला सुरूवात करेन.. पण हल्ली मात्र जे या सणाला राजकीय स्वरूप आलेय.. जास्तीत जास्त थरांच्या स्पर्धा.. मोठमोठ्या बक्षीसांच्या रकमा.. ढणाढण वाजणारे स्पीकर.. सोबतीला तमाशाचा फड लावल्यागत नाचणार्‍या आयटम गर्ल.. पाण्याच्या जागी दारूचे फवारे.. अन दहीहंडीतल्या दह्याच्या जागी... नशीब, आजही तिथे दहीच असते...... असावे....... असो, सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त.. सध्या सलामी देण्याची फॅशन आलीय.. आपल्याला तर हंडी फोडताना बघण्यात उत्सुकता जास्त असते मग तीन थरच का असेना..

मस्त धमालच असते.

पण सध्या पैश्यांच्या वाटणीवरून जे गैरप्रकार चालले आहेत ते पाहून कस तरी वाटत.

एक आठवण आली थरांची स्पर्धा & राजकारण्यांची हौस पहुन.

२ वर्षांपूर्वी डोंबिवली पच्छिम मध्ये एक नवीनच मंडळ उदयास आले ''नवयुग''. त्यांनी पहिल्याच वर्षी
आठ थर लावून डोम्बिवालीच नाव या क्षेत्रात पुढे आणल.

त्याच वर्षी डोंबिवली पूर्वेला म न से चे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दही हंडी कार्यक्रम आयोजित केला होता. नवयुग ने सकाळीच जावून ८ थर लावून सलामी दिली आणि दुसर्या ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी पुढे निघून गेले. त्यांना परत संध्याकाळी यायला सांगण्यात आले. दुसर्या मंडळाने सुद्धा ८ थर लावल्यास पारितोषिक विभागून देण्यात येईल आणि न लावल्यास संपूर्ण पारितोषिक नवयुग देण्यात येईल हे सुद्धा सांगण्यात आले.

पण जेंव्हा नवयुग मंडळ परत संध्याकाळी स्पर्धेच्या ठिकाणी गेले तेंव्हा कळले कि हंडी फोडण्याचा मन
डोंबिवलीतीलंच दुसर्या मंडळाला देण्यात आला आणि त्यांनी तर फक्त ७ थर लावले होते. म्हणजे चक्क
फसवणूक केली होति.

याचा सोक्षमोक्ष लावण्याचं मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले. दुसर्या दिवसापासून थेट राजगडावर खुद्द राज ठाकरेंना भेटण्यासाठी धडपड चालू केलि. आणि त्यांनीसुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता मंडळाच्या विनंतीला मान देवून मंडळाच्या पदाधीकार्यांना भेटण्यासाठी बोलवल. त्यांना सर्व गोष्टी कथन केल्यावर त्यांनी स्वत चौकशी केली आणि त्यानाही मंडळाच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल.

राज ठाकरेनि परत मंडळाच्या पदाधीकार्यांना भेटण्यासाठी बोलवल आणि घोषित केलेलं ५००००/- रुपयांचं पारितोषिक स्वतः दिल.

सूनटुन्या __ खरंय, आणि जे जिंकतात त्याचेही बक्षीसाचे पैसे रखडवले जातात, अगदी चेक बाऊन्स झाल्याचे प्रकार कानावर आलेत, आणि ही सतरा चुकीच्या गोष्टी घुसल्या असतील यात.. काय करणार.. आपण आपल्या आठवणी जपायच्या बस्स..

वर्षूदी .. Happy