बापू..

Submitted by दुसरबीडकर on 12 August, 2013 - 06:47

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन दोन खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार एक मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!
आजी बापूला केव्हा सोडून गेली मला कळत नव्हते..पण तेव्हापासुन बापूंनी सगळ्यांच्या खोल्यापुढ निवारा शोधला होता..मला आठवतं,बापू कुणाच्याही खोलीत कधी गेलेच नाही..रापलेला चेहरा,पण माया दावणारे बारिक डोळे,चिलिम ऒढुु ओढु खप्पड झालेल्या गालावर पिळ दिलेल्या मिशा,तुळतुळीत दाढी,डोक्याला सदैव पिवळा पटका,मस्तकावर अष्टगंध आणि बुक्का..कानाच्या दोन्ही पाळूला दारावतीचे ठिपके...काही शाबुत तर काही दातांनी रामराम ठोकलेला,सहा फुट ऊंचीला शोभणारी शरिरयष्टी..अन सतत हातातल्या तुळशीच्या माळेशी,बोटांची चाललेली स्पर्धा..पायात करकर वाजणारी नर्ही अन धोतर-बंडीतली ती मूर्ती आजही आठवते..
आमच पन्नास ऎकराच्याही वरच रान असेल तेव्हा..पण सगळ ऎकत्र होतं..बायाबायांची भांडण नव्हती..भावाभावांचे वाद नव्हते..फक्त स्वयंपाक वेगळा अन झोपायच्या खोल्या..बाकि सगळ्यांची जेवण सकाळ संध्याकाळ बापूच्या समोर ऊंबराच्या झाडाखाली गोपाळकाला व्हावा तशी व्हायची..बापू जास्त बोलायचे नसत मोठ्यासोबत..पण आम्हा लहाणासोबत अगदी लहान होवून रमायचे..माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या बहिणीवर बापूंचा जीव जास्त..ती जरा तब्येतीने सगळ्या मुलात कृश होती..मी तर पहिल्यापासून दांडगटच..त्यामुळे आमच्या चोरून बापू तीला खोबरं,गुळफुटाणे,पेरू अस जे दिसेल ते आणायचे..तिने खाऊन ऊरल की मग बापू आम्हाला हाळी द्यायचे..पण म्हणून ते आमच्यासाठी वाईट कधीच झाले नाहित..ऊलट त्या बहिणीकरता अन बापूकरिता आमचा जीव अधिक तुटायचा..
बापू सुनांना म्हणजे आईना ,काकूंना कधहि ऎकेरी बोलायचे नाही..अहो-जाहो करायचे..वडिलांच्या अन चुलत्यांच्या बाबतीतही तेच..बापूना कधी सुनांना जेवण मागण्याच काम पडल नाही..कारण बापू आल्याशिवाय कुणिच जेवायला बसायच नाही..आमच्यासारखी चिल्लीपिल्लीही बापूच्या वाटेकडे डोळे लावून असायची..बापूकडे गोष्टींचा खजाना होता..ऊडती माडी,फिरता कळस,कळवातनीची कथा,दामु सुताराची कथा न जाणो अशा कैक गोष्टींना आमच्याबरोबर रात्रीला मोठी माणसही हजेरी लावायची..बापूची चिलिम खास आवडायची मला..त्यातील कपडा पाण्याने धुवून देणे ,तंबाकु साफ करणे,खडा पुसून देणे ई.कामे करता करता मलाही कधीकधी ती ओढून पहायचा मोह होई..पण ऎकदाच नुसती चिलीम ओठाला लावून पाहण अन बापूंची सनकन गालात वाजण झाल..तेवहापासून तो मोह आवरला..पण सुप्त ईच्छा आजतागायत कायम आहे..
आमच रान फारस पिकायच नाही..किंवा तॆव्हाचा काळच दुष्काळाचा होता अस म्हटल तरी हरकत नसावी..त्यामुळे रानात मिळणार्या गोष्टींचेच खेळणे,खाणे असा लळा बापूंनी लावून दिला होता..बापूंना मात्र चहा हमखास दोनचार वेळेस लागायचा..गूळाचा..दुध नसले तरी चालेल पण त्यांच ऎक पितळी दिड दोन कपाच 'गटले' असायच ते भरुन चहा लागायचा..पण ते ही कोणत्या सुनेला सांगायच काम नव्हत..कुणीही चहाच आंदण ठेवल की ती ऒरडून सांगायची,'बाईवो,म्या मामाजीले च्या ठुला बरं..' अन बापूच्या चेहर्यावर स्मीत पसरायच..मी सहा वर्षाचा होईपर्यन्त मला बापूचा साथ लाभला होता..बापूच्या आठवणी खुप आहेत,मला फारशा आठवत नाही..पण जितक्याही आठवतात,तरळलेल्या डोळ्यातून बापू दिसतात..
अखेरच्या दिवसात बापू फार खंगले होते,खाण्यापिण्याच काही ददात नव्हती..पण या वळणावर त्यांना 'आजी जास्त आठवत असावी..त्यांच चिलिम पिण्याच प्रमाण ही खुप झाल होतं..सतत खोकॊक..रात्री बेरात्री खोकल्याची उबळ ऎकल्यावर पटकन बाबा अन चुलते तिकडे धावायचे..सगळ्यांना..व बापूंनाही कळून चुकलेल होत..होणारी गोष्ट होणार आहेच..गावात डोक्टर नव्हतेच,एक दिवस असीच जोरदार उबळ आली..वडिलांनी पटकन गाडी जुंपून बापूला गाडीत घेतले सोबत लहाने चुलते व शहराच्या दिशेने धावले..पण सकाळपर्यंत बापूच निष्प्राण कलेवर दारात होत..बापून घरादाराला काय दिल त्यावेळी कळतं नव्हत..आज जाणवतय,बापूंनी घराला 'घरपण' दिलं होतं....

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलं आहे. विचारी होते की तुमचे बापू. मुलांना स्पेस ची गरज असते हे त्यावेळी त्यान्ना कळलं. पण थोडं अजून मोठं लिहिलं असतं तरी चाललं असतं

कंसराज,मृण्मयी,मामी,पारिजाता..सगळ्यांचे मनापासून आभार..:-)
पारिजाताजी,खरं तर बापू इतक्या कमी शब्दात साकारणं कठिणचं..पुनश्च भेटतो,बापूंच्या काही आठवणींसोबत..!!