फ़िर तेरी कहानी याद आयी....!

Submitted by चेतन.. on 17 September, 2012 - 02:40

आता नाही तिला आठवायचं म्हटलं किच तिची आठवण येते हमखास...
नाही आत.. नाही बाहेर.... मधल्यामध्ये अडकून राहतो श्वास....
भयानक घुसमट होते आणि अस्वस्थता पोहोचते शिगेला...
कातरतेचा षड्ज लागतो आणि मल्हार पोहोचतो टिपेला...
माझ्याच अंगणात आठवणी मग, दंगा मांडू लागतात ...
दमून भागून गेल्यावर डोळ्यातून सांडू लागतात..
एक फुल पूर्णपणे फुलण्याआधीच सुकलेलं...
एक आभाळ नं थकता माझ्यासाठीच झुकलेलं...
कवितेच्या वहीवर तिनं लिहीलेलं माझं नाव...
नक्षत्रंही पडतील फिकी जर केला त्याचा लिलाव...
असं म्हणताच तिचं लाजणं अन चंद्र जायचा दमून...
"चांदणं जाईल संपून रे राजा...!" म्हणायचा तोच वरमून...
मग स्वप्नं जायची उधळून, पसरत जाणारी रात्र ...
सर कोसळताना माझ्या डोक्यावर तिच्या हातांचं छत्रं..
आता तिचे हात केवढे... आणि पाउस केवढा....
तेवढ्यातल्या तेवढ्यात दरवळून जायचा तिच्या केसातला केवडा...
बोटांमधून निथळणारं पाणी झटकत.....
तिचं पुन्हा आडोश्याला जाणं खटकत..
"हे असं.. आभाळ कोसळताना त्यापासून चुकायचं नसतं...
तर थेंबाथेंबामधलं त्याचं मागणं ऐकायचं असतं..."
हे असं मी म्हटल्यावर.. "नाही बाबा आम्हाला असा पाउस ऐकता येत..!
आणि कळतोय बरं तुझा अन पावसाचा मला भिजवण्याचा बेत"
असं म्हणून ती आडोशाला तशीच आणि मी पावसात..
सोबतीला अगदी हिरमुसून गेलेली ती चांदरात...
पाऊस पडला कि हे असलं तिचं आठवत रहातं पुन्हा पुन्हा..
नवीन रंग उजळवंत येतो तोच कॅनव्हास जुना जुना..
नौशादांच तेच गाणं मग उधळू लागतं अत्तराचा फाया...
.
.
.
"फ़िर तेरी कहानी याद आयी, फ़िर तेरा फ़साना याद आया..!"

-चेतन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

वाहवा ! मस्स्स्त कविता !

विशेषतः यमकांची अनोखी जुळवणी आणि त्यातून अवतरलेला आल्हाद फार आवडला .