पीएचडी पुराण भाग २:- पीएचडीचा शोध

Submitted by विजय देशमुख on 19 August, 2013 - 22:19

पीएचडी पुराण भाग १: - पीएचडी म्हणजे काय?

पीएचडी आणि लग्न दोन्ही गोष्टींमध्ये एक चमत्कारिक साम्य आहे. लग्नापुर्वी आणि पीएचडीनंतर प्रत्येक मनुष्य सुखी होतो/ असतो. तसच लग्नासाठी योग्य वर/वधु शोधणे जितके अवघड तितकच पीएचडीसाठी योग्य मार्गदर्शक (गाईड) शोधणे. लग्नापुर्वी जसे एकमेकांतले गुणच दिसतात, दोष नाही, तसच पीएचडी सुरु करण्यापुर्वी प्रत्येक मार्गदर्शक चांगलाच वाटत असतो. पुढे, त्याचा मास्तर (मास्टर या अर्थे) कधी होतो हे आपल्याला कळतच नाही. पीएचडी मार्गदर्शक होण्यासाठी कोणताही कोर्स नसतो. स्वतः पीएचडी झालं आणि ३ वर्षांचा संशोधनाचा अनुभव असेल (आणी किमान ३ आंतरराष्ट्रिय स्तरावरिल शोधनिबंध), तर कोणीही मार्गदर्शक बनण्यासाठी पात्र असतो. त्यामुळे बरेचदा चांगला मर्गदर्शक मिळणे, हा नशिबाचा भाग असतो. एखाद्या प्राध्यापकाच्या हाताखाली पुर्वी कोणी काम केले असेल, तरच त्या प्राध्यापकाबद्दल नेमकी माहीती मिळु शकते.
कधीकधी मला वाटते की मार्गदर्शक (आणि कॉलेजमधील डिन, डायरेक्टर, इ. अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसंबंधी जागांसाठी) एक ऑनलाईन कोर्स उत्तीर्ण करणे आवश्यक करावे. नाहीच काही तर थोडातरी बाकी लोकांचा त्रास कमी होईल.
आमचे इंदौर विद्यापीठाचे प्रा. माहेश्वरी नेहमी म्हणायचे, " गाईड ऐसा हो, जो खुद भी कुछ करे और बच्चेसे भी कुछ करवाये". ते नेहमी स्वतःच्या विद्यार्थ्यांना "मेरे बच्चे..." असच म्हणायचे.
सगळ्यात मोठा प्रश्न असतो, की नेमकं चांगला मार्गदर्शक कसा ओळखावा. कित्येक विद्यार्थी त्या संशोधकाचे जुने पेपर्स बघतात. चांगल्या जर्नलमध्ये असलेले पेपर्स बघुन काही लोकं इमेल्स करतात आणि पीएचडीसाठी जागा उपलब्ध आहे का, ते विचारतात. परंतू, प्रत्येक चांगला संशोधक चांगला मार्गदर्शक होवु शकेलच असही नसतं. त्यात बरेचदा हुशार संशोधक स्वतःच्या संशोधनात व्यस्त असतात, तर बरेचसे research funding साठी प्रपोजल लिहिण्यात.
आपल्याकडे मास्टर्सला संशोधन हे फारफार तर प्रोजेक्टपुरतं मर्यादीत असतं त्यामुळे संशोधन क्षेत्रातील संज्ञा कळल्या नाहीतर मजेदार प्रसंगही येतात.
माझ्या एका मित्राने आयआयटी गुवाहाटीच्या एका प्राध्यापकाला ईमेल केला होता. त्यांच्यात झालेली मेलामेली अशी,

मित्र :- Dear Madam,
I am .... I wish to join for PhD under your guidance......

प्राध्यापकः - Dear ........., Happy to see your interest. Are you interested in modelling?

मित्र परेशान. त्याला वाटलं कि चुकुन त्याने कोणा अ‍ॅड एजेन्सीला ईमेल केला की काय. तसाही तो बरेचदा मॉडेलिंगसाठी प्रयत्न करत होता, आणि दिसायला मॉडेलसारखाच.

मित्र :- Dear Madam,
Which kind of modelling do you expect? ....

प्राध्यापक :- I donot have fund to buy experimental instrument untill next year, so if you are interested in mathematical modelling for optical fiber waveguide structure, then I can accpt your candidature.

and BTW, I am a man !

शेवटचं वाक्य वाचल्यावर मित्र ताडकन उडाला. बंगाली नावं स्त्री-सदृष्य वाटतात, त्याचा चांगलाच अनुभव आला होता.
त्या अनुभवातुन एक शिकलो, की कधीही Dear Sir/Madam लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही. नुस्ताच ईमेल माहीती असेल तर (आणि फोटो बघितला असेल तरीही) Dear Professor ABC अशिच सुरुवात करायची.
भारतात आणि परदेशात पीएचडी शोध सुरु करण्याच्या वेगवेगळ्या पद्दती आहेत. भारतात (आता) पुर्वपरिक्षा उत्तीर्ण करावीच लागते. नेट किंवा तत्सम परिक्षा JRF (Junior Reserach Fellowship) सहित उत्तीर्ण असाल, तर शिष्यवृत्ती मिळते. अन्यथा खिशातुन सगळं काही,. अगदी बरेचदा स्वतःच केमिकल्स, लॅपटॉप, वगैरे विकत घेणे, अश्याही भानगडी असतात.
परदेशात बेसिक फॅसिलिटिजसाठी प्राध्यापक मदत करतात. तसही research fund नसेल तर प्राध्यापक सहसा पीएचडीसाठी विद्यार्थी घेत नाही. पण काही लोकं जरा अतिहुशारही असु शकतात. पुढच्या वर्षी funding मिळेल या भरवश्यावर माझ्याच एका मित्राला इथे कोरियात पीएचडीसाठी बोलावले. अ‍ॅडमिशन झाली, तो स्वतःची नोकरी सोडुन बायकापोरांसहीत इथे आला. २-३ महिने मजेत गेले, अन एक दिवस प्राध्यापकाने सांगीतले, की जो fund मिळणार होता, तो त्याला मिळू शकत नाही, कारण त्याचं प्रपोजल रिजेक्ट झालय. दुसर्‍या एका प्रोजेक्टमधुन त्याला पुढचे २-३ महिने पैसे मिळतील. तो मित्र तर हादरलाच. एक तर भारतातील नोकरी सोडुन आलेला. सोबत बायको एक मुलगी. पण इतर भारतीय लोकांनी मदत केली. दुसर्‍या एका प्राध्यापकाकडे त्याला रिसर्च-स्टुडंटशीप मिळवुन दिली. पुढे रितसर अ‍ॅडमिशनही झाली. पण एका प्राध्यापकाकडुन दुसरीकडे जाणे, अतिशय कठीण काम, विशेषतः कोरियात. कारण आधीच ही मंडळी आपल्यावर (विशेषतः भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी, मलेशिअन, ई.) फारसा विश्वास ठेवत नाही. असो.
परदेशातील बहुतांश विद्यापीठात TOEIC/ TOEFL/ IELTS किंवा तत्सम परिक्षा किमान काही ठरवलेल्या गुणांनी पास होणे गरजेचे असते. अमेरिकेत (आणि इतर काही देशातही) यासोबतच GRE (Graduate Record Exam) - subject म्हणजे तुम्हाला ज्या विषयात पीएचडी करायची आहे, त्या विषयातील परिक्षा पास होणे गरजेचे असते. मिळालेल्या गुणांवरुन तुम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करता येतो. GRE-subject हा तुम्ही पुर्वी मास्टर्सला अभ्यासलेला असावाच असे नाही. {चुभुद्याघ्या}. त्यामुळे तुम्हाला हव्या त्या विषयात पीएचडी करणे शक्य होते. पीएचडीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया अंदाजे ४-८ महिने आधी सुरु होते, त्यामुळे तश्याप्रकारे विचार करुनच सुरुवात करावी.
तत्पुर्वी तुम्हाला कोणत्या प्राध्यापकाच्या हाताखाली पीएचडी (किंवा मास्टर्स/ इंटीग्रेटेड - मास्टर्स्+पीएचडी) करायची आहे, त्या प्राध्यापकाची संमती असणे गरजेचे असते. त्यामुळे सुरुवातीला वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन प्राध्यापकांचे इमेल्स मिळवुन त्यांना स्वतःच्या सीव्हीसहीत तुम्हाला त्या प्राध्यापकाच्या कोणत्या संशोधनक्षेत्रात रस आहे, ते लिहुन इमेल करणे आवश्यक. अर्थातच त्या प्राध्यापकाला विद्यार्थ्याची गरज असेल, तर उत्तर येइल, अन्यथा... नाही. त्यामुळे एकाचा भरवश्यावर मुळिच राहु नये. बरेचदा अनेक पीएचडीच्या जागांची जाहिरात निघत नाही. फेसबुकवरिल काही ग्रुप्सवर अश्या जागा, ज्या प्राध्यापकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगीतल्या आहेत, त्या मिळू शकतात. काही विद्यापीठे रितसर जाहिरात देतात. त्यातल्या बर्‍याचश्या जाहीराती खालील लिंक्सवर बघता येतील.
http://www.findaphd.com/
http://www.phdportal.eu/
http://academicpositions.eu/
http://ec.europa.eu/euraxess/index.cfm/jobs/index
अश्या बर्‍याच वेबसाईट्स बघता येतील. विशेषत: युरोपातील संधी.
कोरिया, जपान, चीन या देशांत परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्थानिक भाषेत जाहीराती असतात. (कोणासाठी देव जाणे?). त्यामुळे इमेल बेस्ट.
इमेल करण्यास सुरुवात केल्यावर, उत्तर न येणे किंवा no position available, वगैरे प्रकारचे रिजेक्शन इमेल येतील हेच ग्रूहित धरुन चाललं तर निराशा येणार नाही. किमान १०० इमेल्सला १० उत्तरं आणि त्यातला एखादा "हो" म्हणणारा, असं गणित मनात बाळगावं. रितसर जाहीरात असलेल्या विद्यापीठांकडुन उत्तर येतं हा माझा अनुभव आहे. असो.
नुकतच कोरियातील सर्व विद्यापीठांत सर्व कागदपत्रे apostile असणे गरजेचे केले आहे. २ वर्षांपूर्वी KAIST या नामांकित कोरियन विद्यापीठात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेउन ४ भारतीय (व इतरही) विद्यार्थ्यांना पीएचडीच्या ३र्‍या वर्षी काढुन टाकले. त्या विद्यार्थ्यांच्या मते ती खोटी कागदपत्रे कोण्या एजंटने त्यांच्या नकळत अर्जासोबत दिली होती. खरं खोटं देव जाणे, पण त्यावरुन एक लक्षात घेतलं पाहिजे, की सगळे कागदपत्रं स्वतः कुरिअर/ पोस्टाने पाठवावे. आता तर apostile शिवाय प्रवेश नाही, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपुर्वी apostile चं काम (ज्याला १ महिनाही लागु शकतो) करणे आवश्यक. पासपोर्ट असणे गरजेचे, हेही सांगणे नलगे.
अशी ही पुर्वतयारी झाली, अ‍ॅडमिशन झाली की व्हिसाचे काम शक्य तितक्या लौकर उरकुन घ्यावे. एजंटच्या भानगडीत न पडलेलं बरं कारण student visa ला कोणतीही अडचण येत नाही. उगाच १०-२०,००० त लुबाडुन घ्यायचे असेल, तर हरकत नाही.
यानंतर त्या देशातील भारतीय ग्रुप (फेसबुक) वरुन नेमकं काय सामान न्यावं (आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे काय नेऊ नये) हे विचारावं. शक्यतो थंडीचे कपडे त्या-त्या देशात घ्यावे. {बाकी लोकं अनुभव सांगतीलच}.
प्रवासाच्या दिवशी देवाचे नाव घेउन निघावे. Happy
दुसरा अध्याय इथे पुर्ण करतो. Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> खोटी कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेउन ४ भारतीय (व इतरही) विद्यार्थ्यांना पीएचडीच्या ३र्‍या वर्षी काढुन टाकले

असल्या आपल्या रेप्युटेशनमुळे सरळमार्गी लोकांची पंचाईत झाली आहे. नुकतंच मी ऐकलं की अमेरिकन विद्यापिठं भारतीय विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्ट ओरिजिनल असून देखील स्वीकारत नाहीत. त्या मार्कलिस्ट मधले मार्क्स विद्यापिठाच्या लेटरहेडवर परत टाईप करून सही शिक्क्यासकट द्याव्या लागतात.

दिनेश, मराठीत आचार्य (पदवी) असे म्हटले जाते. पण आचार्यचा शिक्षक, या अर्थाने बराच वापर होतो. जसं हिंदित प्रधानाचार्य म्हणजे मुख्याध्यापक.
तसच पीएचडी धारकांना डॉक्टर म्हणावं का? आणि एम.बी.बी.एस. किंवा तत्सम अर्हता धारकांना केवळ बॅचलर डिग्री असुनही डॉक्टर का म्हणावं हा ही गोंधळ काही महिन्यांपुर्वी एका फोरममध्ये वाचला होता.
माझे प्राध्यापक स्वतःची सही (इमेलच्या शेवटी) किम क्युन्ग होन, पीएचडी अशी करतात. मला तेच बरोबर वाटते, पण नावाआधी डॉ. लावण्याचे प्रयोजन म्हणजे मेडिकल डॉक्टर असं असावं.
चुभुद्याघ्या.

चिमण, अगदी बरोबर. मागे नागपुरच्या कोहचाडे बोगस डीग्री प्रकरणामुळे नागपुरहुन डीग्री घेतलेल्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला, अगदी सरळमार्गी डीग्री असली तरी.

मॅक्स धन्यवाद. माझी काहीतरी समजण्यात चुक झाली असेल.
पण मग, आचार्य नावाची (शैक्षणीक) पदवी नाहीच की काय?

पीएच्डी डॉ म्हणजे मराठी मध्ये विद्यावाचस्पती >> +१

Ph. D. = Doctor of Philosophy = philosophiae doctor. हा लॅटीन मधुन आलेला शब्द आहे.

फ्रांसमधे डॉक्टर ही पदवी फक्त Ph. D. झालेल्या लोकांसाठीच वापरली जाते. मेडिकल practitioners ना मेदसां (medicin) म्हणतात.