मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

Submitted by बावरा मन on 25 August, 2013 - 01:43

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्‍या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला.

या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि.

आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले.

कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्‍याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे.

तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत.

चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्‍याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्‍या कॅमरा मन ला सलाम.

पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.

चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युद्ध हे केंव्हाही वाईटच असते . LTTE ला त्यावेळेस च्या भारत सरकार ने स्वतः प्रशिक्षण दिले होते. राजीव गांधी हल्ल्यातील लोक RAW ने स्वतः भारतात प्रशिक्षण दिलेल्या सुरवातीच्या काही अतिरेक्यांपैकी होते. LTTE चे तमिळनाडू शी असलेले संबंध सगळ्यांना माहिती आहे पण पाकिस्तान शी युद्ध हे तसे नाही. त्याची कारणे संपूर्णपणे वेगळी आहेत. फेसबुकी लोकांना वाटते तितके ते सोपे नाही पण आपण काहीतरी साम दाम दंड भेद वापरले पाहिजे. सध्या परराष्ट्र धोरण निषेध करून संपते.

मलाही खूप आवडला - सुन्न करून गेला हा चित्रपट. राजकारणाबद्दल आणि एकूणच गांधी घराण्याबद्द्दल खूप कुत्सित बोलले जाते. पण राजीव गांधीनी घेतलेल्या त्या वेळच्या भूमिका आणि त्या निभावताना येणारी आव्हाने हे कुठल्याही देशाच्या सर्वोच्च नेत्यासमोर असतात. त्यातूनही या सिनेमात आंतराष्ट्रीय घटक आणि त्यांचे हितसंबंध यावर खूप चांगला प्रकाश टाकला आहे.

जॉन अब्राहम पहिल्यांदा आवडला.

अगदी गतिमान अशी स्क्रिप्ट - बघताना कुठेही मागे पुढे झाल्याचे, रटाळ झाल्याचे वाटत नाही.

परीक्षण ही खूप छान लिहिले आहे. श्रीलंकेतील भारताची कामगिरी असफल झाली असेल पण भारताचे उद्देश आणि भूमिका बरोबर होती - त्यार्थाने विएतनाम म्हणता नाही येणार.

बऱ्याच वर्षांनी या निमित्ताने सिद्धार्थ बसू दिसला Happy

Pages