एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर

Submitted by बेफ़िकीर on 26 August, 2013 - 07:03

एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?

ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!

इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी?

वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊसुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?

अच्छा... स्वप्ने वगैरे होय? भंगूदेत की ती? तुझी अशी काय मोठी स्वप्ने होती म्हणे? चारजणांसारखीच ना? संसार, मुलेबाळे वगैरे? नोकरी, घर, ही असलीच ना? मग ती तशी अजुनही तुला पूर्ण करता येऊ शकतील की? ओह, आता कोणी लग्नच करायला तयार नाही होय? मग लग्नच झालं पाहिजे असं तरी कुठे आहे?

आणि तुझ्यासारख्या अब्रू गेलेल्या मुलीशी का म्हणून कोणी लग्न करावं? अभंग शरीराच्या असंख्य पर्यायी मुली लग्नाच्या बाजारात उभ्या असताना तुझी गरज कोणाला का असावी? का म्हणून एखाद्या पुरुषाने मन वगैरे मोठे करून तुला स्वीकारावे?

सूड? सूड घ्यायचाय तुला त्या नराधमांचा? कसा घ्यायचाय सूड? ठार वगैरे करायचे आहे का त्यांना? ते तसे ऐच्छिक नसते. त्याच्यासाठी अतिशय न्याय्य आणि कठोर कायदे आहेत. ते सिद्ध व्हावे लागते की त्याच नराधमांनी हे कृत्य केले. वैद्यकीय तपासण्या असतात. साक्षीपुरावे असतात. त्याक्षणी नग्न झाली होतीस तसे पुन्हा एकदा कोर्टात सर्वांसमोर शाब्दिक नग्न व्हावे लागते. धाडस लागते त्यासाठी. त्यातून ते पुरुष कोणत्यातरी राजकीय अथवा श्रीमंत माणसाशी लागेबांधे असलेले असले तर ते न्यायाधीशासकट सगळ्यांना मॅनेज करतात. आपलाच वकील तोंड पाडून सांगतो कोर्टात, की 'माझ्या अशीलाचे वर्तन आरोपींना उद्युक्त करणारे होते हे मान्य आहे' वगैरे! तू नाही का वाटेल तसे कपडे घालायचीस? कोणालाही कधीही कुठेही भेटायचीस? मोकळेपणाने वागायचीस? कोणाचाही सहज गैरसमज व्हावा ही तुझीच जबाबदारी होती ना? मग आता कशाला रडायचं?

शिक्षा? देते ना न्यायालय शिक्षा अश्यांना! त्यांनीच तुझ्यावर बलात्कार केला हे एकदा सिद्ध झाले की शिक्षा जाहीर होते. पण ते सिद्ध होण्यात अनेक अडथळे असू शकतात. तेही पार झाले तर मग एखादा बलात्कार करणारा वयाने लहान असल्याने त्याला सुधारगृहात वगैरे पाठवले जाते. बाकी काही नाही. जे कायद्याने सज्ञान समजले जातात त्यांना एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंत वगैरे तुरुंगात पाठवतात. त्यातही पुन्हा एखाददुसर्‍या वर्षाने ते माणसे मॅनेज करून बाहेर वगैरे पडू शकतात. पण बहुतांशी केसेसमध्ये ते पुराव्याअभावी किंवा कशामुळे तरी निर्दोषच सुटतात आणि पेढे वाटतात. कशाला एवढा उपद्व्याप करतेस? या सगळ्यात तुझी हकनाकच बदनामी होणार. म्हणजे एक तर बलात्काराचे दु:ख आणि वर बदनामी!

बदनामी! बदनामीला काय घाबरायचंय? असं काय मोठं स्टेटस आहे तुझं या समाजात? कोण ओळखत होतं तुला हा बलात्कार होण्याआधी? आता कशी तू सार्‍या जगाला एक बलात्कारिता म्हणून माहिती झालीस उलटी! काहीच न करता प्रसिद्ध होण्यात गंमत नाही वाटत तुला?

जनता ना? हो हो! सगळी जनता तुझ्याचबाजूने आहे. तू नुसते सांगितलेस की तुझ्यावर बलात्कार झाला, की सगळे मेणबत्त्या घेऊन पळत सुटतील. हातात फलक धरून घोषणा देतील. सरकारे हालवून सोडतील. ती शक्ती बघून विरोधी पक्षीय त्यात पडतील. मोठेच राजकारण घडून येईल. एक साधा बलात्कार झाला तुझ्यावर, पण पूर्ण देश हालेल. मोठमोठे नेते भाषणांमध्ये सांगतील की तुझ्या रिहॅबसाठी हे केले जाणार आहे ते केले जाणार आहे. नराधमांना शिक्षा देण्यात येणार आहे वगैरे! तोपर्यंत टी ट्वेन्टी सुरू होईल. मग ज्या चॅनेलवर तुझ्या बातमीला तासनतास कव्हरेज मिळत होते तेथून पाणी ओसरावे तसे तुझे नांव ओसरेल आणि धोनी, कोहली, अश्विन अशी नांवे झळकू लागतील. चीअर गर्ल्सवर कॅमेरे जातील. षटकार आणि चौकारांनी मैदाने दुमदुमतील. लोक रस्त्यावर येऊन नाचतील. त्या रस्त्याच्या कडेला आठ दिवसांपूर्वीचा एक फलक गटारात पडलेला असेल, ज्यावर लिहिले असे की 'अश्या अश्या मुलीचे आयुष्य नासवणार्‍यांना शिक्षा द्या'! याच गर्दीत नाचणार्‍यांच्यापैकीच काही जणांच्या हातात आठ दिवसांपूर्वी तो फलक दिसलेला असेल. आज तो त्यांच्या पायाखाली असेल आणि त्यावर बीअर सांडत असेल. सिगारेटची थोटके त्यावर चुरगाळली जात असतील. अगदी तशीच, जसे तुझे कौमार्य आठवड्याभरापूर्वी चुरगाळले गेलेले होते.

पण एखादा चॅनेल, एखादे वर्तमानपत्र मात्र अजूनही तुझी बाजू लावून धरायचा प्रयत्न करत असेल. वेडी आशा, की तुझी बातमी देऊन अजूनही टी आर पी ओढता येईल ही! तेवढ्यात मॅच फिक्सिंग होईल. आणि मग आपल्या वाहिनीचा अथवा वर्तमानपत्राचा खप उदंड व्हावा म्हणून तुला सुईच्या अग्राइतकीही जागा न ठेवता सगळे आपापल्या हेडलाईन्स बनवतील. त्या रात्री मीडिया पार्टी झोडेल, की हातात कसली दणदणीत बातमी आली आहे. दहाच दिवसांपूर्वी तुझ्या बातम्या दाखवून जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, तुझ्या अश्रूंवर दहाच दिवसांपूर्वी जे तुंबड्या भरत होते ते आता श्रीशांतच्या कंबरेचा रुमाल कसा लटकत होता त्यावर फोकस ठेवतील.

नाही नाही, तू, तुझ्या घरचे, तुझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे तुझ्यावरचा अन्याय मुळीच विसरणार नाहीत. पण इतरांना त्यांचे त्यांचे आयुष्य हे असतेच की? आपापले आयुष्य जगण्याकडे एकेकजण वळायला लागला की तू म्हणजे एक मानसिक विकारांनी पछाडलेले आणि घरात पडून राहिलेले लोढणे ठरशील. ज्याच्याबरोबर तुझा साखरपुडा झालेला होता तो आता तिसरीबरोबर लग्न ठरवत असेल. तुझ्या घरचे त्याला आणि त्याच्या घरच्यांना हे विचारतसुद्धा नसतील की आमच्याच मुलीबरोबर का नाही करत लग्न! उघड आहे, तुझ्या आई वडिलांनाच तुझ्या त्यावेळी ठरलेल्या नवर्‍याचा आत्ताचा निर्णय मान्य असेल. का म्हणून चारजणांनी नासवलेले शरीर त्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारावे?

हां हां, ते बलात्कारी होय? ते फिरतील की मोकाट रस्त्यावरून? निर्दोष म्हणून सुटल्यानंतर खासगीत आपल्या मित्रांबरोबर रात्री पार्टी करताना ते रसरशीत वर्णने ऐकवतील. कसे तुला सापळ्यात पकडले. कशी तू घाबरलीस. कसे तुझे हाल केले. किती धमाल आली. इत्यादी! त्यांना तू पुन्हा रस्त्यात कुठे दिसलीस तर छद्मी हासतीलही ते! नाही गं बाई, धरणीमाता वगैरे काही पोटात्बिटात घेत नसते कोणाला! असल्या गोष्टी रामायणात होतात.

आणि तुला माहीत नाही का? दुसर्‍याची बायको पळवणे, वहिनीचे भर दरबारात वस्त्रहरण करणे ही तर आपल्या धर्मातील सर्वात मोठ्या व प्रभावी काव्यांमधील कथानके आहेत. खरे तर ती कथानके अस्तित्वातच सीता आणि द्रौपदी या दोघ्यींच्या अब्रूवर घातल्या गेलेल्या घाल्यामुळे आली आहेत.

बायका ना? कोणत्या आजूबाजूच्या? त्या नाकच मुरडणार की तुला पाहून? त्यांच्या मुलींची जुनी मैत्रीण असशील तू! पण आज नाहीस काही मैत्रीण वगैरे! आज तुझ्यासारखीबरोबर मैत्री म्हणजे पुन्हा स्वतःचीही बदनामी! ती कोण करून घेणार आहे?

हो हो, पुन्हा बलात्कार होण्यास मात्र पात्र आहेस तू आजही! कारण तुझा आता दुसरा काही उपयोगच नाही ना! ते एक करता येईल तुला! इच्छुकांसमोर स्वतःला सादर करायचे असल्यास अवश्य कर!

काय म्हणतेस? हे नव्हते माहीत आम्हाला! जिवंतच नाही आहेस होय तू? बलात्कारानंतर त्या नराधमांनी मारून टाकले तुला? मग तर काय, कसले प्रश्नच उरलेले नाहीत तुझ्यासमोर!

काय? अजून जगायचे होते? का? ओह... अच्छा अच्छा!

तीनच महिन्यांची होतीस होय? मग लवकर गेलीस त्यामानाने!

====================================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

पुर्वी मित्रांबरोबर फिरताना एखाद्या फटाकड्या मुलीकडे बघणं, तिला न ऐकू येतील अशा कमेंट करण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टी करणं आता या घटणांमुळे स्वतःची शरम वाटून बंद केलय. Sad

Sad
इतक्यातच रत्नागिरीची भयानक बातमी वाचली अजूनच सुन्न वाटतंय. २ दिवसांपुर्वी त्या मुलीची आई वारली होती... Sad
काय लिहावं हे ही कळत नाहीये आता.

भयानक आहे सगळे. माझी चुलत बहिण मला मुलगी नकोच असे म्हणते. माझे आणि तिचे यावरून खूप वाद होतात. आणि आज जे काही घडते आहे ते पाहून खरेच वाट्ते, ती म्हणते ते बरोबरच असावे. माझी तर या बातम्या ऐकायची सहनशक्तीच सम्पुष्टात आलिये.

_/\_

एका खूप भयानक अशा जगात वावरत आहोत आपण आणि तशातच राहायला भाग पाडणार आहोत आपल्या लेकी-बाळींना.
सव्वा वर्षाची लेक आहे माझी. लाडाने जरी कोणी जवळ घेतलं तरीही आजकाल नजरच बदलते माझी. मनात भलतेच विचार दाटून येतात. अजून काय काय वाढून ठेवलय आपल्या पुढ्यात काय माहिती?

Pages