अजिंठा: भाग २

Submitted by डोंगरवेडा on 9 July, 2013 - 23:23

अजिंठा: भाग १

अजिंठा लेणीतले १ व २ क्रमांकाचे भव्य विहार पाहून आम्ही पुढच्या लेणी पाहण्यास निघालो निघालो. पद्मपाणी आणि वज्रपाणी प्रतिमांनी मनावर अक्षरशः गारूड केले होतं आता आमच्यापुढे अजिंठ्याने काय काय आश्चर्ये वाढून ठेवली आहेत याची जाम उत्सुकता होती

पुढील ३ ते ८ क्रमांकाच्या लेण्या या ह्यासुद्धा विहार असून आत सुरुवातीच्या विहारांसारखीच त्यांची रचना आहे. ओसरी, सभामंडप, आणि गर्भगृह. ह्या विहारांमधेसुद्धा काही चित्रे आहेत पण ती बरीचशी नष्ट झालीत. या विहारांमध्ये शिल्पे कोरण्याचे प्रमाण जास्त आहे.

लेणी क्र. ४ च्या प्रवेशद्वारांवर अतिशय सुंदर मूर्तीकाम केले आहे तर आतील स्तंभांवर नक्षीदार कलाकुसर केली आहे. हा विहार बुद्धाच्या विविध स्वरूपातील - आशीर्वादपर, प्रवचनपर, अर्धोन्मिलित, ध्यानस्थ अशा प्रतिमांनी सुशोभित झाला आहे. येथील सभामंडपाच्या छतावर लाव्हारस वाहिल्याच्या खुणा स्पष्टपणे आढळून येतात.

लेणी क्र. ४ मधील प्रकाशचित्रे

१. प्रवेशद्वारातील बोधिसत्व प्रतिमा
a

२. दरवाजांवरील अशाच काही प्रतिमा
a

३. ओसरीतले कोरीव काम
a

४. प्रवेशद्वारानजीकचे काम
a

५. स्तंभांवरील नकसकाम
aलेणी क्र. ६

लेणी क्र. ६ हा अजिंठा समूहातील एकमात्र दुमजली विहार. दोन्ही मजल्यांवर स्तंभयुक्त सभामंडप, निवासकक्ष आणि अंतराळयुक्त गर्भगृहे आहेत. सभामंडपात बुद्धमूर्ती कोरलेल्या असून गर्भगृहामध्ये बुद्धाची सिंहासनारूढ भव्य प्रतिमा व त्यावर आकाशगामी गंधर्वमूर्ती कोरलेल्या आहेत.
तळमजल्यावरील भिंतीवर बोधिसत्व प्रवचन देतानांची चित्रे, जातक कथांमधील काही दृश्ये चित्रित केली आहेत तर वरच्या मजल्यावर बुद्ध, बोधिसत्व, नागराजा नंदाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

लेणी क्र. ६ मधील प्रकाशचित्रे

६. बोधिसत्व प्रवचन देत असताना
a

७. भिंतींवरील कोरीव बुद्धप्रतिमा
a

८. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारानजीकच्या भव्य प्रतिमा
a

९. गर्भगृहातील सिंहासनारूढ भगवान बुद्ध
aलेणी क्र. ७ मधील प्रकाशचित्रे

लेणी क्र. ७ हा सुद्धा एक विहार असून इथे मात्र गौतम बुद्धाचा श्रावस्तीतला चमत्कार जिथे त्याने स्वतःला एक हजार बुद्धांमध्ये अवतरीत केले होते तोच इथे मूर्तस्वरूपात कोरलेला आहे. जातककथांमधली ही कथा लेणी क्र. २ मध्ये चित्ररूपात रंगवलेली आहे हे आपण मागे पाहिलेच आहे.

१०. श्रावस्तीचा चमत्कार
a

११. श्रावस्तीचा चमत्कार
a

१२. गर्भगृहातील आशिर्वादपर मुद्रेतील प्रसन्न पद्मासनस्थ बुद्धमूर्ती
a

१३. सभामंडपातील रंगवलेले छत
aचैत्यगृहे (क्र. ९ व १०)

पुढचे काही विहार साधे आहेत तर ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत. अजिंठ्यातील सर्वात प्राचीन चैत्यगृहे ती हीच.
सर्वसाधारणपणे एका लेणी समूहात एकच चैत्य खोदला जातो. अजिंठा लेणीसमूहात मात्र तब्बल चार चैत्यगृहे आहेत आणि ही ९ आणि १० क्रमांकाची तर एकमेकांना अगदी लागून. फार पूर्वीपासून अजिंठा लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर येणार्‍या बौद्द भिख्खूंच्या प्रार्थनेच्या सोयीसाठी इथे चैत्यगृहे जास्त प्रमाणात कोरली गेली असावीत.

दोन्ही चैत्यगृहांचा दर्शनी भाग नेहमीच्या शैलीतच आहे. प्रवेशद्वारावरचे स्तंभ, पिंपळपानाकृती वातायन. तर अंतर्भागात दोन्ही बाजूंना एका ओळीत कोरलेले स्तंभ, छताची गजपृष्ठाकार रचना, आणि जोते, वेदिकापट्टी, अण्ड, हर्मिका अशा रचनेचा स्तूप.
हिनयानकाळातले हे चैत्य. महायानकाळात यांच्या बाहेरील भिंतींवर बोधिसत्वाच्या मूर्ती कोरल्या गेल्या तर चैत्याच्या आतील बाजूस स्तंभांवर आणि भिंतींवर चित्रे रंगवली गेली. चैत्यगृहे त्यांच्या वातायनामुळे नेहमीच जास्त प्रकाशमान असतात त्यामुळे इथली चित्रे बरीचशी सुस्पष्ट आहेत. या चैत्यांमध्ये जातककथांतील दृश्यांबरोबरच बुद्धप्रतिमाही मोठ्या प्रमाणावर रंगवलेल्या आहेत.

१० व्या क्रमांकाच्या चैत्यगृहात चैत्यकमानीच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आहे.

वासिठिपुतस कट
हादिनो घरमुख
दानं

वासिष्ठिपुत्र कटहादी दिलेले कठ आणि चैत्यमुखाचे दान

म्हणजेच हा चैत्यमुखाचा दर्शनी भाग हा वाशिष्ठिपुत्र कटहादी याने दिलेल्या दानातून निर्माण केले आहे. हा कुणीतरी श्रेष्ठी असावा.

तर चैत्यगृहाच्या आतील बाजूस डाव्या भिंतीवर अजून एक शिलालेख कोरलेला आहे.

कणहस बाहडस
दानं भिति

बाहडचा रहिवासी कण्हक याने दान दिलेली भिंत
हे बाहड गाव कुठले याचा उलगडा होत नाही.

हे दोन्ही शिलालेख ब्राह्मी पाकृतात असून इ.स.पू २ ते इस. पू. १ यादरम्यान कोरलेले आहेत.

लेणी क्र. ९ मधील काही प्रकाशचित्रे

१४. चैत्यगृहाचा दर्शनी भाग
a

१५. प्रवेशद्वाराजवळील तिहेरी छत्र असलेल्या स्तूपाचे शिल्प
a

१६. स्तूप आणि चित्रांकित स्तंभ
a

१७. जातककथांमधील काही प्रसंग
a

१८. जातककथांमधील काही प्रसंग
a

१९. बोधिसत्व
a

२०.जातककथांमधील काही प्रसंग
a

२१. जातककथांमधील काही प्रसंग
a

२२. स्तंभावरील बुद्धचित्र
aलेणी क्र. १० मधील काही प्रकाशचित्रे

२३. चैत्यगृहाच्या शेजारील भिंतीवरील कोरीव शिल्पे
a

२४. अजिंठा लेणीतील सर्वात भव्य स्तूप
a

२५. स्तंभांवरील बोधिसत्व आणि इतर भिख्खूंची चित्रे
a

२६. स्तंभांवरील चित्रे
a

२७. चैत्याच्या आतील भित्तीचित्रे
a

२८. एका स्तंभावर असलेले हे सुरेख चित्र
a

२९. स्तंभावरील एका बौद्ध भिख्खूचे चित्र
a

३०. हा बहुधा चिनी/ मंगोलीयन भिख्खू असावा
a

३१. बोधिसत्व
a

३२. भिख्खू, बोधिसत्व व छत्रधारी सेवक
a

३३. हे अजून काही परदेशी भिख्खू
a

चैत्यगृहातून बाहेर आलो. येथून पुढचे काही विहार साधे असून काही ठिकाणी शिल्पांसकट चित्रेही रंगवली आहेत. आता पुढचे लक्ष्य होते ते क्र. १६ व १७ चे भव्य विहार. या विहारांमध्ये सिंहल जातक, षड्दंत जातक आणि विश्वंतर जातक ह्या कथांमधील दृश्ये असणारी काही अप्रतिम, सुस्पष्ट आणि जगप्रसिद्ध अशी भित्तीचित्रे आहेत. त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर प्रकाशचित्रांची जोड देऊन लिहीलेली, अतिशय छान माहीती..
------------------
@ डोंगरवेडा हा लेख 'मायबोली स्वागत' या ग्रुप ऐवजी 'भटकंती' किंव्हा 'इतिहास' ह्या ग्रुप मध्ये टाका. कदाचीत याचमुळे इतके दिवस होऊनही ह्या लेखावर इतरांच्या प्रतिक्रिया आल्या नसाव्यात.

खूपच छान माहिती दिली आहेत तुम्ही! मी अजुन अजिंठा लेणी पाहिलेली नाही. पण तुम्ही दिलेले प्रकाशचित्र आणि त्यांची माहिती वाचून प्रत्यक्ष अजिंठा लेणी पाहिल्याचं समाधान मिळत आहे!