मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

Submitted by दिनेश. on 15 August, 2013 - 05:30

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार - हे एका पुस्तकाचे नाव आहे Happy
संपादक - अभ्यासक अ. द. मराठे, ग्रंथाली प्रकाशन.
हे पुस्तक विदुषी दुर्गा भागवत यांना अर्पण केले आहे आणि हे संपादनही त्यांच्याच मार्गदर्शनाने झाले आहे.
त्यामूळे हे लेखन पुरेश्या गांभीर्याने झाले आहे.
संपादकांच्या सांगण्यानुसार त्यांना दुर्गाबाईंनी असा सल्ला दिला होता कि त्यांना अश्या म्हणी, जास्त करुन स्त्रियांकडूनच मिळतील. त्यांना तश्या त्या मिळाल्या पण त्या स्त्रियांनी त्यांचा नामोल्लेख करु नये, असे त्यांना
सांगितले होते.

या म्हणी एकेकाळी सहज वापरात होत्या, त्या अर्थी त्या काळात तरी त्या असभ्य मानल्या जात नव्हत्या.
नंतर कधीतरी ( मला नेमका संदर्भ सांगता येणार नाही पण मी वाचल्याप्रमाणे आचार्य अत्रे यांनी ही भाषाशुद्धीची चळवळ सुरु केली. ते पाठ्यपुस्तक मंडळावर होते, तेव्हापासून याची सुरवात झाली. ) त्या असभ्य
मानल्या गेल्या.

त्या काळात संतसाहित्याची पण "शुद्धी" झाली त्यामूळे भले तरी देऊ, कासेची लंगोटी.. अश्यासारखी रचना
प्रचारात आली. संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या रचना सामान्य लोकांसाठीच असल्याने, त्यांच्या
रचनांत, त्या काळात वापरात असलेले वाक्प्रचार सहज आले असतील. पण सध्या मात्र आपल्याला ते
वापरायला संकोच वाटतो, कधी कधी तर आपण संदर्भ माहित नसतानाच, अर्धवट ओळी वापरतो.
( उदा. गाढवही गेले, ब्रम्हचर्यही गेले )

संदर्भ किंवा नेमका अर्थ माहीत नसल्यानेदेखील आपण काही शब्दप्रयोग करतो. उदा कुतरओढ होणे, बोकांडी
बसणे, धसास लावणे या शब्दप्रयोगांना अनुक्रमे कुत्रा, मांजर आणि चतुष्पाद प्राणी यांचे आपल्याला असभ्य
वाटतील असे संदर्भ आहेत.

या पुस्तकातील विवेचन मुळातच वाचण्यासारखे आहे. कधी कधी त्या त्या राज्यातील संस्कृती आणि
चालीरितींचाही संदर्भ येतो. उदा. गुजराथमधे प्रत्येक स्त्री "बेन" का असते आणि "भाभी" का नसते, याला
थेट रामायणाचा संदर्भ आहे.

पण या म्हणी आणि वाक्प्रचारांमागची विचारशक्ती आणि निरिक्षण मात्र दाद देण्याजोगे आहे. हे शब्द
आपण सध्या जरी वापरत नसलो तरी, त्यांचा अर्थ कळायला त्रास होत नाही.

कधी कधी पर्यायी म्हणी निर्माण झाल्याने ( किंवा मूळ म्हण असभ्य झाल्याने ) मूळ म्हणीचा विसरच पडला
आहे. नाचता येईना अंगण वाकडे, नेसता येईना धोतर तोकडे........

काही काही शब्द विस्मृतीत गेल्याने आता वाचताना ते असभ्य वाटणार नाहीत. असा एक शब्द म्हणजे "शिंदळ" ( अर्थ = वेश्या ) आणि तशी एक म्हण म्हणजे, शिंदळाची आई आणि पोराची नाही ( विश्वास
ठेवण्याजोगे नाहीत. )

या म्हणींतून आपले देवही सुटलेले नाहीत. पण आता आपल्या धार्मिक भावना अधिक प्रखर झाल्याने
त्या म्हणी आपण वापरत नाही, किंवा अर्धवट वापरतो. ( उदा. गाजलेला गुरव.. )

व्यवसायवाचक शब्द पुढे जातिवाचक झाल्याने त्याही म्हणी आता असभ्य झाल्यात. तरीपण काही म्हणी
अजूनही वापरता येतील. उदा. गुरवाचे आले आणि कुणब्याचे गेले.. कळत नाही. ( गुरवाचे उत्पन्न आणि शेतकर्‍याचे नुकसान, यांचा अंदाज करता येत नाही. )

या पुस्तकातील सर्वच म्हणी असभ्य आहेत असे नाही. काही काही शब्दांचा तर मला नव्याने अर्थ कळला.
उदा. झक मारणे या म्हणीचा पुढचा भाग म्हणजे झुणका केला, असे मी वाचले होते. यात झक म्हणजे झष ( = मासा ) असा संदर्भही वाचला होता. पण या पुस्तकात वेगळा अर्थ दिला आहे. ( मासा हा शब्द पुल्लींगी मग त्या पुढे मारली, हे क्रियापद का ? )

पण एकंदर हे पुस्तक मला वाचनीय वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्राम्य किंवा शिवराळ असली तरी ती बोलीभाषा आहे. ती नष्ट होऊ नये. या दृष्टीने पुस्तक महत्वाचं वाटतंय. ओळख करून दिल्याबद्दल आभार. झुणका, बेसन आणि पिठलं यातलं नेमकं गावरान काय हे कळत नाही इतकी शुद्ध भाषा आताशा अंगवळणी पडलीये आणि ग्राम्य भाषा हद्दपार होऊ लागलीये.. त्याबरोबर कित्येक शब्द विस्मृतीत जाणार आहेत याचं दु:खं आहेच.

( झक मारणे म्हणजे मासे मारणे असाच अर्थ माहीत होता. पण गावाकडं संतापाच्या भरात लोक हा शब्द शिवीसारखा वापरताना दिसतात, त्यामुळं अर्थाबद्दल शंका आहेत).

वाचनाच्या यादीत पुस्तक आहे. वर्तमानपत्रात परीक्षण वाचलं होतं. पुढच्या पुणे भेटीत घेईन म्हणते.

तशीही आपण 'समजतो'/ मानतो तेवढी मध्ययुगीन-पेशवेकालीन मराठी 'सभ्य' किंवा 'सोज्वळ' नव्हतीच. (म्हणजे त्याकाळची सभ्यतेची परिमाणं वेगळी होती, असावीत)

नुकतंच प्रबोधनकार ठाकरेकृत ग्रामण्याचा इतिहास वाचत होतो. त्या काळची भाषा आणि शैली याची माहिती झाली. हल्ली शिवराळ शिवराळ म्हणून ओरडणा-यांनी जरूर वाचावे असं..

मी आचार्य अत्रे यांचा संदर्भ दिला त्याबद्दल कुणाला खात्री आहे का ?
माझेच उदाहरण घ्या. वडील मालवणचे आणि आई कोल्हापूरची असली तरी आमच्याच घरात काय आजोळी आणि काकांच्या घरातही हे शब्द कधी उच्चारले गेले नाहीत. ( हा काळ आता ८० वर्षाचा मानायला हवा. )

किरण.. अशीच एक गुजराथी म्हण आहे && धोईने कढी करी अने वधे तेनी वडी करी. ही पण या पुस्तकात आहे.
यात बर्‍याच कोकणी म्हणी पण आहेत पण त्यामानाने विदर्भातल्या म्हणी नाहीत.

लोकहो,

असभ्य आणि सभ्यतेतली सीमा अगदी पुसट आहे. नेहमीच्या बोलण्यातही सीमोल्लंघन होऊ शकतं. आता हेच पहा ना : 'त्याच्यावर जो भयंकर प्रसंग गुदरला त्यामुळे अगदी गर्भगळित होऊन गेला बिचारा.' हे वाक्य वरपांगी किती सोज्वळ वाटतं नाही! आता गुदरला म्हणजे कुठून कुठे गेला बरे? आणि गर्भ-गळणे म्हणजे काय हो?

सांगायचा मुद्दा काय की अतिपरिचयामुळे असभ्य शब्दही सभ्य भासू लागतात. Lol

आ.न.,
-गा.पै.

गापै यांच्या लोकहो या संबोधनामुळे ते कमरेवर हात ठेवून माईकसमोर भाषण करत आहेत असंच चित्र डोळ्यासमोर येतं..

गा. पै. हा सभ्यतेचा रेटा एवढा जबरदस्त आहे कि वर्तमानपत्रातही अशी भाषा सहसा वापरत नाहीत. लोकसत्तामधे बोलीभाषांवर मालिका येत असे, त्यातही असे शब्द कटाक्षाने टाळले जात.

@दिनेशदा
धागा असभ्य म्हणींविषयी असल्याने प्रसंगावधान दाखवलं असावं Happy

ते कमरेवर हात ठेवून माईकसमोर भाषण करत आहेत
<<
गुदरण्या बद्दल बोलत आहेत. हात नक्की कमरेवर व्हिजुअलाज केलेत का तुम्ही? Wink

लोकसत्तामधे बोलीभाषांवर मालिका येत असे, त्यातही असे शब्द कटाक्षाने टाळले जात.<<<
<<<दर रविवरी असा एक लेख सध्याही लोकसत्ता लोकरंग पुरवणीत येतो त्यात काही शिवराळ शब्दांसंदर्भातही लिहितात पण तेवढ्याने मजा येत नाही .....

'गुदरणे'चा संदर्भ हिंदी 'गुजरना'शी आहे असे वाचलेले आठवते. (व्युत्पतीकोश सध्या हाताशी नाही. त्यामुळे शहानिशा करता येत नाही. केवळ स्मरणावर अवलंबून.) गुजरना म्हणजे (निघून)जाणे, निवर्तणे. नुक्त्यासहित ज ची 'द'शी अदलाबदल कधीकधी होते. बुजुर्ग-बुजरुक-बुद्रुक हे एक उदाहरण. रमदान आणि रमजान हे उलट उदाहरण. ekhaadaa maaNoos gujarato tevhaa kaThiN prasaMga yeto, yaavaroon haa vaakprachaar aalaa asaavaa. चू.भू.दे.घे.

सिंथेटीक जिनिअस,

>> गलथान, याचा अर्थ काय.

मीही याच शब्दाच्या शोधात होतो. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

माझं सोज्वळ वाक्य असं होईल : गलथान कारभारामुळे त्याच्यावर जो भयंकर प्रसंग गुदरला, त्यामुळे तो बिचारा अगदी गर्भगळित होऊन गेला!

आ.न.,
-गा.पै.

दिनेशदा...
मागच्याच आठवड्यात हे पुस्तक पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहात भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात बगघितलंय. सोबत 'बायको' होती, त्यामुळे फक्त वर-वर चाळुन बघितलं हे पुस्तक...
Happy

गलथान या शब्दाचे मूळ 'अजागलस्तन' या संस्कृत शब्दात आहे. अजा म्हणजे शी-गोट्,बकरी. बकरीच्या गळ्याजवळ दोन मांसल गोळे लोंबत असतात ते अगदी गबाळे दिसतात. त्यांचा उपयोग काहीच नाही कारण ती खरी आचळे नव्हेत. अशा निरुपयोगी गबाळ्या माणसास अजागळ म्हणतात. मूळ शब्दातला 'अजा' लोप पावून 'गलथान' शब्द बनला आणि 'स्तन' लोप पावून अजागळ बनला.
गबाळग्रंथी या शब्दाच्या अर्थाचेही अजागळशी काही नाते असावे का?

मासा हा शब्द पुल्लींगी मग त्या पुढे मारली, हे क्रियापद का ?
>>
मासा हा अक्खा वर्ग जरी पुल्लिंगी असला तरी माशाचा प्रकार स्त्रिलिंगी वा पुल्लिंगी वा नपुसकलिंगी असु शकतो.
उदा.
ही सुरमई केवढ्याला दिली?
हा रावस ताजा आहे ना?
ते पापलेट कसे जोडीला?

एक आठवण सांगतो.
मी हे पुस्तक ऑनलाईन बुक करून मागवले होते.

त्याचा फॉलोअप घेतांना मी फोन करत होतो त्यावेळी फोनवर एक लेडी ऑपरेटर येत होती. तिला पुस्तकाचे नाव कसे सांगायचे म्हणून मला केवळ ऑर्डर नंबर द्यावा लागत असे. Happy

त्यानंतर हे पुस्तक दुपारच्या वेळी डिलीव्हरीसाठी आले त्यावेळी मी घरी नव्हतो. घरून बायकोचा फोन आला की तुमचे एक पुस्तक आले आहे पण आपल्याकडे त्याची डिलीव्हरी देण्याच्या आधी कुरीयरवाल्याने ते दुसर्‍याच्या घरी दिले होते. (आता दुपारच्यावेळी त्या परक्या घरातला पुरूषही त्याच्या शाळेच्या कामावर गेलेला होता.)

मला बायकोचे बोलणे बसले ते निराळेच!!

आणखीन त्यावर कडी. मी हे पुस्तक घरी येताच पहिल्यांदा हस्तगत केले. पाहतो तर हे पुस्तक प्लॅस्टीकच्या एन्व्हलपमध्ये होते!! त्यावरचे मुखपृष्ठ/ मलपृष्ठ व त्यावरील मजकूर सगळा दिसत होता!!!

दुसर्‍या दिवशी मग कुरीयरवाल्याला फोन करून चांगली खरडपट्टी काढली.

मराठी ज्ञानकोष वाईच्या मंडळाचे आणि केतकरांचे पाहा .यामध्ये सर्वच आहे .फक्त अकारविल्हे शब्द येत असल्यामुळे एकाठिकाणी ओळीने नाहित इतकेच .

Pages