मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

Submitted by बावरा मन on 25 August, 2013 - 01:43

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्‍या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला.

या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि.

आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले.

कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्‍याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे.

तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत.

चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्‍याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्‍या कॅमरा मन ला सलाम.

पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.

चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. >>> लेखन स्पर्धा, चित्रपट परीक्षण का अजून कुठला तरी... हा धागा नक्की कुठल्या वडाला बांधायचा होता?
बाकी परीक्षण असेल तर छानच जमल. बघणार!

अतिशय सुंदर चित्रपट आहे...... हा चित्रपट पाहताना "ब्लॅक हॉक डाउन" या हॉलिवुड युध्दचित्रपटाची आठवण आली... जबरदस्त स्क्रिप्ट वर पकड... कुठेही सुटलेली नाही... उगाच नायक नायिकेच्या आठवणीत डुबुन... ऐन युध्द भुमीवर गाणे म्हणत फिरत नाही... Happy हे महत्वाचे...

आवडला. बरेच प्लस आहेत. उगाच घुसडलेली गाणी नाहीत, आक्रस्ताळा अभिनय नाही की स्पेशल मॅनरीझमवाला खलनायक नाही. धूम आणि जिंदानंतर जॉन प्रथमच आवडला. राजकारण्यांच्या आदेशावर चालणार्‍या आणि गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय धोरणांना सांभाळत देशासाठी काही करू पाहणार्‍या सुरक्षासंस्थांची मर्यादा, अगतिकता उत्तमप्रकारे चित्रीत केली आहे.
एका गंभीर विषयाला योग्य न्याय दिलाय दिग्दर्शकाने आणि सर्वच अभिनेत्यांनी.

>>पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारे सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार >>

असे चित्रपट बॉक्स ऑफिसच्या जुगारात तरण्यापेक्षा हरण्याची शक्यता अधिक, अशी उदाहरणे आठवतात. तरीही हे वेगळे विषय मांडण्याची जिगर बाळगणारे, त्यासाठी अमर्याद कष्ट घेणारे निर्माते दिग्दर्शक डगमगत नाहीत, त्यांच्यामुळेच हिंदी चित्रसृष्टीचा चेहरामोहरा बदलत आहे.
शुभेच्छा तुम्हाला, अशा प्रयत्नाची आपल्या लेखनातून दखल घेण्यासाठी.लेख आवडला.

बघितला. आवडला. Happy

>> चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल. >> संपुर्ण अनुमोदन

जॉन ने खरंच अतिशय कन्विन्सिंग रॉ एजंट उभा केला आहे. . दिग्दर्शन , पटकथेवर मेहनत
घेतल्याचे जाणवते. फोटोग्राफी छान आहे.
उगीच गाणी घुसडलेली नाहीत . विषय संवेदनशीलतीने मांडला आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा दिसत नाही.
नर्गिस फक्री ने ही तिचा रोल ठिक केला आहे.(तिचा रोल युद्ध पत्रकार अनिता प्रताप यांच्यावरुन घेतला आहे
असे वाचले होते.) जॉन च्या पत्नी चा रोल छोटाच असला तरी लक्षात राहतो.
बाली ची भुमिका ज्या अभिनेत्याने केली आहे त्यानेही छान केली आहे.
राजीव गांधीं व प्रभाकरन चा रोल करणारे अभिनेते ही अचूक आहेत.
'तो' केमिकल ईंजिनीअर जेंव्हा माहिती सांगतो तेंव्हा एवढ्या गंभीर प्रसंगात ही थेटरात सगळे हसत होते . तेवढीच कॉमेडीची बारिकशी किनार आहे.
'मद्रास कॅफे ' नावामागचा अर्थ ही लक्षात येतो . इथेच हा सगळा कॉन्स्पीरसी प्लॉट हॅच झाला
हे सतत जाणवत राहते .
अतिशय वेगळा विषय असला तरी कुठेही डॉक्युमेंटरी सारखा वाटत नाही . वेगवान आहे.
मी त्या सर्व घटना घडणा-या वर्षी (१९९१) कॉलेजात होते .काही काही सिन्स खरंच भिडले आणि भूतकाळात घेऊन गेले. नवीन पिढीला ते कितपत भिडेल माहित नाही.
अवांतर - अँबॅसिडर गाड्या , आशिकी (राहुल रॉय वाल्या ) चे पोस्टर २ वेळा दिसल्यावर मला एकदम नॉस्तॉल्जीक व्हायला झाले. Happy

'फोर्स ' नंतर अभिनेता म्हणून जॉन चा आवडलेला दुसरा चित्रपट .
निर्माता म्हणून जॉन चे दोन्ही चित्रपट - विकी डोनर व मद्रास कॅफे चांगले आहेत .

ज्यांना वेगळे विषय / पॉलिटिकल थ्रिलर बघायला आवडतात त्यांनी एकदा बघावाच.
जॉन च्या चाहत्यांनी चुकवू नये असा . एकदम किलर दिसला आहे . Wink

अप्रतिम चित्रपट आहे.
पटकथा उत्तम.
सगळ्यात भारी प्रॉडक्शन डिझाइन.
अभिनयही सर्वांचा भारी.
जरूर बघा.

आज जाणार........................!!

पहिल्याच दिवशी बघितला.
सहज म्हणून बघायला गेले. माहीतच नव्हते की कशाबद्दल आहे. त्या काळाशी रिलेट करू शकत असल्यामुळे एकदम भिडला.
अप्रतिम चित्रपट आहे.
जरूर बघा.

नितांत सुंदर चित्रपट !
गल्लाभरू चित्रपटांच्या रांगेत एकदम वेगळा चित्रपट
जॉन अब्राहम चा एक निर्माता म्हणून कौतुक करावा तेवढा थोडा आहे ..
दुर्दैवाने याचा गल्ला कमी होतो ..आणि पांचट पॉर्न कॉमेडीचा जास्त ! त्यामुळे असे चित्रपट कमी बनतात

अवांतर - अँबॅसिडर गाड्या , आशिकी (राहुल रॉय वाल्या ) चे पोस्टर २ वेळा दिसल्यावर मला एकदम नॉस्तॉल्जीक व्हायला झाले.>>>>>

बाकिच्यांच माहित नाही , पण आणखी एक गोष्ट जी मला नॉस्तॉल्जीक करून गेली ती म्हणजे.. सिद्धार्थ बसु. त्यावेळेचे सगळे 'quiz shows' आठवले.

जॉन च्या चाहत्यांनी चुकवू नये असा . एकदम किलर दिसला आहे >>> + १०००००००००

शेवटी शेवटी जेन्वा तो formal shirts घालतो .... परदेसे नजर नही हटती Happy

परीक्षण उत्तम... चित्रपट त्याहुन उत्तम...
१) आपल्या आजुबाजुला असणारे जबरदस्त नायक आणी खलनायक
२) उत्तम चित्रण
३) उगाच नायक नायिकेच्या आठवणीत डुबुन... ऐन युध्द भुमीवर गाणे म्हणत फिरत नाही... हे महत्वाचे... +१
४) गल्लाभरू चित्रपटांच्या रांगेत एकदम वेगळा चित्रपट +१

छान ओळख करून दिली आहे सिनेम्याची. Happy
शेवटचा परिच्छेद अत्यंत नेमका. पाकिस्तानविरोधी, इतर धर्मियांविरोधी मन मानेल तशा पोस्ट्स सोशल मेडियावर टाकणार्‍या मानसिकतेवर नेमकं भाष्य करणारा. चित्रपट फक्त 'संदेशा'पुरता असावा, चित्रपट ही फक्त करमणुक असं समजणार्‍यांवरही. 'हर किसीके पास अपना सच होता है.. उसको समझना- तुम कहां खडे हो, इसके उपर निर्भर करता है..' असे काही संवादही नक्षलवाद्यांवर एकाच बाजूने विचार करणार्‍यांना पुन्हा विचार करायला भाग पाडतील असे.

ही नुसतीच एका सिक्रेट एजंटची स्टोरी किंवा एका देशाच्या प्रमुखाला निर्घृणरीत्या मारण्याची गोष्ट नाही. 'अस्मिते'चे खरे-खोटे दंभ, मानसिकतेचा फायदा घेणार्‍या वृत्तींच्या प्रचंड विध्वंस घडवून आणण्याची क्षमता, सैनिकी कारवायांना पडणार्‍या सीमा, प्रादेशिक हितसंबंधांतली दाहकता, राष्ट्रीय स्तरावरची हतबलता आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातलं क्रौर्य अशा अनेक विषयांना अतिशय थोड्या वेळात पण परिणामकारकरीत्या स्पर्शून जाणारा सुंदर सिनेमा. सर्वांनी नक्की बघावा, असा. जॉन हॅज डन अ फॅब्युलस जॉब!

खूप सुंदर प्रतिसाद. जास्तीत जास्त लोकाणी हा चित्रपट पाहावा हीच विनंती. पैसे वसूल मनोरंजन अधिक आपल्या देशातल्या एका इतिहासा ला वळण देणार्‍या प्रसंगाची जाणीव

आजच पाहिला अप्रतिम चिञपट हाँलिवुड च्या तोडीचा.अप्रतिम कँमेरा व्रक,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परफेक्ट कासटिँग.
बालकृष्ण(बाला)या भूमिकेतला कलाकार जो रहेमान सारखा दिसतो त्याचा जबरदस्त अभिनय पण मुख्य नायक या चित्रपटाची कथा आहे. जरुर पहाच

बावरा मन
छान परिक्षण! भारताचे विएतनाम ही उपमा फार आवडली :)! तुमचे मधेही एक दोन सुंदर लेख वाचले होते. भाग मिल्खा भाग पाहिला तेव्हा ह्या चित्रपटाचे प्रोमो पाहिले होते. तेव्हापासून बघायची उत्सुकता आहे. नक्की बघणार.

वा !!! छा गए गुरु …. शेवटचा परिच्छेद खासच

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडता >>>> टाळ्या , शिट्ट्या , फेटे !!!! ...... वाक्य फारच आवडले आणि पटले मला.

लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड >>> तुम्हाला 'चिमुकल्या देशाना' मध्ये LTTE अभिप्रेत आहे की लंका ?? लंका म्हणायचे असेल तर पटले नाही . भारत लंकेला चिरडण्यासाठी या लढ्यात उतरला नव्हता.

चित्रपट आवडला. छायाचित्रण अशक्य आहे !!!!
वेग भन्नाट असल्यामुळे खिळवून ठेवतो. पण त्यामुळे त्रुटी झाकल्या जातात.
काही गोष्टी खटकल्या.
१) सगळीकडे 'सोर्सेस' कडून माहिती मिळते एवढेच मोघमपणे दाखवले आहे. सोर्सेस कुठून कशी माहिती मिळवतात वगैरे कशाचाही तपशील नाही (उदा . Bangkok मध्ये भेटणारा खबर्या आणि त्याने पैदा केलेली व्हिडीओ कसेट)
२) दरवाजातून आत चालत जावं इतक्या सहजतेने विक्रम चेक-पोस्ट वर परवानगी मिळवून मलयची मुलाखत घ्यायला जातो, आणि तेही तमिळ टायगर्सना मागच्या हल्ल्यात विक्रमचा चेहरा माहिती असताना. प्रत्यक्षात अशा मुलाखतकारांना खूप आधीपासून सेटिंग लावावे लागते आणि त्यांची यच्चयवत माहिती काढून मगच असे खतरनाक लोक मुलाखत देतात'
३) सिनेमाच्या प्रारंभी विक्रम दाढी वाढवून फिरत आहे त्यामुळे 'आपल्या प्रयात्नानंतरही समोर PM वाचू शकले नाहीत ' याचा मेंटल शॉक बसलेला वगैरे दाखवल्यासारखा वाटतो पण शेवटी दिसते की प्रत्यक्ष हत्येनंतर त्याने वरिष्ठांना व्यवस्थित रिपोर्ट वगैरे सादर केलेला असतो - मनस्थिती काबूत ठेऊन. मग तो असा भ्रमिष्ट का दाखवलाय ? दिग्दर्शक/लेखक गंडल्यासारखे वाटले इथे

असो. टीका करण्याचा हेतू नाही. उलट अशा वादग्रस्त आणि दुर्लक्षित विषयाला समर्थपणे पडद्यावर आणल्या बद्दल जॉन आणि शुजीतचे कौतुकच करायला हवे

मलाही चित्रपट आवडला.

जॉन आणि शुजीतचे कौतुकच करायला हवे. + १

पण खूप त्रुटी आहेत हे ही वाटलेले. एकुणच चित्रपटावर क्लिंट इस्टवुडच्या इन द लाईन ऑफ फायरचा प्रभाव आहे असा मला वाटले. (पिक्चर एकदाच बघताना. - एजंटला मोठ्या पोस्टवरील माणसाला वाचवायचे असते हा एक भाग आणि नंतर तो वाचवू शकला नाही त्यानंतरचे द्वंद्व)

वर दामलेंनी लिहिलेल्या सर्वच बाबी मलाही खट्कल्या. त्या काढल्या असत्या तर चित्रपट अजून चांगला झाला असता. फ्लॅशबॅक घेणे अपरिहार्य होते पण श्रीलंकन प्रेसिडंट मेल्यावर तो जे म्हणतो, की लास्ट दुवाही संपला, त्याचा आणि एकुण विषयाचा काहीच संबंध दिसला नाही. (म्हणजे पुढे खुलासाच नाही) मग ते वाक्य का? हे ही अधांतरीच राहते.

बाकी "तुम कहां खडे हो, इसके उपर निर्भर करता है." हे वाक्य फिल्मी आहे. पूर्वी अनेकदा ऐकले आहे पण विचार करू जाता त्याच न्यायाने मग तालिबान पण राईटच आहे आणि बिन लादेन भाऊजींचे कार्य पण बरोबरच आहे असे पण एका अर्थाने होऊ शकते. त्यामुळे मी त्याला लाईटली घेतले. Happy

मला आवडले ते म्हणजे कितीही सोसावे लागले तर हिरो हा कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतो. उगाच संतापाच्या भरात दणादणा गोळ्या मारत सुटलाय किंवा एकट्यानेच जाऊन काहीतरी भन्नाट कामगिरी केलीये असला फाजील प्रकार अजिबात नाही.
मुळात हा तसा बर्यापैकी संवेदनशील विषय कमालीच्या संयतपणे हाताळण्यात आला आहे त्याबद्दल शुजित सरकारचे करावे तितके कौतुक थोडे आहे...जॉन आणि नर्गिसचे प्रेमळ संवाद टाळल्याबद्दल, तसेच मेलोड्रामा ला कात्री लावल्याबद्दलही अभिनंदन

असेच वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट यावेत हीच इच्छा

>>>हा धागा वाचून ३-४ लोकाणी जरी हा चित्रपट पाहिला तरी धागा सफल झाला म्हणायचा : )

मी तुमचा धागा वाचून चित्रपट पाहिला आणि मला आवडला. धन्यवाद!

चित्रपट बराच वेळ डोक्यात घर करून राहतो.

Pages