Visiting Ladakh – 2

Submitted by साधना on 26 August, 2013 - 11:44

आधीची रात्र हाऊसबोटीत अगदी सुखात गेल्याने आता कारगीलला कसले हॉटेल मिळतेय याची उत्सुकता होती. थकेहारे आम्ही हॉटेल ग्रीनलँडमध्ये अवतिर्ण झालो. हॉटेल चांगले होते पण श्रीनगरपासुन एक गोष्ट जाणवलेली ती तिथे अजुनच प्रकर्षाने जाणवली. श्रीनगरला हाऊसबोटीत जाण्यासाठी 'लवकर शिका-यात बसा, सामान मागुन येईल' म्हणुन जेव्हा बोटवाला घाई करु लागला तेव्हा आम्ही फुटपाथवर ठेवलेल्या आमच्या सामानापासुन हलायला अळंट्ळं करू लागलो. बोटवाल्याच्या ते लक्षात येताच तो वैतागला. 'सामानाची काळजी तुमच्या तिथे जाऊन करा, इथे कोणी तुमचे सामान चोरणार नाही, इथे तसले लोक नाहीयेत' म्हणुन तो बडबडायला लागला.

इथे कारगीलला तर खिडक्यांना ग्रिलच नव्हते. मुंबईत घरात ग्रिलवाली खिडक्या-दारे गच्च बंद करुन झोपायची सवय. इथे एकतर खिडक्यांना ग्रिल नाही. बरे खिडकी बंद करावी, तर खोलीत फॅन नाही. नाईलाजाने खिडकी उघडी ठेऊन झोपावे लागले. त्यामुळे रुम जरी दुस-या मजल्यावर असली तरी मला तर आपण अगदी उघड्यावरच झोपतोय असे वाटायला लागले. आमच्या रुमखालीच हॉटेलचे प्रवेशद्वार होते आणि रात्रभर गाड्या येत होत्या. शिवाय कसलातरी फाट्-फुट आवाज सतत होत होता. रात्रभर झोपच आली नाही. कधीतरी पहाटे झोप लागली. उठल्यावर खिडकीतुन वाकुन बघितले तर खाली पाणी गरम करण्याचा मोठा बंब उभा होता आणि त्यात घातलेली लाकडे रात्रभर फाट्-फुट आवाज करत जळत होती. म्हटले, हात्तीच्या, रात्रीच वाकुन बघितले असते तर बंब दिसला असता. इतक्या भट्टीत कोण खिडकी चढून आला असता?? Happy सुखाने झोप तरी लागली असती.

सकाळी नाश्त्यासाठी हॉटेलच्या डायनिंग रुममध्ये जाताना वाटेत एक झाड दिसले ज्याला सुपारीच्या आकाराची भगवी फळे लागलेली. त्याच्या बाजुलाच एक उंच झाड होते जे सफरचंदानी भरलेले. . मी आयुष्यात पहिल्यांदाच सफरचंदाचे झाड पाहात होते. पण ती सगळी सफरचंदे कच्ची होती. भगवी फळे कसली म्हणुन हॉटेलमधल्या पोराला विचारले तर तो म्हणाला अॅप्रिकॉट म्हणजे मराठीत जर्दाळू. ही सुकल्यावर पांढरी कशी होतात हा विचार करत त्याला म्हटले दोनचार काढुन दे जरा चाखायला. तर त्याने सांगितले की ही झाडे हॉटेलची नसुन शेजा-याची होती आणि रोज शेजारीण हॉटेलला शिव्या घालत होती, त्यांची गि-हाईके तिची फळे तोडतात म्हणुन. मग मी फळे चाखायचा बेत रहित केला आणि फक्त ब्रेकफास्टच केला.

तर आज ज्यासाठी इथे आलो ते लेह गाठणार होते. यंग अँग्री मॅन नाझिर त्याच्या गब्बर एक्प्रेससकट तयार होता.

श्रीनगर ते कारगीलचा प्रवास २०४ कि.मी.चा होता. त्या मानाने आजचा कारगील ते लेह हा २३४ कि.मी.चा प्रवास थोडा जास्त होता. कालच्या रस्त्याचा ताजा अनुभव लक्षात घेता, आम्ही लेह कडे लवकर प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला.

NH-1 वर वसलेल कारगील हे एक टुमदार गाव.. गावाला वळसा घालुन आमची गाडी एका टेकाडावर आली. द्रास नदीच्या खळखळाटाने जागं होणार्‍या कारगीलचा सुंदर देखावा डोळ्यात साठवुन आम्ही पुढे निघालो.

आम्ही आज मुलबेख - लामायारु करत जाणार होतो.

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

कारगील पासून साधारण ४० कि.मी. वर मुलबेख गावात मैत्रेय बुद्धाच अखंड पाषाणात कोरललं शिल्प आहे.

प्रचि ३५

गाडी तिथे थांबताच ओल्या जर्दाळूंनी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन लडाखी बायकांनी आमच्यावर हल्ला केला. Happy मला खेड शिवापुरच्या टोलनाक्यावर काकड्या घेऊन गाड्यागाड्यांमधुन फिरणा-या पोरांची आठवण झाली. प्रथमदर्शनी हे ओले जर्दाळू खुपच सुंदर दिसतात. चवीला मात्र ठिकठाक. श्रीनगरला भेट म्हणुन मिळालेल्या नेक्टरिनएवढे हे जर्दाळू मला काही आवडले नाही. पण नेक्टरीन परत कुठेही दिसले नाहीत, सफरचंदे अजुन पिकली नव्हती त्यामुळे मी जर्दाळूंवर समाधान मानुन घेतले.

आज वाटेत दोन पास होते. एक नामिकाला (उंची १२१९८ फुट ) आणि दुसरा म्हणजे फोटुला. ( उंची १३४८७ फुट). कालच्या झोझिलाएवढे ते भयानक वाटले नाहीत कारण रस्ता डांबरी होता. पण एवढ्या उंचीवरुन प्रवास करताना डोके जड होत असल्याची जाणिव व्हायला लागलेली.

मैत्रेय बुद्धाच दर्शन घेऊन नमिकाला कडे निघालो. या मार्गातील चित्तवेधक देखाव्यांवरुन नजर हटत नव्हती.

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३ हे वाळूचे किल्ले आहेत. पण अर्थातच आपोआप तयार झालेले.

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

पुढे गेल्यावर मुलखेब गावात जेवणासाठी थांबलो. ऑथेंटिक लडाखी जेवणाच्या यादीत थुपका, मोमो होते. लगेच दोन्ही ऑर्डर केले. अतिशय मस्त थुप्का तिथे मिळाले. पुढे खुद्द लेहमध्ये एका मोनास्टरीतही एवढे छान थुपका मिळाले नव्हते. आता हे थुपका ऑथेंटिक की मोनास्टरीतले ऑथेंटिक ते देव जाणे पण आम्हाला तरी मुलबेखमधले थुप्का आवडले. लडाखी लोक थुपका मधल्या क चा उच्चार करत नाहीत. ते थुप्पा म्हणतात. मोमो चे स्पेलिंगही मोक मोक असे लिहिले होते पण उच्चार मात्र मोमो असा करत होते. लेहमध्ये मी थुपकामध्ये वापरतात त्या नुडल्स घेतल्या, दुकानदाराने मला ह्या नुडल्स कशा बनवायच्या त्याची रेसिपी तर सांगितलीच पण सोबत ह्यांना नुडल म्हणत नाही तर थुप्पा म्हणतात हेही सांगितले.

जेवणासाठी जिथे थांबलो ती जागा खुपच सुंदर होती. गार्डन रेस्तरा होते, आणि त्याच्या चारी बाजुला जर्दाळूची झाडे होती. झाडांना इतके जर्दाळू लगडलेले होते की झाडे कशीबशी तोल सावरत उभी आहेत असे वाटत होते. जेवण येईपर्यंत मी आजुबाजुला फिरुन शक्य तितकी झाडे गदगदा हलवुन जर्दाळू पाडले आणि त्यांचा समाचार घेतला. मालकाची ऑफिशीयल जर्दाळूंची बाग बाजुलाच होती. जेवण येईपर्यंत जिप्सी बागमालकासमोर 'मी एकही जर्दाळू खाणार नाही' अशी शपथ घेऊन गुपचुप बागेत जाऊन फोटोसेशन करुन आला. त्याच्यानंतर आम्हीही गेलो. आम्हीही त्या बागेतला एकही जर्दाळू खाल्ला नाही कारण आमची पोटे आधीच जेवणाने आणि जर्दाळूंनी गच्च भरलेली.

बाहेर रस्त्यावर मात्र जर्दाळू थोड्या चढ्या भावाने विकली जात होती. ३० ते ४० रुपय पाव किलो. त्यामानाने आधीच्या लडाखी बायांनी २० रुपयाला पावकिलोच्या वर जर्दाळू दिलेले. बाजारात गुलाबी रंगाचे गुबगुबीत मुळे विकायला होते. सगळी भाजी इतकी ताजी. शेतातुन थेट बाजारात. लेहच्या मार्केटमध्येही ताजी भाजी बघुन जीव जळला. ताजा पालक (पण पाने आकाराने बरीच मोठी, स्विस चार्डच्या पानाएवढी), ताजी केशरी गाजरे, गुबगुबीत फुगलेले गुलाबी मुळे, नवलकोल, स्वच्छ पांढरेशुभ्र फ्लॉवर, मटार..... इतकी ताजी भाजी आणि स्वस्तही.

बाजारात आर्मी जवानही भेटले. एका मराठी जवानाशी बोलणे सुरू होते. तो काय सांगत होता ते मला ऐकु आले नाही पण आमच्या नाझिरने मात्र ते ऐकले आणि त्याचे डोके फिरले. पुढे गाडीमध्ये नाझिरशी काश्मिर प्रश्नावर चर्चा सुरू झाली आणि काही क्षणात ती चर्चा अशा वळणाने जाऊ लागली की आझाद काश्मिरचे जे काय होईल ते होवो पण मात्र कुठल्याही क्षणी नाझिरमिया आणि आमच्यासकट गाडी एकाद्या वळणावर शहीद होईल की काय अशी भिती वाटुन आम्ही चर्चेखोर मंडळींना आवरले. मुक्कामाला पोचल्यावर काय ती चर्चा करा अशी प्रेमळ सुचना देऊन वातावरण परत शांत केले. लेहला पोचता पोचता नाझिरने सांगितले की लडाखच्या जनतेने सरकारशी करार केलाय, जर काश्मिर स्वतंत्र झाले तर लडाख भारतात राहणार.

जेवल्यानंतर पुढे निघालो. पुढे मुनस्केप लागले. लडाखला लँड ऑफ ब्रोकन मुन म्हणतात ते ह्या भागामुळेच. हा जमिनीचा तुकडा खरेच चंद्राचा इथेच राहिलेला भाग आहे की काय हे मला माहित नाही पण हा एवढाच तुकडा इतर भुभागापेक्षा वेगळा आहे हे मात्र खरे. असेलही चंद्राचा उरलेला भाग! चंद्राला इथुन तुटून आकाशात जाताना कोणी पाहिलंय? तसेही लडाखमध्ये दगडांची आणि मातीची इतकी विविधता आहे की मुनस्केपमधल्या पांढरट पिवळट दगडांच्या अधेमधे दिसणारे मॉव रंगाचे जांभळट दगड उद्या कोणी मंगळाचा वरुन पडलेला भाग म्हणुन खपवले तरी आमच्यासारख्यांना कळायचे नाही. आम्ही आपले होक्का म्हणुन माना डोलावणार..

फतुला खिंड पार करुन आम्ही लामायारु मॉनेस्ट्री जवळ आलो. मुलबेख पासुन ६० कि.मी. वर लामायारु आहे.

प्रचि ५१

प्रचि ५२ मुन लॅण्ड

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६ रंगसंगती मधिल वैविध्य

वाटेत अल्ची मोनास्टरी दिसली. पण दुस-या दिवशी परत तिथे यायचे होते म्हणुन थांबलो नाही. दुस-या दिवशीच्या प्रवासजंत्रेत लामायारु, अल्ची मोनास्टरी, मुनस्केप, मॅग्नेटिक हिल, हॉल ऑफ फेम इत्यादी भरपुर गोष्टी लिहिलेल्या. लेहला जाऊन परत उलटे इथे यायचे हे लक्षात येताच ज्यांची डोकी दुखत नव्हती त्यांचीही अचानक दुखायला लागली. शेवटी उद्या पाहायच्या अर्ध्या गोष्टी आता रस्त्यातच जाता जाता पाहुन झाल्यात, उद्या परत इकडे येउन डोके दुखवुन घ्यायला नको यावर गाडीत सगळ्यांचे झटकन एकमत झाले.

मॅग्नेटिक हिलवर मात्र थांबलो. तोपर्यंत आमच्या अँग्री यंग मॅनचे डोकेही बरेच थंड झाले होते. त्याने मग गाडी कशी आपोआप मागे जाते त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले, गाडीतल्या फोटोग्राफरनीही त्याचे विडिओ शुटींग केले. आधीच्या वादावादीनंतर नाझिरचे फोटो कॅमे-यात अजिबात घेणार नाही अशी प्रतिज्ञा काही मंडळींनी केली होती. आता शुटींगचे काय, शुटींगमधुन गाडीच्या ड्रायवरला कसे वगळणार? असा प्रश्न मी विचारताच, आता जाऊदे, वाद मिटलाय इ.इ. गुळमुळीत बोलुन फोटोग्राफर मंडळी गप्प राहिली. मॅग्नेटिक हिलमध्ये कसलेच मॅग्नेटिक नाहीय्ये. ते फक्त ऑप्टिकल इलुजन आहे असे मी नेटवर वाचलेले. म्हणुन मी नाझिरला दोनदोनदा विचारले की बाबा खरोखरच हे मॅग्नेटिक आहे की ऑप्टिकल इलुजन? त्याने हे मॅग्नेटिकच आहे म्हणुन ठासुन सांगितल्यावर मी गप्प बसले. तसा आता पुढचा रस्ता सरळ आहे हे माझ्य्या डोळ्यांना दिसत होते, पण उगीच रिस्क कशाला घ्या.....

प्रचि ५७ मॅग्नेटिक हिल

वरिल प्रकाशचित्रात रस्त्याला जो उतार दिसातोय तिथे जाऊन गाडी बंद करायची. तेथील चुंबकीय शक्तीच्या प्रभावामुळे न्युट्रल वर ठेवलेली गाडी आपोआप मागे खेचली जाते.

प्रचि ५८

एक डौलदार वळण घेऊन गाडी एका उंचवट्यावर थोडीशी विसावली आणि नाझिर म्हणाला 'ये लो लेह आगया!...... ज्याची एप्रिलपासुन वाट पाहिलेली ते लेह आमच्या डोळ्यासमोर होते. विस्तिर्ण पसरलेली मिलिट्रीची वस्ती नजरेसमोर आली. त्या रस्त्यासमोरच्या ४० च्या स्पिडलिमिटने धावत आमची गाडी लेहमध्ये अवतिर्ण झाली.

आम्ही लेख मधे दाखल होताच निसर्गातील बदल जाणवू लागला.

प्रचि ५९

लेहला हॉटेल स्नोलायन मधे आमचा चार दिवस मुक्काम होता. हॉटेल मालक सोनमने आम्हाला जराही उसंत न देता सगळं बॅगेज रिसेप्शन वर ठेवायला लाऊन.. थेट हॉटेलच्या मागिल बाजुस पिटाळले. छोटेखानी हॉटेलच्या मागे सुंदर बागीचा तयार केलेला होता आणि बगीच्यात बाफाळता चहा आमची वाट पहात होता. या अनपेक्षीत पाहुणचाराने मन भारावुन गेले.

प्रचि ६० छायाचित्रकार जिवेश आणि अमित

फोटो इंद्राने काढलेत, उगीच माझे अभिनंदन करु नका.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला ते कॅमेरे आहेत का तोफा? Happy

मस्त. फोटोंची अपेक्षा आता त्या तोफा पाहिल्यामुळे जास्त वाढली ठेवली आहे हां !

मी तो मॅग्नेटीक फिल्डचा अनुभव सलालाह ( ओमान ) मधे घेतला होता. पण केनयातल्या माचाकोस या ठिकाणी तर रस्त्यावर ओतलेले पाणी पण चढाकडे जाते. यू ट्यूबवर आहे ते.

साधना, मस्तच लिहिलंय. Happy इंद्रा, सगळेच फोटो बेस्ट!!!
तोफा Proud

अरे पण लेहपर्यंतच पोहचलोय. पुढची सफर कोणासोबत करणार आहोत?

दॅटस् ईट साधना! ते पाषाणशिल्प अप्रतिम! तुमच्यापैकी कुणीतरी लवकर फोटो टाकावेत याची वाट पहात होते केव्हांची!
मस्त खूप! आवडेश! Happy

मंडळींनो धन्यवाद....

एव्हढ्या सगळ्या डोंगरांवर कुठेही बर्फ दिसला नाही. आश्चर्य वाटले

होता होता, बर्फही होता, फोटोत आला नसेल. लडाखमध्येही खार्दुंगला जातना जसजसे वर जात गेलो तसे मागच्या पर्वतराजीवरचा प्रचंड बर्फ दिसू लागला.

अरे पण लेहपर्यंतच पोहचलोय. पुढची सफर कोणासोबत करणार आहोत?

पु|ढचेही लिहितेय.. बघतानाच एवढी दमछाक झाली, लिहिताना झटाककन लिहुन होईल असे वाटलेच कसे तुला?

तुझ्याकडचे फळांनी लगडलेले झाडांचे फोटो टाक ना इथे. माझ्याकडे आहेत फोटो पण पिकासा मला आधीसारखे अपलोड करायला देत नाही आणि त्यची नविन ट्रिक समजुन घेण्याइतका वेळ सध्या नाहीय.

मस्त वर्णन. मस्त फोटू. Happy
जर्दाळूनं लगडलेलं झाड मलापण पहायचंय. म्हणजे त्याचा फोटो...

मस्त लेख आणि फोटोही.

<<पुढे मुनस्केप लागले. लडाखला लँड ऑफ ब्रोकन मुन म्हणतात ते ह्या भागामुळेच. हा जमिनीचा तुकडा खरेच चंद्राचा इथेच राहिलेला भाग आहे की काय हे मला माहित नाही पण हा एवढाच तुकडा इतर भुभागापेक्षा वेगळा आहे हे मात्र खरे. असेलही चंद्राचा उरलेला भाग! चंद्राला इथुन तुटून आकाशात जाताना कोणी पाहिलंय? तसेही लडाखमध्ये दगडांची आणि मातीची इतकी विविधता आहे की मुनस्केपमधल्या पांढरट पिवळट दगडांच्या अधेमधे दिसणारे मॉव रंगाचे जांभळट दगड उद्या कोणी मंगळाचा वरुन पडलेला भाग म्हणुन खपवले तरी आमच्यासारख्यांना कळायचे नाही. आम्ही आपले होक्का म्हणुन माना डोलावणार..>> हे भारीये
फार सुंदर आहे लेह लडाख.

छान लिहित आहेस... आगे बढो..

पुढे गेल्यावर मुलखेब गावात जेवणासाठी थांबलो > जेवणा साठी खलात्सेच्या सनमून मधे थांबलो होतो.

Pages