अदृष्य भिंत ......

Submitted by डॉ अशोक on 16 July, 2013 - 01:42

अदृष्य भिंत ......

सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात काम करणा-यांना संसर्गजन्य रोगाच्या साथीचं इन्वेस्टीगेशन करणं म्हणजे काय आव्हान आहे हे माहित असतं. मला माझ्या ३०-३५ वर्षांच्या सर्व्हीस मधे असे प्रसंग अनेकदा आले. पेशंटच्या एखाद्या दुर्मिळ रोगाचं निदान आणि एखाद्या साथीचं निदान यात साम्य एकच आहे आणि ते म्हणजे यातून मिळणारं समाधान. यातल्या एका साथीचा किस्सा सांगण्यासारखा आहे.

दिवाळी नुकतीच झाली होती आणि कळलं की नांदेड जिल्ह्यातल्या एका गावात विषमज्वरानं (टायफॉइड्नं) थैमान घातलंय. जिल्हा आरोग्य अधिकारी माझे परिचित होते. त्यांनी मदती साठी निरोप दिला. नांदेडच्या वैद्यकिय महाविद्यालयातले फिजीशिअन, पिडीऍट्रीशिअन, मायक्रोबायलोजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रद्न्य अशी टीम घेवून आम्ही ते गाव गाठलं. हजार दीड हजार वस्तीचं ते गाव होतं. गावातच शाळेत पेशंट्ना उपचाराची सोय केली होती. आरोग्य खात्यानं घरोघर जावून पहाणी केली होती. ती आकडेवारी उपलब्ध होती. गावात मलेरिया साठी येणारा एक कर्मचारी होता. त्याच्या लक्षात सर्वप्रथम ही बाब आली की तापाच्या रोग्याच्या संख्येत अचानक वाढ झालीय. त्यानं तात्काळ त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिका-याला रिपोर्ट केला. त्या वैद्यकिय अधिका-यानं लागलीच त्या गावात येवून धांडोळा घेतला आणि नांदेडला जिल्हा आरोग्य अधिका-याला कळवलं. ते पण त्यांची टीम घेवून आले. पण साथीचा उगम काही कळला नव्ह्ता. साथ विषमज्वराची होती यात शंका नव्हती कारण काही पेशंटनी नांदेडला येवून तपासणी करून घेतली होती. दोघे तर आमच्या नांदेडच्या मेडीकल कॉलेजच्या हॉस्पिटलात दाखल झाले होते.

इतक्या कमी कालावधीत उद्भवलेल्या इतक्या केसेस आणि एक वर्षाच्या आतल्या एकाही मुलाला न झालेली लागण या बाबी ही साथ पाण्यातून पसरली आहे असं दर्शवत होती. गावात पिण्याच्या पाण्यासाठी चार विहिरी वापरात होत्या. त्यात नियमितपणे ब्लिचिंग पावडर टाकली जात असे. त्याबाबत गावका-यांनी पण दुजोरा दिला. आणि ही कार्यवाही साथ सुरू होण्याच्या आधी पण होत होती. ही एक दुर्मिळ अशी गोष्ट होती. अशा साथीत बहूदा संबंधित कर्मचारी गावात रहात नाही, पाण्यात पावडर टाकत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी गावकरी करतात. त्याला निलंबित करण्याची मागणी होते. पण इथं गावकरी ठामपणे त्याच्या पाठीशी उभे होते. गावातल्या ब्लिचिंगच्या साठ्याची आणि स्टॉकबुकची तपासणी केली, ती पण गावक-यांच्या आणि त्या कर्मचा-याच्या दाव्याला पूरकच होती. गावात मागील महिन्या-दिड महिन्यात यात्रा, उत्सव किंवा लग्न समारंभ झालेला नव्हता. (अशा घटनेनंतरच कॉलरा, विषमज्वराची साथ येते हा पूर्वानुभव होता). आता मग ही साथ कशी उदभवली याचं उत्तर शोधायचं होतं.

मी गावात एक पदयात्रा काढली. चारही विहिरी पाहिल्या. चांगल्या होत्या. जवळ्पास कुठे त्या विहिरींचं पाणी प्रदूषित होईल असं काही दिसलं नाही. चारही विहिरांना चांगला दोन तीन फूटी कठडा होता. पाणी काढायला रहाट होते. आणखीही एक गोष्ट लक्षात आली होती की चार पैकी एका विहिरीच्या वापरकर्त्यात विषमज्वराची एकही केस झालेली नव्हती. (सोईसाठी आपण या विहीरीला चौथी विहीर म्हणू या.) माझ्या मनाच्या एका कोप-यात याची नोंद झाली. पहाणीच्या दरम्यान गावात आणखी एक पाचवी विहिर दिसली. पाणी गढूळ होतं. या पाचव्या विहिरीला पाय-या होत्या. मुख्य म्हणजे या विहिरीला कठडा नव्हता. आणि बाजूनंच वीस एक फूटावरून नाला वहात होता. त्याच्या काठावरच प्रातर्विधी करण्याची जागा! पण या विहिरीचं पाणी पिण्यासाठी अजिबात वापरलं जात नाही असं गावातल्या पन्नास एक जणानी तरी ठामपणे सांगितलं.

पदयात्रा आटोपून आम्ही परत ग्रामपंचायत ऑफिसात आलो. मी सर्व रिपोर्ट परत एकदा पाहिला. साथीच्या उद्रेकातली पहिली केस केंव्हा झाली, त्या साथीनं कळस केंव्हा गाठला ते तपासलं आणि लक्षात आलं जर ही साथ पाण्यातून पसरली असेल तर पाण्याचं प्रदूषण दिवाळीच्या सुमारास झालं असणार. (इथं एक गोष्ट सांगितली पाहिजे. रोगजंतू शरीरात गेले की लागलीच रोग होत नाही. त्याला काही कालावधी लागतो. या कालावधीस "इन्क्युबेशन पिरीअड" (अधिशयन कालावधी) असं म्हणतात. हा कालावधी प्रत्येक रोगासाठी ठराविकच असतो. विषमज्वरात हा कालावधी १० ते १४ दिवस, क्वचित २१ दिवस इतका असतो. मनातल्या मनात आंकडेमोड केली आणि "दिवाळीच्या सुमारास" हा अंदाज बांधणं शक्य झालं होतं) मग मी गावक-यांकडे चौकशी केली की दिवाळीच्या सुमारास गावात काही विशेष, लक्षात येण्यासारखं घडलं होतं कां? यावर उत्तर मिलालं की: "हो, जोरदार पाऊस झाला होता आणि विशेष म्हणजे त्यामुळे त्या दिवशी भारतभर ब-याच ठिकाणी दिसलेलं खग्रास सूर्यग्रहण ते गावकरी बघू शकले नव्हते." मला त्या सूर्यग्रहण प्रकरणात त्या क्षणी तरी इंटरेस्ट नव्हता, मी पूढे विचारलं: " मग त्या दिवशी पिण्याच्या पाण्याचं काय केलंत?" यावर उत्तर आलं : " त्या दिवशी गावातल्या तीन विहिरींभोवती इतका चिखल सांठला होता की दोन दिवस त्या विहीरींच्या जवळ जाणं सुद्धा शक्य झालं नव्हतं, मग त्या विहीरीतून पाणी भरण्याची गोष्टच दूर." मग गावक-यांनी दोन दिवस नाल्याकाठच्या त्या पाचव्या विहीरीतून पिण्या साठी पाणी घेतलं. तिथं चिखल झालेला नव्हता! पण आणखीही एक महत्वाची गोष्ट कळली ती अशी की त्या पावसानं त्या विहीरीजवळचा नाला भरून वाहिला आणि त्याचं प्रदूषित पाणी जवळ्च्या त्या विहीरीत गेलं कारण त्या पाचव्या विहीरीला कठडा नव्हता. पाणी उघडपणे प्रदूषित झालेलं होतं. गावक-यांना ते उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. पण दिवाळीचा सण होता. तीन विहीरी बाजूला झालेल्या चिखलामुळे तात्पुरत्या निकामी झालेल्या. त्यांचाही नाईलाज झाला होता. त्यांनी पाणी गाळून घेतलं असं त्यांचं म्हणणं! बिच्चारे गावकरी! विषमज्वराचे जीवाणू अशा गाळण्याला दाद देत नाहीत हे त्यांना माहीतच नव्हतं.

चला, एक कोडं सुटलं होतं. पण मला एक गोष्ट आणखी जाणून घायची होती. मी विचारलं की गावाला ती चौथी विहीर उपलब्ध होती. तिच्या भोवती तर दिवाळीत चिखल झालेला नव्हता. त्या वस्तीतल्या गावक-यांनी नेहेमी प्रमाणे आपल्या विहीरीवरून पाणी भरलं होतं. त्यात ब्लिचिंग पावडर पण टाकलेली होती. ते नाल्याकडच्या पाचव्या विहीरीकडे फिरकले सुद्धा नाहीत. मग इतर गावकरी नाल्याकाठच्या पाचव्या विहीरी ऐवजी त्या चौथ्या विहीरीकडे कां गेले नाहीत? ते स्वच्छ पाणी त्यांनी कां वापरलं नाही? बैठकीत शांतता पसरली. मला उत्तर बैठकीत मिळालं नाही. संध्याकाळी नांदेडला परत येतांना बरोबर गावातलाच एक जण होता. त्यानं सांगितलं. "ती चौथ्या विहीरी जवळची वस्ती कोणती होती तुम्ही पहिलंत ना साहेब? गावकरी त्या विहीरीकडे जाणं शक्यच नव्हतं! पाणी पिणं तर दूरची गोष्ट."

म्हणजे पहा, उरलेल्या तीन विहीरीच्या वापरकर्त्यांनी त्या वस्तीत जावून चौथ्या विहिरीतलं स्वच्छ, ब्लिचिंग टाकलेलं पाणी पिण्यापेक्षा सरळ सरळ प्रदूषित पाणी पिणं पसंत केलं होतं. आता हे असं कां केलं त्यांनी? पाणी घेण्यासाठी ते त्या वस्तीत कां गेले नाहीत? भारतात रहाणा-यांना तरी याचं उत्तर जास्त स्पष्ट करून सांगायची गरज नसावी.

नाल्याकाठच्या "त्या’ पाचव्या विहीरीला गावक-यांनी आता कठडा बांधलाय. पण मला तर त्या गावात एक अदृष्य भिंतच दिसत होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्को पोलो,

>> अशा लोकांचे पाणी तर सोडाच पण सावली पण अंगावर पडू नये.

सावधान! नेमक्या या सावलीच्या विटाळापायीच ही परिस्थिती उद्भवलीये! Sad

आ.न.,
-गा.पै.

<<.....रोगाची सामाजिक कारणं शोधणं हे माझं काम ! >> खूप कुतुहल ह्याबद्दल, अशोकजी. अनेकदा वैद्यकीय क्षेत्रात शोध लागूनही ह्या लेखातल्यासारखी सामाजिक भिंत आडवी येते. किती ही जिविताची हानी...

पाणी गाळूनही विषमज्वरासारखा रोग होईल... अन मराल... मुकाटपणे "त्या" वस्तीतल्या विहिरीतून् पाणी घेण्याविना पर्याय नाही.
हे माहीत अस्तं तर?

तर मला खात्री आहे... "ह्या" वस्तीतल्यांनी आधी होम-हवन करून विहिर शुद्धं कशी करून घेता येईल ह्यावर वेळ घालवला असता. इतकच नव्हे तर... त्यानंतर "त्या" वस्तीला पाण्यासाठी नवीन विहिर खोदावी लागली असती.
जsssरा कातडी खरवडली की पहिल्या जातीच्या पेशी उघड्या होतात.

सुंदर लेख, अशोकजी.

एंटीमेटर आणि मार्कोपोलो
तुमची भावना समजली. पण, मार्कोपोलो.... तुमच्या भाषेवरून तुम्ही एक नवीच अस्पृष्यता आणत आहात असं नाही वाट्त तुम्हाला?
-अशोक

मार्कोपोलो...
तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार. पण ही नवीन अस्पृश्यता तुम्ही आणता आहात हे कृपया ध्यानात घ्या !!

स्चाती+१
खरे तर असे भिंतींच्या अलीकडल्या जगात राहणारे लोक आजन्म आजारीच.
शब्दखुणांमधला 'शासन' हा शब्द वाचून बरे वाटले.
हा प्रश्न केवळ शासकीय पातळीवर सुटणारा मात्र नाही.

<.......साठीसाथीचा तपासणी अहवाल मी एका राष्त्रीय जर्नल मधून प्रसिद्ध केलाय.पंण मी खरं कारण देऊ शकलो नाही !> Sad का बरं?

विषमज्वराचे जीवाणू अशा गाळण्याला दाद देत नाहीत हे त्यांना माहीतच नव्हतं.>>>>>>>>>>> आनि ही विषमता संपवण्यासाठी काम करण्यार्ना सुदधा गावकरी कधीही दाद देणार नाहीत... कधीच नाही.. पुर्ण सत्य एवढच आहे. भले मग ते आजारी पडो आनि मरो..

डॉ अशोक,

>> तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार. पण ही नवीन अस्पृश्यता तुम्ही आणता आहात हे कृपया ध्यानात घ्या !!

मार्कोपोलोंचा हेतू तसा नसावा (बहुतेक). आपण सार्‍यांनी आपली भाषा सजगपणे वापरायला हवी. Happy

आ.न.,
-गा.पै.

सरकारदरबारी रिपोर्ट करताना चौथ्या विहीरीचा मुद्दाही रिपोर्ट करायला हवा होता.
'सामाजिक विषमतेचे समाजस्वास्थ्य्यावर परिणाम' हे पी एस एम अंतर्गतच येतं .
उद्या जातीयविषमतेचे सामाजिक आरोग्यावर परिणाम असा एखादा थिसीस तुमचा विद्यार्थी करू शकेल.

हा लेख आणि तुमची लिखाणाची शैली आवडली.

बाकी पीएसएम हा शिकत असताना फार आवडता आणि स्कोरिंग विषय होता माझा.
पीएसएमच्या वायवा आणी कॅल्क्युलेशन्स फारफार आवडते होते.

वारकरी दिंडी मध्ये असताना अस्पृश्याता पळत नाहीत असे एकले आहे किंबहुना दूरदर्शन वर तसेच सांगतायत गेले १५ दिवस.

मग या वारकर्यांना घरी परत आल्यावर असा कोणता किडा चावतो, कि आपली काढून ठेवलीली जातीभेदाची अंगवस्त्रे पुन्हा अंगावर मिरवतात

हो...जी काही केल्या जात नाही.. तिलाच जात म्हणायचं!
ह्या प्रकरणात कोणालाही दुरुस्ती नको आहे....बाकी सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत.
आजचं राजकारणच जातिभेदाला खतपाणी घालतयं.... किंवहुना ते त्यावरच चालतय हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

Pages