एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर

Submitted by बेफ़िकीर on 26 August, 2013 - 07:03

एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?

ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!

इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी?

वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊसुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?

अच्छा... स्वप्ने वगैरे होय? भंगूदेत की ती? तुझी अशी काय मोठी स्वप्ने होती म्हणे? चारजणांसारखीच ना? संसार, मुलेबाळे वगैरे? नोकरी, घर, ही असलीच ना? मग ती तशी अजुनही तुला पूर्ण करता येऊ शकतील की? ओह, आता कोणी लग्नच करायला तयार नाही होय? मग लग्नच झालं पाहिजे असं तरी कुठे आहे?

आणि तुझ्यासारख्या अब्रू गेलेल्या मुलीशी का म्हणून कोणी लग्न करावं? अभंग शरीराच्या असंख्य पर्यायी मुली लग्नाच्या बाजारात उभ्या असताना तुझी गरज कोणाला का असावी? का म्हणून एखाद्या पुरुषाने मन वगैरे मोठे करून तुला स्वीकारावे?

सूड? सूड घ्यायचाय तुला त्या नराधमांचा? कसा घ्यायचाय सूड? ठार वगैरे करायचे आहे का त्यांना? ते तसे ऐच्छिक नसते. त्याच्यासाठी अतिशय न्याय्य आणि कठोर कायदे आहेत. ते सिद्ध व्हावे लागते की त्याच नराधमांनी हे कृत्य केले. वैद्यकीय तपासण्या असतात. साक्षीपुरावे असतात. त्याक्षणी नग्न झाली होतीस तसे पुन्हा एकदा कोर्टात सर्वांसमोर शाब्दिक नग्न व्हावे लागते. धाडस लागते त्यासाठी. त्यातून ते पुरुष कोणत्यातरी राजकीय अथवा श्रीमंत माणसाशी लागेबांधे असलेले असले तर ते न्यायाधीशासकट सगळ्यांना मॅनेज करतात. आपलाच वकील तोंड पाडून सांगतो कोर्टात, की 'माझ्या अशीलाचे वर्तन आरोपींना उद्युक्त करणारे होते हे मान्य आहे' वगैरे! तू नाही का वाटेल तसे कपडे घालायचीस? कोणालाही कधीही कुठेही भेटायचीस? मोकळेपणाने वागायचीस? कोणाचाही सहज गैरसमज व्हावा ही तुझीच जबाबदारी होती ना? मग आता कशाला रडायचं?

शिक्षा? देते ना न्यायालय शिक्षा अश्यांना! त्यांनीच तुझ्यावर बलात्कार केला हे एकदा सिद्ध झाले की शिक्षा जाहीर होते. पण ते सिद्ध होण्यात अनेक अडथळे असू शकतात. तेही पार झाले तर मग एखादा बलात्कार करणारा वयाने लहान असल्याने त्याला सुधारगृहात वगैरे पाठवले जाते. बाकी काही नाही. जे कायद्याने सज्ञान समजले जातात त्यांना एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंत वगैरे तुरुंगात पाठवतात. त्यातही पुन्हा एखाददुसर्‍या वर्षाने ते माणसे मॅनेज करून बाहेर वगैरे पडू शकतात. पण बहुतांशी केसेसमध्ये ते पुराव्याअभावी किंवा कशामुळे तरी निर्दोषच सुटतात आणि पेढे वाटतात. कशाला एवढा उपद्व्याप करतेस? या सगळ्यात तुझी हकनाकच बदनामी होणार. म्हणजे एक तर बलात्काराचे दु:ख आणि वर बदनामी!

बदनामी! बदनामीला काय घाबरायचंय? असं काय मोठं स्टेटस आहे तुझं या समाजात? कोण ओळखत होतं तुला हा बलात्कार होण्याआधी? आता कशी तू सार्‍या जगाला एक बलात्कारिता म्हणून माहिती झालीस उलटी! काहीच न करता प्रसिद्ध होण्यात गंमत नाही वाटत तुला?

जनता ना? हो हो! सगळी जनता तुझ्याचबाजूने आहे. तू नुसते सांगितलेस की तुझ्यावर बलात्कार झाला, की सगळे मेणबत्त्या घेऊन पळत सुटतील. हातात फलक धरून घोषणा देतील. सरकारे हालवून सोडतील. ती शक्ती बघून विरोधी पक्षीय त्यात पडतील. मोठेच राजकारण घडून येईल. एक साधा बलात्कार झाला तुझ्यावर, पण पूर्ण देश हालेल. मोठमोठे नेते भाषणांमध्ये सांगतील की तुझ्या रिहॅबसाठी हे केले जाणार आहे ते केले जाणार आहे. नराधमांना शिक्षा देण्यात येणार आहे वगैरे! तोपर्यंत टी ट्वेन्टी सुरू होईल. मग ज्या चॅनेलवर तुझ्या बातमीला तासनतास कव्हरेज मिळत होते तेथून पाणी ओसरावे तसे तुझे नांव ओसरेल आणि धोनी, कोहली, अश्विन अशी नांवे झळकू लागतील. चीअर गर्ल्सवर कॅमेरे जातील. षटकार आणि चौकारांनी मैदाने दुमदुमतील. लोक रस्त्यावर येऊन नाचतील. त्या रस्त्याच्या कडेला आठ दिवसांपूर्वीचा एक फलक गटारात पडलेला असेल, ज्यावर लिहिले असे की 'अश्या अश्या मुलीचे आयुष्य नासवणार्‍यांना शिक्षा द्या'! याच गर्दीत नाचणार्‍यांच्यापैकीच काही जणांच्या हातात आठ दिवसांपूर्वी तो फलक दिसलेला असेल. आज तो त्यांच्या पायाखाली असेल आणि त्यावर बीअर सांडत असेल. सिगारेटची थोटके त्यावर चुरगाळली जात असतील. अगदी तशीच, जसे तुझे कौमार्य आठवड्याभरापूर्वी चुरगाळले गेलेले होते.

पण एखादा चॅनेल, एखादे वर्तमानपत्र मात्र अजूनही तुझी बाजू लावून धरायचा प्रयत्न करत असेल. वेडी आशा, की तुझी बातमी देऊन अजूनही टी आर पी ओढता येईल ही! तेवढ्यात मॅच फिक्सिंग होईल. आणि मग आपल्या वाहिनीचा अथवा वर्तमानपत्राचा खप उदंड व्हावा म्हणून तुला सुईच्या अग्राइतकीही जागा न ठेवता सगळे आपापल्या हेडलाईन्स बनवतील. त्या रात्री मीडिया पार्टी झोडेल, की हातात कसली दणदणीत बातमी आली आहे. दहाच दिवसांपूर्वी तुझ्या बातम्या दाखवून जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, तुझ्या अश्रूंवर दहाच दिवसांपूर्वी जे तुंबड्या भरत होते ते आता श्रीशांतच्या कंबरेचा रुमाल कसा लटकत होता त्यावर फोकस ठेवतील.

नाही नाही, तू, तुझ्या घरचे, तुझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे तुझ्यावरचा अन्याय मुळीच विसरणार नाहीत. पण इतरांना त्यांचे त्यांचे आयुष्य हे असतेच की? आपापले आयुष्य जगण्याकडे एकेकजण वळायला लागला की तू म्हणजे एक मानसिक विकारांनी पछाडलेले आणि घरात पडून राहिलेले लोढणे ठरशील. ज्याच्याबरोबर तुझा साखरपुडा झालेला होता तो आता तिसरीबरोबर लग्न ठरवत असेल. तुझ्या घरचे त्याला आणि त्याच्या घरच्यांना हे विचारतसुद्धा नसतील की आमच्याच मुलीबरोबर का नाही करत लग्न! उघड आहे, तुझ्या आई वडिलांनाच तुझ्या त्यावेळी ठरलेल्या नवर्‍याचा आत्ताचा निर्णय मान्य असेल. का म्हणून चारजणांनी नासवलेले शरीर त्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारावे?

हां हां, ते बलात्कारी होय? ते फिरतील की मोकाट रस्त्यावरून? निर्दोष म्हणून सुटल्यानंतर खासगीत आपल्या मित्रांबरोबर रात्री पार्टी करताना ते रसरशीत वर्णने ऐकवतील. कसे तुला सापळ्यात पकडले. कशी तू घाबरलीस. कसे तुझे हाल केले. किती धमाल आली. इत्यादी! त्यांना तू पुन्हा रस्त्यात कुठे दिसलीस तर छद्मी हासतीलही ते! नाही गं बाई, धरणीमाता वगैरे काही पोटात्बिटात घेत नसते कोणाला! असल्या गोष्टी रामायणात होतात.

आणि तुला माहीत नाही का? दुसर्‍याची बायको पळवणे, वहिनीचे भर दरबारात वस्त्रहरण करणे ही तर आपल्या धर्मातील सर्वात मोठ्या व प्रभावी काव्यांमधील कथानके आहेत. खरे तर ती कथानके अस्तित्वातच सीता आणि द्रौपदी या दोघ्यींच्या अब्रूवर घातल्या गेलेल्या घाल्यामुळे आली आहेत.

बायका ना? कोणत्या आजूबाजूच्या? त्या नाकच मुरडणार की तुला पाहून? त्यांच्या मुलींची जुनी मैत्रीण असशील तू! पण आज नाहीस काही मैत्रीण वगैरे! आज तुझ्यासारखीबरोबर मैत्री म्हणजे पुन्हा स्वतःचीही बदनामी! ती कोण करून घेणार आहे?

हो हो, पुन्हा बलात्कार होण्यास मात्र पात्र आहेस तू आजही! कारण तुझा आता दुसरा काही उपयोगच नाही ना! ते एक करता येईल तुला! इच्छुकांसमोर स्वतःला सादर करायचे असल्यास अवश्य कर!

काय म्हणतेस? हे नव्हते माहीत आम्हाला! जिवंतच नाही आहेस होय तू? बलात्कारानंतर त्या नराधमांनी मारून टाकले तुला? मग तर काय, कसले प्रश्नच उरलेले नाहीत तुझ्यासमोर!

काय? अजून जगायचे होते? का? ओह... अच्छा अच्छा!

तीनच महिन्यांची होतीस होय? मग लवकर गेलीस त्यामानाने!

====================================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं...........किती भयंकर.... !!
खरंच भारत माझा देश आहे असं म्हणताना लाज वाटायला लागलीये Sad

बेफी, अगदी यथार्थ लिहिलीय. आमच्या मनातला संताप तुमच्या लेखणीतून आला.
खरचं स्त्रीचं जगणं किती धोकादायक झालय. दररोजच्या वर्तमान पत्रात किमान ४/५ बातम्या ह्याच असतात. आणि वर्तमानपत्रात नसलेल्या कितीतरी. Sad

एक हात आणि एक पाय कलम करून टाकावा आणि मग जगायला सोडून द्याव..>>>>>>>>>>...नाही. हात पाय नाही. ..........पुन्हा तो हा गुन्हा करूच शकणार नाही. आणि कुणाच्या मनात कधी विचार आला तरी धडकी बसेल अशी शि़क्षा करावी. Angry (पण दुर्दैवाने हे आपल्या देशात कधीच घडणार नाही. Sad :राग:)

काहीच कळत नाही काय लिहावे... आणी काय सागांवे.... सगळच खिन्न आणी निशःब्द....
काही मार्ग आहे..... काहीच नाही..... Sad

बेफिकीर,

वस्तुस्थिती भयानक आहेच. शंकाच नाही. एक प्रश्न पडला होता. पाव वर्षे वय असलेल्या मुलीवर बलात्कार करून काय मोठं सुख मिळणार आहे.

थोडी शोधाशोध केली तर विचित्र उत्तर मिळालं. यामागे एक अत्यंत चुकीची आणि मूर्खपणाची समजूत आहे. ती म्हणजे कुमारिकेशी संभोग केल्याने गुप्तरोग बरा होतो. माझ्या माहीतीप्रमाणे या समजुतीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आणि असला तरी कुठल्याही नराधमास बलात्कार करण्याचा अधिकार नाही.

यासाठी भयंकर शिक्षाच पाहिजे. शिवाजीमहाराज करायचे तसा चौरंगाच कामी येईल. दोन्ही हातपाय खुडून टाकायचे. बसा जन्मभर खुरडत. एकवेळ मरण पत्करलं पण चौरंगा नको अशी परिस्थिती होते.

शिक्षेबरोबर दुसरा मार्ग प्रबोधनाचा. उपरोल्लेखित समजूत कशी चुकीची आहे याविषयी जागृती झाली पाहिजे. अर्थात, या मार्गाचा शिक्षेशी थेट संबंध नाही. शिक्षा गुन्हेगाराला आहे, तर प्रबोधन सर्वसामान्य लोकांसाठी आहे. कृ.गै.न.

आ.न.,
-गा.पै.

नि:शब्द

>>>पाव वर्षे वय असलेल्या मुलीवर बलात्कार करून काय मोठं सुख मिळणार आह>>>>>
अत्यंत विकृत अन लोडेड प्रश्न आहे गा मा.
जरा पुनर्विचार करा या प्रश्नावर जर सुख मिळत असले तर याच्या स्वीकृतीबद्दल असणर्‍या तुमच्या विचारसरणीवर,अन सुखाच्या व्याख्येवर जरी ते या कृत्याने मिळणार असले तरीही.
तुम्ही विचारलेला प्रश्न ????????? काय दर्शवतोय विचार केला का??

Sad

नि:शब्द

नि:शब्द

श्वास रोखुन वाचता वाचता...शेवटी पोटात खड्डाच पडला माझ्या! Sad

सगळाच स्वैराचार वाढला, जळगांव जामोद येथील घटना, बघा बायकोचे नवर्‍याचे भांडण झाले बाप दारुच्या नशेत होता. बायको भांडणाला कंटाळुन जवळच शेतावर निघुन गेली तसा नुकतीच काही दिवसासाठी माहेरी आलेल्या आपल्या पोटच्या पोरीवर त्याची नजर पडली दोघांची हातापाई झाली, पोरीचा प्रतिकार कमी पडताना ती ओरडली, तशी मुलीची आई लगेच धावत आली, ती नवर्‍याचे कुर्‍हाडीने खांडोळेच केलेत. पोरीच्या लज्जेस्तव स्वता वैधव्य पत्कारले.

बायका स्वतःला अबला समजण्यात का धन्यता मानताहेत. त्या स्वतःला सबल कधी समजणार आहेत. जोपर्यंत बायका सबल होत नाहीत तोपर्यंत असे प्रकार घडताच राहणार मग सरकार कितीही कायदे बनवुडे किवा कितीही कडक शिक्षा करूदेत. सामुहिक बलात्कार किवा लहान मुलींवर होणारे बलात्कार सोडले तर बायका एक-दुसर्या माणसाला तरी प्रतिकार करू शकतात ना. अशावेळी न घाबरता बायकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे पुरुषांकडे सगळ्यात delicate body part असतो. तुमच्याकडे लाथ घाल्यानासाठी पाय आहेत. पाय हे फक्त चालण्यासाठी नव्हे, लाथ घाल्यण्यासाठी पण उपयोगात आणता येऊ शकतात. तुमची एक लाथ तुम्हाला अबला पासून सबला बनवू शकते.

इतर प्रकरणात जिकडे बायका प्रेमात फसविल्या जाउन बलात्कारास बळी पडताहेत, त्या मुलीना हेही समजु नव्हे कि आयुष्याचा जोडीदार निवडताना तो कसा निवडावा आणि जरी निवडलाच चुकून तरी स्वताहून संभोगास समती तेही लग्नाआधी? मग त्यावेळेस चूक हि त्याची स्वतः चीच असते.

हे फक्त माझे एकट्याचे विचार नाहीत माझ्या बायकोचा सुद्धा हेच म्हणणं आहे , बायकानी स्वत:ला सबल बनवावं

बेफिकीर यांच्या ललितलेखाबद्दल काही म्हणत नाहिये. तो लेख समयोचितच आहे.

पण बलात्कार्=संभोग इतकेच नसते. आणि जेव्हा इतक्या लहान मुलींवर बलात्कार केला जातो तेव्हा तो चाईल्ड अ‍ॅब्युज असतो. बलात्कार नव्हे. माझ्या माहितीनुसार कायद्यामधल्या काही पळवाटांचा इथे उपयोग केला जातो. कारण कायदेशीर रीत्या तो बलात्कार आहे हे सिद्ध करता येत नाही... जाणकारांनी प्रकाश टाकावा.

मी नव्याने नोकरी करत होते, तेव्हा बॉसने मला दोन दोन दिवस वेगवेगळ्या बीट्समधे फिरायला लावलं होतं, अर्थात सीनीयरसोबत. हेल्थसाठी दोन्ही दिवस मुंबईमधल्या अनेक हॉस्पिटल्समधे फिरलो होतो, तेव्हा आलेली तीन वर्षाची अशीच एक चाईल्ड अ‍ॅब्युज केस अजून डोळ्यासमोरून हलत नाही. ती घटना आठवली, त्या मुलीच्या शरीरावर झालेले अत्याचार आठवले की अजूनही घशाला कोरड पडते. आज माझी मुलगी तीनच वर्षांची आहे. मी तिला एक्टीने खेळायला बाहेर सोडत नाही. व्हॅनमधून तिला यायला दोन मिनिटं जरी उशीर झाला तरी लगेच शाळेत फोन लावते... मी खूप अतिविचार करते या बाबतीत असं बर्‍याच जणांचं म्हणण्त असतं, पण मग त्या बर्‍याच जणांनी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असलेलं ते तीन वर्षाचं बाळ, ज्याचा अंगावर सिगरेटच्या जखमा आहेत, ज्याच्या तोंडावर चावल्याच्या खुणा आहेत, ज्याच्या पूर्ण शरीरभर रक्ताचे ओघळ आहेत ते बघितलेलं नसतं ना......

तुमच्या प्रतिसादाचा शेवट वाचवलाच नाही नंदिनी, कृपया तेवढा भाग उडवा! थ्थू त्या सगळ्यांच्या जीवनावर जे असल्या राक्षसांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा द्यायला बघतात.

काही वेळा असे वाटते की XXच्या XXXत गेले आपले वैयक्तीक आयुष्य, सरळ तलवार घेऊन रस्त्यावर उतरावे आणि असल्यांना भोसकावे.

पार्डन फॉर माय लँग्वेज!

सरळ तलवार घेऊन रस्त्यावर उतरावे आणि असल्यांना भोसकावे. बायकांना हेच करावे लागणार आहे पुढे....
बाप्रे नंदिनी :अरेरे:.... नाही वाचवत आहे .............

Sad

जेव्हा दूरदर्शन वर ( मराठी ) एक शुन्य शुन्य ( बहुतेक हीच किंवा या सारखीच दुसरी) ही सिरीयल चालू होती तेव्हा त्यातल्या एका भागात एक अशीच घटना दाखवली होती( पात्रांची नावे बदलली होती ).

एक ८ ते १० वर्षाची मुलगी शाळेतुन घरी येत असतांना दुर्दैवाने एकटीच असते, त्या दिवशी तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी नसतात. तर तिच्या सोबत असा भयानक प्रसंग घडतो. ती घरी येते आईला सांगते पण आई तिलाच मारते आणी दोघी रडतात. ती मुलगी बिचारी आई नको गं मारुस मला असे सारखे म्हणत असते, काय अपराध असतो बिचारीचा? मला त्यावेळेस त्या आईचा खूप संताप आला होता. कित्येक दिवस मी ते दृष्य आठवुन अस्वस्थ व्हायची. खरे तर हे आत्ता टाईप करताना सुद्धा माझ्या घशात सारखा आवंढा दाटुन येतोय आणी डोळ्यात पाणी.

पण काय करणार असे वाटते पर्समध्ये चाकू किंवा रिव्हॉल्वरच घेऊन हिंडावे.:राग:

नंदिनी कसे सहन करु शकली असशील तू ते पाहुन्?:अरेरे:

बेफ़ी.. काय हे... Sad

इतकं सत्यं नसतं हो लिहायचं..

अगदी अंगवर येणरं! Angry

दुर्दैवाने.. सर्वच मुलींच्या पालकांना आणखी चिंतेत टाकणारं.. Sad Angry

Edit: प्रतिसाद वाचुन आणखीच भिती वाटते आहे.. माझी चिमणी पण फ़क्त ३ वर्षांची आहे.. Sad

बकर्‍याला जस हलाल करतात ना तस हलाल केल पाहिजे या साल्यांना.... माणुस काय जनावर पण म्हणुन घेण्याच्या लायकीचे नाहित हे. पौराणिक कथेतले खरे राक्षसपण लाजतील हे बघुन....

Pages