आरंभल्या छळाची ही सांगता ठरावी..

Submitted by वैवकु on 22 July, 2013 - 12:02

आरंभल्या छळाची ही सांगता ठरावी
माझी गझल विठ्याला गोरा करून जावी

स्वप्नातले सुखांचे आभाळ स्वच्छ आहे
दुष्काळ वास्तवाची धरणी कशी भिजावी

जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो
मौनातल्या उन्हाची धग ही कुणी सहावी

पेटून राख व्हावे काहूर माजलेले
एकाच आसवाची ठिणगी अशी पडावी

''मी" कोण?.. सांगणारी फाईल पाहिली मी
प्रत्येक पान होती चिठ्ठी तुला निनावी

जेथून ना निघावे वाटे ..अशीच जागा
पण हा विषाद की ती जगकोठडी निघावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्स्ट्रा शेर

जो हिंद पूजिला मी तो वेगळाच होता
जे काय आज येथे ..गांधीगिरी असावी

''मी" कोण?.. सांगणारी फाईल पाहिली मी
प्रत्येक पान होती चिठ्ठी तुला निनावी

जेथून ना निघावे वाटे ..अशीच जागा
पण हा विषाद की ती जगकोठडी निघावी<<< व्वा

गांधीगिरीही छान!

जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो...खूप सहज आलाय हा मिसरा आवडला !

''मी" कोण?.. सांगणारी फाईल पाहिली मी
प्रत्येक पान होती चिठ्ठी तुला निनावी...वाह वा !

गझल छान आहे.

काही मिसरे खूप आवडले..अगदी सरळ असल्याने. उदा

आरंभल्या छळाची ही सांगता ठरावी
स्वप्नातले सुखांचे आभाळ स्वच्छ आहे
पण हा विषाद की ती जगकोठडी निघावी

जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो

''मी" कोण?.. सांगणारी फाईल पाहिली मी
प्रत्येक पान होती चिठ्ठी तुला निनावी

जेथून ना निघावे वाटे ..अशीच जागा
पण हा विषाद की ती जगकोठडी निघावी

व्वा!

'जेही ' हा 'जे काही' चा शॉर्ट फॉर्म आहे का?
कारण ही शब्द योजना मला तरी समजलेली नाही.
''जे जे म्हणायचे ते" असा साधा पर्याय असताना या कोलांट उडीची गरज लक्षात आलेली नाही.

आरंभल्या छळाची ही सांगता ठरावी
.
स्वप्नातले सुखांचे आभाळ स्वच्छ आहे
.
जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो
मौनातल्या उन्हाची धग ही कुणी सहावी
..
जेथून ना निघावे वाटे ..अशीच जागा
पण हा विषाद की ती जगकोठडी निघावी

बढीया. Happy

समीरजी, बेफीजी,अरविंदजी ,सुप्रियातै, डॉ.साहेब, कणखरजी , शामजी ,अमित व मुटेसर सर्वांचे खूप खूप आभार

शामजी आपल्या म्हणण्याशी बराचसा सहमत आहे बेफीजीना ज्या दिवशी हा शेर ऐकवला होता त्याच दिवशी तेही 'जेही' बाबत असेच म्हणाले होते

जेही हे हिंदीतील जोभी चे मराठीकरण माझ्याकडून झाले असावे जे जे हा पर्याय बेफीजींनीही दिला होता पण मला तो निवडावासा वाटला नाही जो कुछ व जोभी मधे जसा फरक आहे जोभी कहेना है केह डालो मधे जी अधीरता आहे बेबसी आहे ती जे जे मध्ये मला जाणवली नसावी म्हणून माझ्याकडून जेही हा पर्याय स्वीकारला गेला असावा

डॉ. साहेब स्टाईल चा मुद्दा तुमच्याकडून प्रत्यक्ष चर्चेत समजून घेईन म्हणतो तूर्तास मला समजला नाही पण ऐकून छान वाटले धन्यवाद Happy

सर्वांचे पुनश्च आभार

आपला सदैव कृपाभिलाषी
~ वैवकु

''मी" कोण?.. सांगणारी फाईल पाहिली मी
प्रत्येक पान होती चिठ्ठी तुला निनावी

सर्वाधिक आवडला

जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो
मौनातल्या उन्हाची धग ही कुणी सहावी

पेटून राख व्हावे काहूर माजलेले
एकाच आसवाची ठिणगी अशी पडावी >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.

वैवकु..
गझल आवडली, स्टाईलही आवडली जेही ची .

जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो
मौनातल्या उन्हाची धग ही कुणी सहावी

पेटून राख व्हावे काहूर माजलेले
एकाच आसवाची ठिणगी अशी पडावी

द्विपदींमध्ये विषाद अन आर्तता भरपूर दाटलेली ,
पण मतल्यातली मिजासही या सर्वाला सेट ऑफ करणारी ! पु.ले.शु.