विषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती - कांदबरी - संधिकाल

Submitted by मोहना on 14 August, 2013 - 08:47

स्वातंत्र्यानंतरच्या भारतातल्या प्रगतीचा, अधोगतीचा, राजकारणाचा, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचा आलेख म्हणजे ’संधिकाल’ ही कादंबरी. मध्यमवर्गीय भिकोबा आरस आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर वाचक त्या त्या काळात त्याच्यांबरोबर वावरायला लागतो, आपल्या मतांना पुन्हा जोखून पाहतो इतकं प्रभावी व्यक्तिरेखाटन आणि काळाचं चित्र ’संधिकाल’ मधून मधु मंगेश कर्णिक घडवितात. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील मराठी मध्यमवर्गियांचा, आपली संस्कृती व मूल्ये जपत जगण्यासाठीचा आणि नव्या विस्मयकारक बदलात टिकून राहण्याचा संघर्ष म्हणजे ’संधिकाल’.

काळानुसार आरस कुटुंबाच्या दोन पिढ्या कशा बदलत जातात किंवा बदलत्या काळानुसार त्यांची जगण्याची तत्त्व कशी बदलतात ते अतिशय परिणामकारक रित्या ’संधिकाल’ पोचवतं. स्वातंत्र्यपूर्वं भारतातील सामाजिक जीवनाचंही दर्शन, भिकोबांकपर्यंत पोचलेल्या त्यांच्या वडिलांच्या मोडी लिपीतील डायर्‍यांमधून होतं.

संधिकालची सुरुवात होते ती भिकोबा ट्राममधून गिरगाव नाक्यावर उतरतात तिथपासून. भिकोबा आरस आणि चाळकर्‍यांच्या दृष्टीने अद्यापही म्हापसेकरांची चाळच असलेली इमारत नुकतीच स्वातंत्र्यानंतर ’प्रभात बिल्डिंग’ झाली आहे. मूळचे कोकण आणि गोव्यातले रहिवासी असणारी ही चाळ मध्यमवर्गीय आणि जातीवाद जोपासणारी. दुसर्‍या महायुद्धानंतरही लोकांनी या चाळीतील घर सोडलं नाही. त्या वेळेस गिरगाव, दादर भागातील पांढरपेशा चाळीतील लोक गावी निघून गेले ते जपान्यांच्या संभाव्य हल्ल्यामुळे. दोन वर्षांनी परत आले तेव्हा त्यांच्या रिकाम्या जागा परक्या माणसांनी ताब्यात घेतल्या होत्या. मुंबईची अतोनात वाढ झालेली होती. बहुतेकांना त्यामुळे मुंबईच्या बाहेर पार बोरिवली गाठावी लागली. भिकोबाही त्या वेळेस ती चाळ सोडून गेले तरी भाडं भरत राहिले ह्याचं त्यांना चाळीच्या दिशेने चालताना आत्ताही समाधान वाटलं.

भिकोबा आरसांना सहा मुलं. त्यातला सदानंद हुशार. तो दहावीला गुणवत्ता यादीत येईल या अपेक्षेत असतानाच सदानंद संघात जायला सुरुवात करतो. हिंदुत्ववादाने भारावून गेलेल्या सदानंदचं अभ्यासातलं लक्ष उडतं ते एस के नावाच्या तरुणाशी त्याची ओळख झाल्यावर. संघात जाणारा एस के हा त्यावेळच्या तरुणत्वाचं प्रतिनिधित्व करणारं मन आहे. एस के ची तळमळ, वक्तृत्व, आणि आपली मतं तावातावाने मांडण्याच्या कौशल्यामुळे प्रभावित होऊन भिकोबा आरसांचा सदानंद संघाकडे ओढला जातो. पण संघाकडे पाठ फिरवण्याचं समर्थन करत लवकरच एस के दुसरीकडे वळतो. एस के च्या प्रभावाने संघाकडे ओढल्या गेलेला सदानंद गोंधळतो, स्वत:ची मतं पक्की न झालेल्या सदानंदच्या मनातला गुंता सुटता सुटत नाही, त्यातूनच तो आत्मविश्वास गमावतो. दहावीची परीक्षाही त्या वर्षी तो देऊ शकत नाही. एका हुशार विद्यार्थ्याची दिशा हरवते.

सदानंदच्या आयुष्याच्या विचका होण्याला आपण जबाबदार आहोत याची कल्पनाही नसलेला एस के कम्युनिस्टच्या कळपात शिरतो. तिथे वाद झाल्यावर एस के लाही स्वत:ला नक्की काय वाटतं आहे हे कळेनासं होतं. संघाचा तिटकारा, कम्युनिस्टांचा वैताग, रॉयिस्टांचा राग... नक्की पुरस्कार तरी कशाचा करायचा? कुठेही जा एक चाकोरी, चौकट सगळं झापडबंद. फाळणीनंतर संघाबद्दल त्याला जो आपलेपणा वाटत होता तो गांधीवधानंतर तेवढाच अप्रिय वाटायला लागला आहे. गांधी एकेकाळी भंपक वाटत तेच आता त्याला देवासारखे वाटायला लागतात. स्वत:ची ओळख तरी पटली आहे का स्वत:ला या प्रश्नात एस के अडकतो.

दोष कोणाचा? एस केचा की स्वातंत्र्याचा? स्वातंत्र्यानंतर सारी आबादीआबाद होईल असं महात्माजी सांगायचे. महात्माजी एक सौदागर होते. त्यांच्या डोकीवरच्या स्वप्नाच्या हार्‍यातली स्वप्न ते विकायचे. चाळीस कोटी नौजवान अहमहमिकिने ती स्वप्न घेण्यासाठी धडपड करायचे. शेवटी राहिलं काय? स्वप्नाच्या सौदागरालाही ठार केलं आणि स्वप्नही पायदळी तुडवली गेली. एस के नावाचंही एक स्वप्न होतं गांधीजीच्या हार्‍यातलं. चाळीस कोटीपैंकी एक. तो खूप शिकणार होता, इंजिनिअर होणार होता. देशाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणार होता आणि त्याचा देश जगातल्या सर्व देशांपेक्षा समर्थ, सुंदर आणि स्वतंत्र असणार होता. देश तर स्वतंत्र झाला. पण या स्वतंत्र देशातील कुणी एक उच्चविद्याविभूषित बेकार एस के शिकवण्या करुन पोट भरतो आहे. तो प्रामाणिक आहे, धडधाकट आहे, सुशिक्षित आहे पण बेकार आहे. स्वातंत्र्यानंतर असे अनेक एस के निर्माण झाले. सदानंदसारखे तरुण दिशाहीन भरकटले.

सुशिक्षित बेकार असलेल्या एस के शी लग्न करण्याचा निर्णय मालती, भिकोबांची मोठी मुलगी घेते तेव्हा सदानंद फक्त हसतो. एस के घरी येतो तेव्हा आवर्जून सदानंदची चौकशी करतो,
"गोमंतक मुक्तीचे वारे वाहताहेत."
सदानंद गप्प राहतो. एस के सदानंदला बोलतं करण्यासाठी पुन्हा तोच विषय काढतो,
"काय बोलायचं? ज्या विषयात स्वत: आपण काही करु शकत नाही, त्याबद्दल नुसता काथ्याकूट करण्यात काय मतलब?"
आपण स्वत: काही करायचं म्हणजे सत्याग्रहात भाग घ्यायचा याची जाणीव एस के ला होते.
एस के तिथेच जाहीर करतो.
"गोव्याच्या सत्याग्रहात मी भाग घेणार."
एस के च्या धरसोड वृत्तीची ओळख असणारा, त्याच्यामुळेच आपलं भवितव्य उद्ध्वस्त झालं असं मानणारा सदानंद म्हणतोच,
"भाग घेणारा विचार करत बसत नाही. तो सरळ उडी घेतो. आपल्या देशात विचार करणारेच जास्त झाले आहेत. प्रत्यक्ष कार्य करणारं कुणीच नाही."
आणि एस के सत्याग्रहात भाग घेतो. पोर्तुगीज सैनिकांच्या गोळीने जखमी होतो. एस के रुग्णालयात असतानाच संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जोर धरतं. आचार्य अत्र्यांचं ’मराठा’ दैनिक, चौघडे, नौबती आणि रणदुंदुभी वाजाव्या तसं गाजायला लागतं. किनार्‍याच्या वाळूवर स्थिर उभ्या केलेल्या रिकाम्या होड्या नि होडकीसुद्धा तरंगू लागावी, तसा प्रत्येक मराठी माणूस आवेशाने त्या वेळेस तरंगत होता. या आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेता येत नाही यामुळे अस्वस्थ, बेचैन झालेला जखमी एस के रुग्णालयातल्या पलंगावर पडून आहे .

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने म्हापसेकरांच्या चाळीला चांगलीच जाग आलेली आहे. चाळकर्‍यांच्या तावातावाने चाललेल्या चर्चेत राजकारणात फारसा रस नसलेले भिकोबाही रमायला लागतात. भिकोबांना आपल्या हातून स्वातंत्र्याच्या लढ्यात काही घडलं नाही याची खंत आहे. ऐन तरुणपणी संसारात अडकल्यानंतर संसाराचा गाडा हाकता हाकता त्यांना कधीच मान वर करता आली नाही. ते विशीत असताना महात्मा गांधीची चळवळ सुरु झाली; त्याआधी टिळकांचा जमाना होता. टिळकांची अंत्ययात्रा पावसात भिजत पाहिलेली त्यांना आजही आठवते. त्यांचे एकदोन मित्र स्वातंत्र्य चळवळीत पुढे गेले, भिकोबा मात्र सत्याग्रहींना मदत कर, वर्गणी दे, खादीचे कपडे घाल अशा साध्या मार्गाने आपल्या परीने देशभक्ती करत असल्याचं समाधान मानत राहिले.

भिकोबा आरस निवृत्त होतात तोपर्यंत समाजात तसंच भिकोबांच्या संसारात बरेच बदल झालेले आहेत. स्वातंत्र्य सैनिक बाबूराव फडणिसांच्या मुलाशी, राजेंद्रशी मालतीचं लग्न होतं. अधू पाय आणि गमावलेलं पौरुषत्व यामुळे मालतीबरोबरचं लग्न त्याआधी एस के ने नाईलाजाने मोडलेलं आहे. मालतीचं लग्न झालं तरी भिकोबांच्या जबाबदार्‍या निवृत्तीनंतर संपत नाहीत. दोन मुली, दोन मुलगे आहेतच, पुतण्याच्या शिक्षणाचा भारही त्यांनी उचलला आहे. सदानंद एव्हाना कारकून झाला आहे, त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नोकरीमुळे आरस कुटुंबाच्या संसाराचा गाडा चालू आहे. जानकीला, भिकोबांच्या पत्नीला आता चाळीतल्या इतरांप्रमाणे आपणही चाळ सोडून ब्लॉकमध्ये राहायला जायचे वेध लागतात. शेवटी पार्ल्याला नव्याने होणार्‍या सोसायट्यांमध्ये फक्त पाच हजार नावनोंदणीचे भरुन उर्वरित हप्त्यांनी असं कळल्यावर भिकोबा तिथं नाव नोंदवायचं ठरवतात. त्यासाठी निघता निघता खादीबापू, रामचंद्र जोशी येतात. म्हणतात,
"आता कुठल्या हाउसिंग सोसायटीचे चेक भरताय? ठेवा तो तसाच."
"का?" भिकोबांनी काही न कळून विचारतात.
"तुमचे व्याहीच खुद्द हाउसिंग बोर्डाचे चेअरमन झालेत. यशवंतराव चव्हाणांनी खास नेमणूक केली."
"कुणाची?"
"बाबूराव फडणिसांची. आता तुम्हाला जागेला काय तोटा? खुद्द हाउसिंग बोर्डाचे चेअरमन तुमचे व्याही."
"तरीही हा चेक माझा मलाच भरावा लागेल. मी स्वातंत्र्यसैनिक नाही त्याच्यांसारखा. त्यांना यशवंतराव चव्हाण आहेत. आम्हाला कोण? आम्ही फक्त भिंतीवर लावलेल्या महात्मा गांधींना हार घालणार. भारतमाता की जय म्हणून बोंबलणार...भारतमाता प्रसन्न तुम्हाला...बाबूरावांना."

चाळ संस्कृती लोप पावत चालल्याच्या खुणा, राजकारणाने घेतलेलं नवं वळण, स्वातंत्र्य सैनिकांची देशभक्तीची किंमत वसूल करण्याची धडपड, स्वहित साधण्याचा खटाटोप आणि या प्रवाहात तग धरण्याच्या खटपटीत असलेला मध्यमवर्ग याचं दर्शन घडवीत, भवितव्याच्या स्वरूपाची जाणवलेली चाहूल व्यक्त करत संधिकालचा पहिला खंड संपतो.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चालू असताना ज्याची चाहूल लागली होती तसंच पुढे घडत जातं. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर कितीतरी गुजराती कुटुंबं माघारी गेली. काही मराठी कुटुंबं नव्याने मुंबईत राहायला आली. भिकोबा आरसही इतरांप्रमाणे ’प्रभात’ मधली आपली जागा विकून पार्लेकर झाले. भिकोबा आरसांची सगळी मुलं आता मार्गी लागली आहेत. निवृत्तीनंतरचा संथपणा अंगात भिनायला लागतो आहे तोच भिकोबांच्या हातात त्यांच्या वडिलांच्या मोडी लिपीतल्या डायर्‍या येतात. १८८८ पासून १९२८ पर्यंत लिहिलेल्या या डायर्‍या. त्यातील काही भागांतून त्या त्या काळाचंही ओझरतं दर्शन होतं ते खालीलप्रमाणे,

१८९५ - दुष्काळ, संर्पदंश आणि अंधश्रद्धेने केलेल्या उपायांनी झालेले मृत्यू अशा नोंदी डायरीत आहेत. शिमग्याला दुष्काळामुळे ग्रामस्थांकडे भात नाही पण आरसांनी खंडाच्या भाताचा एक तट्टा उघडून भाताचे धर्मार्थ वाटप केले. ग्रामस्थ, कुळे खोतांनी उपकार केले म्हणतात पण ही आरस घराण्याची परंपरा आहे . १८७२ मध्ये असेच भात आरसांनी वाटून रयतेला जगवले होते. याबद्दलचा अभिमान या नोंदी दर्शवितात.

१ जानेवारी १९०१ - एक शतक मागे पडले. गेल्या शतकाने लोकांना सुधारणा दिल्या, येत्या शतकात माणसाचे ज्ञान उच्चकोटीचे बनेल. १९ व्या शतकात वाफेच्या इंजिनाचा व विजेच्या शक्तीचा शोध लागला. तारायंत्र, वर्तमानपत्रे, छापखाने, आगगाड्या टायपिंग यंत्रे या गोष्टी एकोणिसाव्या शतकाने लोकांना दिल्या. आता विसावे शतक काय देणार असा प्रश्न आहे.

१२ डिंसेबर १९११ - बादशाही दरबार थाटात पार पडला. ’केसरी’ मध्ये त्याबद्दल खूपच माहिती छापून आली आहे. बंगालची फाळणी जी लॉर्ड कर्झनने केली होती ती दुरुस्त करण्याचा निर्णय झाला. मुळात ही फाळणी करणेच गैर होते. आता ही दुरुस्ती म्हणजेही प्रजेच्या डोळ्यात धूळफेक आहे. ’केसरी’ कर्त्यांनी याहून कडक लिहिणे आवश्यक होते. अशी नोंद आप्पांनी ठणकावून केली आहे. पुढच्या नोंदीत खोतांना वाईट दिवस आल्याची, सावकारीतून त्यांच्या चुलत चुलत्यांच्या झालेल्या खुनाची नोंद आहे. इंग्रजी अमदानीत शाबीत न झालेला तो एकमेव खून असल्याचं त्यात म्हटलं आहे. या डायरीत वाचक रेंगाळत असतानाच स्वातंत्र्यानंतरचं राजकारण सामोरं येतं.

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात आता कसे बदल होत जाणार याचा प्रत्यय आणि सचोटीने वागण्याबद्दल मोजावी लागणारी किंमत प्रसादच्या रुपाने वाचकांपर्यंत पोचते.
सचिवालयाचे नाव मंत्रालय झाले आणि भिकोबांच्या मंत्रालयात काम करणार्‍या मुलाला, प्रसादला एका पेचप्रसंगाला तोंड द्यावं लागतं. प्रसादसमोर गांधीवादी, स्वातंत्र्यसेनानी, मूल्याचा आग्रह धरणार्‍या, शुचितेच्या मार्गावर चालणार्‍या बाबूराव फडणिसांतर्फे काम येतं, ते प्रसादच्या चुलतभावाने, शंभू आरसने केलेल्या विनंतीचं. सरकारी मालकीच्या भूखंडाचे आरक्षण उठवण्याची ही विनंती. प्रसादने सही करुन कागद पुढे सरकवणं एवढंच त्याचं काम. भानोतसाहेबांच्यामुळे प्रसादला गैरमार्ग न अवलंबिता हे काम नाकारता येतं पण भानोतांची बदली होते, प्रसादला मार्गातून हटवलं जातं आणि तो भूखंड अलगद शंभूच्या हातात येतो.

एव्हाना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेबद्दल एस के ची व्यक्तिरेखा मतं व्यक्त करते. तो कोचिंग क्लासेस घेतो तसंच सद्यपरिस्थितीचं विश्लेषण करणारे लेख वृत्तपत्रांसाठी लिहितो. परखड, सडेतोड विश्लेषण करणारा लेखक म्हणून एस के ला सर्वत्र मान आहे. बाळ ठाकरे आता सर्वसामान्यांचे नेते आहेत. याचं कारण सामान्य माणसाच्या वतीने ते आक्रमक होतात, स्वत:ला जे जमत नाही ते दुसर्‍याने आपल्या वतीने केलं की जनता पाठिंबा देते इतकं साधं सूत्र बाळ ठाकर्‍यांच्या लोकप्रियते मागे आहे आहे असं एस के चं त्यांच्या लोकप्रियतेबद्दल विश्लेषण आहे. त्यानंतरच्या महत्त्वपूर्ण घटनेबद्दल एस के जाहीर भाषणांमध्ये आग ओकू लागतो. ही घटना आणीबाणी जाहीर होण्याची. गुजरातमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन, बिहारमधील जयप्रकाशांनी चालवलेली चळवळ, अलाहाबाद हायकोर्टाने पंतप्रधानांना दोषी जाहीर करून सत्तामुक्त केल्याची घटना आणि आपले पंतप्रधानपद टिकवण्यासाठी इंदिरा गांधींनी योजलेली लोकशाहीनाशक उपाययोजना - आणीबाणी.

१९७६ च्या सुरुवातीला अचानक इंदिराबाईंनी आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर केल्या. एस के चे जाहीर भाषणांबरोबर इंदिरा गांधी आणि कॉग्रेसची राजवट याविरुद्धचे जळजळीत लेख प्रसिद्ध होऊ लागले.

दरम्यान भिकोबा आणि जानकी वयोमानानुसार थकत चालली आहेत. अचानक एक दिवस सदानंद भिकोबांकडे त्यांच्या लॉकर मध्ये पिशवी ठेवायला देतो. त्यात पैसे आहेत हे कळल्यावर भिकोबा अस्वस्थ होतात,
"लिगल आहे ना रे सगळं" ते बेचैन होऊन विचारतात,
तो ही तसंच असल्याची हमी देतो. आणि एक दिवस त्याच्या घरावर प्राप्तिकर अधिकार्‍यांचा छापा पडल्याची, सदानंदला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची बातमीच ते वर्तमानपत्रात वाचतात. ’आरस’ घराण्याच्या झालेल्या बदनामीने भिकोबा खचतात. पण सारं शांत झाल्यावर सदानंद ती पिशवी परत घेऊन जायला येतो. त्याला आपण काही गैर केलं आहे असं वाटत नाही. जगायचं तर प्रवाहात सामील होण्यावाचून पर्याय नाही अशी सदानंदची भूमिका आहे

एस के आता लोकप्रिय वार्ताहर आहे. त्याला ’संधिकाल’ दैनिकासाठी संपादकपदाची विचारणा होते. ती स्वीकारताना हे वृत्तपत्र मध्यमवर्गियांचं प्रतिनिधित्व करणारं असायला हवं असं तो मनोमन ठरवतो. एस के ला ’आरस’ कुटुंब ’संधिकाल’ च्या लेखनासाठी आदर्श कुटुंब वाटतं. चेहरा हरवलेली, स्वसुखात मग्न असलेली ही मध्यमवर्गीय माणसं आता उच्चमध्यमवर्गीय झाली तरी जीवनाची भेदकता, प्रखरता त्यांना संधिकाल शिकवेल असं त्याचं मत आहे. शिरीषला, भिकोबांच्या मुलाला हे मान्य नाही. शिरीष वरिष्ठ सनदी शासकीय अधिकारी आहे. जनतेच्या हितासाठी शासनयंत्रणा राबविताना त्याला स्वार्थी राजकारणी, संस्थाचालक, लोक याच्यांशी सदसदबुद्धीनुसार अहोरात्र लढा द्यावा लागतो, तो तसा देतोही. त्याची शिक्षा त्याला प्रमोशन डावलून मिळते. प्रसादला प्रामाणिकपणे वागण्याची किंमत म्हणून राजीनामा द्यावा लागतो. मोहिनीला, प्रसादच्या बायकोला मंत्रिपदावरून उडविण्यात येतं. व्हॅल्यूजसाठी प्राइस मोजावी लागणं हे नवं इकॉनॉमिक्स आहे. व्हॅल्यू म्हणजे मूल्य; प्राइस म्हणजे किंमत. यात महत्त्व कुणाला ? संधिकाल ने ही उत्तर शोधायला हवीत असं एस के मनोमन ठरवतो. नव्या मध्यमवर्गियांच्या आशा आकांक्षा प्रकट करायला हव्यात. आता आव्हाने असतील ती विज्ञानाची, माणसामाणसामधील संबंधांची आणि गरीब श्रीमंतातील फरक नाहीसा करण्याची. चंगळवाद रोखण्याची. व्हॅल्यूज साठी प्राइस द्यावी लागू नये यासाठी झगडण्याची. हिंदुत्वातील उपजत शुचिता हेच त्याला उत्तर असेल याची एस के ला खात्री आहे.

१२ मार्च १९३
’संधिकाल’ सुरू होण्यापूर्वीची तयारी. एस के मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयाच्या वाटेवर आहे. ’संधिकाल’ ची डमी हातात घेऊन विचारात गढलेला. आयुष्याला मिळालेलं अनपेक्षित वळण. संपादक पद, घर, गाडी आणि नुकतंच ठरलेलं लग्न. बदललेलं आयुष्य आणि आता ’संधिकाल’ मुळे कित्येक आयुष्यं बदलण्याची संधी. एस के उत्साहाने एक्सप्रेस टॉवरपाशी पोचतो. अजून भेटीची वेळ झालेली नाही हे पाहून पान खायला ’एअर इंडिया’ समोर येतो. तोच कानठळ्या बसवणारा आवाज त्याचं काळीज चिरून टाकतो, परिसर दणाणून सोडतो, पायाखालची जमीन भूकंपासारखी थरथरते, हादरते. काय होतं आहे हे कळण्याआधीच एस केच्या अंगाला आगीचा लोळ वेढतो. बॉम्बस्फोटामुळे गारद झालेल्या, जखमी माणसांमध्ये एस के चा मृतदेह पडतो. एस के च्या हातातली ’संधिकाल’ ची डमी पश्चिम वार्‍यावर पताकेसारखी फडफडत राहते.

’संधिकाल’ भारतातल्या कोणत्याही एखाद्याच घटनेवर, प्रसंगावर भाष्य करत नाही पण एस के च्या व्यक्तिरेखेतून कार्यकर्त्याचं, मध्यमवर्गियांचं गोंधळलेपण डोकावत राहतं. आरस कुटुंबांतली काही जणं परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत स्वत: बदलायच्या प्रयत्नात आहेत, तर काही तत्त्वाला ठाम राहून त्याची किंमत भोगायला, परिमाणाला तोंड द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. मध्यमवर्गियांच्या बदलत्या जीवनशैलीतून तो तो काळ, प्रगती, तत्त्वाशी प्रामाणिक राहणारी माणसं, लाल लुचपत, भ्रष्टाचार याचं दर्शन ’संधिकाल’ मधून होत राहतं. ’संधिकाल’ ची कालमर्यादा ९३ पर्यंत असली तरी स्वातंत्र्यांपूर्वीच्या, नंतरच्या काळाच्या वाटचालीचं ओघवतं, यथार्थ प्रत्ययकारी चित्रण करणारं, भविष्यकाळाची पाउलं ओळखायला लावणारं हे पुस्तक उल्लेखनीय वाटतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धगधगत्या कालखंडावरील चांगल्या कालाकृतीचा सुरेख आढावा. आणि तुम्हाला शुभेच्छा

मस्त. खूपच छान ओळख. संधीकाल मधून जणू आजचा भारत दिसत राहतो आणि अश्या बर्‍याच SK, सदानंद मधून आपण भारतीय.

अजून वाचले नाही पण असे दिसते की हे मस्ट रिड आहे.

बर्‍याच मोठ्या कालखंडाचा आढावा घेणारी कादंबरी दिसते आहे. यू पेन अथवा यू आय सी च्या ग्रंथालयात सापडते का ते पाहिले पाहिजे.