मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

Submitted by दिनेश. on 15 August, 2013 - 05:30

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार - हे एका पुस्तकाचे नाव आहे Happy
संपादक - अभ्यासक अ. द. मराठे, ग्रंथाली प्रकाशन.
हे पुस्तक विदुषी दुर्गा भागवत यांना अर्पण केले आहे आणि हे संपादनही त्यांच्याच मार्गदर्शनाने झाले आहे.
त्यामूळे हे लेखन पुरेश्या गांभीर्याने झाले आहे.
संपादकांच्या सांगण्यानुसार त्यांना दुर्गाबाईंनी असा सल्ला दिला होता कि त्यांना अश्या म्हणी, जास्त करुन स्त्रियांकडूनच मिळतील. त्यांना तश्या त्या मिळाल्या पण त्या स्त्रियांनी त्यांचा नामोल्लेख करु नये, असे त्यांना
सांगितले होते.

या म्हणी एकेकाळी सहज वापरात होत्या, त्या अर्थी त्या काळात तरी त्या असभ्य मानल्या जात नव्हत्या.
नंतर कधीतरी ( मला नेमका संदर्भ सांगता येणार नाही पण मी वाचल्याप्रमाणे आचार्य अत्रे यांनी ही भाषाशुद्धीची चळवळ सुरु केली. ते पाठ्यपुस्तक मंडळावर होते, तेव्हापासून याची सुरवात झाली. ) त्या असभ्य
मानल्या गेल्या.

त्या काळात संतसाहित्याची पण "शुद्धी" झाली त्यामूळे भले तरी देऊ, कासेची लंगोटी.. अश्यासारखी रचना
प्रचारात आली. संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या रचना सामान्य लोकांसाठीच असल्याने, त्यांच्या
रचनांत, त्या काळात वापरात असलेले वाक्प्रचार सहज आले असतील. पण सध्या मात्र आपल्याला ते
वापरायला संकोच वाटतो, कधी कधी तर आपण संदर्भ माहित नसतानाच, अर्धवट ओळी वापरतो.
( उदा. गाढवही गेले, ब्रम्हचर्यही गेले )

संदर्भ किंवा नेमका अर्थ माहीत नसल्यानेदेखील आपण काही शब्दप्रयोग करतो. उदा कुतरओढ होणे, बोकांडी
बसणे, धसास लावणे या शब्दप्रयोगांना अनुक्रमे कुत्रा, मांजर आणि चतुष्पाद प्राणी यांचे आपल्याला असभ्य
वाटतील असे संदर्भ आहेत.

या पुस्तकातील विवेचन मुळातच वाचण्यासारखे आहे. कधी कधी त्या त्या राज्यातील संस्कृती आणि
चालीरितींचाही संदर्भ येतो. उदा. गुजराथमधे प्रत्येक स्त्री "बेन" का असते आणि "भाभी" का नसते, याला
थेट रामायणाचा संदर्भ आहे.

पण या म्हणी आणि वाक्प्रचारांमागची विचारशक्ती आणि निरिक्षण मात्र दाद देण्याजोगे आहे. हे शब्द
आपण सध्या जरी वापरत नसलो तरी, त्यांचा अर्थ कळायला त्रास होत नाही.

कधी कधी पर्यायी म्हणी निर्माण झाल्याने ( किंवा मूळ म्हण असभ्य झाल्याने ) मूळ म्हणीचा विसरच पडला
आहे. नाचता येईना अंगण वाकडे, नेसता येईना धोतर तोकडे........

काही काही शब्द विस्मृतीत गेल्याने आता वाचताना ते असभ्य वाटणार नाहीत. असा एक शब्द म्हणजे "शिंदळ" ( अर्थ = वेश्या ) आणि तशी एक म्हण म्हणजे, शिंदळाची आई आणि पोराची नाही ( विश्वास
ठेवण्याजोगे नाहीत. )

या म्हणींतून आपले देवही सुटलेले नाहीत. पण आता आपल्या धार्मिक भावना अधिक प्रखर झाल्याने
त्या म्हणी आपण वापरत नाही, किंवा अर्धवट वापरतो. ( उदा. गाजलेला गुरव.. )

व्यवसायवाचक शब्द पुढे जातिवाचक झाल्याने त्याही म्हणी आता असभ्य झाल्यात. तरीपण काही म्हणी
अजूनही वापरता येतील. उदा. गुरवाचे आले आणि कुणब्याचे गेले.. कळत नाही. ( गुरवाचे उत्पन्न आणि शेतकर्‍याचे नुकसान, यांचा अंदाज करता येत नाही. )

या पुस्तकातील सर्वच म्हणी असभ्य आहेत असे नाही. काही काही शब्दांचा तर मला नव्याने अर्थ कळला.
उदा. झक मारणे या म्हणीचा पुढचा भाग म्हणजे झुणका केला, असे मी वाचले होते. यात झक म्हणजे झष ( = मासा ) असा संदर्भही वाचला होता. पण या पुस्तकात वेगळा अर्थ दिला आहे. ( मासा हा शब्द पुल्लींगी मग त्या पुढे मारली, हे क्रियापद का ? )

पण एकंदर हे पुस्तक मला वाचनीय वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटील साहेब,

मला असे म्हणायचे की, निव्वळ शब्दांच्या अर्थाच्या आधाराने परिणामकारकता येत नाही. तर परिणामकारकता उच्चारनादावर अवलंबून असते.

उदा.

"झक मारली आन् झुणका खाल्ला"

ही म्हण असभ्य आहे समजून जर आपण त्याला पर्याय म्हणून

"मासा मारला आणि चवळीची भाजीसोबत जेवन केले"

असा काहीसा सभ्य पर्याय दिला तर मूळ म्हणीची परिणामकारकताच संपुष्टात येते, असे मला वाटते. Happy

भारती / अशोक तूम्ही वाचाच हे पुस्तक.
आणि नातेसंबंधांचा पण फारच प्रभाव पडलाय या म्हणींवर. जावा / नणंदा / भाचे या नात्यातला मोकळेपणा किंवा ताण हे आहेतच पण मुसलमानात चुलत भावंडात विवाह समाजमान्य आहेत, त्याचे पडसाद उमटलेले आहेत.

आणि मुटे म्हणताहेत ते खरेच आहे.
अगदी बैल गेला आणि झोपा केला, याची मूळ म्हण पण आता असभ्य वाटेल.
पण ग्रामीण भागात या म्हणी वापरताना त्यांच्या मनात हा अर्थ येण्यापेक्षा, जिभेला पडलेल्या वळणाचा भाग जास्त असेल. आपण मात्र बोलताना शब्द मोजून मापून, वापरतो.

Pages