अदृष्य भिंत ......

Submitted by डॉ अशोक on 16 July, 2013 - 01:42

अदृष्य भिंत ......

सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात काम करणा-यांना संसर्गजन्य रोगाच्या साथीचं इन्वेस्टीगेशन करणं म्हणजे काय आव्हान आहे हे माहित असतं. मला माझ्या ३०-३५ वर्षांच्या सर्व्हीस मधे असे प्रसंग अनेकदा आले. पेशंटच्या एखाद्या दुर्मिळ रोगाचं निदान आणि एखाद्या साथीचं निदान यात साम्य एकच आहे आणि ते म्हणजे यातून मिळणारं समाधान. यातल्या एका साथीचा किस्सा सांगण्यासारखा आहे.

दिवाळी नुकतीच झाली होती आणि कळलं की नांदेड जिल्ह्यातल्या एका गावात विषमज्वरानं (टायफॉइड्नं) थैमान घातलंय. जिल्हा आरोग्य अधिकारी माझे परिचित होते. त्यांनी मदती साठी निरोप दिला. नांदेडच्या वैद्यकिय महाविद्यालयातले फिजीशिअन, पिडीऍट्रीशिअन, मायक्रोबायलोजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रद्न्य अशी टीम घेवून आम्ही ते गाव गाठलं. हजार दीड हजार वस्तीचं ते गाव होतं. गावातच शाळेत पेशंट्ना उपचाराची सोय केली होती. आरोग्य खात्यानं घरोघर जावून पहाणी केली होती. ती आकडेवारी उपलब्ध होती. गावात मलेरिया साठी येणारा एक कर्मचारी होता. त्याच्या लक्षात सर्वप्रथम ही बाब आली की तापाच्या रोग्याच्या संख्येत अचानक वाढ झालीय. त्यानं तात्काळ त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिका-याला रिपोर्ट केला. त्या वैद्यकिय अधिका-यानं लागलीच त्या गावात येवून धांडोळा घेतला आणि नांदेडला जिल्हा आरोग्य अधिका-याला कळवलं. ते पण त्यांची टीम घेवून आले. पण साथीचा उगम काही कळला नव्ह्ता. साथ विषमज्वराची होती यात शंका नव्हती कारण काही पेशंटनी नांदेडला येवून तपासणी करून घेतली होती. दोघे तर आमच्या नांदेडच्या मेडीकल कॉलेजच्या हॉस्पिटलात दाखल झाले होते.

इतक्या कमी कालावधीत उद्भवलेल्या इतक्या केसेस आणि एक वर्षाच्या आतल्या एकाही मुलाला न झालेली लागण या बाबी ही साथ पाण्यातून पसरली आहे असं दर्शवत होती. गावात पिण्याच्या पाण्यासाठी चार विहिरी वापरात होत्या. त्यात नियमितपणे ब्लिचिंग पावडर टाकली जात असे. त्याबाबत गावका-यांनी पण दुजोरा दिला. आणि ही कार्यवाही साथ सुरू होण्याच्या आधी पण होत होती. ही एक दुर्मिळ अशी गोष्ट होती. अशा साथीत बहूदा संबंधित कर्मचारी गावात रहात नाही, पाण्यात पावडर टाकत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी गावकरी करतात. त्याला निलंबित करण्याची मागणी होते. पण इथं गावकरी ठामपणे त्याच्या पाठीशी उभे होते. गावातल्या ब्लिचिंगच्या साठ्याची आणि स्टॉकबुकची तपासणी केली, ती पण गावक-यांच्या आणि त्या कर्मचा-याच्या दाव्याला पूरकच होती. गावात मागील महिन्या-दिड महिन्यात यात्रा, उत्सव किंवा लग्न समारंभ झालेला नव्हता. (अशा घटनेनंतरच कॉलरा, विषमज्वराची साथ येते हा पूर्वानुभव होता). आता मग ही साथ कशी उदभवली याचं उत्तर शोधायचं होतं.

मी गावात एक पदयात्रा काढली. चारही विहिरी पाहिल्या. चांगल्या होत्या. जवळ्पास कुठे त्या विहिरींचं पाणी प्रदूषित होईल असं काही दिसलं नाही. चारही विहिरांना चांगला दोन तीन फूटी कठडा होता. पाणी काढायला रहाट होते. आणखीही एक गोष्ट लक्षात आली होती की चार पैकी एका विहिरीच्या वापरकर्त्यात विषमज्वराची एकही केस झालेली नव्हती. (सोईसाठी आपण या विहीरीला चौथी विहीर म्हणू या.) माझ्या मनाच्या एका कोप-यात याची नोंद झाली. पहाणीच्या दरम्यान गावात आणखी एक पाचवी विहिर दिसली. पाणी गढूळ होतं. या पाचव्या विहिरीला पाय-या होत्या. मुख्य म्हणजे या विहिरीला कठडा नव्हता. आणि बाजूनंच वीस एक फूटावरून नाला वहात होता. त्याच्या काठावरच प्रातर्विधी करण्याची जागा! पण या विहिरीचं पाणी पिण्यासाठी अजिबात वापरलं जात नाही असं गावातल्या पन्नास एक जणानी तरी ठामपणे सांगितलं.

पदयात्रा आटोपून आम्ही परत ग्रामपंचायत ऑफिसात आलो. मी सर्व रिपोर्ट परत एकदा पाहिला. साथीच्या उद्रेकातली पहिली केस केंव्हा झाली, त्या साथीनं कळस केंव्हा गाठला ते तपासलं आणि लक्षात आलं जर ही साथ पाण्यातून पसरली असेल तर पाण्याचं प्रदूषण दिवाळीच्या सुमारास झालं असणार. (इथं एक गोष्ट सांगितली पाहिजे. रोगजंतू शरीरात गेले की लागलीच रोग होत नाही. त्याला काही कालावधी लागतो. या कालावधीस "इन्क्युबेशन पिरीअड" (अधिशयन कालावधी) असं म्हणतात. हा कालावधी प्रत्येक रोगासाठी ठराविकच असतो. विषमज्वरात हा कालावधी १० ते १४ दिवस, क्वचित २१ दिवस इतका असतो. मनातल्या मनात आंकडेमोड केली आणि "दिवाळीच्या सुमारास" हा अंदाज बांधणं शक्य झालं होतं) मग मी गावक-यांकडे चौकशी केली की दिवाळीच्या सुमारास गावात काही विशेष, लक्षात येण्यासारखं घडलं होतं कां? यावर उत्तर मिलालं की: "हो, जोरदार पाऊस झाला होता आणि विशेष म्हणजे त्यामुळे त्या दिवशी भारतभर ब-याच ठिकाणी दिसलेलं खग्रास सूर्यग्रहण ते गावकरी बघू शकले नव्हते." मला त्या सूर्यग्रहण प्रकरणात त्या क्षणी तरी इंटरेस्ट नव्हता, मी पूढे विचारलं: " मग त्या दिवशी पिण्याच्या पाण्याचं काय केलंत?" यावर उत्तर आलं : " त्या दिवशी गावातल्या तीन विहिरींभोवती इतका चिखल सांठला होता की दोन दिवस त्या विहीरींच्या जवळ जाणं सुद्धा शक्य झालं नव्हतं, मग त्या विहीरीतून पाणी भरण्याची गोष्टच दूर." मग गावक-यांनी दोन दिवस नाल्याकाठच्या त्या पाचव्या विहीरीतून पिण्या साठी पाणी घेतलं. तिथं चिखल झालेला नव्हता! पण आणखीही एक महत्वाची गोष्ट कळली ती अशी की त्या पावसानं त्या विहीरीजवळचा नाला भरून वाहिला आणि त्याचं प्रदूषित पाणी जवळ्च्या त्या विहीरीत गेलं कारण त्या पाचव्या विहीरीला कठडा नव्हता. पाणी उघडपणे प्रदूषित झालेलं होतं. गावक-यांना ते उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. पण दिवाळीचा सण होता. तीन विहीरी बाजूला झालेल्या चिखलामुळे तात्पुरत्या निकामी झालेल्या. त्यांचाही नाईलाज झाला होता. त्यांनी पाणी गाळून घेतलं असं त्यांचं म्हणणं! बिच्चारे गावकरी! विषमज्वराचे जीवाणू अशा गाळण्याला दाद देत नाहीत हे त्यांना माहीतच नव्हतं.

चला, एक कोडं सुटलं होतं. पण मला एक गोष्ट आणखी जाणून घायची होती. मी विचारलं की गावाला ती चौथी विहीर उपलब्ध होती. तिच्या भोवती तर दिवाळीत चिखल झालेला नव्हता. त्या वस्तीतल्या गावक-यांनी नेहेमी प्रमाणे आपल्या विहीरीवरून पाणी भरलं होतं. त्यात ब्लिचिंग पावडर पण टाकलेली होती. ते नाल्याकडच्या पाचव्या विहीरीकडे फिरकले सुद्धा नाहीत. मग इतर गावकरी नाल्याकाठच्या पाचव्या विहीरी ऐवजी त्या चौथ्या विहीरीकडे कां गेले नाहीत? ते स्वच्छ पाणी त्यांनी कां वापरलं नाही? बैठकीत शांतता पसरली. मला उत्तर बैठकीत मिळालं नाही. संध्याकाळी नांदेडला परत येतांना बरोबर गावातलाच एक जण होता. त्यानं सांगितलं. "ती चौथ्या विहीरी जवळची वस्ती कोणती होती तुम्ही पहिलंत ना साहेब? गावकरी त्या विहीरीकडे जाणं शक्यच नव्हतं! पाणी पिणं तर दूरची गोष्ट."

म्हणजे पहा, उरलेल्या तीन विहीरीच्या वापरकर्त्यांनी त्या वस्तीत जावून चौथ्या विहिरीतलं स्वच्छ, ब्लिचिंग टाकलेलं पाणी पिण्यापेक्षा सरळ सरळ प्रदूषित पाणी पिणं पसंत केलं होतं. आता हे असं कां केलं त्यांनी? पाणी घेण्यासाठी ते त्या वस्तीत कां गेले नाहीत? भारतात रहाणा-यांना तरी याचं उत्तर जास्त स्पष्ट करून सांगायची गरज नसावी.

नाल्याकाठच्या "त्या’ पाचव्या विहीरीला गावक-यांनी आता कठडा बांधलाय. पण मला तर त्या गावात एक अदृष्य भिंतच दिसत होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म... काय बोलावं लोकांना ? अजुनही... खरच कठीण आहे...

नुकतीच अमेरिकेतील वर्णभेदाच्या पार्श्वभूमीवरची एक बातमी वाचली... जगभरात आहे हे सगळं Sad

आपण वाचणार्‍या प्रत्येकाने जर स्वतः पासुन सुरूवात केली तर खरच, ही 'अद्रुश्य भिंत' जमीनदोस्त होण्यास मदत निश्चित होइल.

आपण वाचणार्‍या प्रत्येकाने जर स्वतः पासुन सुरूवात केली तर खरच, ही 'अद्रुश्य भिंत' जमीनदोस्त होण्यास मदत निश्चित होइल.
>>>+१

डॉक्टर....

अगदी सुन्न करुन टाकणारी ही वस्तुस्थिती शक्य तितक्या संयत भाषेत तुम्ही इथे व्यक्त केली आहे. काय प्रतिक्रिया व्यक्त करावी अशा कोत्या मनोवृत्तीवर ? एकीकडे आम्ही विज्ञानाच्या गप्पा मारायच्या आणि त्याचवेळी शतकानुशतकाची बेडी पायात अडकवून साथीचे रोग गावात झाले तरी चालेल, पण आम्ही अदृष्य भिंतीचे पाईक असे म्हणत राहायचे.

देशाच्या फाळणीसमयी बंगाल पेटले होते आणि म.गांधींनी नौखालीचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत जे कार्यकर्ते गेले होते त्यात थोर समाजवादी कार्यकर्ते शिरूभाऊ लिमये होते. त्यानी नौखालीची भीषणता अनुभवली. जनावरांपेक्षाही माणसाला कमी किंमत येऊन अक्षरशः शिरकाण चालले होते. त्यानी तिकडच्या काही करुण कथा पुढे इथे व्याख्यानातून सांगितल्या होत्या. नौखालीतील दंगलग्रस्त भागातील लोकांना नदीपलिकडे नेण्यास काही नौकांची व्यवस्था करण्यात आली होती; पैकी काही नौकात ही पीडित मंडळी बसायला तयार नव्हती. कारण ? कारण, त्या नौका हरिजनांच्या होत्या. तशा वणव्यातही आपले बंगाली बंधू भेदाभेद विसरायला तयार नाहीत हे पाहून मग ते हरिजन चक्क मुसलमान झाले आणि नव्याने निर्माण झालेल्या पूर्व बंगालचे नागरिकत्व त्यानी मिळविले.

चौथ्या विहिरीचे शुद्ध पाणी जर चालत नसेल तर मग पाचवी विहिर विषासमान असली तरी आम्हाला चालेल असे म्हणणे मांडणारे आजच्या काळातील 'श्रेष्ठ' लोक आणि १९४७ च्या सुमारातील नौखालीतील श्रेष्ठ यांच्यात फरक तो काय ?

अशोक पाटील

डॉक्टर,

वाचुन मन अगदी गढूळ झालं, अजुनही अश्या भिंती आपल्या समाजात आपल्या डोळ्यांसमोर उभ्या केल्या जातात.
ह्यावर उपाय आहेत खरे, पण ते कितीसे उपयुक्त होतील हे पहावं लागेल आधी . . . .म्हणजे सहकार्यासाठी किती आणी कशी मदत मिळु शकेल !

थोडा वेळ जाऊ द्यावा उत्तर बहुतेक ह्या बाफ वरच मिळेल . . . .

भारतीय माणसे मंगळ, चंद्रावर गेली तरी जातीयवाद सोडायचि नाहीत, कोकणस्थ देशस्थ भेद आहे, तसा तिथे चंद्रस्थ मंगळस्थ भेद काढतील. चंद्रावरचा पाटील आणि मंगळावरचा देशमुख Proud Proud

असच काही नाही की हा भेदाभेद फक्त भारतातच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/nazism-in-europe-and-the-united-...

हे वाचुन मन विषण्ण झालं. परदेशात (अगदी कोरियातही- आशियाई देश) भारतीयांना कमी लेखले जाते. जातीभेदाचे पुढचे पाऊल म्हणा हवं तर... Sad

धन्यवाद दोस्त हो!
माझा विषय "रोग प्रतिबंधक आणि सामाऔषध्वैधवैद्यक शास्त्र" रोगाची सामाजिक कारणं शोधणं हे माझं काम ! या बाबतीत साथ विषम ज्वराची होती. ते झालं साथीचं सूक्ष्म्जीव शास्त्रीय कारण. पाचव्या विहिरीला कठडा नव्हता आणि त्यातून नाल्याचं दूषित पाणी जावून ते पाणी गावातले लोक प्याले हे झालं पर्यावरणीय कारण. समस्येच्या मूळाशी जाऊन पाहिलं तर खरं कारण कळालं. शोध कार्य तिथं पूर्ण झालं, पण खरं काम तिथून सुरू झालं होतं !
-अशोक

>> असच काही नाही की हा भेदाभेद फक्त भारतातच आहे.
हे बोललं की भागतं का?
आपल्याला कॅन्सर झाला तर आपण 'मलाच नाही काही, कित्येकांना होतो - काहीजण तर मरतातसुद्धा!' असं म्हणून स्वस्थ बसतो का? घरात कचरा दिसला तर 'होतो हो लोकांच्या घरातही, आमच्याच नाही!' असं म्हणून तो न झाडता राहू देतो का?

तुम्हालाच म्हणत नाही विजय देशमुख, पण हे आर्ग्युमेन्ट सतत वेगवेगळ्या रूपात कानांवर पडत राहतं म्हणून बोलले. भारतातच नाही, जगभर होतं / हिंदूंनाच कशाला नावं ठेवा, सगळ्या धर्मांची लोकं हे करतातच - असं म्हणून प्रश्न सुटतात का?

खरंच, हा "विषम" ज्वर कधी नाहीसा होईल?

डॉ,
प्रामाणिकपणे सांगतो की एखाद्या खेड्यातल्या साथीचे कारण इतक्या मुळात जावून कोणी शोधून काढत असेल असे वाटलेही नव्हते.
खरंच अशी जागृत सरकारी आरोग्य यंत्रणा प्रत्येक तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आहे का?

कठीण आहे!
मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आले - गावात पाण्याची सोय म्हणून नळ कोंडाळे आले की काही काळातच त्याचीही वाटणी होते.

रा.रा. गमभन.......साठीसाथीचा तपासणी अहवाल मी एका राष्त्रीय जर्नल मधून प्रसिद्ध केलाय.पंण मी खरं कारण देऊ शकलो नाही !!

डॉ. अशोक,
तुम्ही पदवी मिळवताना शपथ घेतली होती म्हणून ठीक आहे.
पण आमच्यासारखे, ज्यांनी असली शपथ घेतली नाही, नि वाचले की केवळ मूर्खासारख्या समजुतींमुळे स्वतःवर रोग ओढवून घेतला त्यांना मी म्हणेन -
छान! पडा मग आजारी! उघड्या डोळ्यांनी निवड केलीत तेव्हा भोगा त्याची फळं! उत्तम.
Angry
कारण ज्या वस्तीतल्या लोकांना आपल्या विहीरीचे पाणी स्वच्छ ठेवायची अक्कल आहे, त्यांचे काही बिघडले नाही. ज्यांना स्वतःला आपले पिण्याचे पाणी स्वच्छ, निर्जंतुक करता येत नाही, इतक्या वर्षांत शिकले नाहीत की असे भेदभाव करू नयेत, असले लोक मेलेलेच बरे. त्यांना शिकवून ते शहाणे तर होणार नाहीतच पण आपले रोग इतर लोकांत पसरवतील. जसे जीवाणू, जंतू तसेच हे लोक!!

भारतीय माणसे मंगळ, चंद्रावर गेली तरी जातीयवाद सोडायचि नाहीत, कोकणस्थ देशस्थ भेद आहे, तसा तिथे चंद्रस्थ मंगळस्थ भेद काढतील. चंद्रावरचा पाटील आणि मंगळावरचा देशमुख

चंद्र, मंगळ दूरच आहेत. सध्या मायबोलीवर कुणा अमेरिकेतल्या किंवा इतर देशातल्या माणसाने भारताबद्दल लिहीले की भारतीय लोक तुम्हाला काय कळतय्, तुम्हाला काय करायचे आहे असली भाषा बोलतात.

हे बोललं की भागतं का?
भारतात चालते.

डॉ. अशोक सारखे लोक फार थोडे तिथे. बहुसंख्य लोक काही करत नाहीत. असली कारणे सांगून सारवासारव करतात.

नि स्वाती_आंबोळे, अहो जपून. तुम्ही अमेरिकेत रहाता. लग्गेच कुणितरी येऊन लिहीतील की परदेशात रहाणार्‍या लोकांनी कशाला भारताबद्दल बोलावे?

कारण ज्या वस्तीतल्या लोकांना आपल्या विहीरीचे पाणी स्वच्छ ठेवायची अक्कल आहे, त्यांचे काही बिघडले नाही. ज्यांना स्वतःला आपले पिण्याचे पाणी स्वच्छ, निर्जंतुक करता येत नाही, इतक्या वर्षांत शिकले नाहीत की असे भेदभाव करू नयेत, असले लोक मेलेलेच बरे. त्यांना शिकवून ते शहाणे तर होणार नाहीतच पण आपले रोग इतर लोकांत पसरवतील. जसे जीवाणू, जंतू तसेच हे लोक!!
<<
झक्की,
गाल कुठे आहेत?
(एक पप्पी Wink )
पाय कुठे आहेत?
चरणस्पर्श!

चला, मी लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रिया देणा-यांचं पण कवतिक होतंय हे बघून इतका आनंद झालय म्हणून सांगू. मूळ लेख सुद्धा विसरायला झालं बघा !!

स्वाती_आंबोळे,

>> असं म्हणून प्रश्न सुटतात का?

नाही. म्हणूनच रामकृष्ण परमहंस आदिंचा आदर्श अनुसरला पाहिजे. ते अस्पृश्यता पाळत नसत.

आ.न.,
-गा.पै.

>> असच काही नाही की हा भेदाभेद फक्त भारतातच आहे.
हे बोललं की भागतं का?
आपल्याला कॅन्सर झाला तर आपण 'मलाच नाही काही, कित्येकांना होतो - काहीजण तर मरतातसुद्धा!' असं म्हणून स्वस्थ बसतो का? घरात कचरा दिसला तर 'होतो हो लोकांच्या घरातही, आमच्याच नाही!' असं म्हणून तो न झाडता राहू देतो का?

तुम्हालाच म्हणत नाही विजय देशमुख, पण हे आर्ग्युमेन्ट सतत वेगवेगळ्या रूपात कानांवर पडत राहतं म्हणून बोलले. भारतातच नाही, जगभर होतं / हिंदूंनाच कशाला नावं ठेवा, सगळ्या धर्मांची लोकं हे करतातच - असं म्हणून प्रश्न सुटतात का?

"मी सगळीकडे होतय म्हणुन भारतात झालं तर काय झालं" असं म्हणत नाहिय. पुढचं माझं वाक्य नजरेतुन सुटलं की काय. Happy

जगात सगळीकडे हे होतय आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काळासोबत हा द्वेष कमी होण्याऐवजी वाढत चाललाय. यावर मला वाईट वाटतं, आनंद होत नाही.

छान लेख.. छान विचार.. डॉक्टरी पेश्यातल्या व्यक्तीचे असे विचार असणे गरजेचे आहे.. त्याचा लेख बनवून सादर करणे आणखी कौतुकास्पद..

सोशल साईटवरचा (मुख्यते एकेकाळचे ऑर्कुट) माझा आवडीचा विषय आहे हा जातीभेद. दूर दुर्गम गावातच नाही तर शहरातील सुशिक्षित आणि सुसंस्कृतही यातून सुटले नाहीत हे मी बरेचदा चर्चेच्या ओघात अनुभवले आहे. फरक इतकाच की यातले काही तथाकथित उच्च जातीय आम्ही इतर जातींचा द्वेष नाही करत मात्र आमची जात श्रेष्ठ समजतो असा युक्तीवाद करतात. तर त्याचबरोबर खालची जात म्हणून समजले जाणार्‍यांची आजची सुशिक्षित पिढी देखील आजवरच्या अन्यायाचा एक द्वेष मनात बाळगून असते.. हे ही चूकच..

असो, वैद्यकीय भाषेतच बोलायचे तर हा एक असा आजार आहे जो पुर्णता बरे होणे अशक्यच... बस्स शक्य तितके कंट्रोलमध्ये कसा राहील हे बघायचे..

हाडामासाच्या माणसापेक्षा ज्यांना विष्ठायुक्त पाणी गोड लागते त्यांना माणूस म्हणावे का डुक्कर??

वाचुन फार वाईट वाटलं . खरतर असा भेदभाव पाळणार्‍या लोकांजवळ जाण्याचीच मला किळस वाटेल. अशा लोकांचे पाणी तर सोडाच पण सावली पण अंगावर पडू नये.

Pages