एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर

Submitted by बेफ़िकीर on 26 August, 2013 - 07:03

एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?

ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!

इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी?

वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊसुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?

अच्छा... स्वप्ने वगैरे होय? भंगूदेत की ती? तुझी अशी काय मोठी स्वप्ने होती म्हणे? चारजणांसारखीच ना? संसार, मुलेबाळे वगैरे? नोकरी, घर, ही असलीच ना? मग ती तशी अजुनही तुला पूर्ण करता येऊ शकतील की? ओह, आता कोणी लग्नच करायला तयार नाही होय? मग लग्नच झालं पाहिजे असं तरी कुठे आहे?

आणि तुझ्यासारख्या अब्रू गेलेल्या मुलीशी का म्हणून कोणी लग्न करावं? अभंग शरीराच्या असंख्य पर्यायी मुली लग्नाच्या बाजारात उभ्या असताना तुझी गरज कोणाला का असावी? का म्हणून एखाद्या पुरुषाने मन वगैरे मोठे करून तुला स्वीकारावे?

सूड? सूड घ्यायचाय तुला त्या नराधमांचा? कसा घ्यायचाय सूड? ठार वगैरे करायचे आहे का त्यांना? ते तसे ऐच्छिक नसते. त्याच्यासाठी अतिशय न्याय्य आणि कठोर कायदे आहेत. ते सिद्ध व्हावे लागते की त्याच नराधमांनी हे कृत्य केले. वैद्यकीय तपासण्या असतात. साक्षीपुरावे असतात. त्याक्षणी नग्न झाली होतीस तसे पुन्हा एकदा कोर्टात सर्वांसमोर शाब्दिक नग्न व्हावे लागते. धाडस लागते त्यासाठी. त्यातून ते पुरुष कोणत्यातरी राजकीय अथवा श्रीमंत माणसाशी लागेबांधे असलेले असले तर ते न्यायाधीशासकट सगळ्यांना मॅनेज करतात. आपलाच वकील तोंड पाडून सांगतो कोर्टात, की 'माझ्या अशीलाचे वर्तन आरोपींना उद्युक्त करणारे होते हे मान्य आहे' वगैरे! तू नाही का वाटेल तसे कपडे घालायचीस? कोणालाही कधीही कुठेही भेटायचीस? मोकळेपणाने वागायचीस? कोणाचाही सहज गैरसमज व्हावा ही तुझीच जबाबदारी होती ना? मग आता कशाला रडायचं?

शिक्षा? देते ना न्यायालय शिक्षा अश्यांना! त्यांनीच तुझ्यावर बलात्कार केला हे एकदा सिद्ध झाले की शिक्षा जाहीर होते. पण ते सिद्ध होण्यात अनेक अडथळे असू शकतात. तेही पार झाले तर मग एखादा बलात्कार करणारा वयाने लहान असल्याने त्याला सुधारगृहात वगैरे पाठवले जाते. बाकी काही नाही. जे कायद्याने सज्ञान समजले जातात त्यांना एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंत वगैरे तुरुंगात पाठवतात. त्यातही पुन्हा एखाददुसर्‍या वर्षाने ते माणसे मॅनेज करून बाहेर वगैरे पडू शकतात. पण बहुतांशी केसेसमध्ये ते पुराव्याअभावी किंवा कशामुळे तरी निर्दोषच सुटतात आणि पेढे वाटतात. कशाला एवढा उपद्व्याप करतेस? या सगळ्यात तुझी हकनाकच बदनामी होणार. म्हणजे एक तर बलात्काराचे दु:ख आणि वर बदनामी!

बदनामी! बदनामीला काय घाबरायचंय? असं काय मोठं स्टेटस आहे तुझं या समाजात? कोण ओळखत होतं तुला हा बलात्कार होण्याआधी? आता कशी तू सार्‍या जगाला एक बलात्कारिता म्हणून माहिती झालीस उलटी! काहीच न करता प्रसिद्ध होण्यात गंमत नाही वाटत तुला?

जनता ना? हो हो! सगळी जनता तुझ्याचबाजूने आहे. तू नुसते सांगितलेस की तुझ्यावर बलात्कार झाला, की सगळे मेणबत्त्या घेऊन पळत सुटतील. हातात फलक धरून घोषणा देतील. सरकारे हालवून सोडतील. ती शक्ती बघून विरोधी पक्षीय त्यात पडतील. मोठेच राजकारण घडून येईल. एक साधा बलात्कार झाला तुझ्यावर, पण पूर्ण देश हालेल. मोठमोठे नेते भाषणांमध्ये सांगतील की तुझ्या रिहॅबसाठी हे केले जाणार आहे ते केले जाणार आहे. नराधमांना शिक्षा देण्यात येणार आहे वगैरे! तोपर्यंत टी ट्वेन्टी सुरू होईल. मग ज्या चॅनेलवर तुझ्या बातमीला तासनतास कव्हरेज मिळत होते तेथून पाणी ओसरावे तसे तुझे नांव ओसरेल आणि धोनी, कोहली, अश्विन अशी नांवे झळकू लागतील. चीअर गर्ल्सवर कॅमेरे जातील. षटकार आणि चौकारांनी मैदाने दुमदुमतील. लोक रस्त्यावर येऊन नाचतील. त्या रस्त्याच्या कडेला आठ दिवसांपूर्वीचा एक फलक गटारात पडलेला असेल, ज्यावर लिहिले असे की 'अश्या अश्या मुलीचे आयुष्य नासवणार्‍यांना शिक्षा द्या'! याच गर्दीत नाचणार्‍यांच्यापैकीच काही जणांच्या हातात आठ दिवसांपूर्वी तो फलक दिसलेला असेल. आज तो त्यांच्या पायाखाली असेल आणि त्यावर बीअर सांडत असेल. सिगारेटची थोटके त्यावर चुरगाळली जात असतील. अगदी तशीच, जसे तुझे कौमार्य आठवड्याभरापूर्वी चुरगाळले गेलेले होते.

पण एखादा चॅनेल, एखादे वर्तमानपत्र मात्र अजूनही तुझी बाजू लावून धरायचा प्रयत्न करत असेल. वेडी आशा, की तुझी बातमी देऊन अजूनही टी आर पी ओढता येईल ही! तेवढ्यात मॅच फिक्सिंग होईल. आणि मग आपल्या वाहिनीचा अथवा वर्तमानपत्राचा खप उदंड व्हावा म्हणून तुला सुईच्या अग्राइतकीही जागा न ठेवता सगळे आपापल्या हेडलाईन्स बनवतील. त्या रात्री मीडिया पार्टी झोडेल, की हातात कसली दणदणीत बातमी आली आहे. दहाच दिवसांपूर्वी तुझ्या बातम्या दाखवून जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, तुझ्या अश्रूंवर दहाच दिवसांपूर्वी जे तुंबड्या भरत होते ते आता श्रीशांतच्या कंबरेचा रुमाल कसा लटकत होता त्यावर फोकस ठेवतील.

नाही नाही, तू, तुझ्या घरचे, तुझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे तुझ्यावरचा अन्याय मुळीच विसरणार नाहीत. पण इतरांना त्यांचे त्यांचे आयुष्य हे असतेच की? आपापले आयुष्य जगण्याकडे एकेकजण वळायला लागला की तू म्हणजे एक मानसिक विकारांनी पछाडलेले आणि घरात पडून राहिलेले लोढणे ठरशील. ज्याच्याबरोबर तुझा साखरपुडा झालेला होता तो आता तिसरीबरोबर लग्न ठरवत असेल. तुझ्या घरचे त्याला आणि त्याच्या घरच्यांना हे विचारतसुद्धा नसतील की आमच्याच मुलीबरोबर का नाही करत लग्न! उघड आहे, तुझ्या आई वडिलांनाच तुझ्या त्यावेळी ठरलेल्या नवर्‍याचा आत्ताचा निर्णय मान्य असेल. का म्हणून चारजणांनी नासवलेले शरीर त्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारावे?

हां हां, ते बलात्कारी होय? ते फिरतील की मोकाट रस्त्यावरून? निर्दोष म्हणून सुटल्यानंतर खासगीत आपल्या मित्रांबरोबर रात्री पार्टी करताना ते रसरशीत वर्णने ऐकवतील. कसे तुला सापळ्यात पकडले. कशी तू घाबरलीस. कसे तुझे हाल केले. किती धमाल आली. इत्यादी! त्यांना तू पुन्हा रस्त्यात कुठे दिसलीस तर छद्मी हासतीलही ते! नाही गं बाई, धरणीमाता वगैरे काही पोटात्बिटात घेत नसते कोणाला! असल्या गोष्टी रामायणात होतात.

आणि तुला माहीत नाही का? दुसर्‍याची बायको पळवणे, वहिनीचे भर दरबारात वस्त्रहरण करणे ही तर आपल्या धर्मातील सर्वात मोठ्या व प्रभावी काव्यांमधील कथानके आहेत. खरे तर ती कथानके अस्तित्वातच सीता आणि द्रौपदी या दोघ्यींच्या अब्रूवर घातल्या गेलेल्या घाल्यामुळे आली आहेत.

बायका ना? कोणत्या आजूबाजूच्या? त्या नाकच मुरडणार की तुला पाहून? त्यांच्या मुलींची जुनी मैत्रीण असशील तू! पण आज नाहीस काही मैत्रीण वगैरे! आज तुझ्यासारखीबरोबर मैत्री म्हणजे पुन्हा स्वतःचीही बदनामी! ती कोण करून घेणार आहे?

हो हो, पुन्हा बलात्कार होण्यास मात्र पात्र आहेस तू आजही! कारण तुझा आता दुसरा काही उपयोगच नाही ना! ते एक करता येईल तुला! इच्छुकांसमोर स्वतःला सादर करायचे असल्यास अवश्य कर!

काय म्हणतेस? हे नव्हते माहीत आम्हाला! जिवंतच नाही आहेस होय तू? बलात्कारानंतर त्या नराधमांनी मारून टाकले तुला? मग तर काय, कसले प्रश्नच उरलेले नाहीत तुझ्यासमोर!

काय? अजून जगायचे होते? का? ओह... अच्छा अच्छा!

तीनच महिन्यांची होतीस होय? मग लवकर गेलीस त्यामानाने!

====================================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवायच्या आधी वाचले नाही हे बरे केले.. क्राईमपेट्रोलच्या एका एपिसोडने ताटावरून उठवल्याचे आठवतेय..

हे असे प्रकार घडले की मन कचरत आणि सारखं वाटत की मुलीला मुलीसाराखच वागवायला हवाय Sad , नको जाऊस कुठे घरात बसून राहा, चारचौघी सारखं शिक्षण पूर्ण कर, लग्न कर बस

मोकळा श्वास घेऊ नकोस. Sad जग हे वाईट असतं Angry

सर्वांचे आभार म्हणणे योग्य होणार नाही, फक्त सहृदय असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, पण झालेल्या घटनेच्या प्रकाशात 'सखेद' अभिनंदन!

वर प्रतिसादांमध्ये आपण पाहिले की कित्येक आई बाप हा लेख वाचून स्वतःच्या मुलींबाबत चिंता व्यक्त करत आहेत. (लेखणीत किती दम असू शकतो याचे प्रत्यंतर मला स्वतःलाही हा लेख लिहायला घेतल्यापासूनच येत होते
>>>> सॉरीच पण ही वाक्ये वाचून अंमळ गंमत वाटली Happy
लेखणीची ताकद असते हे वाक्य ठीक, पण इथे आईबापांनी व्यक्त ़केलेल्या आपापल्या मुलींच्या (सध्याच्या घटनांमुळे ऑल्रेडी असलेल्या) काळजीचे श्रेय स्वतःच स्वतःच्या लेखणीला घेणे म्हणजे Happy यु आर ओवररेटिंग युर्सेल्फ Happy
आय मीन एक करन्ट ट्रॅजेडी ज्याने प्रत्येकाच्या मनात जे आधीच खदखदते आहे तेच केवळ एक्सप्रेस केलेय या लेखात. ( अ‍ॅग्री, ते चांगले व्यक्त केलेय) सो ९० प्रतिक्रिया आल्या तर फार अनपेक्षित नव्हे!
कुणाला न जाणवलेला इश्यु घेऊन केवळ लेखणीच्या ताकदीने जागृती करणे , वाचकांना नव्या जाणीवा करून देणे हे फार फार वेगळे, नाही का !!! Happy असो.

मा. अ‍ॅडमिन.

या धाग्याला कुलुप तरी लावावे किंवा अप्रकाशित तरी करावा, अशी कळकळीची विनंती करतो.

या माणसाने लिहिलेले हे हृदयस्पर्शी लिखाण वाचून या देशातल्या कुणा हलकट कुत्र्याचे उद्बोधन होईल असे वाटत नाही.. माझ्यासारख्यांच्या जिवाला जीवघेण्या जखमा जरूर होतात.

सबब,
लवकरात लवकर कारवाई करावी.

धन्यवाद!

बेफी,
सॉरी, भावना नुसत्या पोहोचल्याच नाहियेत, तर माझ्याच तुम्ही लिहिल्या आहेत. पण मला खरेच वरील विनंती करावीशी वाटते आहे

मा. मैत्रेयी, तो प्रतिसाद लिहितानाच माझा जागृत झालेला अहं मला जाणवत होता. प्रामाणिकपणे सांगतो की अत्यंत त्वेषाने हा लेख लिहिला. पण म्हणून स्वतःकडे श्रेय घेणे योग्य नाही! तुमचे मत पटले. प्रतिसाद संपादीत तर करतच आहे, पण हा लेख लिहून घेणार्‍यासाठी एक वेगळा प्रतिसादही देत आहे.

धन्यवाद! Happy

>>>एक करन्ट ट्रॅजेडी ज्याने प्रत्येकाच्या मनात जे आधीच खदखदते आहे तेच केवळ एक्सप्रेस केलेय या लेखात. ( अ‍ॅग्री, ते चांगले व्यक्त केलेय) सो ९० प्रतिक्रिया आल्या तर फार अनपेक्षित नव्हे!
कुणाला न जाणवलेला इश्यु घेऊन केवळ लेखणीच्या ताकदीने जागृती करणे , वाचकांना नव्या जाणीवा करून देणे हे फार फार वेगळे, नाही का !!! स्मित असो.<<<

हो, सहमत आहे. Happy

श्रेय घ्यायचा अश्लाघ्य प्रयत्न केल्याबद्दल क्षमा करा.

मनापासून Happy

ह्म्म. इतके सगळे होवून शिक्षा किती लोकांना होते हां मोठा प्रश्न आहे. बर त्यांना शिक्षा झाली आहे का नाही हे पण ९०% वेळा कळत नाही. जोपर्यंत पोलीस, ज्यूडीशीयल रीफोर्म्स होत नाहीत तोपर्यंत परिस्थिती सुधारणे जरा अवघड आहे. मुख्य म्हणजे आपल्या कुठल्याही राज्यकर्त्यांना असे वाटत नाही की आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी करावी. तुम्ही चांगले लिहिले आहे पण दर वेळी फक्त असे वाचून काय होणार आणि आपण काय करू शकतो हे कळत नाही.

बेफी Sad

.............

हे असे प्रकार घडले की मन कचरत आणि सारखं वाटत की मुलीला मुलीसाराखच वागवायला हवाय अरेरे , नको जाऊस कुठे घरात बसून राहा, चारचौघी सारखं शिक्षण पूर्ण कर, लग्न कर बस
केदार अजुनही मुली मुलीसारख्याच जगतात आहे ना.... वेगळे असे आहे करतात काय फक्त घराबाहेर अर्थार्जनासाठी बाहेर पडतात.... ते काय मुला सारखे जगणे झाले काय? आणि घरी बसुनही सुरक्षितेची हमी कोण देणार.....

मी माझ्या मुलीला लाख वेळा सांगते...कोणी ओळखीचे जरी आले तरि दार उघडाय्चे नाही.... असे करायचे नाही तसे कराय्चे नाही...पण लक्ष कुठे कुठे ठेवणार...................? क्लासेस ला जावेच लागतं... शाळेत जावचं लागतं...

आमच्याकडे कामाला येणार्‍या बाईंची मुलगी ५-६ वीत असल्यापासून लोकांकडे भांडी घासायला जाते. आम्ही तेव्हाच तिला आणि तिच्या आईला सावध केले. आणि कुणावरही विश्वास ठेवू नका असे बजावले.

"छान लिहीलय" अस म्हणायला जीभ रेटवत नाही, इतका या मजकुराचा अन विषयाचा परिणाम होतो आहे. तरीही,
उत्कृष्ट विषय मांडणी, वाचकास अतंर्मुख करावयास लावणारी.
एका फार मोठ्या षंढ बनलेल्या व म्हणूनच षंढपणा लपविण्यासाठी ढोन्गीही बनत चाललेल्या नालायक समाजसमुहाचे एक अत्यंत उघडे नागडे वास्तव दर्शन. त्याच समाजाचा आपण स्वतःही एक हिस्सा आहोत ही सुळी देणारी जाणिव करुन द्यायचे सामर्थ्य या लेखात आहे.

सरकार बदलेल
पोलिस बदलतील
राजकारणी सुध्दा बदलतील

.
.
.
पण माणसांची विकृती कशी आणि कधी बदलणार

>>>> कुणाला न जाणवलेला इश्यु घेऊन केवळ लेखणीच्या ताकदीने जागृती करणे , वाचकांना नव्या जाणीवा करून देणे हे फार फार वेगळे, नाही का !!! असो. <<<<
या धाग्याचा विषय नाही, व बेफिकीरजींच्या आधीच्या पोस्टला उद्देशूनही नाही, पण या वाक्याशी केवळ ठळक केलेल्या मजकुराला घेऊन सहमत.
पण जर असे कुणी "न जाणवलेल्या इश्यूला घेऊन सजग" करू पाहिले तर काय होते? माझा अनुभव असा की तो "कम्पुच्या" टवाळखोरीचा/उपहासाचा विषय बनतो. कित्येक वर्षांपूर्वी मी विशिष्ट वादाकडे अंगुलीनिर्देश केल्यावर इथेच मायबोलिवरच मला विचारणा झाली की असे दिस्ते तरी कुठे तुम्हाला? तुमचाच काहीतरी भ्रम असेल वा "विकृती" असेल (हो, त्यावेळेस विकृत हा शब्द माबोवर इनथीम होता)
उण्यापुर्‍या पाच/सहा वर्षातच भांडारकर/दादोजी पुतळ्यासहीत त्याच विषयाचे उघडेनागडे स्वरुप दिसू लागले. (अनावश्यक प्रतिक्रियांनी धाग्याच्या मूळ विषयास बाधा येऊ नये म्हणून मी मुद्दामहून स्पष्ट उल्लेख टाळतोय)

अशा वेळेस मान्य की मी जो इश्यू घेऊन लिहू पहात होतो, तिथे माझ्या लेखणीची ताकद नक्कीच अपुरी पडलि असेल.

पण तरीही, वरील आधी दर्शविलेली सहमती अधिक विचाराअंति मागे घेऊन असे म्हणावे लागते, की विषय रोजचाच असेल किंवा क्वचित घडणारा/अदृष्य-सूप्त रूपात असेल, तो परिणामकारक मांडला गेला तर तिथे लेखणीची ताकद असेच म्हणावे लागेल.

विषय नवा की जुना, रोजचाच की क्वचितचा, कुणाला जाणवलेला वा न जाणवलेला हा फरकच "लेखणिच्या ताकदी" समोर टीकू शकत नाही असे माझे मत.

तसे नसेल तर बाहिणाबाईचे/तुकारामांचे अभंग, ज्यात रोजच्याच बाबी तर दाखल्याकरता मांडलेल्या आहेत, काळाच्या कसोटीवर टीकूच शकले नसते.

लेखणिची ताकद असेल, तरच ते ते विषय, नवे वा जुने, जाणवलेले वा न जाणवलेले, वा नव्याने ओळख करुन दिलेले, हे वाचकाच्या मनात खोलवर भिडतात व तो त्यात त्याची सहमती, इथे माबोवर प्रतिक्रियांद्वारे त्याला शक्य त्या शब्दात देऊ पहातो.

सबब, हा विषय नुक्ताच घडलेला असला, ज्वलंत असला, सर्वांच्या परिचयाचा असला, तरी त्याच विषयाची सुसंगतपणे ज्या पद्धतीने मांडणी बेफिकीरजींनी केली आहे तो स्त्युत्यच आहे, व या लेखनात "त्यांचे लेखणीची" ताकद दिसून येते असे म्हणायला मला काहीही प्रत्यवाय दिसत नाही.
विषयांतराबाबत क्षमस्व.

>>>> सरकार बदलेल
>>>> पोलिस बदलतील
>>>> राजकारणी सुध्दा बदलतील
>>>> पण माणसांची विकृती कशी आणि कधी बदलणार
बहुधा प्रबोधनाने नव्हे, पण "कायदे" करुन नक्कीच बदलत असेल उदयनराव!

विषय नवा की जुना, रोजचाच की क्वचितचा, कुणाला जाणवलेला वा न जाणवलेला हा फरकच "लेखणिच्या ताकदी" समोर टीकू शकत नाही असे माझे मत. १००% खरे आहे लिंबु काका Happy

हा धागा आठवला कारण २ वर्षांपूर्वी देशातील सर्वात क्रूर बलात्काराची घटना घडली होती.

निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ज्या बसस्टॉपपाशी तिने ती बस घेतली तेथे काहीजण जमून काही धार्मिक विधी करताना टीव्हीवर दाखवत आहेत. हा प्रकार अनाकलनीय व खेदजनक आहे असे म्हणावे लागेल. व्यावहारिक जगात आयुष्य कंठणार्‍या आपल्या लोकांना व्यावहारिक उपाय योजना कश्या अंमलात आणता येतील हे बघावे हे सुचत नसून दोन वर्षांनी निर्भयाचा आत्मा घोटाळत असेल हे सुचत आहे.

एका ठिकाणी आजही मेणबत्त्या घेऊन एक रॅली निघाली असेही दाखवले.

दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांत स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण अधिकच झालेले आहे अशी आकडेवारी दिली जात आहे. आकडेवारीचा नेमका तपशील मी टिपून घेतलेला नाही, पण विस्तृत तपशील आहे.

बेफि ... hats ऑफ तुमच्या लिखाणाला ... इतके हृदयद्रावक लिहिले आहे ... शब्दच नाहीत ..

खरंच सुन्दर लिहिलयं.... प्रत्येक शब्द, वाक्य संवेदना बधीर करणारं आहे..

बेफीच्या लिखाणा बद्दल काही लिहण्याची गरजच नाही, त्यांची मांडणी आणि लेखन हे परिणामकारक असतच. पण प्रतिसाद वाचता ही बेफींची चुक म्हणावी की वाचणार्‍यांच्या बुद्धीमत्तेची..

बेफीनी बलात्कार आणि बलात्कारी ह्या बद्दल काहीच लिहिलेले नाही. लिहीले आहे ते आपल्या मानसिकते बद्दल. लहान मुलांवरती कुठलाही अत्याचार करणारे सगळेच तितकेच दोषी आहेत जितके बलात्कार करणारे. बाल कामगार, मुलांचे अपहरण करणारे, मुलांना अपंग करुन रस्त्यावर भिक मागायला लावणारे ह्या बद्दल आपल्याला काही वाटत नाही किंवा तितक्या प्रकर्षाने आत्ता वाटत नाही आहे.. हेच खरे.
सध्या बलात्काराच्या घटनेला जास्त टीआरपी आहे हेच खर.
कोणी दिला टिआर्पी? वरच्या प्रतिक्रिया वाचुन बघा उत्तर सापडेल.

ज्यांना मुली आहेत त्यांच्या काळजी दर्शाऊ प्रतिक्रिया वाचल्या, ज्यांना मुलगा/मुलगे आहेत त्यांच्या काळजीवाहू प्रतिक्रिया कुठे आहेत? एक ही प्रतिक्रिया नाही? की ह्या सगळ्यात त्यांची काहीच जबाबदारी नाही? ते निर्धास्त आहेत?

बलात्कारा पेक्षा मुलगी नसलेली बरी अशा प्रतिक्रिया वाचुन माझातरी संताप झाला आहे....

बलात्कार होईल म्हणुन मुलगी नको, हुंडाबळी होतात म्हणुन मुलगी नको, हुंडा द्यावा लागेल म्हणुन मुलगी नको. च्यायला रेप करतात म्हणुन मुलगा नको, स्त्रीयांवर अत्याचार करेल मोठा होउन म्हणुन मुलागा नको. उद्या खुन चोर्‍यामार्‍या करेल म्हणुन मुलगा नको, मुलाचे अपहरण होते म्हणुन मुलगा नको असं नाही वाटत तुम्हाला... ? वाटत नसेल तर खरे बलत्कारी कोण हे समजुन घ्या..

बेफीनी लिहील बलात्कारावर हळवं, पडल्या १००-२०० प्रतिक्रिया, कितीती हळहळ.. बेंफीच काही चुकल नाही. जे विकत ते पिकवल. मुद्दाम नाही, पण लिहीणारे आणि वाचणारे एकाच मानसिकतेचे बळी.

नंदिनीने वर सांगितलेल्या घटनेला आणि निर्भयावर झालेल्या अमानवी प्रकार वगळता ( जिथे शारिरीक इजा झाली आहे असे) जिथे मानसिक आघात जास्त आहे तिथे त्या मुलींना किंवा स्त्रीला अपराधी वाटण्यासाठी किंवा मानसिक नैराष्य येण्यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत,
"रेप??"
अरे बापरे.. किती भयाण !!!
अयुष्य उध्वस्त करणारी घटना ...
हात पाय तुटले असते तरी ठिक होत, अ‍ॅसिड अटॅक, अ‍ॅक्सीडंट ह्या सर्व अत्याचारां पेक्षा बलात्कार हा भयानक आहे ..

हे प्रतिसाद प्रतिकात्मक आहेत. बलात्काराच आणि कौमार्याच अवडंबर माजवणारे हे हळहळ करते जास्त दोशी आहेत. बलात्कार झाल्याने आयुष्य उध्वस्त होतं, पण अपंगत्व आल्याने होत नाही.. अरे कुठली ही विचारसरणी.

नवर्‍याने बेदम मारले, रोज मना विरुद्ध संभोग केला तर बलाक्तार होत नाही, आयुष्य उध्वस्त होत नाही. का? कारण आपण ते अ‍ॅक्सेप्ट केल आहे. किती स्त्रीयां खरच वाटतं की नवर्‍याने मना विरुद्ध केलेला संभोग देखिल बलात्कारच आहे? त्यात शारिरिक आणि मानसिक वेदना होत नाहीत...?
पण कुणाला सांगितल तर लोक काय म्हणतिल "अग फक्त नवर्‍याने केली आहे ना जबरदस्ती, त्यात काय येवढ?"

" एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर?" असा कोणी लेख लिहीणार नाही आणि इतकी सहानभुती मिळणार नाही. हो ना?

तुम्ही म्हणाल जमिन आस्मानाचा फरक आहे दोन्हीत, खरच आहे?

"कौमार्य चुरघळले" वगैरे जे लिहील आहे ना तीच सर्वात मोठी चुतियागिरी आहे. हे जे बलात्कारी हिजडे आहेत ना ते बलात्कार शारिरिक सुखासाठी करत नाहीत आपली नसलेली मर्दांगी सिद्ध करण्यासाठी करतात, दुसर्‍यावर हुकुमत गाजवण्या इच्छेपोटी करतात असतात.

बाकी आपल्याला काही करण शक्य नाही मग मर्दांगी साबित करायची कशी? लोकांच जाउ दे पण स्वतःला आपण मर्द आहोत कसं प्रूव्ह कराव?

हा समाज शिल, लज्जा, कौमार्य याला जास्त महत्व देतो ना मग ते हीरावून घेण म्हणजे काही अफाट केल्याच फिलींग येत असाव आणि त्यांची मर्दानगी प्रुव्ह होत असावी. इतक्या सहज एखाद्याच्या अयुष्याची इतकी मोठी हानी करता येते तर बलात्कार हा मर्दानगी साबित करण्याचा सोप्पा आणि योग्य मार्ग नाही का?

म्हणुनच पुर्वापार, शत्रूच्या स्त्रीयांवर बलात्कार हा शत्रुसाठी त्याचा जिवघेण्या पेक्षाही जास्त लाच्छ्नास्पद असे आणि आजही आहे. त्यामुळे बलात्कार्‍याला फाशीची शिक्षा झाली तरी त्याने दुसर्‍याच त्याच्या जिवापेक्षाही जास्त नुक्सान केलं आहे त्यामुळे त्याचा जिव गेला तरी तो दुसर्‍याच जास्त नुक्सान करुन जातो आहे ह्यात त्याला जास्त सुख असणार. म्हणुनच बलात्कार्‍याला फाशीची शिक्षा झाली तरी तो हसत असतो कारण फाशीची शिक्षा होउनही तो जिंकलेला असतो आणि समाज हरलेला आसतो.

वर नंदिनीने दिलेल्या घटनेत आणि निर्भयावर झालेल्या घटनेत हीच मानसिकता दिसुन येते.

बलात्कार्‍याला आणि आपण सर्वांना जो वर" बलात्कार करुन फक्त बलात्कार्‍याच जास्त नुक्सान झालं आहे, जिच्यावर बलात्कार झाला आहे तिच क्षणीक शरीरीक वेदने पलिकडे काहीही नुक्सान झालेल नाही "असं वाटत नाही" तो पर्यंत अशा घटना घडत रहातिल आणि वर्तमान पत्राच्या माथळ्यावर झळकत रहातिल.

बलात्कार केल्यामुळे एड्स झाला, गुप्तरोग झाला अशा बातम्या झळकावयला हव्यात मग ह्या घटनांन वर आणि बलात्कारी मानसिकतेव चरपाक बसेल त्या पेक्षा जास्त हळहळ व्यक्त होण कमी होईल आणि बलात्कार आणि बलात्कार्‍याना फाट्यावर मारल जाईल तेंव्हा बलात्कार थांबतिल.

जरा विचार करा....
कुणाचा अपमान करायचा वा दुखवायचा माझा हेतू नाही, पण हे बदलायला हव ही एकमेव प्रामाणिक इच्छा आहे.

हा लेख पण पटतो आणि वर लिहीलेला मोठा प्रतीसाद पण. समाज बदलायला वेळ लागेल.
आधी हिंदी चित्रपटातले खालील ट्रेंड बदला:
१. नायकाच्या बहिणीवर बलात्कार झाल्यास तिने आत्महत्या करणे. (बहुतेक जिगर, आणि बरेच इतर)
२. नायिकेवर बलात्कार झालेला असल्यास किंवा चारित्र्य संशयास्पद असल्यास काही करुन तिला चित्रपटाशेवटी खपवणे. (हिरोला वाचवताना किंवा व्हिलनने केलेल्या बाँबस्फोटात मरुन) (जिद्दी, गुलाम ए मुस्तफा)
३. जो काही हिरोत्याग आहे तो सर्व तवायफ किंवा नाचणारीला करायला लावणे. आणि शेवटी दुसर्‍या सोज्वळ नायिकेला तो हिरो मिळवून देणे. (मुकद्दर का सिकंदर)इथे रेखालार्हिरोला नकार द्यायला लावून हिरो मारला.)),देवदास(इथे दोघी गंडल्या.))
४. नायकानेच बलात्कार केलेला असल्यास नायिकेला त्याच्याशी लग्न करायला लावणे आणि मग तिलाच आणि त्रास देऊन त्याच्या घरच्यांचे मन जिंकायला लावणे. (राजा की आयेगी बारात, बेताज बादशाह(यात जुहीला हुतात्मा बनवले आहे बहुतेक नंतर.))

बलात्कार झालेल्या नायिकांना कथेत साधे आयुष्य जगण्याचा, शेवटी सुखाने लग्न करण्याचा मॉरल हक्क नाही????

बलात्कार्‍याला आणि आपण सर्वांना जो वर" बलात्कार करुन फक्त बलात्कार्‍याच जास्त नुक्सान झालं आहे, जिच्यावर बलात्कार झाला आहे तिच क्षणीक शरीरीक वेदने पलिकडे काहीही नुक्सान झालेल नाही "असं वाटत नाही" तो पर्यंत अशा घटना घडत रहातिल आणि वर्तमान पत्राच्या माथळ्यावर झळकत रहातिल.>>>>>>>>>>पटलं.
सातच्या आत घरात मधला स्मिता तळ्वळकरचा कोर्टातला युक्तीवाद आठवला.

अंगावर काटा आला. सुन्न......
बलात्कार्‍याला आणि आपण सर्वांना जो वर" बलात्कार करुन फक्त बलात्कार्‍याच जास्त नुक्सान झालं आहे, जिच्यावर बलात्कार झाला आहे तिच क्षणीक शरीरीक वेदने पलिकडे काहीही नुक्सान झालेल नाही "असं वाटत नाही" तो पर्यंत अशा घटना घडत रहातिल आणि वर्तमान पत्राच्या माथळ्यावर झळकत रहातिल.>>>>>> अगदी.
ओह इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सीडेंट विथ हर. अशी समाजाची मानसिकता होणे गरजेचे आहे. अन त्याही आधी आपापल्या मुलांना समोरील व्यक्तीचा रिस्पेक्ट करणे शिकवायला हवेय.

Pages